Wednesday, October 23, 2013

भाजपातील बदलाची चाहुल



    मंगळवारी भाजपाच्या संसदीय मंडळाची भल्या सकाळी बैठक घेण्यात आली, तेव्हा त्यात दिल्लीच्या उमेदवारांची यादी जाहिर करण्याआधीच तिथल्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची घोषणा होणार; अशी बातमी पसरली होती. त्यात प्रदेशाध्यक्ष विजय गोयलना बाजूला सारून डॉ. हर्षवर्धन यांना पुढे केले जाणार अशीही बातमी होती आणि झालेही तसेच. त्या घटनाक्रमाने पंधरा वर्षापुर्वी जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या, तेव्हा दिल्लीच्या भाजपामध्ये धमासान माजलेले होते; त्याची आठवण झाली. तेव्हा विद्यमान मुख्यमंत्री साहिबसिंग वर्मा आणि माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांच्यात धुमश्चक्री चालू होती. त्यांच्यातला लोकप्रिय नेता स्विकारयापेक्षा भाजपाने दोघांनाही बाजूला सारून सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री पदावर बसवले आणि अखेर दिल्लीची सत्ता गमावली होती. पुढे तिथल्या राजकारणात रस नसलेल्या स्वराज यांनी सोनियांच्या विरोधात थेट कर्नाटकात बेल्लारी येथून लोकसभा लढवली होती आणि पराभव पत्करला होता. मुद्दा इतकाच, की ज्यांना स्थानिक राजकारणात रस नाही, त्यांना त्यात लुडबुडू देण्याची चुक भाजपाला नडली होती. पण पुढल्या काळात भाजपा पुन्हा दिल्लीत सावरू शकला नाही. तिथे नव्याने स्थानिक नेतृत्व उदयास आले नाही. त्याला संसदीय मंडळ किंवा पक्षश्रेष्ठी नावाचा खलनायक जबाबदार होता. ज्यांना स्थानिक लोकमताचा थांगपत्ता नसतो आणि पक्षाच्या नेतेपदाचा मान मिळालेला असतो; असेच उपटसुंभ पक्ष बुडवत असतात. आजची कॉग्रेस पक्षाची दुर्दशा त्यातूनच झालेली आहे. देशात राष्ट्रीय पर्याय म्हणून उदयास आल्यापासून कॉग्रेसची भ्रष्ट नक्कल करताना भाजपाने मागल्या पंधरा वर्षात अशीच आपली ताकद गमावली आहे.

   खुराणा व विजय मल्होत्रा हे दिल्लीतले भाजपाचे स्थानिक प्रभावी नेते, त्यांना बाजूला सारताना नव्याने उत्साही व कणखर नेता श्रेष्ठी देऊ शकले नाहीत व आपल्या मर्जीतले बुजगावणे अधिकार पदावर बसवताना, त्यांनीच पक्षाची पुरती वाट लावली. जे दिल्लीत झाले तेच राजस्थान उत्तरप्रदेश, झारखंड, आसाम वा कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यात झालेले आहे. ज्यांनी कंबर मोडून राज्यात पक्षाची उभारणी केली; त्यांनाच नामोहरम करण्यातून आपण राज्यातली संघटना मोडीस आणतो आणि पर्यायाने त्याचा लोकसभा विवडणुकीवर परिणाम होतो, हे दिल्लीत आयत्या बिळावर बसलेल्या श्रेष्ठींना कधीच कळत नसते. तिथेच कुठल्याही राजकीय पक्षाचा बोजवारा उडत असतो. दिग्विजय, गुलाम नबी आझाद, सुशीलकुमार शिंदे, मनमोहन सिंग इत्यादी कॉग्रेस श्रेष्ठी वा भाजपातले जेटली, स्वराज, अडवाणी, अनंतकुमार पक्षश्रेष्ठी कोण आहेत? त्यांचे स्थानिक महात्म्य काय? राज्यातल्या नेत्यांनी बांधलेल्या संघटना व राष्ट्रीय नेत्याच्या प्रतिमेवर हे लोक दिल्लीत जाऊन पोहोचतात. मग त्यांनी राज्यातील नेत्यांचे खच्चीकरण करायचे; असलाच प्रकार होत नाही काय? राजस्थानचे मोठे नेते भैरोसिंह शेखावत यांनी कधी बहुमत मिळवले नव्हते; ते वसुंधराराजे यांनी मिळवून दाखवले, त्यांना मागल्या निवडणुकीत सतावणारे भैरोसिंह शेखावत व त्यांनाच पाठीशी घालणार्‍या भाजपा श्रेष्ठींनी राजस्थानची सत्ता मागल्या खेपेस गमावलेली नव्हती काय? दिल्लीत वेगळे काहीच नव्हते. पंधरा वर्षात तिथे भाजपानेच आपला समर्थ स्थानिक नेता उभा राहू दिला नाही, म्हणूनच शीला दिक्षीत यशस्वी होऊ शकल्या होत्या. यावेळीही विजय गोयलच्या नेभळट नेतृत्वावर कॉग्रेससह आम आदमी पक्षाची मदार होती. तिला ताज्या बदलाने धक्का बसणार आहे.

