Thursday, January 30, 2014

मोडलेल्या लग्नाची गोष्ट


  वयात आलेल्या मुलीचा घोर घरच्यांना असतोच. पण मुलगी मतिमंद किंवा थोडी वेडपट असेल, तर तो घोर झोप उडवून देणारा असतो. तिला कुठे ‘खपवायची’ अशी ती चिंता असते. अशाच एका मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीला खपवायची छान योजना आखली होती. बघण्याचा कार्यक्रम सुरळीत पाडायची मस्त योजना (नेपथ्यरचना) तयार केली होती. बघायला येणार्‍यांना मुलीची अक्कल कळू नये, याची पुर्ण सज्जता केलेली होती. त्यानुसार सर्व बोलणी झाल्यावर मुलीने फ़क्त चहा व बिस्किटाचा ट्रे घेऊन पाहुण्यांसमोर यायचे अशी व्यवस्था होती. नमस्कार करायचा की संपले. त्यासाठी तिला पढवून ठेवलेले असते. कित्येक दिवस आधीपासून सरावही करून घेतलेला असतो. आणि तो दिवस उजाडतो. सर्वकाही ठरल्याप्रमाणे पार पडत असते. बोलणी संपली आणि आता बघण्याचा शेवटच्या अंकातला शेवटचा प्रवेश असतो. माऊली बाहेरूनच हाक मारते, ‘सुजया, बेटा चहा घेऊन ये पाहुण्यांसाठी.’ छान सजलेली नटलेली मुलगी पडदा बाजूला करून चहाचा ट्रे घेऊन बैठकीच्या खोलीत येते. पाहुण्यांना हसून दाखवते आणि समोरच्या टेबलावर हातातला ट्रे ठेवून सर्वांना नमस्कारही करते. आईचा जीव भांड्यात पडतो. पण पिता मात्र अस्वस्थ असतो. कारण सुजयाने आणलेल्या ट्रेमधून बिस्किटे गायब असतात. तेव्हा कौतुकाच्या स्वरात पिता विचारतो, ‘बेटा सुजया चहा आणलास, बिस्किटेही आणायची होती ना सोबत?’ खरे तर इथे पित्याने नियम मोडलेला असतो. मुलीला पाहुण्यांसमोर बोलू द्यायचे नाही, असे आधीच ठरलेले असते आणि पिताच तिला प्रश्न विचारतो सर्वांच्या देखत. मग काय मजा? सुजया मस्त मुरका मारते आणि आपल्या नसलेल्या अकलेचे झकास प्रदर्शन पाहुण्य़ांसमोर मांडत म्हणते, ‘पप्पा, मी ना बिस्किटे चहात घालूनच आणली. नाहीतरी पाहुणे बुडवूनच खाणार ना? त्यांना कशाला तेवढा त्रास?’

   पुढे काय झाले ते सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. ज्याक्षणी सुजयाने हे अकलेचे तारे तोडले, त्याक्षणी तिच्या मातापित्यांना परिणामांची कल्पना आलेली होती. पण बिचार्‍या सुजयाला त्याचा थांगपत्ता नव्हता. आपण काही भलताच मोठा शहाणपणा केला आहे. अशा थाटात ती तिथेच मिरवत उभी होती आणि पालकांना मात्र कपाळावर हात मारून घ्यायची वेळ आली होती. पाहुणे संतप्त होऊन व फ़सवणूकीचे आरोप करून निघून गेले होते, आणि लाडकी सुजया आपल्या पित्याला आश्चर्याने विचारत होती, ‘पप्पा पाहुणे चहा न घेताच का निघून गेले हो?’

    ज्याच्या बोलण्याने आपण गोत्यात येऊ शकतो, त्याचे मौन अधिक लाभदायक असते, याचे भान कॉग्रेसने ठेवले असते; तर आज १९८४च्या शिख विरोधी दंगलीचे भूत त्या पक्षाच्या मानगुटीवर बसले नसते. गेली बारा वर्षे सातत्याने गुजरातच्या दंगलीचे कॉग्रेससह तमाम सेक्युलर पक्षांनी इतके अतिशयोक्त भांडवल केले, की जणू ती दंगल वगळता देशात कधी दंगलच झाली नव्हती असे कुणाला वाटावे. पण सतत त्याचा अतिरेक झाल्याने त्या अपप्रचाराचा प्रभाव संपुष्टात आलेला होताच. पण दरम्यान दिल्लीच्या इंदिरा हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत कॉग्रेसजनांनी केलेल्या शिख नरसंहाराचा विषय गुजरातच्या अपप्रचाराखाली गाडला गेला होता. तो राहुल गांधींच्या खास ऐतिहासिक मुलाखतीने उकरून काढला गेला. यापेक्षा राहुल यांनी मुलाखत दिलीच नसती तर झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणतात, तशी परिस्थिती कायम राहिली असती. पण मोदी माध्यमांना सामोरे जायला घाबरतात आणि राहुल मात्र माध्यमांच्या कुठल्याही भडीमाराला समर्थपणे उत्तरे देतात; हे सिद्ध करण्याच्या उतावळेपणाने आज कॉग्रेसला गोत्यात आणले आहे. त्यामागचा डाव त्याच पक्षावर उलटला आहे. राहुलची मुलाखत संपताच पहिल्या प्रतिक्रिया त्या डावपेचाची साक्ष देणार्‍या होत्या. पंतप्रधान पदाची शर्यत अमेरिकेप्रमाणे स्पर्धकातील खुला सामना अशा स्वरूपातच करायची असेल, तर आता नरेंद्र मोदींनीही माध्यमांच्या भडीमाराला उत्तरे द्यायला व पत्रकार परिषदेला सामोरे जायचे धाडस करावे; अशाच त्या प्राथमिक प्रतिक्रिया होत्या. पण राहुलच्या मुलाखतीला चोविस तास उलटण्यापुर्वीच शिख नरसंहाराच्या विषयाला इतका उठाव मिळाला, की राहुलप्रमाणे मोदींनी पत्रकारांना सामोरे जाण्याचा विषय कुठल्या कुठे पालापाचोळ्यासारखा उडून गेला. यात राहुलचा दोष फ़ारसा मानता येणार नाही. त्याला बोहल्यावर चढवायला उतावळे झालेले व त्याला पुढे करून बोलकी बाहुली बनवणार्‍यांनी त्याचा व कॉग्रेस पक्षाचा घात केला आहे.

   उपरोक्त विनोदी किस्सा वाचला तर लक्षात येते की राहुलच्या बाबतीत नेमके तसेच घडले आहे. आजवर कॉग्रेसचा भावी सर्वोच्च नेता व पंतप्रधान पदाचा निर्विवाद उमेदवार, असा जो आभास निर्माण करण्यात आलेला होता, त्यामागे पत्रकारांच्या भडीमारापासून दूर ठेवण्यातच त्याची झाकली मूठ सव्वा लाखाची होती. अकारण त्याला सर्वात खोचक प्रश्न विचारणारा पत्रकार अर्णब गोस्वामी समोर पेश करायची काहीही गरज नव्हती. आजवर ते पथ्य पाळले गेले होते. परंतु ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर त्याच्या मुलाखतीने मोदींना बचावात्मक पवित्र्यात नेण्याचा उथळ डावपेच राहुलसह कॉग्रेसलाच बचावात्मक परिस्थितीत घेऊन गेला आहे. देशात विविध कारणांनी बदनाम झालेल्या कॉग्रेसची प्रतिमा सुधारण्यापेक्षा मोदींना गोत्यात टाकण्याच्या नकारात्मक डावपेचांनी कॉग्रेस अधिकाधिक अडचणीत येत चालली आहे. मोदींनी पत्रकारांना सामोरे जाण्यासह गुजरात दंगलीचा मुद्दा बाजूला पडून कॉग्रेसला शिख नरसंहार प्रकरणी प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती मात्र निर्माण झालेली आहे. आणि त्या गोष्टीतल्या सुजयाप्रमाणे राहुलला आपण काय व कुठे चुकलो त्याचा थांगपत्ताही लागलेला नाही.

1 comment:

  1. भाऊ, राहुल गांधी मतिमंद आहे हे नक्की. बाता लांबलांब मारतो पण आकलनाचा पत्ता नाही. खाण तशी माती.
    आ.न.,
    -गा.पै.

    ReplyDelete