Wednesday, January 22, 2014

शेफ़ारल्या पोराच्या उचापती

  

   गेल्या दिड महिन्यात म्हणजे दिल्ली विधानासभेच्या निवडणूकीचे निकाल लागल्यापासून त्यातील आम आदमी पक्षाच्या यशाने भारावलेल्या शहाण्यांकडून आपण सतत परिवर्तनाची भाषा ऐकत आलो आहोत. त्यात अर्थातच ‘आप’ पक्षाचे नेते व सर्वेसर्वा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परिवर्तनाचा जप सातत्याने चालविला आहे. आणि त्यांचा पक्ष देशात आमुलाग्र परिवर्तन घडवतो आहे; असाच आभास त्यांनी उभा केला होता. असल्या भाषा व शब्दांनी सर्वसामान्य माणूस भारावून गेला तर एकवेळ समजू शकते. पण मागल्या दीड महिन्यात त्या सामान्य माणसापेक्षा बुद्धीमंत व सुशिक्षित समजला जाणारा वर्गच ‘आप’च्या जादूला भुललेला दिसला. मात्र गेल्या दोनतीन दिवसात तो सामान्य माणूस शांत असताना, हेच बहकलेले बुद्धीमंत जागे होऊ लागले आहेत आणि त्यांनी या नव्या पक्षाच्या कार्यपद्धती व भाषेची दखल नवेपणाने दखल घ्यायला सुरूवात केली आहे. कारण आतापर्यंत मजेदार वाटलेले परिवर्तनाचे लोण आता त्याच बुद्धीमंतांच्या सुरक्षित जीवनाला येऊन धक्के देऊ लागले आहे. सरकार बनवण्यासाठी जनतेचा कौल, लालबत्तीच्या सरकारी गाड्या किंवा बंगले नाकारणे; असल्या भुलभुलैय्याने आम आदमी भारावत नाही. कारण सत्ताधार्‍याने आपल्या गरजेसाठी अशा सुविधा घेण्याबद्दल जनतेला कुठलाही आक्षेप नसतो. मात्र सर्व सुविधा मिळत असताना त्या सत्ताधार्‍याने आम आदमीला भेड्सावणार्‍या समस्यांचा निचरा करावा; हीच त्या गरीबाची अपेक्षा असते. केजरीवाल व त्यांचा पक्ष तिथेच लंगडा पडू लागला आहे. त्यामुळेच त्यांनी लोकांच्या ज्या समस्या सोडवण्याची मोठमोठी आश्वासने देऊन भरघोस मते मिळवली, त्याच समस्यांवरून लोकांच लक्ष उडवण्याच्या कसरती सुरू केल्या आहेत.

   असल्या राजकीय नाटकांचे दुष्परिणाम गांजलेल्या आम आदमीला नेहमीच भोगावे लागत असतात. त्यामुळे केजरीवालांच्या नाटकाने तो सामान्य माणूस वैतागलेला नाही. परंतू ज्या बुद्धीमंतांनी ह्या अर्धवटरावांना हरभर्‍याच्या झाडावर चढवले, त्यांना आता भयग्रस्त होण्याची पाळी आली आहे. कारण कालपर्यंत व्यवस्था परिवर्तनाची भाषा बोलणारे केजरीवाल आता व्यवस्था तशीच ठेवून केवळ व्याख्या परिवर्तनाचा खेळू लागले आहेत. बुद्धीवादी वर्गाची क्रांती अथवा परिवर्तन हे शब्दांपर्यंत मर्यादित असते. त्याचा व्यवहारी जगाशी संबंध नसतो. त्यामुळेच त्या आभासी शाब्दीक क्रांतीचा त्या सुखवस्तु बुद्धीवादी जगावर कुठला परिणाम संभवत नसतो. जेव्हा ते परिणाम व्यवहारात समोर येतात; तेव्हा सुखवस्तु बुद्धीजिवी वर्गाचे स्थापित जीवन डळमळू लागते. गेल्या आठवड्यात तीच स्थिती केजरीवाल यांनी निर्माण केली आणि मग त्यांच्या बुद्धीवादी चहात्यांची गाळण उडाली. कारण आता केजरीवाल यांना त्यांच्या अशा कृतीचे जाब व खुलासे विचारले जाऊ लागल्यावर त्यांनी यालाच लोकशाही व परिवर्तन ठरवण्य़ापर्यंत मजल मारली. थोडक्यात व्यवहारात सर्वकाही तसेच चालू आहे. म्हणजे नव्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी वा कार्यकर्त्यांनी आपली दांडगाई करणे; हेच आजवरचे व्यवहारी राजकारण होते. केजरीवाल यांनी त्यात कुठले परिवर्तन आणले? जे प्रकार शिवसेना, समाजवादी, कॉग्रेस वा तृणमूल अशा पक्षांनी सत्ता मिळाल्यावर केले; त्याचीच पुनरावृत्ती ‘आप’च्या हाती सत्ता आल्यावर सुरू झाली. फ़रक किरकोळ होता. उपरोक्त पक्षाच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी निदान आपल्या चुका व आगावूपणा नाकारला होता. केजरीवाल त्याच दांडगाईला जनतेचा लोकशाही सहभाग असे नाव देऊन टाकले.

   त्यांच्या कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी आपल्या सहकार्‍यांना सोबत घेऊन एक वस्तीत घातलेला धुडगुस, महिलांशी केलेला गैरव्यवहार आणि त्याबद्दल त्यांचे कान उपटण्यापेक्षा केजरीवाल त्यांचेच समर्थन करू लागले. त्याबद्दल त्यांच्याच परिवर्तनाचे कौतुक करणार्‍यांनी सवाल विचारले; तेव्हा केजरीवाल यांच्या परिवर्तनाची व्याख्याच बदलून गेली. इतर पक्षांच्या गुंडगिरी, दादागिरी, दांडगाईचा ज्या कारणास्तव निषेध जो बुद्धीमान वर्ग करीत होता, त्याच दांडगाईला केजरीवाल यांनी आता जनतेचा सहभाग असलेली लोकशाही, असे नाव देऊन टाकले. कुठे भाजपाच्या राज्यात कार्यकर्त्यांनी पबमध्ये जाणार्‍या महिलांना पळवून लावले होते. कुठे शिवसैनिक वा कॉग्रेस-समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनाच ओलिस ठेवले होते. तोच प्रकार ‘आप’च्या लोकांनी केला. आपल्या दांडगाईला पोलिस साथ देत नाहीत, तर त्यांच्या बदलीचे आग्रह अन्य पक्षांचे कार्यकर्ते धरतात. इथे तर खुद्द मुख्यमंत्र्यानेच अशा बदली निलंबनाची मागणी करून संपुर्ण दिल्लीच ओलिस ठेवली. याचा अर्थ इतकाच, की सामाजिक राजकीय परिवर्तन मागे पडून आता जुन्याच दांडगाईला परिवर्तनाचे लेबल लावून केजरीवाल क्रांती करायला निघाले आहेत. त्याच्या परिणामी बुद्धीमंत वर्गाची झोप उडाली आहे. मात्र त्याबद्दल केजरीवाल यांना दोष देता येणार नाही. कारण त्यांची पाठ थोपटण्याची घाई बुद्धीवादी वर्गाने केली होती. थोडक्यात त्यांनीच हे उनाड पोर शेफ़ारून ठेवले. आता त्याच पोराच्या उचापतींनी बुद्धीवादी वर्ग गडबडला आहे. त्या उचापतखोराला इतके डोक्यावर चढवून ठेवले नसते, तर तोही इतका धुडगुस घालायला सोकावला नसता. पण आपापल्या राजकीय स्वार्थ व हेतूंसाठी केजरीवालांचे अवास्तव कौतुक करणार्‍यांवर आता त्यांचाच डाव उलटला आहे.

1 comment:

  1. Bunty aur babli movie madhil Tajmahal sell kartaat...
    Aani khote andolan ubhe kartaat...
    Hamari mange puri karo...
    Mange kay te tyanach mahit naste...
    Ya scene chi aathvan jhaali...

    ReplyDelete