Saturday, October 19, 2013

बावन्नकशी मुर्खपणा

  उत्तरप्रदेशच्या उन्नाव जिल्ह्याच्या कुठल्या किल्ल्यात सोन्याचा प्रचंड खजीना असल्याचे व तो लौकरच खोदून काढला जाणार असल्याचे काहूर माजलेले आहे. कुणा साधूने त्याला स्वप्नात असे गुप्तधन, त्या किल्ल्याच्या मूळच्या राजाने दडवून ठेवल्याचे स्वप्नात येऊन सांगितल्याचे बातम्यातून समोर आलेले आहे. पुरातत्व विभाग त्या किल्ल्यात खोदकाम करून शोधही घेण्याच्या कामाला लागला आहे. मग वाहिन्यांना दुसरे काय हवे? आसारामला तसाच अर्धवट वार्‍यावर सोडून, बहुतांश वाहिन्या कल्पनेतल्या बातम्यांचे उत्खनन करू लागल्या आहेत. तिथे खरेच एक दोन हजार टन सोने मिळेल काय? तिथेच सोने असेल काय? आता तरी त्याबद्दल काही सांगता येणार नाही. पण उत्तरप्रदेश ही खरेच सोन्याची व रत्नांचीच खाण आहे. तिथे कुठेही गावखेड्यात खोदल्यास  मोठ मोठे गुप्तधनाचे साठे सापडू शकतात. आणि काही प्रसंगी तर खोदायचीही गरज नसते, हवेतल्या हवेत अनमोल रत्ने, माणके तिथे कुठल्याही गावात सापडू शकतात. तुमच्यामध्ये शोधण्याची जिद्द असायला हवी. तिथे स्वप्ने पडणारे साधू असतात, तसेच स्वप्ने बघणारे लोक असतात आणि स्वप्ने दाखवू शकणारे चमत्कारी नेते महापुरूषही असतात. त्या सगळ्या नौटंकीमध्ये सहभागी व्हायची तुमच्यात हिंमत व सोशिकता तेवढी असायला हवी. नऊ वर्षापुर्वी तिथे एका दुर्गम खेड्यात अब्दुल कलाम यांच्यापेक्षाही अगाध बुद्धीमत्ता व प्रतिभा असलेला सौरभ सिंग नावाच्या शाळकरी मुलाने माध्यमांना अशीच ब्रेकिंग न्युज पुरवली होती. तेव्हा विषय सोन्याचा नव्हता तर ‘सोन्या’सारख्या गुणी मुलाचा होता. मग त्याच्या उच्चशिक्षणासाठी लाखो रुपये द्यायला सगळीकडून रिघ लागली होती. पण ती गुप्तधनासारखी प्रतिभा लौकरच चव्हाट्यावर आलेली होती.

   माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या बलीया जिल्ह्यातील नरही गावातला हा चौदा वर्षाचा शाळकरी मुलगा थेट अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्था ‘नासा’च्या कुठल्या जटील परिक्षेत पहिला आलेला होता आणि त्यातून तो गहजब माजलेला होता. कल्पना चावला आणि अब्दुल कलाम यांनी यश मिळवलेल्या त्याच परिक्षेत सौरभने मोठे यश मिळवलेले होते. गावातल्या लोकांना ही बातमी मिळताच आपल्या गावातल्या सोन्याला बाजारमूल्य मिळावे, म्हणून त्यांनी जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केला. त्याची बातमी स्थानिक वृत्तपत्रात झळकली आणि जिल्हा व प्रादेशिक पत्रकार तिथे जाऊन धडकले. त्यांनी त्या पोराचे फ़ोटो काढून त्याच्यावरल्या अन्यायाला वाचा फ़ोडली. तेच सुत्र पकडून मग प्रथम हिंदी व नंतर बाकीच्या वृत्तवाहिन्यांनी जोरदार आवाज उठवला. दोन दिवसातच ती देशव्यापी बातमी झाली. नुसती देशव्यापी नाही, थेट अमेरिकेत ती बातमी जाऊन पोहोचली. प्रत्येक वाहिनीवर सौरभच्या अदभूत यशाचे पोवाडे गायले जात होते. आजच्या उत्तरप्रदेशी मुख्यमंत्री अखिलेशचे पिताश्री तेव्हा तिथले मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर लोकांनी टिकेची झोड उठवली. त्यांनीही तो मारा परतवण्यासाठी सौरभच्या उच्चशिक्षणासाठी पंचवीस लाखाचे अनुदान जाहिर केले आणि त्यांच्या समाजवादी पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपती भवनाचे दार ठोठावत सौरभला अब्दुल कलाम यांना भेटवायचे प्रयास सुरू केले. त्यातून सौरभची कहाणी डॉ. कलाम यांच्यापर्यंत पोहोचलीच. पण आपण इथपर्यंत आलो, त्या वैज्ञानिक वाटचालीत आपण ’नासा’ची परिक्षा दिली असल्याचा सुगावा अब्दुल कलाम यांना प्रथमच लागला. त्यांच्यावर या चमत्काराने थक्क होण्याची पाळी आली. तिथून या गुप्तधनागत असलेल्या छुप्या प्रतिभेची उलटी कहाणी सुरू झाली.

   सर्वप्रथम कलाम यांनी आपल्या प्रवक्त्यामार्फ़त आपण अशी कुठली परिक्षा दिलेलीच नाही, त्यामुळे ती उत्तीर्ण होण्याचा प्रश्नच येत नसल्याचा खुलासा करून टाकला. त्यामुळे अमेरिकेच्या ‘नासा’ संस्थेलाही त्या बातमीची दखल घ्यावी लागली. त्यांच्या प्रसिद्धीप्रमुखांनी तात्काळ अशी कुठली परिक्षा ‘नासा’ घेतच नसल्याचा खुलासा करून टाकला. तेव्हा मग चारपाच दिवस ब्रेकिंग न्युज देण्याची झिंग चढलेल्यांची नशा थप्पड बसल्यासारखी उतरू लागली. मग कुठे प्रत्येक वाहिनीचा व मुख्य वृत्तपत्रांचा प्रतिनिधी त्या बलियाच्या खेड्यात धावत सुटला. कारण सगळेच त्या चौदा वर्षाच्या पोराने उठवलेल्या अफ़वेला बळी पडले होते. घरातून काही हजार रुपये घेऊन आपल्या शिक्षकासह कोटा येथे स्कॉलरशीपच्या परिक्षेचा क्लास मिळवण्यासाठी गेलेल्या या पोराने; आपल्या मास्तरांसह हजारो रुपये मौज करण्यात उधळले होते आणि घरच्यांना सत्य सांगायची हिंमत नसल्याने पैशाची ‘नासा’डी केल्याची लोणकढी थाप ठोकलेली होती. त्यांना मोठाच अभिमान असल्याने त्यांनी ती गावभर केली आणि ती गावगप्पा थेट देशव्यापी ब्रेकिंग न्युज होऊन गेली होती. उपग्रहवाहिन्यांचा जमाना आल्यापासून आपल्या देशातील पत्रकारितेची अवस्था किती तकलादू झाली आहे, त्याचा हा नऊ वर्षापुर्वीचा नमुना. पुढल्या काळात दिवसेदिवस पत्रकारिता व बातम्यांची विश्वासार्हता पुरती रसातळालाच गेलेली आहे. ज्यांना नऊ वर्षापुर्वी एका चौदा वर्षाच्या कोवळ्या पोराने हातोहात बनवले, त्या दिवट्या पत्रकार वा वाहिन्यांना उल्लू बनवायला कोणा भोंदू साधूला फ़ार मोठे कष्ट पडतील काय? जे अस्सल निर्भेळ मुर्खच असतात, त्यांना फ़सवण्याची गरजच काय? बावनकशी मुर्खांना फ़सवायला अस्सल सोन्याची गरज काय?

1 comment:

  1. भाऊ,

    याची लागण युरोपातही झाली आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी शौर्य राय या जर्मनीतील शालेय विद्यार्थ्याने म्हणे पार्टिकल डायनॅमिक्स मधील कुठलेसे कोडे सोडवले. या बातमीची इतकी प्रसिद्धी केली गेली की मूळ कोडे व त्याची उकल काय आहे यावर कुठल्याही प्रथितयश युरोपीय वृत्तपत्राने भाष्य केले नाही. पार्टिकल डायनॅमिक्स या शाखेचा न्यूटनशी काडीमात्र संबंध नाही हे सांगायला प्रसारमाध्यमांतील कोणी माईचा लाल पुढे आला नाही. ना कोणी तत्ज्ञांना विचारायचे कष्ट घेतले. युरोपीय प्रसारमाध्यमांचीही भारतासारखीच गत आहे. एखादी सनसनाटी बातमी दिसली की कसलीही शहानिशा न करता वावड्या उठवायच्या !

    अमेरिकेत अजूनच भीषण परिस्थिती आहे. तिथे 'मीडिया स्टडीज' मध्ये पदवीधर होऊन बाहेर पडणार्‍या स्नातकास विषयाची कवडीमात्र जाण नसते. हां पण डोक्यावर कर्जाचा डोंगर मात्र पडलेला असतो. तो निवारण्यासाठी 'मोठ्या' ठिकाणी नोकरीची गरज असते. मग 'बाबावाक्यं प्रमाणं' ! अर्थात, यास सन्माननीय अपवाद आहेत, नाही असं नाही. पण ते अपवाद आहेत, यातच सारं काही आलं नाहीका ?

    बेअकलीपणाचे कारखाने जगात सर्वत्र चालू आहेत. घरोघरी मातीच्याच चुली. दुसरं काय !

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete