Sunday, August 11, 2013

इतका ओरडा कशाला?



  

   शुक्रवारपासून दाऊद कुठे आहे, त्याचा सर्वच वाहिन्या शोध घेत आहेत. पकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांचे खास दूत असलेले शहरीयार खान यांनी, दाऊद आता पाकिस्तानात नाही आणि त्याला पाकिस्तानातून पळवून लावले, असे वक्तव्य करताच, इथे गदारोळ सुरू झाला. जणू पाकिस्तानने तो तिथेच असल्याचे कबुल केल्यास त्याला भारत उचलूनच आणणार आहे, असा एकूण चर्चेचा सूर होता. शहरीयार खान असो, की पाकचे पंतप्रधान असोत त्यांच्या नावातच शरीफ़ असा शब्द असतो. बाकी त्यांनी शराफ़त कधीच सोडून दिलेली आहे. त्यामुळे असल्या वांझोट्या चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. अमेरिकेने ज्याप्रमाणे पाकिस्तानात दडी मारून बसलेल्या ओसामाला पाकसेना व गुप्तचर खात्याचेच संरक्षण मिळाले असल्याचे ओळखले आणि पाकच्याच मदतीने त्याला पकडायचा नाद सोडून दिला होता. पुढल्या काळात त्यांनी ओसामाचा शोध चालूच ठेवला होता, पण हाती लागलेली माहिती पाकिस्तानला न देता त्यांच्यापासून लपवलेली होती. पक्की माहिती हाती येताच पाकला अंधारात ठेवून पाक हद्दीत जाऊन ओसामाचा मुडदा पाडला होता. नुसता ओसामाला मारलाच नाही, तर त्याचा मृतदेहही अमेरिकन सैनिक घेऊन गेले होते. मग जगाला ओसामा मारला गेल्याचे कळले; तेव्हाच पाकिस्तानलाही समजले होते. त्यांच्या अतिशहाणपणाचे नाक मग जगासमोर कापले गेले होते. पाकला जी भाषा समजते, त्याच भाषेत मित्र अमेरिकेने त्यांच्या लबाडीला उत्तर दिले होते. दाऊद प्रकरणात भारताला तेच करावे लागेल आणि ते अशक्य अजिबात नाही. भारतीय गुप्तचर खाते कराचीत जाऊन दाऊदला ठार मारू शकेल. सवाल त्याला शोधण्याचा व ठार मारण्याचा नसून सरकारच्या इच्छाशक्ती व हिंमतीचा आहे.

   आपला जीव धोक्यात घालून पाकिस्तानच्या इथल्या हस्तकांना संपवण्याच्या कारवाया करणार्‍या आपल्याच गुप्तचरांना जे सरकार स्वदेशातच कायदेखटल्यात गोवू बघते आणि मतांच्या राजकारणासाठी गुप्तचर कारवायांचे पितळ उघडे पाडते; त्या सरकारवा विसंबून कुठला सैनिक वा गुप्तचर देशासाठी आपले प्राण पणाला लावू शकतो? एकवेळ आपला सैनिक वा गुप्तचर, शत्रू असलेल्या पाकिस्तानवर विश्वास ठेवू शकेल, पण आजच्या राज्यकर्त्यांवर विश्वास ठेवू शकणार नाही. मतांच्या गठ्ठ्य़ासाठी इथले राज्यकर्ते कुणाचाही गळा फ़ासात अडकवू शकतात. इशरत प्रकरणाने तेच सिद्ध केलेले आहे. पण अमेरिकेन सेना किंवा त्यांचे गुप्तचर अशा कारणाने घाबरत नाहीत. डेव्हीड हेडलीला भारताच्या हाती सोपवला, तर अमेरिकन गुप्तचर खात्याचे पितळ उघडे पडेल म्हणून तिथल्या सरकारने हेडलीला भारताच्या हवाली करण्यास साफ़ नकार दिला होता. आणि आमचे सरकार पाक हस्तकांना चकमकीत मारले, म्हणून आपल्याच गुप्तचर अधिकार्‍यांना चव्हाट्यावर आणायचे गलिच्छ राजकारण करते आहे. अशा सरकारवर विसंबून कुठला अधिकारी वा सैनिक पाक हद्दीत जाऊन दाऊदचा काटा काढू शकेल? असे काम हेरगिरी वा गुप्तचरांचे असते, म्हणजे ते प्रत्यक्षात बेकायदेशीर स्वरूपाचे काम असते. त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रकार सरकारी यंत्रणेकडून होणार नाही अशी हमी असते. त्याच विश्वासार्हतेला आजच्या युपीए सरकार व राज्यकर्त्यांनी तडा दिलेला आहे. मग दाऊदचा काटा कोणी कसा काढायचा? इशरत प्रकरणाने भारतीय गुप्तचर खात्याचे मनोबल किती खचले आहे, त्याचेच परिणाम आपण काश्मिरातील नियंत्रण रेषेवर बघत आहोत. घुसखोरी व वारंवार होणारे हल्ले गुप्तमाहिती अभावी होत आहेत.

  पाकिस्तानचे खुले समर्थन करणारे व शांततेचा आग्रह धरून भारतीय सेनेबद्दल गुप्तचरांवर उघड संशय घेणारे, इथे उजळ माथ्याने वावरत आहेत. एकप्रकारे तेच पाकचे हितसंबंध इथे बसून जपणार असतील, तर पाकला इथे वेगळे हस्तक शोधण्याची गरज काय? भारतीय कैदी सर्वजीतचा खटला चालवणार्‍या पाक वकीलावर तिथे हल्ले होतात. आणि इथे पाक हल्ले व सैनिकांच्या कुरापतीचे समर्थन करणारे उजळमाथ्याने वावरतात. मग दाऊद इथे असला वा तिकडे पाकिस्तानात असला, म्हणून काय फ़रक पडतो? बिहारचे जवान सीमेवर मारले गेले आणि सरकारनेही पाकसेनेच्या कारवाईत मारले गेले असे स्पष्टपणे सांगितले असताना; बिहारीमंत्री पाकसेनेचे समर्थन करतात, तेव्हा पाकने कोणाला हाती धरले आहे, त्याचीच साक्ष मिळते ना? मग दाऊद तिकडे लपवून ठेवायची पाकिस्तानला गरजच काय? त्याला भारतात आणले म्हणून त्याच्या कारवाया थांबणार आहेत काय? चुकून त्याचा चकमकीत मृत्यू झाला, तर मग बघायलाच नको. त्याला हुतात्मा ठरवायला इथे आकाशपाताळ एक केले जाण्याचा धोका आहे. आजच्या एका राष्ट्रीय वाहिनीचा संपादक वीस वर्षापुर्वी मुंबईत बॉम्बस्फ़ोट झाल्यावर त्यात दाऊदचे नाव गोवले गेले; म्हणून ओक्साबोक्शी रडला होता. दाऊदच्या राष्ट्रप्रेमावर शंका घेतल्याबद्दल त्याने जाहिरपण नाराजी व्यक्त करणारा लेख लिहिला होता. शुक्रवारी तोच संपादक दाऊदच्या पत्त्याबद्दल चर्चा रंगवत होता. अशा देशात पाकिस्तानला वेगळे हस्तक व घातपाती शोधायची गरज आहे काय? दाऊदचे असे उजळमाथ्याने वावरणारे प्रतिष्ठीत समर्थक असताना, त्याला लपून रहाण्याची गरजच काय? तो पाकिस्तानात कशाला भारतातही उजळमाथ्याने वावरू शकेल. त्याबद्दल ओरडा करायचे कारणच काय?

No comments:

Post a Comment