Tuesday, April 15, 2014

कल्पनाविश्वातला मोदी


   जसजसे मतदानाचे पुढले टप्पे येत आहेत आणि मतदानाची वाढलेली टक्केवारी स्पष्ट होते आहे, तसतसे मोदी विरोधक अधिकच सैरभैर होत चालले आहेत. कारण कितीही बदनामी, अपप्रचार करून लोक मोदींकडे कशाला आकर्षित होतात, त्याचा थांग या मंडळींना लागलेला नाही. मग अधिकच चिडून मोदी विरोधक आक्रस्ताळेपणा करत सुटले आहेत. पण त्यातून त्यांचेच अधिक नुकसान होते आहे. असे का व्हावे? स्वत:ला चाणक्याचे बाप, पितामह समजणार्‍या या महान सेक्युलर बुद्धीमंत व राजकीय अभ्यासकांनी मागली बारा वर्षे ज्याला गुजरातमध्येही टिकू द्यायचे नाही म्हणून कंबर कसली होती. पण आता त्यांना तोच नरेंद्र मोदी थेट गुजरातबाहेर येऊन आव्हान देऊ लागला. तेव्हा त्यांची अशी गाळण कशाला उडाली आहे? त्यांना मोदीला गुजरातमध्येच संपवायचे होते. पण तिथे तो घट्ट पाय रोवून उभा राहिलाच आहे. उलट ज्याला ‘आयडीया ऑफ़ इंडीया’ म्हणून सेक्युलर मंडळी आपले संरक्षित साम्राज्य समजत होती; तिथपर्यंत येऊन मोदी धडका देऊ लागला आहे. त्याला अडवणे दुरची गोष्ट. या तमाम सेक्युलर लढवय्यांना आपापले गल्लीबोळातले बालेकिल्ले टिकवून ठेवताना तारांबळ उडाली आहे. असे का व्हावे? एका माणसाला रोखणे त्यांना इतके अवघड कशाला झाले आहे? मोदीची ताकद कशात सामावली आहे? हे इतके सेक्युलर रथी महारथी एका मोदीला इतके भयभीत कशाला झाले आहेत? त्याला हुकूमशहा, हिटलर किंवा तत्सम नावे ठेवण्यापर्यंत त्यांनी घाबरून जाण्याचे कारण काय? तर त्यांना जसा जसा भारत माहित नाही, तसाच खरा मोदी सुद्धा ठाऊक नाही. कल्पनेच्या भ्रामक विश्वात रममाण होऊन कल्पनेतल्याच लढाया जिंकण्याची सवय त्यांना वास्तव जगात भयभीत करते आहे.

   कुठल्याही लढाई वा युद्ध संघर्षात ज्याला पराभूत करायचे असते, तो कोण व कसा आहे याची माहिती असावी लागते. त्याची ताकद किंवा दुर्बळता ठाऊक असली, तरच त्याच्यावर मात करण्याचे डावपेच आखता येतात, यशस्वी करता येतात. याच्या उलट त्याच बाबतीत तुम्ही गाफ़ील असलात आणि तुमचे सर्वच बारकावे शत्रूला ठाऊक असले; तर तो सहज तुमच्यावर मात करून जातो. इथे नेमकी दुसरी बाजू घडताना दिसते आहे. मोदी कोण कसा व कितीसा शक्तीमान आहे; त्याचा थांगपत्ता त्याच्या विरोधकांना नाही. मात्र आपल्या विरोधकांचे सर्व बारकावे मोदींनी आधीच अभ्यासले आहेत आणि त्यानुसार आपली रणनिती व डावपेच आखलेले आहेत. सहाजिकच एक एक डावपेच मोदी खेळतात, त्यावर प्रतिक्रिया व प्रतिसाद देण्यापेक्षा विरोधकांच्या हातात कुठले अस्त्र नाही की क्षेपणास्त्र नाही. देशाचे नेतृत्व करायला लोकसभेच्या आखाड्यात उतरलो, तर विरोधक आपल्या विरोधात दंगल, हिंसाचार, जातीयवाद, हिंदुत्व असे ठराविक आरोप करणार, याची मोदींना चारपाच वर्षे आधीच माहिती होती. पण मोदी मैदानात उतरले, तर कोणकोणते डावपेच खेळतील? गुजरातबाहेर त्यांना कितीसा प्रतिसाद मिळेल? भाजपात त्यांना नेतृत्व मिळू शकेल काय? अशा सर्वच बाबतीत त्यांचे विरोधक अखेरच्या क्षणापर्यंत गाफ़ील होते. पंतप्रधान पदाचा उमेदवार होऊन मोदींनी गुजरातबाहेर मोठ मोठ्या सभा गाजवायला सुरूवात केली, तेव्हा कुठे मोदींच्या लोकप्रियतेचा साक्षात्कार विरोधकांना घडला. मात्र त्या लोकप्रियतेची चाचपणी मोदी विविध मार्गाने आधीपासून करीत होते. मतचाचण्य़ांचे तंत्र त्यांनी तीन वर्षे आधीच वापरायला आरंभ केलेला होता. मोदींचा सर्वात मोठा डावपेच कुठला असेल, तर आपल्या प्रतिस्पर्ध्याला गाफ़ील पकडण्याचा.

   युद्ध व लढाईत नुसती ताकद कामाची नसते. हाताशी असलेली साधने व साहित्याचा धुर्तपणे नेमका वापर करून शत्रूला थक्क करणे आणि मग त्याच्यावर मात करण्यावर युद्धाचा परिणाम अवलंबून असतो. मोदींना त्यांच्या विरोधकांची शस्त्रास्त्रे व हत्यारे नेमकी ठाऊक होती. गुजरातची दंगल व तत्सम आरोप यापेक्षा आपल्या विरोधात कुठलेच हत्यार शत्रूपाशी नाही, याचे भान मोदींना आधीपासून होते. पण रणांगणात उतरल्यावर मोदी युपीएचा भ्रष्टाचार, विविधांगी गैरकारभार, महागाई, अराजक यांची सांगड विकास व गुजरातशी यशस्वीरित्या घालतील; अशी अपेक्षा त्यांच्या कुणाही विरोधकाने केलेली नव्हती. मोदींनी गुजरातबाहेरच्या पहिल्या सभेपासून त्याच हत्याराचा वापर केला. त्याचा जनमानसावर प्रभाव पडण्यापर्यंत त्याचे विरोधक गुजरात व दंगलीलाच चिकटून बसले होते. तोपर्यंत मोदींनी विकासपुरूष अशी आपली प्रतिमा यशस्वीपणे उभी करून घेतली. मग त्यांच्या गुजरात विकासाला खोटे पाडण्याची स्पर्धा सुरू झाली. तो मोदींनी लावलेला सापळा होता. कारण तुलनेने मोदींचा शासकीय कारभार चांगला होता आणि त्याचे दाखले विविध संस्था व केंद्रातील युपीएनेच दिलेले होते. त्यामुळे मोदींच्या विकासाला नाकारले जाताच, मोदी थेट सोनिया गांधींच्या राजीव फ़ौडेशनचाच दाखला पुढे करू लागले. दुसरीकडे विरोधकांचा सर्व मारा आपल्यावर वैयक्तीक व्हावा, अशीही काळजी मोदी घेतच होते. दोनतीन महिन्यात देशाचे राजकारण ढवळून निघाले आणि ते मोदीभोवती घुसळण घेऊ लागले. थोडक्यात मोदी स्वत:ला हवे ते करीतच होते. पण आपल्याला हवे तसेच वागायला विरोधकांना भाग पाडत होते. हा खरा धुर्त पाताळयंत्री मोदी ज्यांना बघता ओळखता आला नाही, ते मोदीला पराभूत करणार कसे?

   मोदींच्या बहुतांश विरोधकांना खरा मोदी ठाऊकच नाही. त्यांच्या कल्पनेतला जो मोदी आहे, त्याला पराभूत करण्यात त्यांनी आजवरचा वेळ खर्ची घातला आणि आजही त्याच काल्पनिक मोदीशी त्यांची लढाई जुंपलेली आहे. आणि हा सगळा खेळ खरा चाणाक्ष मोदी दूर उभा राहून मजेने बघतो आहे. म्हणूनच विरोधकांचा प्रत्येक वार त्यांना कितीही प्राणघातक वाटला, तरी त्यामुळे मोदीला किंचितही इजा होत नाही. उलट हल्ला करणारेच अधिक बेजार व जखमी होत आहेत. मोदींना पराभूत करण्याची आकांक्षा चुकीची म्हणता येणार नाही. पण त्यासाठी आधी खर्‍याखुर्‍या मोदीला शोधायला हवे, ओळखायला हवे आणि मगच त्याच्याशी लढून पराभूत करता येईल. ‘आयडीया ‘ऑफ़ इंडिया’ असल्या भ्रामक जगात वावरणार्‍यांना वाटते की कल्पनेतल्या मोदीला संपवले, मग खराखुरा मोदीही आपोआपच संपून जाईल. पिंजर्‍यातल्या पोपटात राक्षसाचा जीव असल्याने पोपट मारायच्या गोष्टीत रममाण होणार्‍या सेक्युलर अभ्यासक व राजकारण्यांकडून मोदीचा पराभव निदान या जन्मी तरी शक्य नाही.

No comments:

Post a Comment