   आपल्या अल्पावधीच्या सत्ताकाळामध्ये पोलिओ लसीकरणाने देशभर कौतुकाचा विषय झालेल्या डॉ. हर्षवर्धन यांच्या गुणवत्तेला संधी देण्याचा विचारही आजवर झाला नाही. उलट केंद्रीय मंत्रीमंडळात महत्वाच्या खात्याचा मंत्री म्हणून काम करूनही दिल्लीत निष्प्रभ राहिलेल्या गोयल यांनाच अलिकडेपर्यंत मुख्यमंत्री म्हणुन पुढे करण्याचे कारणच काय होते? कार्यकर्ते व लोकमताचा कल विरोधी जाताना दिसत असूनही त्यात बदल करायला श्रेष्ठींना इतका विलंब कशाला लागावा? कर्तबगार नेता आपल्या आवाक्यात वा मुठीत रहाणार नाही, अशा भयाने पछाडलेल्या श्रेष्ठींकडुन पक्षाचे नुकसान होते. संसदीय मंडळात मोदी आलेच नसते, तर आज दिसतो तसा बदल दिल्लीतही होऊ शकला नसता. गोयल जाऊन हर्षवर्धन आले, ती मोदींची किमया आहे, याबद्दल मनात शंका बाळगण्याचे कारण नाही. कर्तृत्वहीन महत्वाकांक्षा बाळगणार्‍यांची गर्दी पक्षात वा संघटनेत झाली आणि त्यांच्याच हाती पक्षाची सुत्रे गेली; मग कुठल्याही संस्था संघटनेचा बोजवारा उडत असतो. प्रणब मुखर्जी यांना राष्ट्रपती पदावर बसवून सोनियांनी आपल्या समोरचे आव्हान निकालात काढले असले तरी पक्ष व सरकारचा तोल त्यानंतरच गेला, हे विसरता कामा नये. आज कॉग्रेस श्रेष्ठी म्हणून त्यांच्याभोवती असलेला गोतावळा कर्तृत्वहीन होयबा लोकांचा आहे. तेच अडवाणींनी भाजपात केलेले होते. मोदींच्या उमेदवारीने त्याला शह दिला गेला आणि मागल्या सहा महिन्यात भाजपामध्ये देशातल्या सर्व कार्यकर्ता व पक्ष शाखांमध्ये उत्साहाचे वातावरण त्यामुळेच आलेले दिसते आहे. अधिकारपदे उबवत बसलेल्या नेत्यांना निष्ठूरपणे बाजूला सारण्याचे धाडसच पक्षाला यशाची हमी देत असते. मोदींनी अडवाणींच्या तक्रारीला झुगारून त्याची चुणूक दाखवली होती. आता दिल्लीतल्या नेता बदलातून भाजपाच्या पुढल्या वाटचालीची चाहुल दिली आहे. कुठल्याही अटीशिवाय येदीयुरप्पा माघारी यायला निघाले ही त्याचीच साक्ष आहे.

1 comment: