Thursday, August 29, 2013

शरद पवारांना राष्ट्रपतीच बनवायला हवे



   अवघ्या एक महिन्यापुर्वीचीच गोष्ट आहे. भारत सरकारचे अल्पसंख्यांक मंत्री रेहमान खान यांनी दहशतवादी म्हणून पकडल्या जाणार्‍या मुस्लिम व्यक्तींवर होणार्‍या आरोपाचा खरेखोटेपणा तपासण्यासाठी एक वेगळी समिती वा मंडळ बनवावे, अशी मागणी पंतप्रधानांकडे केलेली होती. तसे करताना मग त्यांनी भारतातील मुस्लिम बांधव आपल्याला भेटून जे मत व्यक्त करतात, तेच आपण बोलत असल्याचेही सांगितले होते. त्याच संदर्भात रेहमान पुढे म्हणाले होते, की इंडीयन मुजाहिदीन नावाची कुठलीही भारतातील मुस्लिमांची दहशतवादी जिहादी संघटना अस्तीत्वात नसून हे सर्व तपास यंत्रणांनी निर्माण केलेले भ्रम आहेत. अर्थात त्यावर काहूर माजले, तेव्हा पुन्हा रेहमान यांनी असे आपले मत नसून मुस्लिम जनसमुदायाचे मत असल्याचे ठासून सांगितले होते. त्यांचे वक्तव्य खरेच व प्रामाणिक आहे, असे मानायला हरकत नाही. पण कुठलेही मत त्यांना पटलेले नसेल, तर त्यांनी तशी मागणी करण्यापर्यंत मजल मारली असती काय? ज्याअर्थी त्यांनी इंडीयन मुजाहिदीन नावाची संघटनाच नसल्याचा व असे काल्पनिक भूत तपास यंत्रणांनी निर्माण केल्याचा दावा केला होता; त्याअर्थी त्यांचाही त्यावर किमान विश्वास बसलेला असणार ना? मग आता त्याच तपास यंत्रणांनी नेपाळ भारत सीमेवर यासिन भटकळ नावाच्या जिहादी व्यक्तीला पकडल्यावर, आधी तो खरेच भारतीय मुस्लिम व इंडीयन मुजाहिदीनचा संस्थापक असल्याचे रेहमान यांच्याकडून प्रमाणपत्र घ्यायला नको काय? तसे न करताच गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यासिनला पकडल्याचे श्रेय आपल्या आधिपत्याखाली चालणार्‍या तपास यंत्रणांना देत आहेत. मग तेही काल्पनिक कारभार करतात म्हणावे लागेल. यातल्या कशावर विश्वास ठेवायचा?

   शिंदे यांनी केलेला दावा व त्यांच्याच अखत्यारीत काम करणारे दिल्ली पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांनी यासिन भटकळ हा इंडीयन मुजाहिदीनचा संस्थापक असल्याचे पुन्हा एकदा छातीठोकपणे सांगितले आहे. पण ज्या सरकारचे शिंदे गृहमंत्री आहेत, त्याच सरकारमध्ये रेहमानही मंत्री आहेत. मग यातल्या कोणावर लोकांनी विश्वास ठेवायचा? जी संस्था, संघटना अस्तित्वातच नाही, तिने असे अनेक स्फ़ोट व घातपात केले आणि त्यात यासिन भटकळचा हात आहे; ही सगळीच निव्वळ थापेबाजी होत नाही काय? एकतर शिंदे खरे बोलत असतील, किंवा रेहमान हे भटकळ सारख्यांना पाठीशी घालणारे भारत सरकारमध्ये बसलेले मंत्री असले पाहिजेत. यातले खरे काय व खोटे काय; ते युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी वा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच देशाला सांगायला नको का? पण ते दोघेही सहसा बोलतच नाहीत. त्यामुळे बहुधा कृषीमंत्री शरद पवार यांना हे काम पार पाडावे लागेल. आजवर पवारांनी मांडलेल्या अनेक तत्वांशी रेहमान यांचा दावा सुसंगत आहे. कोणी उगाच सतावत असेल किंवा पोलिस कारवाई करीत असेल, तर सुडाची भावना म्हणून घातपात होऊ शकतात. असे तत्वज्ञान मध्यंतरी शरद पवार यांनीच मांडलेले होते. तेव्हा आता त्यांनीच पुढाकार घेऊन यासिन भटकळ कुठल्या अन्यायाच्या बदल्यासाठी असे घातपात व स्फ़ोट करीत मोकाट फ़िरत होता; त्याचा खुलासा केला तर निदान सामान्य जनतेच्या मनातल्या अनेक शंका दूर होतील. पण यातले काहीही होण्याची शक्यता कमीच आहे. कारण यासिन भटकळ पोलिसांच्या तावडीत सापडला असून, तोच आता पोपटासारखा बोलू लागला, मग अनेक मंत्र्यांची बोलती बंद होण्याची शक्यता आहे.

