Friday, April 18, 2014

पुर्वपुण्याईचे भान ठेवा



  आज महाराष्ट्रातील दुसर्‍या फ़ेरीचे मतदान होते आहे आणि त्याच्या दोनतीन दिवस आधी राज्यातील सत्ताधारी आघाडीला भगदाडे पडू लागली आहेत. म्हणजे असा उद्योग निवडणूक जाहिर होताच दोन महिन्यापुर्वी व्हायला हरकत नव्हती. प्रत्येक पक्षात आता महत्वाकांक्षी नेत्यांचा भरणा झालेला आहे. मग त्यांची महत्वाकांक्षा पुर्ण करणारा पक्ष त्यांना हवा असतो. जिथे ज्या पक्षाला असा नाराज दुसर्‍या पक्षात आढळतो आणि स्वार्थासाठी उपयुक्त वाटतो, त्याला लगेच शुद्धीकरण करून पक्षात सहभागी करून घेतले जात असते. पण हा प्रकार उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी चालतो. कारण लढाई उमेदवारीची असते. याहीवेळी अनेकांच्या बाबतीत तसा प्रकार घडला. सगळ्याच पक्षातून नाराजांची देवाणघेवाण झाली. पण कॉग्रेसच्या बाबतीत, सोडून जाणार्‍यांची संख्या अधिक आहे. त्यातल्या काहीजणांनी तर धक्कादायक पवित्रे घेतले. म्हणजे पक्षाकडून उमेदवारी मिळवली. पण अर्ज भरून झाल्यानंतर मैदानातून पळ काढला. काहीजणांनी मुदत संपल्यावरही माघार घेतली किंवा पक्षांतर केले. काहीजणांनी आधीच पक्ष बदलला. यात जसे मतलब साधायचे असतात, तसेच सूडाचेही राजकारण असते. म्हणजे स्वपक्षाने उमेदवारी दिली नाही; तर बंड पुकारून मते फ़ोडणे किंवा आपल्याच जुन्या सहकार्‍याला पडण्याचे डावपेच खेळणे चालतच असते. त्यात आता नवे काही राहिलेले नाही. पण यावेळी नवा प्रकार बघितला, म्हणजे मतदानाचा दिवस समोर आल्यानंतर विरोधातल्या उमेदवाराने माघार घेतल्याची घोषणा करणे वा स्वपक्षीयाला पाडण्यासाठी मैदानात येणे. महाराष्ट्रात दोन ठिकाणी असा प्रकार घडला, तो चकावून सोडणारा आहे. एक कोकणात निलेश राणे यांच्या विरोधात तर दुसरा नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधातला.

   निलेश राणे हे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र. मागल्या खेपेस त्यांनी लोकसभा जिंकली होती. तेव्हाही त्यांना सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी कॉग्रेसचा पाठींबा मिळाला होता. मात्र स्थानिक राजकारणात त्यांचे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी कधीच पटलेले नाही. मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थाचे मतदान झाले; त्यात राणेंचा प्रभाव कमी करण्यासाठी सेना भाजपासह राष्ट्रवादी यांची आघाडी तयार झाली होती. यावेळी त्याचा स्फ़ोट झालेला आहे. सावंतवाडीचे आमदार राष्ट्रवादीचे आहेत आणि त्यांनी मतदानाला दोनच दिवस शिल्लक असताना बंडाचा झेंडा उभारला. त्यांना शांत करण्यासाठी खुद्द शरद पवार यांना सावंतवाडीत दाखल व्हावे लागले. तरीही उपयोग झाला नाही. राणेंवरचा बहिष्कार सुरूच राहिला आणि पवारांना आपल्या आमदाराला तंबी भरावी लागली. तर त्या आमदाराने थेट आमदारकीचा राजिनामा फ़ेकून शिवसेनेच्या प्रचाराचा उघड पवित्रा घेतला. त्याच्या जोडीला पक्षाच्या तमाम पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीचे राजिनामे देऊन बंड पुकारले. काहीसा तसाच प्रकार उत्तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेता छगन भुजबळ यांच्याही बाबतीत घडला. तिथे मोकाटे नावाचे आमदार उघडपणे भुजबळांच्या विरोधात मत देण्याचे आवाहन आपल्याच सहकार्‍यांना करीत होते. दुसरीकडे शरद पवार यांनी सोडून दिलेल्या माढा जागेवर उभे असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांना तेच संकट भेडसावते आहे. आधी घरातूनच सख्या भावाने अपक्ष उमेदवारी जाहिर केली होती. आता मतदान एका दिवसावर आले, असताना सावंतवाडीचा बदला घेण्य़ासाठी माळशिरस तालुक्यातील कॉग्रेस नेत्यांनी विजयसिंहना पाडण्यासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय जाहिर केला. एकूणच या लोकसभा निवडणूकांनी पक्षापासून घरापर्यंत बेबनाव निर्माण केलेला आहे.

   इथे महाराष्ट्रामध्ये अशी बेबंदशाही माजली असताना दूर तिकडे उत्तरप्रदेशात देशातल्या सर्वात मोठ्या व जुन्या राजकीय घराण्याच्या पाचव्या पिढीतले वारस एकमेकांची लक्तरे चव्हाट्यावर धुवायला पुढे आलेले आहेत. वास्तविक याच घराण्याचे चार सदस्य मागल्या लोकसभेत निवडून आलेले होते. त्यातल्या पाचव्या पिढीतल्या वरूण गांधी यांनी यावेळी आपला पिलीभीट मतदारसंघ बदलून अमेठी नजिकच्या सुलतानपूर मतदारसंघात तळ ठोकला. अर्थात भाजपाने मुद्दाम त्यांना आपल्या चुलत भावाला आव्हान देण्यासाठी तिथे आणलेले आहे. पण आपण भावाच्या विरोधात प्रचार करणार नाही, असे वरूण गांधी यांनी स्पष्ट केले होते. तेवढ्यावर न थांबता त्यांनी अमेठीतल्या विकासकामाचे कौतुकही केल्याने वादळ उठले होते. इतक्यात कारण नसताना राहुल गांधींचा प्रचार करायला तिथे पोहोचलेल्या भगिनी प्रियंकाने वरूणवर तोफ़ डागली आणि त्याला धडा शिकवण्याचे आवाहन मतदारांना केले. त्यातून मग नसते वादळ उठले आहे. वरूणने त्यावर बोलायचे टाळलेले असले, तरी त्याची आई व प्रियंकाची काकू मनेका गांधी, यांनी पुतणीवर तोंडसुख घेतलेच. आपल्या चुलत भावाला शहाणपण शिकवण्यापेक्षा पती वाड्राच्या कर्तबगारीकडे प्रियंकाने लक्ष द्यावे; अशी मल्लीनाथी मनेका गांधी यांनी केली. अशा बातम्या रंगवणार्‍यांना मजा वाटणे स्वाभाविक आहे. पण त्यातून आपण आपल्याच नामवंत पुर्वजांची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहोत, हे त्या चौथ्या व पाचव्या पिढीच्या वारसांच्या ध्यानात आलेले दिसत नाही. ज्यांच्याकडे देशाने अपेक्षेने बघितले व ज्यांना देशाच्या इतिहासात मानाचे स्थान आहे; त्यांच्या पुण्याईवर जगणार्‍यांनी निदान त्या पुण्याईला बाधा आणू नये; इतकी तरी भारतीय जनतेने या वारसांकडून अपेक्षा बाळगावी काय?

No comments:

Post a Comment