Wednesday, March 26, 2014

मिस्त्री ही पराभवाची खात्री?



   अजून सोळाव्या लोकसभेसाठी पहिल्या फ़ेरीचेही मतदान झालेले नाही. नुकतेच कुठे त्या पहिल्या फ़ेरीच्या उमेदवारांचे अर्ज भरले जात आहेत. इतक्यातच सत्ताधारी कॉग्रेस पक्षाने हत्यार टाकल्यासारखे वागायला सुरूवात केलेली दिसते. त्यांच्या बडोदा येथील उमेदवार नरेंद्र रावत यांनी माघार घेतली असून बदल्यात तिथे मधुसूदन मिस्त्री नामक बड्या नेत्याला घाईगर्दीने पाठवण्याची वेळ सत्ताधारी पक्षावर आलेली आहे. अशी वेळ कॉग्रेसवर का यावी, याचा मात्र विचार करायची त्यांची तयारी दिसत नाही. बडोद्याच्या या जागेचे महत्व असे, की तिथून भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार व राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी लोकसभा उमेदवार आहेत. त्यामुळेच रावत यांनी पराभव पक्का समजून पळ काढला, असा त्याचा अर्थ लावणे सोपे आहे. पण हा विषय त्या कॉग्रेस उमेदवारापुरता मर्यादित नाही. हा उमेदवार आला कुठून, त्याला अधिक महत्व आहे. नरेंद्र रावत याला कॉग्रेस हायकमांडने पक्षाची उमेदवारी बहाल केलेली नव्हती. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चार महिन्यांपुर्वी आम आदमी पक्षाकडून जो धडा गिरवला, त्यातून जन्माला आलेले ते पिल्लू होते. विधानसभा निवडणूकीत सुपडा साफ़ झाल्यानंतर जनतेशी थेट भिडून त्यांच्याशी संवाद साधण्याचा धडा राहुल शिकले. त्यातून त्यांनी पंधरा लोकसभा मतदारसंघात सर्व स्थानिक पक्ष पदाधिकार्‍यांच्या मतदानाने उमेदवाराची निवड करण्याचा प्रयोग केला होता. त्यात बडोद्याच्या या उमेदवाराचा समावेश होता. आधी त्याचे नाव कॉग्रेसने जाहिर केले आणि नंतर भाजपाकडून मोदींच्या नावाची घोषणा झाली. तेव्हा त्याचे स्वागत करताना याच रावतनी मोठी तगडी झूंज द्यायचा मनसुबा जाहिर केला होता. पण अवघ्या दोन दिवसातच त्याचे अवसान गळाले आहे.

   यातला पहिला मुद्दा म्हणजे राहुलना आपल्या प्रयोगाविषयी कुठलीही खात्री नसावी. अन्यथा इतक्या वाजतगाजत केलेल्या प्रयोगावर त्यांनी पाणी फ़ेरले नसते. असो, बदलून आणलेला उमेदवार मधुसूदन मिस्त्री यांचेही एक महत्व आहे. उमेदवार बदलल्याने लोकांपर्यंत काय संदेश गेला? घाबरून तरूण उमेदवार कॉग्रेसने मागे घेतला. म्हणजेच पराभवाला कॉग्रेस घाबरली, असाच संदेश त्यातून गेला. आणि दुसरा तगडा म्हणून कोणाला आणले? गुजरातमध्ये कॉग्रेसपाशी कोणीही तगडा स्वयंभू नेताच उरलेला नाही. म्हणून मग मिस्त्री यांना दिल्लीतून ऐनवेळी बडोद्याला गाशा गुंडाळून पाठवण्यात आलेले आहे. त्यांनी छाती फ़ुगवून मोदींशी दोन हात करण्याची बरीच जुनी आकांक्षा असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. पण आता अकस्मात बडोद्याला जाण्यापेक्षा त्यांनी मागल्या दोनचार वर्षात तितकी हिंमत दाखवली असती, तर मोदींना विधानसभा निवडणूकीतच पाणी पाजता आले असते आणि आज मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवारही होता आले नसते. म्हणजेच मिस्त्री हे कोणी रथीमहारथी वगैरे नाहीत. कोणीच हिंमतीने उभा ठाकणारा नसल्याने, दिल्लीतून कुमक म्हणून मिस्त्री यांना पिटाळण्यात आलेले आहे. हा बिनबुडाचा आरोप नाही. कारण मिस्त्री हे गुजराती असले, तरी दोनतीन वर्षे दिल्लीत बसून मध्यवर्ती पक्षाची रणनिती आखायचे काम करीत आहेत. मोदींच्या इच्छेनुसार त्यांचा विश्वासू सहकारी अमित शहा याला राजनाथ सिंग यांनी उत्तरप्रदेशात भाजपाची संघटना बांधणी करायला नेमले; तेव्हा त्याला काटशह म्हणून राहुल गांधींनी मिस्त्री यांना उत्तरप्रदेशचे प्रभारी म्हणून नेमलेले होते. थोडक्यात तिथला मोर्चा सोडून मिस्त्रींना आता बडोद्याला पिटाळण्यात आलेले आहे. मग उत्तरप्रदेशचे आव्हान संपले म्हणायचे काय?

