Wednesday, March 12, 2014

जुन्या नाटकाचा नवा प्रयोग



   काही दिवसांपुर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आपणच बाप आहोत, इथे ‘आप’ची गरज नाही, असे विधान केले होते. त्यावेळी त्यांच्या त्या विधानाचा अर्थ कोणाच्याच लक्षात आलेला नव्हता. बहुधा त्यासाठीच अरविंद केजरीवाल यांनी मुंबई महाराष्ट्राचा दौरा हाती घेतला असावा. दिल्लीहून विमानाने इथे यायचे आणि रिक्षा पकडून रस्त्यावर वाहतुकीचा गोंधळ उडवून द्यायचा. नंतर रेल्वेच्या सामान्य डव्यातून आपल्या हुल्लडबाज जमावासोबत चर्चगेटपर्यंत प्रवास करायचा. त्यातून मुंबईकरांच्या नित्य जीवनात व्यत्यय निर्माण करून धिंगाणा करायचा. पुढे चर्चगेट येथे त्या जमावाने झुंबड करून असलेल्या सुरक्षा यंत्रांची नासधूस करायची. मेटल डिटेक्टर पाडायचे. कायदे धाब्यावर बसवून रोडशो करायचा. ह्या सगळ्या गोष्टी मुंबईला नव्या नाहीत. असे गांधीवादी शांततापुर्ण आंदोलन महाराष्ट्राने गेल्या अर्धशतकात अनेकदा अनुभवले आहे. मुंबईकरांना त्याची सवय जडली आहे. बुधवारी केजरीवाल यांनी केला तो तमाशा जुन्या नाटकाचा नवा प्रयोग म्हणायला हरकत नाही. फ़रक खुप किरकोळ आहे. जुन्या नाट्यप्रयोगात त्याला दंगल, हुल्लड म्हटले जायचे. आज त्या नवा संचातील नाटकाला शांततापुर्ण गांधीवाद म्हणतात. पुर्वी शिवसेनेचा धिंगाणा असे संबोधले जायचे. फ़सगत झाली असेल, तर बिचार्‍या मुंबईकराची. त्याला केजरीवाल यांनी आधीच कल्पना दिली असती, तर त्याने घराबाहेर पडायचे कष्ट घेतलेच नसते. शिवसेनेने मुंबई बंदचा नारा दिला किंवा हुतात्मा चौक भागात मोर्चा काढायची घोषणा दिल्यावर; मुंबईच्या लोकल गाड्या ओस पडायच्या. रस्त्यावरची वहाने कमी व्हायची, आणि फ़ोर्ट भागातले रस्त्यावरचे फ़ेरीवालेही बेपत्ता व्हायचे. त्यासाठीच राज ठाकरे म्हणाले होते, ‘आप’ कशाला हवे? इथे आम्ही बाप आहोत’.

   दिड वर्षापुर्वी असाच एक धिंगाणा मुंबईने पाहिला होता. रझा अकादमी नावाच्या संस्थेने आसाममध्ये झालेल्या दंगल व हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी एक मोर्चा काढला होता. त्यावेळी म्हणजे नेमके सांगायचे तर ११ ऑगस्ट २०१२ रोजी आझाद मैदानावर योजलेल्या त्या निदर्शनात यापेक्षा अधिक गांधीवादाचे प्रदर्शन झाले होते. अनेक गाड्या जाळण्यात आल्या, पत्रकार व महिलांवर हल्ले झाले, बसेसवर दगडफ़ेक करण्यात आली. फ़रक इतकाच, की त्यात सहभागी झालेल्या अथवा संयोजक वा टिकाकारांनी त्याला गांधीवादी आंदोलन असे नाव दिले नव्हते. पण केजरीवाल यांनी परिवर्तनाची ध्वजा खांद्यावर घेतलेली आहे. त्यामुळे आजकाल त्यांनी ज्या विविध शब्दांच्या व्याख्यांचे परिवर्तन चालविले आहे; त्यातच गांधीवादाचीही व्याख्या परिवर्तित केलेली असावी. ज्याअर्थी गांधीजींचे नातू राजमोहन गांधी स्वत:च केजरीवालांमध्ये आपल्या आजोबाचे प्रतिबिंब बघतात, त्याअर्थी मुंबईत जे काही घडले व दिल्लीत भाजपाच्या कार्यालयावर हल्ला झाला; ते गांधीवादाचे नवे स्वरूप असावे. अन्यथा आपल्याला असे चित्र बघायची वेळ कशाला आली असती? रझा अकादमीच्या दंगलखोर कारवायांनी मुंबई चिडलेली असताना राज ठाकरे यांनी निषेधार्थ शांतता मार्च काढायचा पवित्रा घेतलेला होता. त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरी मनसेने तो मोर्चा काढलाच आणि त्यात कुठेही दगड फ़ेकला गेला नाही, की हिंसा मोडतोड झालेली नव्व्हती. तरीही कायद्याचा आदेश मोडून मोर्चा काढल्याबद्दल त्यांना गुंड ठरवायला मोठीच स्पर्धा बुद्धीमंतांमध्ये लागलेली होती. गांधीवाद आणि कुठेही दगड पडू नये? दगड फ़ेकला जाऊ नये? आज त्या सर्वांचे आत्मे शांत झाले असतील, अन्यथा केजरीवाल छातीठोकपणे गांधीवादाचा दावा कशाला करू शकले असते.

   राज ठाकरे यांच्या मोर्चाच्या अखेरीस एका पोलिस शिपायाने राजना गुलाबाचे फ़ुल दिले म्हणून त्याला थेट नोकरीतून निलंबित करण्याची कारवाई झालेली होती. त्यावेळी मेधाताई पाटकरांपासून तमाम शांततावादी व गांधीवादी यांनी रा्ज ठाकरे यांचे अभिनंदन का केले नव्हते? कारण त्यांच्या गांधीवादामध्ये शांतता याचा अर्थच बदलला आहे. दगडफ़ेक, मोडतोड, हिंसा हीच या नव्या महात्म्याने आपल्या देशाला दिलेली सर्वात मोठी भेट असावी. मग गंमत याची वाटते की मागल्या कित्येक वर्षात त्याचे आचरण शिवसेना आणि मनसे करीत असतील, तर त्यांनी आजवर आपणच खरे गांधीवादी असा दावा कशाला केला नव्हता? कारण अलिकडल्या काही दिवसात देशाच्या विविध भागामध्ये केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली जो धिंगाणा चालू आहे, त्यांनी प्रत्यक्षात शिवसेनेचे अनुकरणच चालविले आहे. १९६०-७० च्या कालखंडातली शिवसेना ज्यांना ठाऊक असेल; त्यांना आजच्या आम आदमी पक्षाच्या कारवाया बघून त्याच काळाची आठवण आल्याशिवाय रहाणार नाही. कदाचित नव्या युगातल्या किंवा एकविसाव्या शतकातल गांधींचा नवा अवतार केजरीवाल यांच्या रुपाने जन्म घ्यायची व त्याने शांतता शब्दाची व्याख्या बदलण्याची प्रतिक्षा मेधाताई व अन्य लोकांना प्रतिक्षा असावी. अन्यथा त्यांनी कधीच बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायीत्व स्विकारले असते. आपल्या साधेपणाचे प्रदर्शन मांडण्यासाठी हे नवे गांधी जे तमाशे करीत आहेत, त्याची दखल सामान्य जनताही घेत आहेच. तीच त्याला पायबंद घातल्याशिवाय रहाणार नाही. एका अर्थी निवडणूकीपुर्वी केजरीवाल यांनी केलेला धिंगाणा उत्तमच म्हणायचा. त्यामुळे मुंबईकर मतदारांना झाडू कशासाठी वापरायचा त्याचा साक्षात्कार झाल्याखेरीज रहाणार नाही. 

No comments:

Post a Comment