Thursday, February 20, 2014

राजकारणातला ‘अलबेला’

   बुधवारी एका इंग्रजी दैनिकात भाजपा निवडणूक प्रचारासाठी ४०० कोटी खर्च करणार अशी बातमी झळकली. अर्थात त्यासाठी कुठला पुरावा नाही, की आधार नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोडलेली बातमी आहे. पण त्यात अनेक जाहिरात कंपन्या व त्यातल्या जाणकारांची नावे आहेत. त्यानंतर तात्काळ आम आदमी पक्षाचे नवे नेते व प्रवक्ते आशुतोष यांनी भाजपाकडे त्यावर जाहिर खुलासा मागितला आहे. इतके पैसे भाजपाकडे आले कुठून आणि त्यात काळापैसा किती आहे? पहिली बाब म्हणजे अजून अशी बातमी खरीखोटी याचाच थांगपत्ता नाही आणि त्यावर जाब विचारायचा. त्याच्याही पुढे जाऊन त्यात काळापैसा किती, असा तपशीलही मागायचा. मात्र गेले काही दिवस भाजपाने ‘आप’च्या तिजोरीत येणारा परदेशी पैसा कुठून येतो व कशाला मिळतो, त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आशुतोष वा अन्य कुणी देत नाही. फ़ारच कोणी मागे लागला, की सर्वच हिशोब वेबसाईटवर टाकलेत; अशी एक गोलमाल थाप ठोकली जाते. बाकीच्यांनी जाहिर सभेत वा टिव्हीच्या कॅमेरा समोर खुलासे व हिशोब द्यायचे असतात. फ़क्त आम आदमी पक्षाला देशाच्या राज्यघटनेने प्रत्येक खुलासा वेबसाईटवर टाकायची खास सवलत दिलेली असावी. अर्थात देशातला भ्रष्टाचार व काळापैसा खणून काढण्याचे कंत्राट केजरीवाल व त्यांच्याच टोळीला थेट देशकी जनताने दिलेले असल्याने, त्यांचा खरेखोटेपणा तपासण्याचा आपल्याला अधिकार नाही. पण देशातल्या कुठलाही उद्योगपती, राजकीय पक्ष वा नेत्याचा खर्च होणारा पैसा कुठून आला; याबद्दल इतके कुतूहल असलेल्या ‘आप’वाल्यांना स्वत:कडे येणार्‍या पैशाविषयी औत्सुक्य कशाला नसावे? अगदी नवा आशुतोषही त्याला अपवाद नाही.

   दिर्घकाळ हा माणूस विविध टिव्ही वाहिन्यांवर पत्रकार म्हणून मिरवला आणि तिथे लाखो रुपये पगार घेऊन सुखवस्तू जीवन जगलेला आहे. त्याने अलिकडेच नेटवर्क १८ नामक कंपनीची नोकरी सोडून ‘इमानदारी’चे व्रत घेतले. सात वर्षे ‘आयबीएन७’ नामक वाहिनीचा संपादक म्हणून काम केलेल्या आशुतोषला त्यासाठी आलेले भांडवल कुठून आले आणि त्या वाहिनीसह नेटवर्कचे व्यवहार कुठल्या पैशाने चालायचे, त्याबद्दल कधीच कुतूहल कशाला वाटले नाही? आज जीभ लांब करून गोदावरी खोर्‍यातल्या गॅसच्या उत्पादनाच्या किंमतीविषयी मुकेश अंबानी यांना जाब विचारणार्‍या आशुतोषने, त्यांच्याच जाडजुड पगारासाठी मुकेश अंबानी कुठून पैसे आणतो; असा प्रश्न कशाला विचारवासा वाटला नव्हता? निदान मागली दिडदोन वर्षे तरी मुकेश अंबानी यांच्याच कंपनीने हे नेटवर्क ताब्यात घेतले आहे. त्यामुळेच नाकर्तेपणाने वाहिन्या बुडीत घालवणार्‍या आशुतोषसारख्यांना नोकरी सोडून पळ काढायची वेळ आली. मग त्यांना मुकेश अंबानी यांच्या आर्थिक व्यवहाराचे किंवा अन्य कुणाच्या काळ्यापैशाचे भान आले आहे. ‘देरसे आये दुरुस्त आये’ म्हणतात, तसे आपण आशुतोषचे स्वागतच करायला हवे. पण मग त्याने इमानदारीची सुरूवात स्वत:पासून कशाला करू नये? दिडदोन वर्षे तरी त्यानेही मुकेश अंबानीचे मीठ खाल्ले आहे. तेव्हा ते मीठ काळ्या पैशातून आलेले काळे मीठ होते की टाटाचे शुभ्र नमक होते, त्याची आशुतोषने आधी चौकशी करावी. भाजपाला मुकेश अंबानी काळापैसा प्रचारासाठी देतो हे आशुतोषला स्वानुभवातून कळले काय? आजवर आशुतोषची पत्रकारीता त्याच काळ्यापैशातून चालली होती. त्यामुळेच मुकेशचा काळापैसा कसा वापरला जातो, त्याचे त्याल नेमके ज्ञान असावे.

   मजा कशी असते बघा. आधी एक बातमी सुत्रांनी दिलेली माहिती म्हणून सोडून द्यायची. मग तीच राई आहे असे लोकांना मान्य करायला भाग पाडून त्याचाच पर्वत उभा करायचा. ह्याला आशुतोषची पत्रकारिता म्हणतात. खरा पत्रकार मुळात बिनबुडाची बातमी देत नाही. जी माहिती हाती येईल, त्यामागचा खरेखोटेपणा तपासून बघतो. पण मुळातच बिनबुडाच्या बातम्या सोडून त्याच अफ़वांचे रान माजवण्य़ात आयुष्य गेल्यावर आसुतोष आता राजकारणात आला आहे. कारण सध्या ‘इमानदार’ राजकारणात अफ़वाबाजीचा बाजार तेजीत आहे. म्हणून मग कधी सोली सोराबजी, कधी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल अशा नावाजलेल्या व्यक्ती संस्थांच्या नावे अफ़वा पिकवल्या जातात. कधी रस्त्यावरचा फ़ुलवाला, चायवाला किंवा ऑटोवाला यांच्या नावावर कंड्या पिकवल्या जात असतात. मग त्याच्याच आधारावर इमले उभे केले जातात. त्यामुळे दिवसेदिवस ‘आप’ म्हणजे थाप असे म्हणायची वेळ लोकांवर येत चालली आहे. छोट्या थापा पचू लागल्या, की मोठमोठ्या थापा मारायची इच्छा अनावर होते. म्हणूनच केजरीवाल यांनी चेंबर ऑफ़ इंडीयन इंडस्ट्रीच्या सभेतही जाऊन बेधडक दिल्लीतला भ्रष्टाचार कमी झाल्याची लोणकढी थाप ठोकली. त्यासाठी ट्रान्सपरन्सी संस्थेच्या नावाने चाचणी झाल्याचेही दडपून सांगितले. आपल्या भोळ्या चेहर्‍याने निरागस भाषेत बोलणारा केजरीवाल हा माणूस खरेच भारतीय राजकारणात ‘अलबेला’ आहे. भगवान दादांच्या जुन्या गाजलेल्या गाण्याची आठवण हे लोक नित्यनेमाने करून देतात, शपथविधीनंतर केजरीवाल तेच गाणे गुणगुणले असते तर बरे झाले असते.

भोली सुरत दिलके खोटे
नाम बडे और दर्शन छोटे

http://www.youtube.com/watch?v=jHEXI3xHbGA

1 comment: