Friday, September 20, 2013

डॉ. अनंतमुर्ती शेरावत




  गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भाजपाने आगामी लोकसभेसाठी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवड केली; तेव्हा त्यांना ती वाढदिवसाची भेटच दिली, अशा बातम्या झळकल्या होत्या. मग देशभरचे उत्साही भाजपा कार्यकर्ते व मोदी समर्थकांनी त्यांचा वाढदिवस मोठा वाजतगाजत साजरा केला. सर्व माध्यमांनी त्या घटनांना मोठीच प्रसिद्धी दिली आहे. माध्यमांना हल्ली मोदीविकार, ज्याला इंग्रजी भाषेत ‘नमोनिया’ म्हणतात तो आजार जडला आहे. मग त्यावरचा उपाय म्हणून माध्यमे सतत मोदी नामजप करीत असतात. त्यांना मोदींचा वाढदिवस ही पर्वणी वाटली तर नवल नाही. मग देशभरच्या राज्यातून  व शहरातून मोदींच्या वाढदिवशी कुठले कार्यक्रम कोणी केले व त्यांना कोणी कशा शुभेच्छा दिल्या, त्याची रसभरीत वर्णने सादर केली होती. अशा उत्सवात मग लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकजण टपून बसलेले असतात. तेही प्रसिद्धीचे साधन व संधी म्हणून त्यात उडी घेतात. कुठल्या अश्लिल नृत्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या राखी सावंत नावाच्या महिलेने त्याचे उत्तम नमुने आजवर सादर केलेले आहेत. अलिकडेच तिने आपण संजय दत्त याची उर्वरीत शिक्षा भोगायला सज्ज झाले आहोत; असे विधान केलेले होते. तिच्याच पंगतीत बसणारी मल्लीका शेरावत नावाची एक कलाकार महिला आहे. मात्र आपल्या कलेपेक्षा वादग्रस्त वागणे व वक्तव्यांनी शेरावत हिने, आजवर प्रसिद्धीचा झोत अंगावर घेतलेला आहे. तिनेही मग मोदींच्या लाटेवर स्वार होण्याची संधी साधली तर नवल नव्हते. अलिकडेच तिने मोदी हा देशातला सर्वात उमदा व आकर्षक पुरूष असल्याचे विधान करून, त्यापेक्षा काही वेगळे केले नव्हते. तिनेही मग वाढदिवशी हॅपी बर्थडे म्हणून प्रसिद्धीची संधी साधली.

   अर्थात त्या कलाकार महिलांच्या वागण्याबोलण्याची कोणी सहसा गंभीरपणे दखल घेत नाही. माध्यमातही टवाळी करण्यासाठीच त्यांचे मत विचारलेले असते आणि त्याला वारेमाप प्रसिद्धी दिली जात असते. त्यामुळेच विरंगुळा म्हणून त्याकडे पाहिले जाते व त्यांच्या वागण्याला माफ़ही केले जाते. पण त्यांच्या पंगतीत कोणी नावाजलेले प्रतिष्ठीत जाऊन बसू लागले; तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. मोदींच्या बाबतीत अनेक बुद्धीमंत विचारवंतांनी आपली पायरी सोडण्यापर्यंत मजल मारलेली आहे. जागतिक किर्तीचे अर्थशास्त्रज्ञ मानले जाणारे नोबेल विजेते अमर्त्य सेन यांनी अलिकडेच मोदींच्या विरोधात वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवली होती. अर्थात अशा आरोपाला कोणीही आक्षेप घेईल. कारण मोदी चर्चेत येण्याच्या खुप आधीच सेन विख्यात झालेले होते. म्हणूनच प्रसिद्धी मिळण्यासाठी त्यांना मोदींवर टिका करण्याचे कारण नाही, असाही खुलासा होऊ शकतो. वास्तवात तेही खरेच आहे. पण आपल्या बुद्धीकौशल्य व अभ्यास या कारणासाठी सेन यांच्या विधानाची दखल जेवढी घेतली जात नाही; तेवढी त्यांच्या मोदीविरोधी विधानाची चर्चा झाली. तितकेच नाही, तर त्यांच्याच दर्जाचे विख्यात अर्थशास्त्रज्ञ असलेल्या काहीजणांनी सेन यांच्या विधानातला पक्षपात उघड करून दाखवला. त्यामुळेच मग सेन यांनी मोदींवर केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच झोड उठवली, असे म्हणावे लागते. जणू मोदी विरोधकांच्या हाती कोलीत द्यायलाच सेन बोलले, म्हणायला जागा आहे. आता त्यामध्ये दिवसेदिवस भर पडत आहे. कर्नाटकचे एक विख्यात साहित्यिक डॉ अनंतमुर्ती यांनी आता त्याच पंगतीत स्थान मिळवले आहे. मोदी पंतप्रधान झाले तर आपण भारतात थांबणार नाही, असे म्हणत त्यांनी धुरळा उडवला आहे.

   नेमक्या शब्दात सांगायचे तर डॉ. मुर्ती यांना आताच असे बोलण्याचीकाय गरज होती? कानडी साहित्यामध्ये त्यांचे योगदान मोठे असेल. त्यांना ज्ञानपीठ वा तत्सम अनेक सन्मान मिळालेले आहेत. पण माध्यमातून त्यांच्या त्या गुणवत्तेची कितीशी चर्चा झालेली आहे? देशाच्या कानाकोपर्‍यात वास्तव्य करणार्‍या किती भारतीयांना अनंतमुर्ती ही व्यक्ती ठाऊक आहे? अगदी कर्नाटकात तरी दहाबारा टक्के लोक त्यांना ओळखतात काय? त्यांच्या मतविचारांना कर्नाटकातील सामान्य जनता किती किंमत देते? नसेल, तर त्याबद्दल इतका गवगवा कशाला? ज्या मताचा प्रभाव कुठल्या एका लोकसभा मतदारसंघातही पडू शकणार नाही, त्या व्यक्तीच्या इच्छेसाठी देशातल्या करोडो लोकांनी आपल्या इच्छेवर बोळा फ़िरवावा काय? असा माणूस परदेशी जाऊ नये किंवा याच देशात रहावा; यासाठी सामान्य भारतीयाने मोदींना मते देऊ नयेत, अशी त्यांची अपेक्षा आहे काय? जे कोणी अनंतमुर्तींच्या विधानाचे कौतुक सांगत आहेत, त्यांना असे वाटते काय? अर्थात अनंतमुर्ती हे एकमेव मोदी विरोधक नाहीत. मोदींचेही लाखो व करोडो विरोधक असू शकतात. पण तसेच मोदींचे समर्थकही आहेत. लोकशाही बहूमताने चालते. म्हणूनच बहूमताचा सन्मान करणे याला सुसंस्कृतपणा म्हणतात. पण आपल्या प्रतिस्पर्धी मताच्या विरोधातला इतका टोकाचा द्वेष असभ्यतेचे लक्षण असते. मुर्ती यांनी त्याचाच दाखला दिलेला आहे. पण अर्थात तसे झाल्यास ते भारत सोडून जाण्याची अजिबात शकता नाही. उलट उद्या मोदी सत्तेत आले व त्यांनी कुठला पुरस्कार दिल्यास, हेच अनंतमुर्ती मोदींचे गुणगान करताना दिसतील. सध्या ते प्रसिद्धीच्या हव्यासाने झपाटलेले असावेत. म्हणूनच मल्लिका शेरावत, राखी सावंत यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.

No comments:

Post a Comment