Thursday, November 28, 2013

दिल्ली का घाबरलीय?



   आसाराम किंवा बाबा रामदेवच नव्हेतर अण्णा हजारे यांचे आंदोलन पेटलेले असताना दिल्लीतला प्रतिष्ठीत बुद्धीवादी वर्ग मात्र त्यांची हेटाळणी करण्यात दंग होता. अशा रितीने क्रांती होत नाही, सत्ता परिवर्तन वा समाज परिवर्तन शक्य नाही, असे आग्रहपुर्वक सांगायला हाच वर्ग आपली बुद्धी खर्ची घालत होता. मजेशीर गोष्ट अशी, की जेव्हा आसाराम, रामदेव किंवा अण्णा हजारे यांच्यासारख्यांचे आंदोलन वा गडबडींनी माध्यमांची जागा व्यापलेली नसते; त्या काळात हीच बुद्धीवादी मंडळी त्याच अण्णा वा रामदेवाच्याच भाषेत सरकार व राजकारण्यांवर टिकेचे आसूड ओढत असतात. जणू सरकार किंवा राजकीय नेत्यांच्या पापाचे पितळ उघडे पाडणारे हेच प्रामाणिक सत्यवादी आहेत. निदान असा आभास हेच उच्चभ्रू लोक जनतेसमोर उभा करीत असतात. पण ज्या सत्तेच्या विरुद्ध ही मंडळी अत्यंत मुद्देसुद बोलत वा भाषण करीत असतात; त्यातून त्या शासन व्यवस्थेमध्ये कधी सुधारणा होत नाही किंवा कुठलेही परिवर्तन घडून येत नाही. पण तेच परिवर्तन घडवून आणण्यासाठी ते संघर्ष करीत असल्याचा त्यांचा आवेश आपण नित्यनेमाने बघू शकतो. परंतू दुसरीकडे अधूनमधून कुठल्यातरी समारंभातून हीच मंडळी त्या ‘आरोपीत’ सत्ताधारी वा राजकारण्यांसोबत पार्ट्या करताना दिसतात. जणू रंगमंचावर एकमेकांच्या विरोधात भाषा बोलणारे नायक व खलनायक पडदा पडल्यावर हास्यविनोद करताना दिसावेत, त्यातलाच प्रकार असतो. म्हणजेच प्रतिष्ठीत बुद्धीवादी वर्गाचे असे नाटक नित्यनेमाने चालू असते. पण जेव्हा कधी त्यांनीच व्यक्त केलेल्या नाराजीला असंतोषाची जोड देऊन जनता रस्त्यावर येते; तेव्हा हाच वर्ग त्या आंदोलनाच्या विरुद्ध उभा ठाकतो, आणि यातून परिवर्तन होणार नसल्याची ग्वाही देऊ लागतो.

   अण्णा वा रामदेव यांच्या विरोधात कुठलेही भक्कम पुरावे नसताना आणि केवळ आरोप असताना, त्यांना गुन्हेगार ठरवण्य़ापर्यंत मजल मारणारे बुद्धीवादी लोक; आता तरूण तेजपाल गुन्हेगार ठरला असताना मात्र मूग गिळून गप्प आहेत. अण्णांच्या आंदोलनाला लोकशाहीविरोधी ठरवण्यात तीच मंडळी आघाडीवर होती. आपण बारकाईने बघितले तर एक लक्षात येते, की नेत्यनेमाने सत्ता व प्रस्थापित व्यवस्थेला शिव्याशाप देणारा हा बुद्धीवादी अभिजनवर्ग परिवर्तनाला सज्ज होऊन जनता रस्त्यावर येते, तेव्हा मात्र त्याच भ्रष्ट व्यवस्थेला जपण्यासाठी पुढे सरसावत असतो. थोडक्यात जी प्रस्थापित व्यवस्था किंवा सत्ताधारी असतात, त्यांच्या सत्तेत व व्यवस्थेमध्ये हा बुद्धीवादी वर्ग आपले हितसंबंध गुंतवून आपण परिवर्तनवादी असल्याचा निव्वळ आभास निर्माण करीत असतो. आपण शोषण वा अन्यायाचे विरोधक व न्यायाचे समर्थक असल्याचे भासवून जनतेची दिशाभूल करीत असतो. व्यवहारात हा वर्ग त्याच शोषणकर्त्या नेते व व्यवस्थेचा भागिदार असतो. तो महिलांच्या हक्क व न्यायाचा आवाज उठवतो, पण व्यवहारात तोच महिलांचे पद्धतशीर शोषण करीत असतो. सामान्यजनांना पापपुण्याचे भय घालून त्यांची दिशाभूल करणारा कुणी अध्यात्मिक बाबा बुवा आणि त्याला न्यायाचे हवाले देऊन त्याची दिशाभूल करणारा आजकालचा बुद्धीवादी अब्रुदार वर्ग; यात तसूभर फ़रक नसतो. म्हणूनच जेव्हा तेजपालच्या बलात्कारी लिलांचे प्रकरण चव्हाट्यावर आले, तेव्हा आरंभी कायद्याने आपले काम करावे, अशी मखलाशी प्रतिष्ठीतांकडुन सुरू झाली. तोंडापुरता निषेध करून मौन धारण करण्यात आले. आणि जेव्हा तेजपालने फ़रारी होऊन आपल्या गुन्हेगारी वृत्तीचाच पुरावा दिला; तेव्हा आता दिल्ली मुंबईतले अनेक प्रतिष्ठीत हात झटकू लागले आहेत.

   भाजपानेत्या सुषमा स्वराज यांनी कुणाचेही नाव न घेताच एक मंत्रीच तेजपालला वाचवतो आहे, असा आरोप केला होता. त्यावर कपील सिब्बल यांनी इन्कार करण्याची काय गरज होती? आपण तेजपाल याला मदत केलेली नाही, पण पुर्वी कधी टहलका सुरू करण्यासाठी पाच लाखाची देणगी दिली होती, असा खुलासा सिब्बल यांनी केला आहे. चोराच्या मनात चांदणे यालाच म्हणतात ना? आज दिल्लीतल्या अनेक प्रतिष्ठीतांची अब्रू तेजपालने पणाला लावली आहे. कारण तो फ़रारी झाला असून, जितके दिवस तो असा लपंडाव खेळणार आहे, तितके दिवस त्याचा गुन्हा चर्चेत रहाणार आहे. सहाजिकच आजवर त्याच्याशी निकटवर्तिय राहिलेले वा त्याला मदत करणार्‍यांकडे संशयाने बघितले जाणार आहे. त्यातून त्यांच्याच अब्रुचे धिंडवडे निघणार आहेत. अशी प्रतिष्ठीत मंडळी आता तेजपालच्या पापामुळे आपला मुखवटा फ़ाटण्याच्या भितीने बेजार झालेली आहेत. दुसर्‍या कुणाचे मुखवटे फ़ाडायला त्यांनीच आजवर तेजपालचा वापर केला आणि इतराच्या अब्रुचे धिंडवडे काढण्याचे डावपेच खेळलेले आहेत. त्यात दुखावले गेलेले किंवा नुकसान झालेले आता तेजपालच्या पापाचा आडोसा घेऊन अशा साळसूद प्रतिष्ठीतांना तेजपालचे भागिदार म्हणून बेइज्जत करायला निघाले असतील; तर त्यांना तरी दोष कसा देता येईल? ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात. या निमित्ताने सत्यकथनाचे दावे करणार्‍या अनेक माध्यमसमुह वा ज्येष्ठ पत्रकार विचारवंताच्या प्रतिष्ठेची लक्तरे चव्हाट्यावर आणली जाऊ शकतात. टहलकाने छुपे चित्रण करून जितकी पापे उघड केली; त्याच्या हजारो पटीने त्याच्याच पाठीराख्यांची लपवलेली पापे वेशीवर टांगली जाण्याच्या भयाने दिल्ली सध्या शहारली आहे. दिल्लीचा अभिजनवर्ग भेडसावला आहे. सिब्बल त्याची नुसती सुरूवात आहे.

1 comment:

  1. जसं हळू हळू सत्य बाहेर येत आहे कि तेजपाल चे व्यावसायिक, आर्थिक, संबंध कुणा कुणाशी आले तेव्हा असा उघडकीस येत आहे कि केवळ प्रतिष्ठीत नाहीत, तर गेले ३ कार्यकाल सत्तेवर असलेले अनेक पक्ष आणि त्यांचे नेते हेच तेहेलका ला पैसा, संरक्षण देऊन , अवैध मार्गाने 'sting journalism ' करायला उत्तेजन देत होते आणि त्यातून निर्माण केलेल्या खोटे पुरावे, साक्षीदार, video चित्रण , व इतर गोष्टींचा वापर करून आपल्या विरोधकांवर आरोप करुन , खटले भरून, हे नेत्ते आपला आणि आपल्या पक्ष श्रेष्ठींचा राजकीय मार्ग सुकर करत होते …

    ReplyDelete