Monday, October 28, 2013

खोटेपणा उघडा पडला



  रविवारी पाटणा येथे झालेल्या बॉम्बस्फ़ोट मालिकेनंतर आपला मुंगेरचा दौरा अर्धवट सोडून मुख्यमंत्री नितीशकुमार पाटण्यात आले व त्यांनी घटनेच्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. आपण सत्ताधारी म्हणून पुर्ण खबरदारी घेतली होती.म्हणूनच यात राजकारण आणू नये असे त्यांनी आग्रहपुर्वक सांगितले. पण त्यांच्या बोलण्यात कितीसे तथ्य आहे? पहिली गोष्ट म्हणजे राजकारणातला विरोध व्यक्तीगत जीवनात असता कामा नये असे नितीश म्हणाते, त्यात किती सत्य आहे? कुठल्याही राज्याचा मुख्यामंत्री वा केंद्राचा मंत्री राज्यात आला असताना त्याला सरकारी पाहुणा म्हणून सन्मानित करायचा शिष्टाचार असतो. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री आहेत आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीसाठी पाटण्याला आलेले होते. तेव्हा मित्र पक्ष भाजपाच्या संपूर्ण कार्यकारीणीला भोजनाचे आमंत्रण नितीशकुमार यांनी दिलेले होते. पण तिथे मोदी येता कामा नयेत, अट घातलेली होती. याला व्यक्तीगत पातळीवरचा द्वेष नाही तर काय म्हणायचे? ज्या द्वेषासाठी नितीशनी राजकीय शिष्टाचारालाही हरताळ फ़ासला होता. तोच माणूस रविवारी दुर्घटना घडल्यावर राजकारणातले हेवेदावे व्यक्तीगत जीवनात नसावेत, असा मानभावीपणे सांगत होता. एका व्यक्तीचा द्वेष करतानाच त्यांनी सतरा वर्षाची जुनी मैत्री निकालात काढली, याला व्यक्तीद्वेष नाही तर काय म्हणतात? तेवढ्यावरच भागत नाही. सहा महिने आधीपासून ज्या मेळाव्याची तयारी भाजपा करीत होता, त्यालाच अपशकून घडवण्यासाठी याच नितीशकुमारांनी ऐनवेळी दोन दिवसांसाठी राष्ट्रपतींना बिहार भेटीचे आमंत्रण देऊन मेळाव्याला सुरक्षा देण्यात अडचणी उभ्या केल्या होत्या. यातून त्यांचा व्यक्तीद्वेष साफ़ स्पष्ट होतो आणि तरी माणूस शहाजोगपणे सहिष्णूतेचे बोल बोलत होता.

   पुढे भाजपाच्या नेत्यांनी ही लबाडी राष्ट्रपतींच्या नजरेस आणून दिल्यावर, त्यांनीच रविवारी पाटण्यात थांबायचे नाकारले आणि इच्छेविरुद्ध पाटण्यात मोदींचा मेळावा योजण्यात आडवे येण्य़ाची संधी नितीशना नाकारली गेली. त्यावर मग त्यांच्या अनुयायी व प्रवक्त्यांनी भाजपासह मोदींवर तोफ़ा डागलेल्या होत्या. हा माणूस स्वत:पेक्षा राष्ट्रपतींनाही छोटा समजतो; असली शेलकी टिका केलेली होती. त्यातून नितीशची मोदीविषयक पोटदुखी साफ़ व्यक्त झाली आहे. मग आता त्यांनी दुर्घटना घडल्यावर मगरीचे अश्रू ढाळण्यात काही अर्थ आहे काय? लाखो लोक आपल्याच बालेकिल्ल्यात मोदींना ऐकायला व बघायला जमणार, या कल्पनेनेच नितीशचे पित्त खवळले होते. म्हणून त्यांनी राष्ट्रपती दौर्‍याचे कारण दाखवून सुरक्षेचा बंदोबस्त नाकारला होता. पण अखेरीस सुरक्षा द्यायची वेळ आल्यावर ती पुरेशी नसावी, याची पुरेपुर काळजी घेतली होती. म्हणूनच जिहादी बॉम्ब घेऊन वावरत असताना पोलिस त्यांना रोखू शकले नाहीत आणि पुन्हा अशी कुठली सुचना मिळाली नव्हती, अशी थाप नितीशनी पत्रकार परिषद घेऊन ठोकली. वास्तवात तशी सुचना चार दिवस आधी केंद्रीय गुप्तचर विभागाकडून मिळाल्याचे त्यांच्याच वरीष्ठ अधिकार्‍यांनी नंतर एका वाहिनीकडे कबुल केले. मुद्दा म्हणूनच गंभीर आहे. असे स्फ़ोट घडवण्यामागे नितीशचा हात आहे, असा आरोप कोणी करणार नाही. करूही नये. पण तसे काही घडण्याची शक्यता असेल, तर तेही रोखायची त्यांची इच्छा नव्हती, हेच यातून स्पष्ट होते. पण भाजपाच्या नेतृत्वाची पाठ थोपटावीच लागेल, की त्यांनी गंभीर प्रसंगात योग्य पवित्रा घेऊन शेकडो लोकांचे प्राण वाचवले आहेत. नितीशच्या प्रशासनावर अवलंबून राहिले असते तर हजार पंधराशे लोक तरी नक्कीच मेले असते.


