Sunday, March 30, 2014

पवारांची विनोदबुद्धी




   शरद पवार यांच्या इतका सत्तेच्या राजकारणातला कोणी मुरब्बी राजकीय नेता आज भारतात नसावा. त्यामुळेच निवडणूका व सत्तेची समिकरणे याबाबत त्यांनी व्यक्त केलेले मत दुर्लक्ष करण्यासारखे अजिबात मानता येणार नाही. मग त्यांनी दोनदा मतदान करण्याचे केलेले आवाहन असो किंवा कुणाचे डोके फ़िरल्याचे केलेले निदान असो, त्याची दखल घेणे भागच आहे. विशेषत: ज्यांच्या बाबतीत पवार बोलतात, त्यांनी तर पवारांच्या मताचा अतिशय गंभीरपणे विचार करणे भागच असते. आणि डोके फ़िरलेले असो किंवा मनावर परिणाम झालेला असो, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी तितके हुशार नक्कीच आहेत. दोनच आठ्वड्यापुर्वी पवारांनी एक असेच विधान करून खळबळ उडवून दिली होती. गुजरात दंगलीचा विषय संपला आहे. कोर्टानेच त्या बाबतीत मोदींना क्लिनचीट दिलेली असल्याने वारंवार त्याच दंगलीवरून काहूर माजवणे गैरलागू असल्याचे मत पवारांनी व्यक्त केलेले होते. मग सगळीकडे चर्चा सुरू झाली की पवार एनडीएमध्ये चालले की काय? पण तात्काळ पवारांच्या सहकार्‍यांनी खुलासा केला, की तसे होणार नाही. पण कोर्टाचा सन्मान राखला गेला पाहिजे म्हणून पवार साहेब तसे बोलले. आणि कोर्टाचा सन्मान राखणार्‍याचे डोके ठिकाणावर असणार हे वेगळे सांगायला नको. पण निवडणूकीचा प्रचार करायला पवार मराठवाडयात पोहोचले आणि त्यांना आपण धुतलेल्या गुजरातच्या दंगलीच्या लक्तरांचे डाग अच्छे नाहीत, याचा पत्ता लागला. म्हणून तडकाफ़डकी त्यांचे डोके ताळ्यावर आले आणि त्यांनी पुन्हा गुजरातच्या दंगलीची लक्तरे धुवायला काढली. ज्याच्या अंगावर दंगलीचे आरोप आहेत, त्याच्या हाती देशाची सत्ता जाता कामा नये, असा गंभीर इशारा त्यांनी देऊन टाकला.

   आता सवाल इतकाच आहे, की अशी परस्पर विरोधी वाटणारी विधाने पवार अधुनमधून करतात, तेव्हा त्यापैकी कुठले विधान डोके ताळ्यावर ठेवून केलेले आहे? त्याचा शोध घेतला पाहिजे. सत्ता काबीज करण्यासाठी माणसाच्या डोक्यावर परिणाम होतो, हे निदान योग्यच आहे. पण जेव्हा डोके फ़िरते तेव्हा माणूस सुसंगत बोलत नाही. प्रत्येक जागी व प्रत्येकवेळी त्याच्या विधानात तफ़ावत येऊ लागते. निदान मोदींच्या विधानांत अशी तफ़ावत आलेली दिसत नाही. पण पवारांच्या अलिकडल्या विधानांमध्ये सातत्याने विसंगती आढळू लागल्या आहेत. मग ती विधाने मोदींच्या बाबतीत असोत किंवा मतदानाच्या बाबतीत असोत. एका प्रचार सभेत त्यांनी सातार्‍याला आधी मतदान करून पुन्हा मुंबईत येऊन बोगस मतदान करायचा, बहूमोल उपदेश लोकांना केलेला होता. परंतु त्यावरून काहुर माजले आणि निवडणूक आयोगाने चपराक हाणली. तेव्हा आपण विनोद केल्याचा खुलासा पवारांनी केलेला होता. सहाजिकच पवार विनोद कधी करतात आणि केव्हा गंभीरपणे बोलतात, त्याची दखल आधी घेऊन त्यांच्या विधानातला गर्भित अर्थ नंतर तपासावा लागतो. आताही सत्ता बळकावायला आतुर झाल्याने मोदींचे डोके फ़िरले आहे, असे विधान करताना पवार खरेच गंभीर होते काय, त्याची खातरजमा करूनच माध्यमांनी बातमी द्यायला हवी होती. नुसते पवार बोलले म्हणून बातमी होत नाही. आधी ते काय बोलत आहेत, ते ऐकण्यापेक्षा शुद्धीवर बोलत आहेत का; याचे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायला हवे, याचे भान पत्रकार ठेवत नाहीत. त्यामुळे सगळी गडबड होते. मग विधान दंगलखोराच्या हाती देशाची सत्ता जाऊ नये, असले विधान असो किंवा मोदींचे डोके फ़िरल्याचे विधान असो.

   हल्ली पवार डोके ठिकाणावर ठेवून बोलतात, अशी खात्री कोणी देऊ शकत नाही. हल्लीच कशाला मागली दोन दशके पंतप्रधान होण्याच्या आतुरतेने उतावळे झालेल्या पवारांनी अनेकदा त्यांच्या ‘डोक्या’ला शोभणार नाहीत अशी विधाने अधूनमधून वारंवार केलेली आहेत. मग त्यांच्या पुतण्यानेही त्यालाच राजकीय मुरब्बीपणा समजून लघूशंकेने धरणे भरून काढण्याचे विधान केलेले होते. पंधरा वर्षापुर्वी परदेशी व्यक्तीच्या हाती देशाची सत्तासुत्रे जाऊ नयेत म्हणून शरद पवार यांनी ‘राष्ट्रवादी’ मोहिम उघडल्याचे आपण विसरलो काय? त्यासाठी ‘सोनियामुक्त’ कॉग्रेसचा नारा कोणी दिला होता? पण मतदारानेच कोण राष्ट्रवादी आणि कोणाचे डोके ठिकाणावर नाही, त्याचा निर्वाळा दिला. तेव्हा आधी केला ,तो फ़क्त विनोद असल्याचे स्पष्ट करून पवारसाहेब सोनियांच्या पदरी सेवेत रुजू झाल्याचे आपण विसरलो काय? पवारांचा शब्दकोश ‘सत्तावान’ नावाच्या पंडीताने लिहिलेला असून, सत्ता अर्थ बदलते तसे पवारांच्या विधानाचे संदर्भ व अर्थ बदलत असतात. तेव्हा ‘सोनियामुक्त’ कॉग्रेसच्या विरोधात लोकमत गेले आणि पवारांनी ते मान्य केले. उद्या १६ मे २०१४ रोजी कॉग्रेसमुक्त भारत असा लोकांनी मोदींना कौल दिला, तर पवार देशाला खंबीर नेतृत्वाचीच गरज असल्याचे सांगून तळ्य़ातून मळ्यात यायला विलंब लावणार नाहीत. नाहीतरी मोदी सुद्धा बंडखोर कॉग्रेसजनांना सोबत घेऊन भाजपालाच ‘कॉग्रेसयुक्त’  भाजपा बनवत आहेत. त्यात पवारांची सोय नसेल असे कोणी सांगावे? उलट कॉग्रेसयुक्त भाजपा म्हणजेच आपण १९९९ सालात ‘सोनियामुक्त’ कॉग्रेस म्हणालो, ते स्वप्न पुर्ण झाल्याचाही दावा पवार करू शकतील. राजकारणात विनोदाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणार्‍या पवारांना तितकी सवलत आपण देणार नसू; तर आपली डोकी फ़िरलीत म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment