Monday, January 13, 2014

नारायण मुर्तींचे बोल


    दिल्लीत आम आदमी पक्षाचे अल्पमत सरकार आले आणि आता बहुतेक माध्यमे व पत्रकारांनी आगामी लोकसभा निवडणूकीत कॉग्रेस संपली असेच गृहित धरून बोलायला सुरूवात केली आहे. कारण विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांनी जे यश संपादन केले; त्यामुळे अनेक यशस्वी अधिकारी व्यवसायी त्या पक्षात दाखल व्हायची झुंबड उडाली आहे. चळवळीतले अनेक कार्यकर्ते पत्रकारही तिकडे धावत सुटले आहेत. प्रत्येकाला राजकारण वा देशाचा कारभार करणे अगदीच सोपे वाटू लागले आहे. जर एक आयकर विभागातला अधिकारी इतक्या सहजपणे निवडणूका जिंकून मुख्यमंत्री होऊ शकत असेल; तर आपण मोठ्या कंपन्या चालवलेले आहोत तर नक्कीच सत्ता काबीज करू, अशा भ्रमात अनेकजण हुरळले आहेत. पण सत्ता हाती घेतल्यावर केजरीवाल नेमक्या कुठल्या समस्या सोडवू शकले आहेत? त्यांनी मोठ्या उत्साहात जनता दरबार रस्त्यावर भरवण्याचा पवित्रा घेतला आणि त्याचा बोजवारा उडाला. तर त्याला पोरकटपणाही म्हणता येणार नाही. उलट त्यांच्या फ़सण्याची कारणमिमांसा व्हायला हवी. केजरीवाल यांच्या फ़सण्याचा आनंद त्यांच्या विरोधकांना व्हावा किंवा त्यातही त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या चुकांचेही समर्थन करावे; यातून वाद रंगवता येतील, पण लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत. वास्तव बदलणार नाही. म्हणूनच परिस्थिती बदलण्या्ला प्राधान्य असले पाहिजे. म्हणूनच केजरीवाल कुठल्या गृहितावर फ़सले, त्याकडे गंभीरपणे बघायला हवे. त्याच दृष्टीने बघता इन्फ़ोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मुर्ती यांचे शब्द मार्गदर्शक ठरावेत. शून्यातून एक मोठी कंपनी उभी करणार्‍या या कर्तबगार माणसाचे बोल खुप मोलाचे आहेत. पण त्यांच्याच जुन्या सहकार्‍यांना त्याचे भान आहे काय?

   नुकतेच बालकृष्णन हे इन्फ़ोसिसचे माजी मुख्याधिकारी आम आदमी पक्षात सहभागी झाले, तेव्हा नारायण मुर्ती यांचे शब्द आठवले. दहा वर्षापुर्वी माहिती तंत्रज्ञान विस्ताराचा खुप बोलबाला होता आणि त्यात आघाडीवर असलेले मुर्ती यांचे खुप कौतुक चाललेले असायचे. त्याच काळात टिव्ही पत्रकार बरखा दत्त यांनी नारायण मुर्ती यांची मुलाखत घेतली होती. त्यात मुर्ती यांना प्रश्न विचारला होता, की तुम्ही देशाचे यशस्वी पंतप्रधान होऊ शकाल ना? मग तसा प्रयत्न कशाला करत नाही? तुम्ही राजकारणात का येत नाही? तेव्हा मुर्ती यांनी नेमके दुखण्यावर बोट ठेवले होते. ते उत्तरले, इन्फ़ोसिस कंपनीच्या यशाला मी एकटाच कारणीभूत नाही, तिथला प्रत्येक कर्मचारी त्या यशाचा मानकरी आहे. मात्र तो प्रत्येक अधिकारी व कर्मचारी मला माझ्या गरजेनुसार निवडण्याची मोकळीक होती. परंतु पंतप्रधान वाजपेयी यांना सरकार ज्या कर्मचार्‍यांच्या मदतीने चालवायचे आहे, त्यातला एकही कर्मचारी वाजपेयी यांना निवडण्याचा अधिकार नाही. जे कर्मचारी आहेत, त्यांच्याकडूनच कारभार करून घेण्याची सक्ती वाजपेयी यांच्यावर आहे. तशी सक्ती माझ्यावर झाली असती, तर इन्फ़ोसिस इतकी यशस्वी करणे मला शक्य झाले नसते. माझ्या कंपनीतले नियम व कार्यपद्धती मी ठरवू शकतो. सरकारची कार्यपद्धती मला ठरवता किंवा बदलता येणार नाही. म्हणूनच मी पंतप्रधान झालो तर अपेशी ठरेन. ते माझे काम नाही. नारायण मुर्ती यांचे हे बोल अनुभवाचे आहेत. बाहेर बसून वाजपेयी किंवा मनमोहन सिंग यांचे काम ज्यांना सोपे वाटते; त्यांना तिथे जाऊन जबाबदारी उचलायची वेळ येते, तेव्हा अडचणी तुम्हाला जाणवू लागतात. नारायण मुर्ती पंतप्रधानाच्या अडचणी ओळखू शकले. कारण कुठलेही काम सहज व सोपे नसते.

