Wednesday, February 12, 2014

क्रिकेटचे महाभारत


   सध्या भारतातल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील जुगार व बदमाशीचे एक एक किस्से समोर येत आहेत. तसे पाहिल्यास मागल्या मोसमाची स्पर्धा चालू असतानाच त्यातला घोटाळा चव्हाट्यावर आलेला होता. पण त्यावर थातूरमातूर खुलासे देऊन स्पर्धा उरकण्यात आली. फ़ारच गवगवा होऊ लागला, तेव्हा क्रिकेट नियामक मंडळाने एका निवृत्त न्यायधीशाला एकूण प्रकाराची चौकशी करायचे काम सोपवून पळवाट काढली. पण ज्याला अटक झालेली होती, त्यात खुद्द क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचाच जावई असूनही बाकीच्या सदस्यांनी त्यावर मुग गिळून गप्प बसणे पसंत केले होते. मंडळामध्ये बहूमत हाताशी असले; मग अकय करता येते त्याचा नवा पाठ श्रीनिवासन यांनी तेव्हा घालून दिला. तत्पुर्वी ओलिंपिक संघटनेच्या अध्यक्ष पदावर असलेल्या सुरेश कलमाडी यांनाही बाजूला करणे, कोणाला साधले नव्हते. त्याचीच पुनरावृत्ती क्रिकेटमध्ये घडली. त्यावर बौद्धीक चर्चा करणारेही मंडळाच्या सदस्यांच्या बहूमताची आकडेमोड करीत होते. पण क्रिकेटसह देशातील खेळाच्या प्रतिष्ठेची मोडतोड होतेय; याची कोणाला फ़िकीर नव्हती. अर्थात त्यासाठी क्रिकेटचा धंदा करणार्‍यांना दोष देण्य़ाचेही काही कारण नाही. सभ्य माणसांचा खेळ असलेल्या क्रिकेटला धनिक पैसेवाल्यांची बटीक बनवले जात असताना; चौकार षटकार बघून टाळ्या पिटणारे क्रिडारसीकही तितकेच जबाबदार आहेत आणि स्वत:ला यातले विक्रमवीर म्हणवून घेणारे खेळाडूही तितकेच कारणीभूत झाले आहेत. खरेदी करणार्‍यांनी मुहबोली किंमत मोजली, म्हणून आपले क्रिडाकौशल्य विकणार्‍यांनी आपली लायकी दाखवली आहेच. त्यामुळेच आता मुदगल अहवालाचा आडोसा घेऊन कोणी कोणावर चिखलफ़ेक करण्यात दम नाही.

   महाभारतामध्ये वस्त्रहरण नावाचा एक प्रसंग आहे. तिथे द्रौपदी टाहो फ़ोडून धृतराष्ट्राच्या दरबारात न्याय मागत असते. आपली अब्रू झाकण्याचा आपला हक्क सांगत असते. तेव्हा एकाहून एक महाविद्वान मानले जाणारे कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य तिला काय उत्तर देतात? नियम कायदे डोळ्यावर ओढून ती दुर्योधनाची दासी झाली आहे, असाच निर्वाळा देतात ना? मग गेल्या वर्षभरात भारतीय क्रिकेटचे आयपीएलच्या निमित्ताने धिंडवडे काढले जात असताना, आपण सारे क्रिकेटशौकीन वा त्यातले जुनेजाणते प्रशासक काय करीत होतो? कायद्यानुसार सर्वकाही होईल म्हणताना दु:शासनाच्या नावे बोटे मोडताना कोणी क्रिकेटची अब्रू झाकायला पुढे सरसावला काय? सुनील गावस्कर, कपीलदेवपासून सचिन तेंडूलकरपर्यंत कोणाला क्रिकेट नावाच्या द्रौपदीचे राजरोसपणे चाललेले वस्त्रहरण थोपवण्याची गरज वाटली काय? क्रिके्टला जुगार बनवणार्‍यांना साथ देताना प्रत्येक जुनाजाणता खेळाडू आपले हित व लाभ बघून गप्पच बसला ना? नवे खेळाडू आपल्याच लिलावात सहभागी झाले ना? महाभारतात तरी एकच युधिष्ठीर होता. इथे क्रिकेटच्या वस्त्रहरणात शेकडो युधिष्ठीरांनी आपले कौशल्य गुणवत्ता द्रौपदीप्रमाणे पणाला लावण्याचा पराक्रम केला आहे. त्यातून जे क्रिकेटचे वस्त्रहरण होत राहिले त्यालाच चौकार षटकार म्हणून टाळ्या पिटणारे निरपराध म्हणता येतील काय? श्रीनिवासन हा एकटा त्यातला दु:शासन दुर्योधन ठरवण्याची लबाडी जगाच्या डोळ्यात धुळ फ़ेकायला बरी आहे. पण त्यामुळे सत्य लपणार नाही. क्रिकेटला बाजारबसवी बनवण्याच्या या पापात सगळेच सारखे गुन्हेगार आहेत. युधिष्ठीराने पत्नीला पणाला लावण्याचे पाप केलेच नसते, तर वस्त्रहरणाचा प्रसंग ओढवलाच नसता. मग एकट्य़ा दु:शासनाला गुन्हेगार ठरवता येईल काय?

   १९८३ सालात भारताने प्रथम विश्वचषक जिंकला. त्यामुळे भारतामध्ये जी क्रिकेटप्रेमाची लाट उसळली; तिचा लाभ घेत क्रिकेट व्यवस्थापनामध्ये असलेल्या काही धुर्त लोकांनी त्याचा बाजार करण्याचे योजले. तिथून या खेळाची अधोगती सुरू झाली. जेव्हा कुठलाही धंदा व्यापार तेजीत येतो, तेव्हा त्यात बरेवाईट लोक शिरकाव करून घेणारच. झटपट पैसे मिळवायला खेळाडूच पुढाकार घेऊ लागल्यावर, त्यात डाकू दरोडेखोर शिरले नाहीत तरच नवल. नावाजलेले खेळाडू आपल्या कौशल्याचा बाजार मांडू लागल्यावर कमी दर्जाच्या खेळाडूंना एका सामन्यात वा एकाच मोसमात करोडपती व्हायचा मोह अपरिहार्य असतो. शेवटी सचिनच्या विक्रमापेक्षा त्याला मिळणार्‍या पैशाचेच कौतुक होते; तेव्हा इतर खेळाडूंनाही पैशाने सचिनची बरोबरी करण्याचेच प्रोत्साहन मिळत असते. जुगार्‍यांना असेच सावज हवे असते आणि क्रिकेटचा बाजार मांडणार्‍या प्रत्येकाने तशी व्यवस्था केल्यावर ही स्थिती आलेली आहे. आज मुदगल अहवालाचा हवाला देणार्‍या कितीजणांनी वेळीच हस्तक्षेप करून क्रिकेटमधली सभ्यता टिकवण्याचा प्रयास तरी केला होता? क्रिकेटशौकीनांपासून माध्यमातल्या टिकाकार समालोचकांपर्यंत प्रत्येकजण त्या क्रमाक्रमाने होत गेलेल्या वस्त्रहरणातला भागीदार नव्हता काय? दुसर्‍याला दोषी वा गुन्हेगार ठरवणे सोपे असते. आपलाच चेहरा आरशात बघायला मात्र भिती वाटत असते. क्रिकेट झगझगीत, चमकदार बनवण्यात ज्यांनी पैसे घातले; त्यांना क्रिकेटशी कर्तव्य नव्हते. त्यातल्या गुंतवणूकीतून करोडोची उलाढाल करण्याचाच हेतू होता. त्यांचा हेतू लपलेला नव्हता. त्याकडे तेव्हा डोळेझाक करून आता कांगावा करणारे तितकेच बदमाश आहेत. म्हणूनच मयप्पन वा श्रीनिवासन यांच्याकडे बोट दाखवण्यात अर्थ नाही.

No comments:

Post a Comment