Monday, January 6, 2014

उंट डोंगराखाली आला


   उंट हा वाळवंटातला प्राणी आहे, तो कितीही दिवस पाण्याशिवाय रखरखित वाळवंट तुडवू शकतो. अथक चालू शकतो. पण उंट हा डोंगरावर चढत नाही की अशा उंच टेकड्यांवर वास्तव्य करीत नाही. त्यामुळेच जेव्हा कोणी फ़ार हवेतल्या गप्पा मारत असतो आणि नंतर त्याचे पाय जमीनीला लागतात, तेव्हा हिंदी भाषेत त्याला उंट डोंगराखाली आला असे म्हणतात. ‘अब आया उंट पहाडके नीचे’ अशी हिंदीत उक्ती आहे. नेमकी तीच आठवली, कारण आम आदमी पक्षाचा देशाच्या सत्तेला व राष्ट्रीय पक्षांना आव्हान देणारा उंच पर्वतावर बागडणारा उंट आता जमीनीवर येताना दिसतो आहे. दिल्ली विधानसभेच्या विधानसभा निवडणूकीत दुसरे स्थान व राजकीय गुंतागुंतीमुळे सत्तेवर जाऊन बसलेल्या या पक्षाच्या नेत्यांना, गेल्या चार आठवड्यात माध्यमांनी थेट हिमालयावरच नेऊन बसवले होते. त्यांनाही आपण हिमालय चढलो, असेच वाटत होते. म्हणूनच त्यांच्याकडुनही थेट लोकसभेच्या निवडणूका लढवित मोठमोठ्या नेत्यांना आव्हान देण्याची भाषा चालू होती. पण त्याच पक्षाची राष्ट्रीय कार्यकारीणीची सभा झाल्यावर, त्याच पक्षाचे जाणते नेते योगेंद्र यादव यांनी वास्तविकता स्पष्ट कबुल केली आहे. आपले लक्ष अधिकाधिक लोकसभा जागा लढवण्याकडे असले, तरी आमचे प्राधान्य आगामी लौकरच होणार्‍या विधानसभा निवडणूकीवर असेल, असे त्यांनी सांगितले आहे. त्याचे कारण यादव स्वत: निवडणूक निकालाचे अभ्यासक व विश्लेषक आहेत. त्यांच्याखेरीज मुख्यमंत्री पदावर आरुढ झालेले दुसरे नेते अरविंद केजरीवाल यांनीही आपण लोकसभेचे उमेदवार नसल्याचे साफ़च सांगून टाकले आहे. माध्यमे त्यांना पंतप्रधान पदावर बसवायला उतावळी झाली असताना, या ‘आप’च्या सेनापतीने रणांगणातून माघार कशाला घ्यावी?

