Thursday, October 10, 2013

मायावती कॉग्रेस यांचा सौदा



   तब्बल वीस वर्षापुर्वी तेव्हाचे कॉग्रेस पंतप्रधान नरसिंहराव यांनी उत्तरप्रदेशात प्रथमच कॉग्रेस-बसपा युती केलेली होती. तसे पाहिल्यास बसपाने राजकीय वाटचालीमध्ये केलेली ती दुसरी निवडणूकपुर्व युती वा आघाडी होती. त्याआधीच्या विधानसभा निवडणुकीत त्याच बसपाने मुलायमसिंग यांच्या समाजवादी पक्षासोबत युती केलेली होती. त्याचे कारण मुलायमना भाजपावर मात करायची होती. त्यात बसपाला अनेक मतदारसंघात मिळणारी दलितांची तुटपुंजी मते जोडल्यास आपल्या पडणार्‍या उमेदवारांना निवडून आणता येईल असे मुलायमचे समिकरण होते. पण त्याचाच लाभ बसपाला मिळाला आणि प्रथमच बसपा हा उत्तरप्रदेशात ठराविक जागा निवडून आणणारा दखलपात्र पक्ष झाला. तरीही सपा-बसपा मिळून दोघांना बहूमत काही मिळवता आले नाही. त्यांनी कॉग्रेसचा बाहेरून पाठींबा घेऊन सरकार बनवले होते. तेव्हा बसपावर कांशीराम यांची हुकूमत होती व त्या संयुक्त सरकारवर मायावती बाहेरून हल्ले चढवत होत्या. त्यांची नाराजी ओळखून भाजपाने त्यांना मुख्यमंत्री बनवण्याचा डाव खेळला. त्यामुळे मुलायमना सत्तेबाहेर करून लौकर मध्यावधी घ्यायची वेळ आणायची व सत्ता मिळवायची भाजपाचा डाव होता. पण ते फ़सले. कारण मध्यावधी निवडणूकीत बसपाने कॉग्रेसशी युती करून निवडणूका तिरंगी बनवल्या व विधानसभा त्रिशंकू होऊन पुन्हा भाजपाला मायावतींनाच मुख्यमंत्री बनवून संयुक्त सरकार बनवण्याची नामुष्की आली. त्यावेळी दाक्षिणात्य असल्याने उत्तरभारतीय नेते आपल्याला पंतप्रधानपदी टिकू देणार नाहीत, या भयापोटी नरसिंहराव यांनी उत्तरप्रदेशातील कोग्रेस नामशेष करण्याचा जो डाव खेळला, त्याचाच भाग म्हणजे कॉग्रेस बसपा युती होती. त्यानंतर तिथे कॉग्रेस पुन्हा कधी सा्वरली नाही.

   त्यानंतर कधीच मायावतींनी निवडणूकपुर्व युती कुठल्या पक्षासोबत केली नाही. निवडून आल्यावर पाठींबा आघाड्या खुप केल्या. पण निवडणूकपुर्व युती म्हणजे आपल्या मतदारांना मित्रपक्षाच्या दावणीला बांधणे. तो मुर्खपणा कॉग्रेसने केला व आपला मतदार बसपाच्या दावणीला बांधला होता. ती चुक मायावतींनी कधी केली नाही. म्हणूनच त्यांचा पक्ष संघटनात्मक पातळीवर वाढला; तर कॉग्रेस व भाजपाचे खच्चीकरण होत गेले. पुढल्या राजकारणात मुलायम व मायावतींनी आपल्या प्रभावक्षेत्रात कधी निवडणूकपुर्व आघाड्या केलेल्या नाहीत. मात्र यावेळी त्याला तडा जाताना दिसतो आहे. नरेंद्र मोदींच्या उमेदवारीने उत्तर भारतात जे राजकारण ढवळून निघते आहे, त्यातून तिथे पुन्हा नव्या युत्या आघाड्यांचे निवडणूकपुर्व समिकरण बदलू लागले आहे. त्यात मायावतींना प्रथमच आपला मतदार हातातून निसटण्याच्या भयाने पछाडले असून त्यांनी नामशेष झालेल्या कॉग्रेसशी युती करून जागा टिकवण्याचा अत्यंत बचावात्मक पवित्रा घेतलेला आहे. त्याच युतीची पुर्वअट म्हणून त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे खटले गुंडाळण्याचा पवित्रा युपीएप्रणित सीबीआयने घेतल्याचे वृत्त आहे. मोदींमुळे उत्तरप्रदेशात मतांचे धृवीकरण होईल अशी ओरड करणार्‍या मुलायम व कॉग्रेसच्या आत्मघातकी डावपेचांनी आता तिथे जी परिस्थिती आणली आहे, त्याचे परिणाम मग कॉग्रेस व मायावतींना भोगावे लागणार आहेत. कारण दोघांची मुस्लिम मते मुलायमकडे झुकण्याची भिती त्यांना सतावते आहे, तर मध्यमजाती, इतरमागास व सवर्णांची मते भाजपाकडे जाण्य़ाची खात्री वाटल्यानेच आपापल्या मतांची बेरीज करून अधिक जागा पदरात पाडन्य़ाचा सौदा कॉग्रेस मायावतींनी केल्याचे म्हटले जाते. म्हणूनच सीबीआयने मायावतींना मुक्त करण्याचा पवित्रा घेतला आहे.

