Thursday, April 17, 2014

विचारधारेचा शोध आणि बोध



   कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कन्या आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भगिनी प्रियंका गांधी, यांनी आता रायबरेली या आपल्या घराण्याच्या जहागिरीतून डरकाळी फ़ोडलेली आहे. तिथून त्यांनी अवघ्या भारतीय जनसामान्यांना बोधामृत पाजण्याचा संकल्प केलेला आहे. त्यामुळेच त्यांनी आधी वरूण गांधी आणि आता भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ़ डागली आहे. अर्थात ही वृत्तपत्रिय भाषा झाली. आणि असे शब्द वापरणार्‍यांना मुळातच तोफ़ आणि फ़टाक्यातली बंदूक; यातलाही फ़रक कळत नसतो. म्हणूनच बातमीतले शब्द असतील, तसेच घ्यायचे नसतात. तोफ़ डागण्याचा अर्थ बातमी लिहीणार्‍यांना कळत नसला, तरी टेलीव्हिजनमुळे युद्धही घरबसल्या बघणार्‍यांना त्या शब्दाचा अर्थ कळतो. तोफ़ डागणाराही तिच्यापासून ऐन क्षणी दूर पळतो. इतका तोफ़ेचा बार धमाकेदार असतो. कुठलाही आवाज म्हणजे तोफ़ नसते. पण ब्रेकिंग न्युजच्या जमान्यात फ़ुसक्या आरोपालाही तो्फ़ असे विशेषण लावले जाते, परिणामी शब्दांचे अर्थही झिजून गेलेले आहेत. त्यामुळेच रायबरेली या आपल्या मातेच्या मतदारसंघात प्रियंका काय बोलली, ते सामान्य माणसाच्या लक्षात येऊ शकते. ही दोन विचारधारांची लढाई आहे, असे बोधामृत या सोनियाकन्येने लोकांना पाजले. कुठल्या त्या दोन विचारधारा? तर एक कॉग्रेसची आणि दुसरी भाजपाची. कॉग्रेसची विचारधारा कुठली? तर आम्ही सामान्य जनतेला शक्ती देऊ इच्छितो. जनतेलाच प्रबळ बनवू बघतो, असे प्रियंकाचे म्हणणे आहे. त्यात तथ्य असेल, तर मग मागल्या सहा दशकात तो सामान्य माणूस इतका दुर्बळ कशाला राहिला आहे? त्याचेही उत्तर द्यायला हवे. ते दिले जात नसेल, तर तोफ़ांची बत्ती घेऊन फ़िरणार्‍या पत्रकारांनी तसे उत्तर प्रियंकाकडे मागायला हवे.

   सहासष्ट वर्षात जी विचारधारा देशातल्या सामान्य माणसाला अधिकाधिक दुबळा व कंगाल करीत गेली, तीच विचारधारा आगामी पाच वर्षात त्याच दुबळ्याला शक्तीमान कशी करणार? किंवा त्याचा दुसरा अर्थ असाही असू शकतो, की विचारधारा दुबळ्याला शक्ती देण्याची असल्याने आधी देशात दुबळे लोक असायला हवेत. म्हणून मागल्या सहासष्ट वर्षात देशातल्या जनतेला नाडून व पिडून दुबळा बनवण्यात आलेले असावे. त्यासाठीच कॉग्रेसची विचारधारा आणि प्रियंकाचे पुर्वज सामान्य जनतेला भुकेकंगाल बनवण्यासाठी झटलेले असावेत. विचारधारा असा शब्द वापरताना प्रियंका किंवा राहुल यांना त्याचा तरी निश्चित अर्थ कधी समजला आहे काय? जर त्याच विचारधारेने सामान्य जनतेला सबळ व सशक्त बनवण्याचे काम भूतकाळात केले असते, तर आपल्या हायफ़ाय चैनीच्या जीवनातून सुट्टी घेऊन प्रियंकाला उन्हाळ्यात रायबरेलीच्या वणव्यात फ़िरावे लागले नसते. ज्याअर्थी तिथे सामान्य लोकांच्या दारात जाऊन आपण तुम्हाला शक्ती देणार असे सांगावे लागते आहे; त्याअर्थी चार पिढ्य़ांनी सामान्य माणसाला शक्ती देण्याचे काम केलेले नाही. त्याचीच कबुली प्रियंका देत आहे. त्याला तोफ़ डागणे म्हणत नाहीत, तर पापाची कबुली देणे म्हणतात. प्रत्येक निवडणूकीत प्रियंकाने आपल्या आईच्या प्रचारासाठी अमेठी व रायबरेली या मतदारसंघात काही दिवस काढलेले आहेत. पण इतका अन्याय सोसूनही तिथल्या जनतेने जी निष्ठा गांधी घराण्याला दाखवली, त्याचे आभार मानायचेही सौजन्य या तरूणीने दाखवलेले नाही. उलट तिथून कुठलेही काम न करताही निवडून येण्याचा आपला जन्मसिद्ध हक्क कसा आहे, तेच लोकांना सांगायला ही महिला तिथे जाऊन थडकली. त्याला सशक्त करणे नव्हे धमकावणे म्हणतात.