   पहिली गोष्ट म्हणजे दिल्लीत चमत्कार घडवणार्‍या केजरीवाल यांच्या यशाची माध्यमातून झालेली मिमांसा व कौतुक किती फ़सवे आहे, याची त्यांना पुरेशी जाणिव आहे. त्यांनी कॉग्रेस विरोधी मतांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले असले, तरी भाजपाचे मतदार फ़ोडण्यात त्यांना अजिबात यश मिळालेले नाही. पण त्यांनी कॉग्रेसप्रमाणेच बसपा म्हणजे तिसर्‍या गटात मोडणार्‍या सेक्युलर पक्षाची जागा व्यापलेली आहे. त्यामुळेच भाजपाच्या बालेकिल्ल्यात मोठे यश मिळवणे सोपे नाही आणि दिल्लीत दिलेली आश्वासने पुर्ण करण्यातली कसूर पुढल्या काही महिन्यातच अंगाशी येणार याचे त्यांना भान आहे. आगामी लोकसभा निवडणूक ऐन उन्हाळ्यात व्हायची असून तेव्हा दिल्लीच्या बकाल वस्त्या, झोपडपट्ट्यामध्ये पाण्य़ाचे दुर्भिक्ष्य कळीचा मुद्दा बनणार आहे. त्यावेळी स्थानिक मतदारांचा रोष पत्करून लोकसभा लढवणे माध्यमांना वाटते तेवढे सोपे नाही. त्यापेक्षा मिळालेली दिल्लीतील मते व प्रतिष्ठा जपण्यासाठी दिल्लीच्या पाणीपुरवठ्याला प्राधान्य द्यायला शक्ती खर्ची घालणे आवश्यक आहे. तिकडे दुर्लक्ष करून लोकसभेच्या मैदानात उतरणे, म्हणजे दिल्लीवाल्यांच्या आक्रोशाचे हत्यार बनवण्याची संधी कॉग्रेस व भाजपाला आयती सोपवण्याचा मुर्खपणा असणार आहे. उन्हाळ्यातल्या पाणीटंचाईचा जाब दिल्लीतले लोक माध्यमांना विचारणार नाहीत किंवा देशभरच्या ‘आप’च्या उमेदवारांना दिल्लीतल्या अपयशाचा जाब देण्याची नामुष्की ओढवेल. तिथे माध्यमांतले कौतुक कामाचे ठरणार नाही. याच जाणिवेतून केजरीवाल यांनी माघार घेतली आहे. शपथविधी समारंभातच लाचखोरांना पकडण्यासाठी हेल्पलाईन म्हणून एक फ़ोननंबर घोषित करण्याची योजना सात दिवस उलटून गेल्यावरही तडीस गेलेली नाही, त्याबद्दल आवाज उठू लागला आहे.

   थोडक्यात चार आठवड्याच्या अवधीत केजरीवाल व यादव अशा ‘आप’नेत्यांचे पाय जमिनीला लागलेले आहेत. कारण आता ते रामलिला मैदान.वा जंतरमंतर अशा ठिकाणी बसलेले घोषणा देणारे निदर्शक राहिलेले नसून सरकार बनलेले आहेत. आणि सरकारचे मंत्री किती साधेपणाने जगतात, यापेक्षा ते जनजीवनात भेडसावणार्‍या किती समस्या निकाली काढतात, याला महत्व आहे. माध्यमांना ज्याचे कौतुक असते, त्याबद्दल जनतेला सोयरसुतक नसते, तुम्ही आमच्याकडे मते मागितली, ती दिली. आता आम्हाला भेडसावणार्‍या समस्यांवर उपाययोजना करा; इतकीच लोकांची अपेक्षा असते. कुठ्ले चॅनेल वा वृत्तपत्र तुम्हाला मोठे साधूसंत म्हणते; त्याच्याकडे जनता ढुंकून बघत नाही. साधेपणाचे कौतुक असते, पण ते नाकर्तेपणावरचे पांघरूण होऊ शकत नाही. याची अशा मोजक्या ‘आप’नेत्यांना जाणीव होत चालली, हे उत्तम लक्षण आहे. एक चांगली चळवळ व त्यातून उत्साहात समोर आलेले तरूण नेतृत्व आगामी दोनतीन दशकात देशाला नेतृत्व देण्याची नवी शक्यता आहे. त्यांचा दुर्दैवी शेवट आरंभीच्या उतावळेपणातच होत कामा नये. कारण अशा उत्साह व नवखेपणातून झालेल्या चुकाही नव्या दिशा शोधून देत असतात, जुन्या व कालबाह्य संकल्पना व प्रक्रियांना तिलांजली दिली जात असते. म्हणूनच दिर्घकाळासाठी आम आदमी पक्षाचे अस्तित्व अवश्यक आहे. ते भरकटून गेल्यास त्यांच्यामुळे सार्वजनिक जीवनात आलेल्या व राजकारणात रस घेऊ लागलेल्या नव्या पिढीला नैराश्य ग्रासू शकते. ते देशासाठी चांगले नसेल. म्हणूनच ‘आप’नेत्यांनी पाय जमिनीवर ठेवून वाटचाल करणे अगत्याचे आहे. पुन्हा एकदा जनमानसात आशेचा किरण त्यांनी निर्माण केला आहे, तो विझता कामा नये. त्यांचे पाय जमीनीवर घट्ट रोवले गेले पाहिजेत.

No comments:

Post a Comment