Saturday, September 28, 2013

भक्ती असावी तर अशी


   चार दशकांपुर्वी मी जेव्हा नवखा पत्रकार होतो आणि पत्रकारितेचे धडे प्रथमच गिरवत होतो, तेव्हा कुमार केतकर टाईम्स ऑफ़ इंडियाच्या संदर्भ ग्रंथालयात काम करीत होते. त्या काळात ते आमच्या म्हणजे दैनिक ‘मराठा’च्या कार्यालयात अनेकदा यायचे. तिथेच त्यांचा पहिला परिचय झाला. तिथे प्रामुख्याने आमचे वृत्तसंपादक व वरीष्ठ रामभाऊ उटगी यांच्याशी कुमार गप्पा करायचे. आम्ही उटगींना बाबा म्हणायचो. त्यांचे पत्रकारितेतले दांडगे अनुभव होते आणि त्याच्या कहाण्या बाबा मूडमध्ये असले मग ऐकवित. त्यापैकीच एक गोष्ट आज आठवली. पां. वा. गाडगीळ हे त्या काळातले अत्यंत अभ्यासू, जाणकार व व्यासंगी संपादक म्हणून नावाजलेले मराठी विचारवंत होते. पुढे उतारवयात ‘लोकमत’ त्यांच्याच संपादनाखाली सुरू झालेले दैनिक. तर असे हे गाडगीळ कमालीचे नेहरूभक्त होते. म्हणजे त्यांची नेहरूंच्या कर्तबगारी व गुणवत्तेवर खुद्द नेहरूंपेक्षा अगाध श्रद्धा होती म्हणे. इतकी की नेहरू म्हणतील तेच सत्य व वास्तव याबद्दल गाडगीळांच्या मनात काडीमात्र शंका नसे. सहाजिकच त्यांच्या लिखाणातून नेहरूभक्ती ओसंडून वहात असे, हे वेगळे सांगायला नको. ज्यांना त्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल त्यांनी आजकाल कुमार केतकरांच्या बोलण्या लिहिण्यातून नेहरूगांधी खानदानाविषयी जी दुथडी भरून भक्ती वहात असते, त्याकडे बघावे; म्हणजे अंदाज येऊ शकेल. तर अशा नेहरूभक्त गाडगीळांनीही एकदा थेट नेहरूंना खडसावणारा ऐतिकासिक लेख लिहिला होता. त्यामुळेच त्याचे त्यांच्या समकालीन पत्रकार सहकार्‍यांना खुप अप्रुप होते.

   झाले असे की पंडित नेहरूंनीच एकदा गाडगीळांच्या भावना व भक्तीलाच दणका दिला. त्यामुळे गाडगीळ विचलित झाले होते. संसदेत वा अन्यत्र कुठे बोलताना नेहरूंनी म्हणे आपण चुकलो, असे मान्य केले वा कबुली दिली. ती वाचून गाडगीळांचे पित्त खवळले. स्वत:चीच चुक कबुल करणार्‍या नेहरूंना खडसावणार्‍या त्या लेखात गाडगीळांनी झालेल्या चुकीबद्दल नेहरूंना जाब विचारला नव्हता. तर चुक कबुल केल्याबद्दल नेहरूंना खडसावले होते. त्यांच्या मते नेहरू हे नेहरू असल्याने ते चुकूच शकत नाहीत. मग त्यांनी चुक मान्य करणे, हीच चुक होती. म्हणून त्यांनी नेहरूंना सवाल केला होता, ‘पंडीतजी तुम्ही चुकालच कसे?’ याला असीम भक्ती म्हणतात. खुद्द देव आपली चुक कबुल करतो, तरी भक्ताला त्याची चुक ही चुक वाटत नसते. या अगाध श्रद्धेला व निष्ठेला भक्ती म्हणतात. केतकर त्याच्याही पुढे गेले आहेत. त्यामुळेच राहुल वा गांधी घराण्यातले कोणी चुकू शकत नाहीत, यावर केतकरांची अगाध श्रद्धा आहेच. पण समजा त्यापैकी कोणी चुक मान्य केलीच, तर ती चुक कशी नाही तर योग्यच काहीतरी आहे; इतका प्रभावी युक्तीवाद केतकर करू शकतात. आसारामनी उद्या आपल्या चुकीची वा पापाची कबुली दिली, म्हणून त्यांचे निस्सीम भक्त त्यांची चुक वा पाप मान्य करतील काय? भक्तीला तर्कशास्त्र, बुद्धीवाद, विवेकबुद्धी, नितीशास्त्र असे निकष लावता येत नसतात. तशी अपेक्षा आपण भक्ताकडून करणेचे चुकीचे असते. कारण प्रतिक वा व्यक्तीशी भक्ती निगडीत नसते, ती भक्ताची मनोवस्था असते. त्या भक्ती वा श्रद्धेमध्ये सैलपणा व शैथिल्य येऊ लागले, मग तिचा जिर्णोद्धार करण्यासाठी काय करावे लागते? आपल्या देवाचे देवपण स्वत:लाच पटवून देण्यासाठी कोणीतरी खराखोटा भ्रामक सैतान निर्माण करावा लागतो. त्याचा आभास निर्माण करावा लागतो. गेल्या काही वर्षात केतकर किंवा तत्सम नेहरूगांधी भक्त सातत्याने नरेंद्र मोदींना शिव्याशाप त्याच कारणास्तव देत असतात. त्या शिव्याशापातून त्यांना आपल्या दैवतावरच्या भक्तीसाठी नवी प्रेरणा मिळत असते.

