Friday, August 23, 2013

आपणही कांगावखोर झालोय ना?

   हक्काचे अधिकार होऊ लागतात तेव्हा जबाबदारीच्या मर्यादांचे भान सुटून दुसर्‍यांच्या हक्कावर कुरघोडी सुरू होते. त्यातून अन्याय-न्यायाचा झगडा उभा राहू लागतो. हक्क माझा माझ्यापुरता असतो. अधिकार दुसर्‍याच्या हक्कावर गदा आणणारा असतो. त्याचे त्याने निर्णय घेण्याचा त्याचा हक्क हिरावून त्याच्यावर दुसर्‍याचे निर्णय लादण्याला अधिकार म्हणतात. अधिकार हा सक्तीने लादला जात असतो. जेव्हा तशी दुसर्‍याच्या हक्कावर गदा आणली जाते, तेव्हा त्या दुसर्‍याला त्याचा हक्क सुरक्षित राखण्याचाही हक्क नाकारला जातो वा तसा कायदा असतो; तेव्हा आपोआप अन्याय करणार्‍याचा अधिकार बलवान आणि अन्याय होणार्‍याचा हक्क दुबळा होऊन जात असतो. गेल्या कित्येक वर्षात ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांचा हक्क अबाधित राखायला कायद्याने किती पुढाकार घेतला आणि ज्यांनी अन्याय केला, त्यांना किती संरक्षण दिले; याकडे बारकाईने बघितले तर कायद्याचे राज्यच अन्यायाला संरक्षण देताना दिसेल. जेव्हा अशी स्थिती निर्माण होते, तेव्हा अन्याय वाढत जाणे अपरिहार्य असते. कारण व्यवस्थाच हक्काचा दुरूपयोग अधिकार म्हणून करणार्‍यांना पाठीशी घालू लागते आणि हक्क नाकारले जाणार्‍यांना अगतिक व्हावे लागते.

   गुरूवारी ज्यांनी सामुहिक बलात्कार केला, त्यांना मुक्त जगण्याचा असलेला अधिकार वापरताना, त्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला आहे. तिच्या मुक्त जीवन जगण्याचा हक्क पायदळी तुडवला आहे. त्यातून त्यांनी मानवी हक्काविषयीच अविश्वास दाखवला आहे, त्याची अवहेलना केली आहे. मग त्याच हक्काच्या अंतर्गत येणारा न्यायाचा हक्क त्यांना कसा असू शकतो? पण आज त्यांना न्याय मिळावा किंवा त्यांच्यावरही अन्याय होऊ नये; म्हणून संपुर्ण कायदा यंत्रणा कामाला लागलेली आहे. त्यांनी कुठला अन्याय करावा याची निवड करायची त्यांना मोकळीक आहे. पण ज्या मुलीने अन्याय अत्याचार सोसला, तिला मात्र त्यांना द्यायची शिक्षा निवडण्याचाही हक्क नाही. अधिकार खुप दूरची गोष्ट झाली. जेव्हा अशी स्थिती असते, तेव्हा कुणाच्याही हक्काचे संरक्षण होऊ शकत नाही. उलट ज्यांना त्याच हक्काच्या मर्यादा ओलांडून इतराच्या हक्कावर कुरघोडी करायची असते, त्यांना मोकाट रान मिळत असते. मग ते आपल्या हक्काची हुकूमत सिद्ध करण्यासाठी इतरांच्या हक्काची बिनधास्त पायमल्ली करतात. कारण आपल्या त्या कुरघोडीसाठी आपणच पायदळी तुडवलेला कायदा संरक्षण देणार; याची त्यांना पुरेपुर खात्री पटलेली असते. मात्र आपला हक्क नाकारला गेला वा त्याची पायमल्ली झाली, तर त्याच्या संरक्षणासाठी आपल्याला एकाकी झुंजावे लागेल, कुठले सरकार वा कायदा यंत्रणा; आपल्या मदतीला येणार नाही, याची प्रत्येक नागरिकाला आज खात्री पटलेली आहे. त्यातूनच एकप्रकारची अन्याय सहन करण्याची अगतिकता आपल्यात रुजत गेलेली आहे.

   या गुंत्यातून बाहेर पडावे लागेल. शेवटी कायदा म्हणजे तरी काय असतो? जो लादला जात असतो. कायदा ही सक्तीने अंमलात आणायची बाब आहे. दुबळ्यांकडे सक्ती करायची हिंमत नसते, त्यांच्या वतीने हस्तक्षेप करून कुरघोडी करणार्‍यावर सक्ती करण्यासाठीच कायदा असतो. आज त्यातली सक्ती संपलेली आहे. आपोआपच त्याचे सक्तीतून येणारे भय कुणाला किंवा असे गुन्हे वा अन्याय करणार्‍यांना वाटेनासे झाले आहे. इथे बसलेला गृहमंत्री वा पोलिस आयुक्त सुरक्षेची हमी देतो, पण त्यासाठी आवश्यक असलेली सक्ती करण्याची क्षमता त्याच्यात नाही, याची प्रत्येकाला खात्री आहे. म्हणूनच आपण पोलिस पहार्‍यावर विसंबून रहात नाही. त्यांच्या हमीवर विश्वास ठेवत नाही. पण दुसरीकडे कराचीत बसलेला कुणी दाऊद वा मलेशियात लपलेला राजन, शकील असे गुंड असतात, त्यांच्या धमकीवर आपला शंभर टक्के विश्वास आहे. त्यांच्या धमकीतून कोट्यवधी रुपये दिले-घेतले जातात. पण सरकारी कायद्याच्या धाकाने कोणी वेळच्यावेळी साधा करभरणाही करीत नाही. कारण कायदा व सरकार सक्तीने अधिकार वापरण्याचे आपल्याला कुणाला भय वाटत नाही. पण दाऊद वा तत्सम लोकांनी दिलेली धमकी वा शब्द हमखास अंमलात येण्याची सर्वांना खात्री आहे. काय दुर्दैव आहे बघा. ज्यांना आपण गुन्हेगार माफ़िया म्हणतो, ते कायद्याची धमक सक्तीमध्ये असल्याचे ओळखून हुकूमत गाजवत असतात. जणू तेच त्यांचा कायदा बिनधास्त राबवत असतात. पण ज्यांच्या हाती खरोखर कायदा व त्याचे अधिकार आहेत, त्यांना सक्तीने त्याचा अंमल करायची हिंमत उरलेली नाही. खुद्द सरकारच तुमच्याआमच्यासारखे हतबल व अगतिक झालेले नाही का?

जिथे कायद्याचा सत्ताधिकारच दाऊद, शकील, राजन समोर हतबल आहे, त्यांच्या रयतेवर कुणा भुरट्याने बलात्कार वा अन्याय केला तर नवल कुठले? जिथे अन्यायालाच कायदा संरक्षण देऊ लागतो; तेव्हा यापेक्षा काहीही वेगळे घडण्याची शक्यता नसते. काल दिल्ली, आज मुंबई, उद्या चेन्नईत हेच होत राहिल. छोट्या शहरात गावात ते नित्यनेमाने चालू आहे. एखादे निमित्त शोधून तुम्हीआम्ही सुद्धा जागरूक नागरिक असल्याचा देखावा उभा करण्यात आता खुपच वाकबगार झालो आहोत. मेणबत्त्या, निषेधाचे मोर्चे, चर्चा यातून आपण तरी वेगळे काय करीत असतो? आपण कमालीचे बेशरम झालोत. आणि पुन्हा अब्रुदार असल्याचे सोंग आणण्यासाठी ‘याची त्याची लाज वाटते’ असाही कांगावा करू लागलो आहोत. सरकार, कायदा वा राज्यकर्ते, राजकारणी नालायक असतीलच. पण आपण काय कमी ढोंगी आहोत? या असल्या देखाव्यातून आपणही त्या पिडीत मुलीचे खोटेच सांत्वन करीत नाही काय? पुढल्या मुलींचा असाच बळी जाणार हे माहित असून त्यांना गाफ़ील ठेवण्यासाठी त्यांना धीर देण्याचे पाप आपणही करत नसतो काय?

No comments:

Post a Comment