   जगात बदल करायला निघालेल्यांना Real and Ideal  म्हणजे वास्तव आणि आदर्श यातला फ़रक ओळखता आला पाहिजे. तरच वास्तव बदलता येते. आदर्श ही निव्वळ कल्पना असते. ती वास्तवात आणायची तर आधी वास्तवाची जाण असायला हवी. साधे दगड घेऊन उंच मनोरे व पिरॅमिड हजारो वर्षापुर्वी ज्यांनी उभारले, त्यांचे आजही अजूबा म्हणून कौतुक कशाला होते? तर त्यांना त्या कालखंडात इतके तंत्रज्ञान ठाऊकच नसावे, हे आपले गृहित आहे. परंतु त्या काळातही मानव समाजाला काही प्रमाणात तंत्रज्ञान अवगत असावे, म्हणून आज असाध्य वाटणारे त्यांनी साध्य केलेले असावे. पण ते साध्य करण्यासाठी हाताशी असलेली वास्तव साधने व सोयी यांचा बारकाईने अभ्यास केल्यावरच त्यांनी अशा कामाला हात घातलेला असणार. नुसत्याच कल्पना व स्वप्नांचे फ़ुगे फ़ुगवून वास्तव बदलता येत नसते. आजचा कुणी इंजिनीयर असे मनोरे उभारू शकेल. पण त्याच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपल्ब्ध आहे. तेच नसते, तेव्हा आधी तंत्र व उपाय शोधून मगच कल्पनांचे वारूवर स्वार होणे आवश्यक असते. आज मोकाट सुटलेल्या अनेक ‘आप’नेते व समर्थकांना वास्तवाचे भान सुटलेले आहे. सरकार चालवण्यासाठी रॉकेट सायन्स समजण्याची गरज नाही, अशी मुक्ताफ़ळे उधळणार्‍या केजरीवालना साधा जनता दरबार योजताना घाम फ़ुटला व गर्दीतून पळ काढावा लागला, यातच त्यांना वास्तवाचे भान कसे नाही, याची साक्ष मिळालेली आहे. हळुहळू त्यातून लोकांचा भ्रमही दूर होईल आणि आज त्यांना डोक्यावर घेऊन नाचणारी माध्यमे व पत्रकारच मग त्यांच्या स्वप्नांच्या मुडद्याचे लचके तोडू लागतील, हे विसरता कामा नये. तेव्हा मग नारायण मुर्तीसारख्या जाणत्याचे बारा वर्षे जुने बोल किती मोलाचे आहेत त्याची प्रचिती येईल.

No comments:

Post a Comment