   दोन विचारधारेची लढाई करायची असेल, जरूर करावी. पण निदान आपली विचारधारा तरी समजून घ्यावी. मोदी म्हणजे एकटाच सगळे अधिकार आपल्या हाती ठेवणारा किंवा सगळे निर्णय एकच माणुस घेणारी विचारधारा; असे प्रियंकाला म्हणायचे आहे. पण मग त्यांच्या आजीपासून पिता व मातेपर्यंत सर्वांनी कॉग्रेस पक्षात काय वेगळे केले आहे? या तिन्ही पिढ्यांनी कॉग्रेस पक्षात सर्व सत्तासुत्रे आपल्याच हाती केंद्रीत केलेली नाहीत काय? जेव्हा कोणी पक्षामधला किंवा सत्तेमधला त्या अधिकारात भागिदारी करण्यास पुढे आला; तेव्हा त्याची गठडी वळली गेलेली नाही काय? १९६९ आणि १९७८ सालात कॉग्रेस पक्षामध्ये इंदिराजींच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयास झाला; तेव्हा काय झाले होते? इंदिराजींनी पक्षच फ़ोडला होता. त्यातून तमाम कॉग्रेस नेत्यांना दुबळे करून स्वत:ला शक्तीमान करून घेतले होते. आज प्रियंका किंवा राहुल यांच शब्द प्रत्येक कॉग्रेसवाला झेलतो, कारण आजीने प्रत्येक कॉग्रेसवाला व जनतेला दुर्बळ करून टाकलेले आहे. जोपर्यंत ती जनतेसह कार्यकर्त्याला दुबळे करणारी विचारधारा मोडीत काढली जात नाही, तोपर्यंत सामान्य माणूस सोडा, कॉग्रेस पक्षही सशक्त होण्याची सूतराम शक्यता नाही. कारण ज्या विचारधारेचे कौतुक प्रियंका सांगत आहेत, ती खुद्द शतायुषी कॉग्रेस पक्षालाही दुबळापांगळा करून गेलेली आहे. त्यामुळेच त्या पक्षाला गांधी कुटुंबाच्या गुलामीतून आधी मुक्त करावे लागेल, तेव्हा मग सशक्त झालेला कॉग्रेस पक्ष उभारी घेऊ शकेल. त्यानंतर त्या पक्षाकडून जनतेला अपेक्षा बाळगता येतील. म्हणूनच भारतीय जनतेला बोधामृत पाजण्यापुर्वी प्रियंका गांधी यांनी आधी विचारधारेचा व तिच्या इतिहासाचा थोडा शोध घ्यावा. मग पायाशी काय जळते आहे, त्याचा त्यांनाच बोध होईल.

No comments:

Post a Comment