Wednesday, March 12, 2014

हिटलरने केलेले रोगनिदान



आपल्याला काहीही नको. बंगला-गाडी वा सत्तेचा मानमरातब काहीच नको. आपल्याला फ़क्त भ्रष्टाचारमुक्त देश हवा आहे, अशा नि;स्वार्थ भाषेचा अवलंब करून राजकारणात आलेल्या आम आदमी पक्षाच्या टोळीत आता हाणामारीचे प्रसंग येऊ लागले आहेत. इतक्या त्यागी भूमिकेतून राजकारण करायला पुढे आलेल्या जमावात आता लूटमारीनंतर डाकू हिस्सेदारीसाठी एकमेकांच्या जीवावर उठतात, तसे घडताना दिसू लागले आहे. एकामागून एक जुने सदस्य नेत्यांवर आरोप करून बाहेर पडू लागले आहेत. आमच्या पक्षाचे निर्णय बंद खोलीत भिंतीआड होत नाहीत, आमच्याकडे हायकमांड संस्कृती नाही, आमच्या पक्षात श्रेष्ठींच्या मर्जीने कोणाला उमेदवारी दिली जात नाही. अशा सर्व गमजा विस्मृतीत गेल्या असून उमेदवारी मिळण्यासाठी किंवा चुकीच्या लोकांना उमेदवारी दिली गेल्याने गदारोळ सुरू झाला आहे. मात्र त्याचे नेमके विश्लेषण माध्यमातून वा पत्रकारांकडून होऊ शकलेले नाही. काय चालले आहे या नव्या पक्षात? त्याचे उत्तर कित्येक दशकांपुर्वीच एडॉल्फ़ हिटलर नावाच्या ‘विचारवंता’ने देऊन ठेवलेले आहे. ‘कार्यकर्त्यांना चळवळीतून जोवर आर्थिक वा अन्य प्रकारचे लाभ होत नाहीत, तोवरच त्या चळवळीचा आवेश टिकून रहातो, एकदा का अशा प्रकारचे लाभ मि्ळू लागले, की कार्यकर्ते त्या लाभाला चटावतात आणि चळवळीच्या मुळ उद्दीष्टांची त्यांना विस्मृती होते. भावी पिढ्य़ांकडून होणारा सन्मान आणि भविष्यात होणारी किर्ती हेच फ़क्त आपल्या कार्याचे बक्षिस, या भावनेने कार्यकर्ते जोवर चळवळीसाठी खपतात; तोवरच चळवळीच्या कार्यावर त्यांचे लक्ष रहाते. प्राप्त परिस्थितीचा जास्तीत जास्त फ़ायदा उठवायचा या हेतूने प्रेरित झालेल्यांचा ओघ चळवळीकडे सुरू झाला, की चळवळीचे मुळ उद्दीष्ट बाजूला पडू लागले आहे असा अंदाज करायला कोणतीच हरकत नाही.’ (अडॉल्फ़ हिटलर, माईन काम्फ़)

   प्रथमच निवडणूकीच्या रिंगणात उतरून अवघ्या चार महिन्यापुर्वी नेत्रदिपक यश संपादन करणार्‍या आम आदमी पक्षाने भारतीय तरूण पिढीच्या मनात मोठ्या आशा निर्माण केल्या होत्या. पैसा आणि प्रतिष्ठा यांच्या राजकीय भिंतीवर डोके आपटून निराश झालेल्या या तरूण पिढीला केजरीवाल व त्यांच्या नव्या पक्षाच्या यशाने नवा आशेचा किरण दिसला होता. त्यामुळेच भाजपा व कॉग्रेस यांच्यासह प्रस्थापित पक्षांच्या राजकारणाला कंटाळलेला समाज घटकही मोठ्या अपेक्षेने त्या पक्षाकडे बघू लागला होता. पण यश मिळवणे सोपे आणि पचवणे अवघड असते, हेच शेवटी खरे ठरले आहे. यशाचे श्रेय जनतेला देताना त्या यशावर केवळ आपलीच मक्तेदारी असल्याप्रमाणे केजरीवाल आणि त्यांचे निकटवर्ति वागु लागले आणि त्यांची अवस्थाही समाजवादी पक्षातले मुलायम, राजदमधील लालू यांच्यासारखी होऊन गेली. पक्षात चापलुसी हाच निष्ठेचा निकष झाला आणि प्रश्न वा खुलासे विचारणार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ लागला. दहा वर्षापुर्वी अकस्मात जया प्रदा नामक अभिनेत्री समाजवादी पक्षात सामील झाली आणि तिलाच रामपूरची उमेदवारी दिल्याने जुने निष्ठावंत आझम खान संतापले होते. कालपरवा लालूंनी आपल्या कन्येला उमेदवारी देताना लाथाडले, म्हणून रामकृपाल यादवांना पक्ष सोडावा लागला. त्यापेक्षा आजच्या नव्या आम आदमी पक्षाची अवस्था कितीशी वेगळी आहे? तिथेही तशाच लाथाळ्या सुरू झालेल्या आहेत ना? पासवान यांनी मोदींच्या गोटात दाखल होणे अथवा नामवंतांनी आम आदमी पक्षात दाखल होणे; यात नेमका कुठला गुणात्मक फ़रक असतो? पण त्याच जयाप्रदा किंवा तत्सम लोकांच्या भरतीने समाजवादी पक्ष लयास गेला होता आणि आम आदमी पक्षही आशुतोष सारख्यांच्या भरतीने तिकडेच जाणार आहे.

