Wednesday, October 23, 2013

अडाण्याचे जुनेच रडगाणे



    येत्या दिड महिन्यात चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यासाठी सध्या कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी प्रचारासाठी फ़िरत आहेत आणि भाषणेही देत आहेत. पहिल्या काही दिवसात त्यांनी भोजनाचा हक्क, माहितीचा अधिकार, रोजगाराचा हक्क अशी पोपटपंची करून खुप झाले. पण समोर बसलेल्यांवर त्याचा काहीच परिणाम होत नाही असे दिसल्यावर त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. आक्रमक म्हणजे थोडे आवेशात व तावातावाने बोलले आवाज चढवला, म्हणजे आक्रमक अशी त्यांची कोणीतरी समजूत करून दिलेली आहे. मग राहुल आवेशात बोलू लागले आहेत. त्यालाही प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यावर त्यांनी विकास व अधिकाराची पोपटपंची सोडुन दंगली व जातीयवादाचे जुनेच मुद्दे उकरून काढायला सुरूवात केली आहे. त्याचाही परिणाम त्यांना रामपूर व उत्तररदेशातील प्रचार सभेत होताना दिसला नाही, तेव्हा मग आता आपलय घराण्याच्या त्यागाची जुनीच कालबाह्य कहाणी सांगण्यापर्यंत त्यांची घसरण झाली आहे. पण इंदिराजींच्या हत्येनंतर राहुलच्या पित्याला भारतीय जनतेने ४१५ जागांचे बहूमत देऊन पांग फ़ेडलेले आहेत आणि राजीवच्या हत्येनंतर पुन्हा त्याच कॉग्रेस पक्षाला सत्ता देऊन किंमत मोजलेली आहे. त्यानंतरही आपल्या घराण्याच्या त्यागाचा वाडगा घेऊन सोनियाजी मागल्या दहा वर्षात दोन निवडणूकांना सामोर्‍या गेलेल्या आहेत. इतक्या निवडणूकात इतका दिर्घकाळ त्यांनाच सत्ता दिलेल्या जनतेने मोजलेली किंमत; राहुलना कधीतरी कळली आहे काय? असती तर त्यांनी पुन्हा त्याच वापरून जुन्या झालेल्या त्यागाच्या व हौतात्म्याच्या कहाण्या सांगायचे धाडस केले नसते. दिड वर्षापुर्वी याच थापेबाजीचा परिणाम उत्तरप्रदेशात दिसला, त्यातून हा तरूण नेता काही शिकायच्या तयारीत दिसत नाही.

   तेव्हा उत्तरप्रदेशात विधानसभेच्या निवडणूका होत्या आणि राहुल गांधी दोन महिने शेकडो सभा घेत होते. त्या सभांमध्ये त्यांनी अशाच एकाहुन एक थापांची सरबत्ती लावली होती. उत्तर प्रदेशचे लोक मुंबईत व दिल्लीत जाऊन भिक मागतात. स्टूडिओत बसणार्‍यांनी जरा दिल्लीच्या कुठल्याही नाक्यावर भिकार्‍याला विचारावे, मी अशा लोकांशी बोललो आहे, अशी लोणकढी थाप त्यांनी मारलेली होती. ज्या माणसाला इतकी प्रचंड सुरक्षा दिलेली आहे, त्याची गाडी चौकात सिग्नलसाठी थांबली; तर कोणी तिच्यापाशी भिक मागायला जाऊ तरी शकेल काय? नुसता कोणी अनोळखी त्यांच्या गाडीपाशी गेला, तरी पोलिस अंगरक्षक तात्काळ धाव घेऊन त्याच्या मुसक्या बांधतील. अशा गाडीत बसलेले राहुल गांधी दिल्लीच्या कुठल्या सिग्नल वा नाक्यापाशी गाडीत बसले असताना कुणा भिक मागणार्‍याशी बोलले? आणि त्याने उत्तरप्रदेशात कामधंदा नसल्याने दिल्लीत येऊन भिक मागावी लागते, असे त्यांना सांगितले; यावर कोणी विश्वास ठेवणार? हा माणूस धडधडीत थापा मारतोय, हे ओळखून त्या निवडणूकीत लोकांनी राहुलसह त्यांच्या पक्षाकडे साफ़ पाठ फ़िरवली होती. मग निकाल लागले, तेव्हा मायलेकरांना तोंड लपवून बसायची वेळ आलेली होती. कारण बाकीच्या उत्तर प्रदेशचे सोडा; त्यांचा कौटुंबिक बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या अमेठी, रायबरेलीतही मतदाराने कॉग्रेसला धुळ चारली होती. त्याचे कारण हीच निव्वळ थापेबाजी होती. जो माणूस वा त्याची आई सामूहिक बलात्कार झाल्यावर संतप्त झालेल्या जमावाचा मोर्चा घरावर आला तर तोंड लपवून बसला; तो कुणा गरीबाशी गाडी थांबवून बोलतो, यावर कोणी विश्वास ठेवायचा आणि कसा? अशा माणसाला आता दहा वर्षानंतर अचानक आपल्या आजी व पित्याच्या हौतात्म्याची व हत्येची आठवण व्हावी काय?

   अगदी अलिकडेच भारतीय जवानांची सीमेवर किंवा नियंत्रण रेषेवर हत्या झाली किंवा त्यांची मुंडकी कापून नेली; त्यांच्या मृत्यूला काय म्हणतात? इंदिराजी व राजीव गांधी यांचा मृत्यू हौतात्म्य असेल आणि त्याचा घुस्सा राहुलना अजून प्रक्षुब्ध करीत असेल वा म्हणूनच हिंसेने राहुल खरेच व्यथीत होत असतील; तर त्यांना त्या जवानांच्या कुटुंबाच्या वेदना वा यातना नक्कीच कळल्या असत्या. अशा निदान तीनचार डझन भारतीय जवानांची वर्षभरात हत्या झाली आहे. त्यापैकी कुणा एकाच्या आप्तस्वकीय कुटुंबियांचे सांत्वन करायला तरी राहुल गांधी फ़िरकले होते काय? २९ वर्षापुर्वीच्या आपल्या आजीचे आणि बावीस वर्षापुर्वीचे आपल्या पित्याचे हौतात्म्य आठवणार्‍याने; हिंसा व हौतात्म्याच्या बळींची वेदना आपल्याला कळते, हे कशाच्या आधारे सांगावे? त्यांच्याशी स्वत:चे नाते कसे सांगावे? निवडणूकीच्या प्रचारातून, की जेव्हा त्याच पिडीतांच्या डोळ्यात अश्रूंची धार लागलेली असते तेव्हा ते अश्रू पुसून? गेल्या साडेनऊ वर्षात निदान दहा बारा हजार लोक विविध कारणाने हिंसेचे वा घातपातचे बळी झालेले आहेत, त्यापैकी कितीजणांचे अश्रू पुसायला हा आजीचा नातू वा पित्याचा पुत्र गेला आहे? सत्तेचा उपभोग घेताना साडेनऊ वर्षात त्याला एकदाही आपल्या आजी व पित्याच्या हौतात्म्याचे स्मरण कशाला झालेले नाही? आणि त्या दोन्ही हत्याकांडात भाजपाचा काय संबंध होता? उलट त्या दोन्ही प्रकरणात जे राजकारण आजी व पिता खेळले होते; त्यातूनच त्यांचे हत्याकांड घडलेले आहे. आजीच्या हत्याकांडानंतर हजारो शिखांचे जे शिरकाण कॉग्रेसी गुंडांनी व दंगलखोरांनी केले; तेव्हा राहुलची मम्मी किती लोकांचे अश्रू पुसायला गेली होती? लोक यांना इतके मुर्ख वाटतात काय? त्या दोन्ही घटनांचे साक्षीदार व त्यात हेलावून गेलेल्या दोन पिढ्या त्या हौतत्म्याची किंमत मोजून आता मागे पडल्या आहेत. आजच्या मतदाराला असली नाटके पचणारी नाहीत, हे पुढल्या दिड महिन्यातच या युवराजांच्या लक्षात येईल.

No comments:

Post a Comment