   मिस्त्री हे बडोद्यातून मोठी यशस्वी लढत देण्य़ाची शक्यता अजिबात नाही. जिंकणे दूर, त्यांना प्रचंड बहूमताने पराभव स्विकारावा लागेल, यात शंका नाही. पण आपण मोदींच्या विरोधात मोठा मोहरा टाकला, हे दाखवण्यासाठी मिस्त्रींना बळीचा बकरा बनवण्यात आलेले आहे. मजेची गोष्ट म्हणजे मिस्त्री कॉग्रेसचा मूळचा कार्यकर्ता नाही. तर ज्या रा. स्व. संघाच्या नावाने कॉग्रेसवाले नित्यनेमाने शंख करीत असतात, त्याच संघाचा स्वयंसेवक म्हणून मित्री यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाला आरंभ केला होता. पण त्यांनी कधीच भाजपाच्या राजकारणात लुडबुड केली नाही. माजी भाजपानेते व आजचे गुजरात कॉग्रेसचे प्रमुख नेते शंकरसिंह वाघेला यांचे निष्ठावंत म्हणून मिस्त्री २००० पुर्वी राजकारणात आले. भाजपा सोडून वाघेला यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय जनता पार्टीतून मिस्त्री यांचे राजकीय जीवन सुरू झाले. पुढे वाघेलांच्या बरोबर मिस्त्री कॉग्रेसमध्ये आले. संघाकडून जे संघटना कौशल्य मिळालेले होते, त्यातूनच त्यांना कॉग्रेसमध्ये बढती मिळत गेली. केरळ व कर्नाटकच्या निवडणूकांचे नियोजन त्यांनी केले. त्यात कॉग्रेसला मिळालेल्या यशामुळे ते राहुल गांधींचे लाडके झाले. मोदींच्या विरोधातला त्यांचा संघर्ष मोदी मुख्यमंत्री होण्यापुर्वीचा आहे. मात्र कुठल्याही बाबतीत गुजरातमध्ये मोदींना शह देण्यात मिस्त्री कधी यशस्वी झालेले नव्हते. २००७ व २०१२ अशा लागोपाठ दोन विधानसभा निवडणूकात मोदींना गुजरातमध्ये शह देण्य़ात वाघेलांनी मिस्त्रींनाच आयोजनाची जबाबदारी दिलेली होती. पण त्याचा उपयोग झाला नाही. आताही आपल्या कार्यक्षेत्राच्या म्हणजे साबरकाठा बाहेर मोदींशी लढणे मिस्त्रींना शक्य नाही. पण थेट आमनेसामने मोदींना भिडण्य़ाची संधी त्यांना मिळालेली आहे. पराभवाच्या दु:खापेक्षा थेट लढतीचा आनंद त्यांच्यासाठी मोठा असेल.

No comments:

Post a Comment