   गेल्या वर्षी याच पाटण्यात छटपूजेसाठी लाखो लोक नदीकिनारी जमलेले होते. तिथली व्यवस्था नितीश प्रशासनाने केलेली होती. त्यातला एक तात्पुरता पुल कोसळताच लोकांमध्ये धावफळ व घबराट होऊन जी चेंगराचेंगरी झाली; त्यात शंभरावर लोकांचा हकनाक बळी गेला होता. त्याला नितीश प्रशासन म्हणतात. नेमकी तीच घातपाती जिहादींची योजना होती. त्यांना स्फ़ोटातून माणसे मारायची नव्हती. तर स्फ़ोटाने घबराट निर्माण करून गोंधळ उडवून द्यायचा होता. मग मेळाव्यासाठी जमलेल्या लाखो लोकांची पळापळ होऊन त्यात नुसत्या चेंगराचेंगरीनेच हजारोंचा सहजगत्या बळी पडला असता. पण सभास्थानी पाठोपाठ स्फ़ोट होत असतानाही, आयोजक भाजपा नेत्यांनी व्यासपीठावरून लोकांना शांत रहाण्याचा व फ़टाके फ़ुटत असल्याचे सांगून घबराट पसरणार नाही याची काळजी घेतली. गर्दीतल्या कार्यकर्त्यांनी लोकांना पळापळ करण्यापासून रोखले आणि म्हणुनच जिहादींची घातक योजना फ़सली. ह्याच सभेचा बंदोबस्त पुर्णत: नितीश सरकारच्या पोलिसांच्या हाती असता, तर चेंगराचेंगरीतच कित्येक लोक मारले गेले असते. सुदैवाने तसे काही घडले नाही आणि विद्वेषाचे राजकारण न खेळणार्‍या मोदींनी आपल्या भाषणातही त्या घातपाताचा उल्लेख टाळला. ज्यायोगे जमावात संतप्त भावनेचा उद्रेक होईल; असे बोलायचेही मोदी यांनी टाळले. उलट सुखरूप लोकांनी शांतपणे आपापल्या घरी परतण्याचे जातीने आवाहन केले. या एकाच चालीतून मोदी यांनी बिहारींना जिंकले. प्रत्यक्ष मतदान होईल तेव्हा त्याची पावती नितीशना मिळेल. द्वेष व मत्सराचे राजकारण कितीही सभ्य भाषेतले असले; म्हणुन त्याचे पितळ उघडे पडायचे थांबत नाही, याचाच हा पुरावा आहे. इतक्या स्फ़ोटानंतरही सभा सुरळीत पार पाडून मोदींनी आपल्या नेतृत्व गुणांचीच साक्ष दिली आहे.

No comments:

Post a Comment