   मुझफ़्फ़रपुर व एकूण उत्तरप्रदेशात मुस्लिमांच्या लांगुलचालनाचे व हिंदूंना दुखावण्याचे राजकारण मुलायम जाणिवपुर्वक खेळत आहेत. त्याला स्थानिक भाजपा नेत्यांचा मिळणारा प्रतिसाद मायावती व कॉग्रेसला भेडसावतो आहे. उदाहरणार्थ पश्चिम उत्तरप्रदेशात अगदी बाबरी प्रकरणातही जाट-मुस्लिम मैत्री अभंग होती, तिला अलिकडल्या दंगलींनी छेद गेला आहे. तिथल्या भागातील गरीब मजुरी करणारा दलितवर्गही दंगलीनंतर बिगरमुस्लिम गटामध्ये ओढला गेला आहे. अशा बिगरमुस्लिम वर्गाचा ओढा भाजपा व प्रामुख्याने मोदींकडे दिसतो आहे. त्यामुळेच कॉग्रेस व मायावतींच्या पारंपारिक मतपेढीला खिंडार पडल्याची भिती त्यांना एकत्र आणते आहे. वास्तविक मुलायमनी मुस्लिमांच्या आक्रमकतेला वेसण घातली असती आणि अकारण हिंदूंच्या भावनांशी खेळ केला नसता; तर हे धृवीकरण इतक्या झपाट्याने झाले नसते. दंगलीत चिथावणीखोर कृत्ये केल्याचे आरोप असलेल्या भाजपा नेत्यांना रासुका लावून  स्थानबद्ध करण्यात आले. पण अन्य पक्षाच्या मुस्लिम आमदार नेत्यांना जामीनावर मुक्त करण्यात आले. त्यातून पश्चिम उत्तरप्रदेशात असंतोष उफ़ाळला आहे. त्याने धृवीकरणाला चालना दिली आहे. हे माहित असुन दोन्ही सेक्युलर पक्ष मुलायमच्या मुस्लिम लांगुलचालनाला दोष देऊ शकत नाहीत. कारण त्यातून त्यांच्याबद्दल मुस्लिमात शंका निर्माण होऊ शकेल. आणि नुसतेच गप्प बसले, तर हिंदू व बिगर मुस्लिम मते दुरावतात. अशाच भयाने या दोन पक्षांना सतावले आहे. त्यामुळे त्यांना परस्परांची मदत घ्यायची गरज भासू लागली आहे. अन्यथा मायावती कॉग्रेसबरोबर निवडऊकपुर्व युती करायला तयार झाल्याच नसत्या. अजून तशी घोषणा झालेली नाही. पण सुत्रांकडून त्या सौद्याचा बोलबाला झाला आहे. मग त्यावर पांघरूण घालण्यासाठी राहुलनी मायावतींवर व त्यांनी कॉग्रेसवर टिकेचे नाटक चालविलेले असू शकते. सीबीआयद्वारे केलेला सौदा लपवायला तेवढे तरी करायला नको काय?

No comments:

Post a Comment