ख्रिश्चन धर्मातील प्रोटेस्टंट पंथाचा प्रवर्तक संस्थापक, पहिला मार्टीन ल्युथर हा कॅथॉलिक पंथ व पोपचा कडवा विरोधक होता. नुसता विरोधकच नाही तर द्वेष्टा होता म्हटले तर वावगे ठरू नये. (अमेरिकेतील कृष्णवर्णियांची चळवळ करणारा मार्टीन ल्युथर ज्युनियर म्हणुन ओळखला जातो. त्याचा आणि याचा संबंध नाही. दोघे वेगवेगळ्या कालखंडातील आहेत.) तर हा प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक ल्युथर, स्वत:च्या धर्मश्रद्धेविषयी काय म्हणतो; ते समजून घेण्यासारखे आहे.

"परमेश्वराचे नाव घेण्याइतका उत्साह माझ्या मनाला वाटत नाही, तेव्हा मी माझ्या शत्रुच्या, म्हणजे पोपच्या आणि त्याच्या हस्तकांच्या दगलबाजीच्या, त्यांच्या ढोंगबाजीच्या आठवणी आठवतो. त्या आठवणी जाग्या होताच, माझा संताप आणि द्वेष फ़ुलून येतो. माझा नैतिक अहंकार खुलतो आणि नव्या उत्साहाने मी देवाचे नाव घेऊ लागतो. माझ्या संतापाचा पारा वाढताच, परमेश्वरा, तुझ्या नावाचा जयजयकार असो, या भुतलावर तुझे राज्य येवो, मी तुझ्या मनासारखे करीन, ही प्रार्थना मी दुप्पट जोराने म्हणु लागतो."

5 comments:

  1. मागे एकदा या केतकरांचा आणिबाणी कशी आवश्यक होती , ती विरोधकांच्या कारवायांमुलेच कशी निर्माण झाली होती आणि इंदीराजींकडे ती लागू करण्याशिवा़य कसा दुसरा पर्यायच नव्हता असा लेख वाचला होता.
    तसेच २००४ नंतर सोनीयांच्या शालीनतेवरचाही लेख वाचल्याचे आठवते

    ReplyDelete
  2. केतकरचं नाव वाचावं लागलं नि सारा दिवस खराब मूडमधे गेला... काय हो हे भाऊ... छ्या:

    ReplyDelete
    Replies
    1. Hahahahaha..
      mag kay tar !!! Chaplusicha jeevan gaurav dya ketkar la

      Delete
  3. सुमार बुद्धीचे कुमार .....

    ReplyDelete
  4. केतकरांच्या बाबतीत जे आपण लिहले आहे ते खरेच खुपच मार्मिक आहे. एकदा भाऊ खुषवंत सिंहांचा लेख इंग्रजी हिंदुस्तान टाइम्स मध्ये आला होता. त्यांनी स्वतः लिहले होते की कोणत्यातरी इंग्रजी पेपेरच्या मालकाने त्यांना 'रांडका भांड' संबोधले होते. खुषवंत सिंग असेच इंदिरा गांधींचे परमभक्त होते. तसेच काहीतरी केतकरांचे आहे.

    ReplyDelete