   खरे तर असे कोणाला पाळत ठेवून पकडण्यापुर्वी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आधी रेहमान खान वा दिग्विजय सिंग यापैकी कोणाची परवानगी घ्यायला हवी होती. आपल्या तपास यंत्रणा व पोलिसांना उपलब्ध पुरावे वगैरे घेऊन दिग्विजय सिंग यांच्याकडे छाननीला पाठवायला हवे होते. त्याआधीच त्यांनी यासिन भटकळ किंवा अब्दुल करीम टुंडा यांना थेट पाळत ठेवून वा सापळा लावून पकडले; हा अतिरेकच म्हणायचा नाही काय? असे चालते म्हणून मुस्लिम दुखावतात. कारण यासिन सारख्या निरपराधाला अकारण अटक होते आणि गजाआड डांबले जात असते. आधी कुणाला असेच सतावले म्हणून यासिनने इतके घातपात स्फ़ोट केले असतील, तर त्याने बदल्याच्या भावनेनेच ते केले असणार ना? त्यात त्याची चुक काय? त्याचा गुन्हा कोणता? शरद पवार यांनी घालून दिलेल्या नितीमूल्यानुसारच यासिन वागलेला नाही काय? म्हणूनच अशी कुठलीही कारवाई करण्यापुर्वी खरे तर दिग्विजय सिंग यांचा तरी सल्ला गृहमंत्री शिंदे यांनी घ्यायला हवा होता. आता त्यांनी म्हातार्‍या टुंडाला व तरूण यासिनला अकारण अटक करून तुरूंगात डांबले आहे. त्यातून मग दुखावलेल्या अनेक मुस्लिम तरूणांनी काय करायचे? त्यांना सुडाला प्रवृत्त होऊन जिहादी वा घातपाती होण्यापलिकडे दुसरा काही पर्याय आहे काय? देशात सुरक्षा अशीच धोक्यात आलेली आहे. सरकारचा कारभारच असा नव्या मुस्लिम तरूणांना जिहाद व सुडाला प्रवृत्त करण्याचा आहे. आणि मग असे घातपाती तयार झाले तर पुन्हा पाकिस्तानला दोष द्यायचा. सगळाच अतिरेकी मुर्खपणा नाही काय? रेहमान खान म्हणतात, तेच खरे आहे. या गुप्तचर यंत्रणांच्या डोक्यातून इंडीयन मुजाहिदीनचे भ्रामक भूत काढून टाकणे, हाच सुरक्षेचा उत्तम उपाय होऊ शकेल. सोनियांनी शिंदे यांची हाकालपट्टी करून दिग्विजयना पंतप्रधान व रेहमान खान यांना गृहमंत्री करायला हवे आणि ज्येष्ठतेचा मान राखून शरद पवारांना राष्ट्रपती बनवायला हवे.

2 comments: