Monday, October 21, 2013

अंधश्रद्धेचे दिवास्वप्न

हिंदू ................................. राष्ट्रवादी



   उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यामध्ये एका किल्ल्यामध्ये गाडलेले भूमीगत सोने मिळणार असल्याच्या अफ़वा आणि त्यासाठी पुरातत्व विभागाने आरंभलेले शोधकाम, यामुळे शेतीमंत्री शरद पवार कमालीचे नाराज झालेले आहेत. कुठे भूमीगत सोने मिळण्याची शक्यता अजिबात नाही, असे पवारांनी ठामपणे सांगून टाकले आहे. तेवढ्यावर थांबले असते तर पवारांना कोणी धुर्त मुत्सद्दी कशाला म्हटले असते. सोने मिळणार नाही सांगून झाल्यावर त्यांनी असले उद्योग म्हणजे अंधश्रद्धेला प्रोत्साहन असल्याचीही पुस्ती जोडली. त्याची काय गरज होती? कुठलाही धंदा उद्योग हा लोकांच्या हळव्या भावनांशी खेळ करूनच साधला जात असतो. अल्प मेहनत वा भांडवलात उत्तम नफ़ा कमावण्याचा सोपा मार्ग; म्हणजे त्या त्या क्षेत्रातली अंधश्रद्धाच असते. अंधश्रद्धेने लोकांच्या भावनांना आवाहन केले, मग लोक आपले घरदार विकून आपले सर्वस्व तुमच्या चरणी अर्पण करायला तयार असतात. मग ती बुवाबाजी असो किंवा राजकारण, समाजकारण असो. अगदी बुद्धीवाद सुद्धा त्यातून सुटत नाही. त्यामुळेच पवारांनी पुढली अंधश्रद्धेची पुस्ती जोडायचे काही कारण नव्हते. जमीनीतल्या सोन्याची गोष्ट सोडा, शेती वा सहकाराची गोष्ट घ्या. मागल्या कित्येक वर्षात शेतीतून सोने काढायच्या आश्वासनावर पवार किती दिर्घकाळ सत्तापदावर आरुढ झालेले आहेत? म्हणून शेती वा सहकाराच्या मार्गाने लोकांच्या नशीबी सोने आलेले आहे काय? काही हजार शेतकर्‍यांना महाराष्ट्रात तर लाखभर शेतकर्‍यांना देशात आत्महत्या करायची पाळी आली. मग शरद पवार जी प्रगत शेती वा विविध योजनांची स्वप्ने दाखवतात, त्याला अंधश्रद्धा म्हणायचे काय? कुठल्या बाबा, बापू वा बुवाने आजवर शरद पवारांच्या सहकार वा प्रगत शेती उद्योगावर अंधश्रद्धेचा आरोप केलेला नाही ना?

   जमीनीतून गाडलेले सोने शोधणे ही अंधश्रद्धा असेल. पण भूमीतून सोन्यासारखे पीक निर्माण होते, हे तर स्वप्न वा अंधश्रद्धा नाही ना? मग त्याबाबतीत पवार यांनी काय केले आहे? शेती उद्योगात निसर्गाची किमया वापरून शेतकरी आपल्या घामाचे व मेहनतीचे सोने निर्माण करीत असतो. त्याने निर्माण केलेल्या त्या संपत्तीला सोन्याचा भाव मिळू शकतो. जितके पिक, म्हणजे संपत्ती शेतातून निर्माण केली, तिला बाजारात योग्य मोल मिळाले; तर त्या शेतकर्‍याला सोनेचे जमीनीतून काढल्याची अनुभूती होऊ शकते. पण गेली साडे नऊ वर्षे देशाचे कृषीमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या पवारांनी, बाजारभाव या अंधश्रद्धेतून शेतकरी वा सरकारची सुटका करण्यासाठी कुठली पावले उचलली? जेव्हा शेतमाल हाती येतो, तेव्हा त्याचे बाजारमूल्य पाडले जाते आणि बिचार्‍या शेतकर्‍याला मातीमोल भावाने आपल्या घामातून निर्माण झालेले सोने विकावे लागत असते. म्हणजेच कृषीविषयक कुठलेच ठाम धोरण नसल्यामुळे सोन्याची माती होऊन जाते आणि शेतकर्‍याला विष प्राशन करून आत्महत्या करावी लागत असते. शेतमाल हे कष्टातून निर्माण होणारे म्हणजेच भूमीतून मिळणारे सोनेच आहे. पण ठराविक मुदतीमध्ये त्याच्या साठवणीची सुविधा नसेल; तर त्याची नासाडी होते, म्हणजेच ते सोने मातीमोल होऊन जाते किंवा मातीमोल भावाने विकावे लागते. उदाहरणार्थ मध्यंतरीच्या काळात आभाळाला जाऊन भिडलेल्या भावाचा कांदा हे शेतकर्‍यानेच निर्माण केलेले सोने होते. पण त्याचे मोल त्याला मिळाले नाही. ज्याच्यापाशी कांद्याची साठवण करायच्या सुविधा होत्या; त्याने मातीमोल भावाने खरेदी करून ठेवलेला तोच कांदा कृत्रीम टंचाई निर्माण करून सोन्याच्या भावाने विकला. त्याला काय म्हणायचे?

   शेतमाल बाजारात येतो, तेव्हा बाजारभाव कोसळतात आणि गोदामात माल साठल्यावर त्याच वस्तुंच्या किंमती अवाच्या सव्वा वाढतात, त्याला चमत्कार म्हणायचे की अंधश्रद्धा? प्रतिवर्षी निदान एक लाख कोटी रुपये किंमतीचा शेतमाल नाशीवंत म्हणून वाया जातो. कारण त्याची साठवण करायची व्यवस्था आपल्यापाशी नाही. सहा सात दशकाच्या कालखंडात भूमीतून मिळणार्‍या या सोन्याची राखण करण्यासाठी साठवण सुविधा नामक तिजोरी सरकारला उभारता आलेली नाही. शेती हा उद्योग आहे आणि त्याला व्यवस्थापन, नियोजन व गुंतवणूक आवश्यक आहे; याचे भान इतक्या वर्षात न आलेले सरकार व त्याचे कृषीमंत्री आधुनिक युगातले म्हणायचे काय? विना सहकार नाही उद्धार म्हणण्यात पवारांची सर्व उमेद खर्ची पडली. आज त्याच सहकाराने साकार झालेल्या बॅन्का, साखर कारखाने दिवाळखोरीत जाऊन कवडीमोल किंमतीत खाजगी उद्योजकांना विकले जातात. मग त्या सहकाराच्या युगाला प्रचाराला व भक्तीला अंधश्रद्धाच नाही तर काय म्हणायचे? ज्या राजकीय निष्ठा वा धुर्तपणाने पवारांच्या राजकीय वाटचालीचा पुरता बट्ट्याबोळ आजवर झाला, त्यामागची भूमिका अंधभक्तापेक्षा वेगळी म्हणता येईल काय? दोनदोनदा कॉग्रेस सोडून वा पुन्हा त्याच पक्षात शिरताना पवार यांनी खेळलेले डावपेच कुठल्या श्रद्धेतून आलेले होते? बुवाचे स्वप्न बाजूला ठेवा. पवारांच्याच पठडीत तयार झालेले आबा पाटिल महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत. त्यांना डॉ. दाभोळकरांचे खुनी दोन महिने उलटून गेल्यावरही पकडता आलेले नाहीत. असे असताना तेच आबा, गुन्हेगारांना शिक्षा देणारच, असल्या वल्गना करतात, तेव्हा अंधश्रद्धा कशाला म्हणायचे? शोभन सरकार साधूने स्वप्नात बघितलेले एक हजार टन सोने आणि महाराष्ट्राच्या मुख्य्मंत्र्यांनी दिवसाढवळ्या दाभोळकरांचे खुनी गांधीवधाची प्रवृत्ती असल्याचे बघितलले दिवास्वप्न; यात नेमका कोणता वैज्ञानिक फ़रक असतो, पवार साहेब?

No comments:

Post a Comment