   कुठलीही चळवळ, आंदोलन किंवा पक्ष संघटना ही नेहमी निष्ठेने, कसलीही अपेक्षा न बाळगता झटणार्‍यांच्या बळावर उभी रहात असते. एकेकाळी भाजपाही तसाच उभा राहिला होता. पण सत्तेच्या मागे धावताना आणि झटपट अधिक जागा जिंकण्यासाठी त्याने ज्या बांडगुळांची भरती केली; त्यातून त्या पक्षाची दुरावस्था होत गेली. हिटलरच्या भाषेत भाजपाच्या लोकप्रियतेचा लाभ उठवण्याच्या हेतूने प्रेरीत झालेल्यांचा ओघ सुरू झाला आणि त्या पक्षाला उतरती कळा लागली. अशी नामवंत माणसे आपल्या नावाचा लाभ द्यायला पक्षात वा संघटनेत येत नसतात, तर त्या संघटनेचे बळ आपल्या लाभासाठी वापरण्यास पुढे आलेले असतात. मीरा सन्याल, आशुतोष किंवा अन्य नावाजलेले लोक ८ डिसेंबरपुर्वी ‘आप’ पक्षाकडे कशाला फ़िरकलेले नव्हते? पासवान यांना मोदींच्या गुजरातमधील विकासाचा साक्षात्कार इतके दिवस कशाला झाला नव्हता? रामकृपाल यांना मोदीसारख्या सामान्य घरातल्या पोराला भाजपात सामाजिक न्याय मिळू शकतो, हे आताच कसे कळाले? नेहमी उमेदवारीसाठी हाणामारी करणार्‍या कॉग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना आताच वैराग्य कशाला आलेले आहे? त्यांना उमेदवारी कशाला नको आहे? त्यांच्या अशा वागण्याचे विश्लेषण हिटलरने योग्य पद्धतीने केले आहे. कुठल्याही तजेलदार झाडावर जमा होणारी बांडगुळे त्या वृक्षाच्या सुदृढतेचा पुरावा असतो, तर येऊ घातलेल्या रोगाची चाहुल असते. आम आदमी पक्षाला कोवळ्या वयातच अशा आजाराने ग्रासलेले असेल, तर त्याचे भवितव्य साफ़ आहे. त्या पक्षाने व त्याच्या नेत्यांनी आपल्या उद्धीष्टाला तिलांजली दिली, इतकाच त्याचा अर्थ आहे. अर्थात त्यांची भाषा व शब्द तेच असतील. पण त्यातला खरेपणा व सच्चाई कधीच त्यांना सोडून गेली आहे.

1 comment:

  1. भाऊ,

    हाच न्याय शिवसेनेला लावावा का? राज ठाकऱ्यांसाठी दत्ताजी साळवींना संपवण्यात आल्याची चर्चा कोणे एके काळी चालत असे. राज आणि उद्धव यांची पक्षातील जागा मजबूत व्हावी म्हणून आनंद दिघेंना बाजूला सारले जाणार होते. इतक्यात त्यांचा अनपेक्षितपणे देहांत झाला. त्यावेळचे शिवसेनेतील राजकारण हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. खुद्द बाळासाहेबांना दिघ्यांच्या अंत्यदर्शनास अटकाव करण्यात आला. बाळासाहेबांना असे ठणकावणे फक्त ठाण्यातच घडू शकते असेही ऐकिवात आहे.

    यासंबंधी तुमची मते व निरीक्षणे वाचायला आवडतील.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete