Friday, April 4, 2014

बोटावरची शाई फ़ेकायची शाई



   यंदाच्या निवडणूकीचे एक खास वैशिष्ट्य आहे, ते शाईचे. शाईला तसे प्रत्येक निवडणूकीत महत्व असते. ही शाई प्रामुख्याने मतदान करणार्‍याच्या बोटाला खूण म्हणून लावली जाणारी शाई असते. त्याच बाबतीत देशाचे कृषीमंत्री शरद पवार यांनी केलेल्या विधानाने गदारोळ माजला होता. आधी दुसरीकडे मतदान करून पुन्हा मतदान करताना बोटाला लावलेली शाई पुसून टाकायला विसरू नका, असे पवार म्हणाले आणि काहूर माजले होते. तसे बघितले तर निवडणूक प्रचारात थोडीफ़ार गंमत होत असते. त्यात बोलला जाणारा प्रत्येक शब्द नेमका समजण्याचे कारण नाही. म्हणूनच पवारांनी केलेली गंमत दुर्लक्षित करायचा विषय होता. पण वाहिन्यांच्या जमान्यात बारीकसारीक गोष्टही हेडलाईन बनत असते. म्हणूनच बोटाला लावायची खुणेची शाई मोठीच बातमी बनून गेली. पण ती तेवढीच शाई या निवडणूकीने गाजवलेली नाही. ती बोटाला लावायची शाई पहिल्या निवडणूकीपासून एक महत्वाचे मतदान साहित्य म्हणून वापरात आहे. खरे सांगायचे तर त्याच एका शाईची मक्तेदारी निवडणूकीत असायची. लाल, निळी वा काळी शाई यांना निवडणूकीत स्थान नव्हते. यावेळी त्या दुसर्‍या शाईने या बोटाला लावायच्या शाईची मक्तेदारी संपवली म्हणायची वेळ आलेली आहे.

   चार महिन्यांपुर्वी विधानसभांच्या निवडणूकांमुळे आम आदमी पक्ष नावाच्या नव्या पक्षाचा गाजावाजा सुरू झाला. त्याने भारतीय व पक्षीय राजकारणात अनेक नव्या गोष्टी आणल्या असे मानले जाते. त्यांच्यामुळेच अनेक पक्षाच्या नेत्यांनी मंत्र्यांनी आलिशान बंगले सोडले व गाड्यांचा ताफ़ा घेऊन फ़िरणे सोडले; असे आग्रहाने सांगितले जाते. पण त्याच पक्षाच्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने गाड्यांचा ताफ़ा घेऊन प्रचार केला म्हणून पहिला गुन्हा नोंदण्याची पाळी पोलिसांवर आली. असो, त्याच आम आदमी पक्षाने निवडणूकीतली बोटाच्या शाईची मक्तेदारी संपवली आहे. ह्या पक्षाच्या स्थापनेपासून शाईला राजकारणात अपरंपार महत्व प्राप्त झाले. मागल्या वर्षी म्हणजे हा पक्ष नवा असताना, त्याच्या पत्रकार परिषदेत एका इसमाने घुसून अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांच्यावर शाईची बाटली उलटी केलेली आपण विसरून गेलो का? पण तो कार्यकर्ता भाजपाचा असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. भाजपा खासदार दिलीप गांधी यांच्याशी त्याचा संबंध असल्याने निष्पन्न झाले होते. मात्र केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांची फ़सवणूक केल्याचे ओरडत त्याने पत्रकार परिषदेत धुमाकुळ घातला होता. आप नेत्यांच्या तोंडावर शाई फ़ेकली होती. नचिकेत वाल्हेकर असे त्याचे नाव. आता तोच आम आदमी पक्षात सहभागी झाला आहे. पण त्याने या पक्षाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे शाईमहात्म्य. त्याने आम आदमी पक्षाला शाईचे जणू वरदानच दिले आणि मागल्या काही महिन्यात जितक्या म्हणून शाईच्या बातम्या आल्या; त्यात केवळ याच पक्षाकडून वा विरोधात शाईचा वापर झाल्याचे दिसून येते.

   महिलादिनी जंतरमंतर येथे आम आदमी पक्षाच्या वतीने कार्यक्रम चालू असताना अकस्मात तिथे एक कार्यकर्ता व्यासपिठावर घुसला आणि त्याने कॅमेरा समोर आपनेता योगेंद्र यादव यांच्या तोंडाला शाई फ़ासली होती. पुढे तो दुसर्‍या कुठल्या पक्षाचा नव्हेतर आम आदमी पक्षाचाच कार्यकर्ता असल्याचे उघड झाले. त्याचीच पुनरावृत्ती मग गुजरात वा कर्नाटक राज्यात झाली होती. तिथेही कजेरीवाल यांच्यावर कोणी शाई फ़ेकल्याच्या बातम्या आल्या होत्या. मग वाराणशीत मोदींना पराभूत करण्यासाठी जाण्य़ाची घोषणा केजरीवाल यांनी कर्नाटकातून केली. वाराणशीला गेल्यावर एका उघड्या जीपमध्ये रोडशो करणार्‍या आप नेत्यांवर कोणीतरी शाईची बाटलीच उपडी केलेली बातमी वाहिन्या संपुर्ण दिवस दाखवत होत्या. खुद्द आप नेतेही त्याच शाईच्या डागासह व्यासपिठावर तसेच बसलेले दिसत होते. मात्र ती शाई कोणी फ़ेकली, त्याचा पुढे मागमूस नाही. हाच प्रकार मागले चार आठवडे सातत्याने विविध प्रचाराच्या बातम्यातून समोर येतो आहे. पण गंमतीची गोष्ट म्हणजे एका आम आदमी पक्षाला सोडले; तर दुसर्‍या कुठल्या पक्षाच्या विरोधात शाईचे हत्यार उपसले गेल्याची एकही बातमी नाही. राजस्थानातील अजमेरचे कॉग्रेस उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री सचिन पायलट यांच्या विरोधातल्या आम आदमी पक्षाच्या नेत्याने अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तेव्हा तिथे जमलेल्या आप कार्यकर्त्यांनी तात्काळ त्याच्यावर शाईचा वर्षाव केला. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. कारण अर्ज मागे घेऊन बाहेर पडलेल्या फ़ुटीर दगाबाज उमेदवाराच्या अंगावर तात्काळ शाई फ़ेकणारे त्याच्याच पक्षाचे कार्यकर्ते होते. मग असा प्रश्न पडतो, की आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ‘कुठल्याही प्रसंगी शाईसज्ज’ असायचा दंडक आहे काय? नसेल तर निवडणूक अधिकार्‍याच्या कार्यालयाबाहेर त्यांनी आपल्याच उमेदवारावर फ़ेकायला शाई कुठून आणली?

   शाई फ़ेकण्याचे किंवा तोंडाला शाई फ़ासण्याचे प्रकार एकट्या आम आदमी पक्षाच्याच बाबतीत घडावेत आणि त्यात गुंतलेले त्यांच्याच पक्षाचे असावेत याला योगायोग म्हणायचा काय? आता शेवटची घटना नचिकेत वाल्हेकरची आहे. ज्याने शाईने सहा महिन्यांपुर्वी ‘आप’च्या प्रचाराला सुरूवात केली, तोच आता त्या पक्षात दाखल झाला आहे. कोणाच्या कर्तृत्वाने असो किंवा कोणत्याही कारणाने असो, बोटाला लावायच्या शाईची निवडणूकीतली मक्तेदारी शाई फ़ेकण्यामुळे संपुष्टात आली. त्याचेही श्रेय आम आदमी पक्षालाच द्यायला हवे. ज्या अनेक नव्या प्रथा व परंपरा भारतीय राजकारणात केजरीवाल यांनी आणल्या, त्यामध्ये याचा उल्लेख त्यांचे हितशत्रू मुद्दाम टाळत असावेत. किंवा आपण ही सोळाव्या लोकसभेच्या निवडणूकीची देणगी आहे असे समजू.

No comments:

Post a Comment