Tuesday, April 23, 2013

कलम कसाई



मोगलाईत पगारी सैनिक असायचे त्यांना वेळच्यावेळी पगार देण्याचे काम कारकुनाकडे असायचे. एकदा एका दांडग्या शिपायाचा कारकुनाशी कसला वाद झाला. तर त्या शिपायाने याला दम भरला. ‘हाडं मोडून हातात देईन म्हणून’. बिचारा किरकोळ अंगयष्टीचा कारकुन गप्प बसला. करतो काय? पण तेव्हापासून त्याने डूख धरला होता. कधीतरी या शिपायाला अद्दल घडवायचा. आतासारखी तेव्हा नव्हती ओळखपत्रे किंवा अन्य कसल्या खाणाखुणा. मग नेमक्या शिपायाला वा चाकरालाच पगार देणार कसा? तर शरीरावरची काहीतरी खूण नोंदवून ठेवलेली असायची. त्याही शिपायाची अशीच काही पाठीवरच्या डागाची खूण होती. वर्षभरात कारकुनाची नेमणूक बदलली, तेव्हा जाण्यापुर्वी त्याने दांडगाई केलेल्या शिपायाला धडा शिकवण्याची संधी साधून घेतली. अधिकार सुत्रे नव्या कारकुनाला देण्यापुर्वी त्याने दफ़्तरात त्या शिपायाच्या शारिरीक खुणेची नोंद बदलून टाकली. पुढल्या महिन्यात शिपाई पगार घ्यायला आला, तर पाठीवरचा डाग दाखवूनही त्याला नवा कारकुन पगार देईना. कारण दफ़्तरी शारिरीक खुण वेगळीच नोंदलेली होती.

नाव अमूक तमूक आणि शारिरीक खुण होती समोरचे वरचे दोन दात पडलेले. आता काय करायचे? शिपाई दात लपवू शकत नव्हता आणि ओळख पटत नसल्याने नवा कारकुन त्याला पगार देत नव्हता. पण शिपाई थोडाच ऐकतो? चार शतकांनंतर प्रस्थापित होणार्‍या चळवळीच्या वंशजांचा तो आद्यपुरूष होता. त्याने कारकुनाची ‘वर’ तक्रार केली आणि दाद मागायचा पवित्रा घेतला. थेट आपल्या जमादार, फ़ौजदार यांच्यापासून सरदार मनसबदारापर्यंत दार ठोठावण्यात वर्षभराचा काळ खर्च केला तरी उपयोग झाला नाही. कारण आधीच्या कारकुनाने केलेली नोंद बदलणे कोणाच्याच हाती नव्हते. अखेर बादशहाच्या विश्वासातल्या एका खुशमस्कर्‍याने त्याला मुक्तीचा मार्ग दाखवला आणि चौदाव्या महिन्यात त्याचा सगळा थकलेला पगार एकरकमी मिळाला. कारण दफ़्तरी नोंदलेली खुण पटवण्याचा मार्ग त्याने चोखाळला होता. निमूट वैद्याकडे जाऊन शिपायाने वरचे पुढले दोन दात पाडून घेतले. खुण पटली आणि पगार मिळाला.

सरकारी दफ़्तरात कारकुन होत्याचे नव्हते व नव्हत्याचे होते करू शकतो आणि अवघे प्रशासन त्यात अवाक्षर बदलू शकत नाही, ही तेव्हापासूनची थोर परंपरा आजही स्वतंत्र भारतात तशीच नांदते आहे. आता तर बादशाही सुद्धा राहिलेली नाही. कारकुनच राजे व मंत्री, मुख्यमंत्री व पंतप्रधान होतात. तेव्हा आधार कार्ड असो की साधार कार्ड असो, आपण सगळे सामान्यजन निराधारच असतो. कारण कलम चालवू शकणार्‍यांच्या कसाईखान्यात आपण कत्तल होणारी मूक जनावरेच असतो. कारण आपल्यावर ‘कलम कसाई’ राज्य करतात.

No comments:

Post a Comment