Sunday, March 16, 2014

केजरीवालांना सुवर्णसंधी

  अखेर भाजपाने नरेंद्र मोदी यांना उत्तरप्रदेशातून मैदानात आणले आहे. तिथे अर्थातच भाजपाचे कट्टर विरोधक मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाचे राज्य आहे. त्यामुळे तिथे मोदींची गुंडागर्दी चालते, असा आरोप होऊ शकणार नाही. सहाजिकच तिथेच मैदानात उतरून आम आदमी पक्षाचे इमानदार नेते केजरीवाल यांनी ‘बेइमान’ मोदींचा पराभव करण्याची सुवर्णसंधीच त्यांना भाजपाने देऊ केलेली आहे. खरे तर भाजपाने मोदींची उमेदवारी जाहिर करण्यापेक्षा केजरीवाल यांचीच वाराणशीमधून उमेदवारी जाहिर केली, म्हणायला हरकत नाही. कारण केजरीवाल व त्यांच्या पक्षाने मागल्या महि्नाभर तरी जिथे मोदी उभे रहातील तिथून केजरीवाल उभे ठाकणार; अशा डरकाळ्या फ़ोडलेल्या होत्या. त्यामुळेच मोदींना भाजपाने वाराणशीतून उभे केले, असे म्हणणे वास्तविक होणार नाही. त्या पक्षाने केजरीवाल यांनी लोकसभा कुठून लढवावी, तेच निश्चित केले म्हणायचे. कारण आम आदमी पक्षाने तो निर्णय भाजपावर सोपवला होता. आता भाजपाने निर्णय दिला आहे. पण आम आदमी पक्षाच्या आघाडीवर शांतता आहे. असणारच, कारण तो पक्ष सध्या दिल्लीबाहेर आहे. केजरीवाल ही व्यक्ती म्हणजेच तो पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठली घोषणा होत नाही, तोपर्यंत बाकीच्यांना आपण काय म्हणायचे, त्याचा पत्ताच नसतो. मग वाराणशीचे काय, हे बाकीचे आपनेते कसे सांगणार? पण एक गोष्ट स्पष्ट आहे, की केजरीवाल यांना आता वाराणशीमध्ये जावेच लागेल. मोदींना वाराणशीतून हरवणे त्यांना अवघड नाही. कारण केजरीवाल किंवा आम आदमी पक्ष नुसते उमेदवार उभे करतात बाकी सगळे काम आम आदमी म्हणजे सामान्य जनतेने करायचे असते. त्यामुळेच आता खरी कसोटी लागायची आहे.

   अर्थात केजरीवाल तिथे पराभूत झाले किंवा त्यांचे डिपॉझीट गेले म्हणून बिघडत नाही. तसे झालेच, तर आपल्याला मतदाराने नव्हेतर अंबानीनेच पाडल्याच दावा केजरीवाल करू शकतात. सहाजिकच त्यांना लढायची गरज नाही, की पराभवाचे भय बाळगण्याचे कारण नाही. मोदींनाही भयभीत होण्याचे कारण नाही. एकाचवेळी मोदी उत्तरप्रदेश व गुजरातमधून लढणार आहेत. त्यामुळेच वाराणशीतून मोदी पडले, म्हणून बिघडत नाही. ते गुजरातमधून संसदेत पोहोचणार आहेतच. थोडक्यात दोघांची लढत मोठी मनोरंजक असेल. त्यात बिचार्‍या कॉग्रेस उमेदवार रीटा बहुगुणा जोशी यांची हालत वाईट आहे. कारण त्यांना तिथेच जिंकल्या तर लोकसभा गाठता येणार आहे. अर्थात अजून केजरीवाल यांची उमेदवारी घोषित झालेली नाही. होईलच याची खात्री नाही. कारण आज केजरीवाल काही बोलतील, तर उद्या त्याबद्दल ठाम असतील याची कोणी हमी देऊ शकत नाही. सहाजिकच प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत त्याबद्दल बोलणे योग्य होणार नाही. समजा त्यांनी तशी घोषणा केली; म्हणून ठरल्या मुदतीतच केजरीवाल उमेदवारी अर्ज दाखल करतील याची हमी कोणी द्यायची? त्यांना कुठले नियम वा मुदत मान्य नसते. म्हणूनच मुदत संपल्यावर ते अर्ज दाखल करायला जातील आणि अर्ज नाकारला गेला, तर निवडणूक आयोगालाही कुणीतरी विकत घेतल्याचा आरोप करू शकतील. देशच मुकेश आंबानी चालवतो, असा त्यांचा सिद्धांत आहे. मग त्याच देशातील अशी कुठली संस्था संघटना असेल, जिच्यावर अंबानीची हुकूमत नसेल? कदाचित उद्या आम आदमी पक्षही मुकेश अंबानीच चालवतात, असाही आरोप केजरीवाल करू शकतात. म्हणूनच मतदान होऊन, मोजणी संपून निकाल लागेपर्यंत आपण वाराणशीबद्दल काहीही बोलू शकत नाही.

   गेल्या दहा बारा वर्षात माध्यमांनी मोदींचे इतके कौतुक केले, की त्यामुळेच मोदींना तीनदा सुप्रिम कोर्टाने नेमलेल्या एस आय टी चौकशीला सामोरे जावे लागले होते. मोदींचे वाहिन्या व वृत्तपत्रांनी मागल्या दोन वर्षात इतके अवास्तव कौतुक चालविले आहे, की त्यामुळेच मोदी गुजरातच्या बारा वर्षे जुन्या दंगलीमुळे बदनाम झालेले आहेत. मोदींनी गुजरातचे इतके वाटोळे करून टाकले, की त्यासाठी विविध संस्थांनी त्यांना विकासाची प्रमाणपत्रे दिली आणि तरीही माध्यमे अहोरात्र मोदींचे कौतुक करीत आहेत. लोकही त्याच कौतुकाचा फ़सून मोदींना सतत निवडून देत आहेत. गुजरातमध्ये चार माहिती अधिकार कार्यकर्त्यांना केजरीवाल यांनी आपल्या सभेत शहीद म्हणून श्रद्धांजली अर्पण केली. त्यापैकी तिघेजण जिवंत असावेत, ह्याला कारस्थान नाही, तर दुसरे काय म्हणायचे? केजरीवाल गुजरातला गेलेच नसते, तर तिथे खुन केल्यानंतर मेलेली माणसेही जिवंत रहातात, हा शोध लागला असता काय? इतका दिव्यदृष्टी महापुरूष आपल्या देशात वा जगात कधी जन्माला आला नव्हता. केजरीवाल यांच्या रुपाने तो जन्मला असेल, तर आता गुजरातप्रमाणेच वाराणशीतही मोठे चमत्कार घडतील, याविषयी आपण निश्चिंत असायला हवे. कारण केजरीवाल तिथे अर्ज भरून उभे राहिले नाही, तरी आपल्याला मोदींनी अंबानीमार्फ़त खरेदी केले किंवा ‘हरवा दिया’ असाही आरोप करू शकतील. काय होईल तो नंतरचा भाग आहे. पण राजकीय पोरकटपणाचा अभिनव मनोरंजक कार्यक्रम आपल्याला अनुभवता येणार आहे. मोदी व भाजपानी तसा ‘आयटेम’ सादर करण्याची अपुर्व संधी केजरीवाल यांना उपलब्ध करून दिली; त्याबद्दल त्या पक्षाचे आभार मानावेत तितके थोडे आहेत. पडदा वर जाण्यासाठी थोडी कळ काढायला हवी.

1 comment: