Wednesday, April 16, 2014

आज गांधीजी असते तर?



  गेल्या काही महिन्यात अनेक मोठमोठ्या माणसांना अचानक आपल्या मातृभूमीविषयी तिटकारा कशाला वाटू लागला, अशी शंका सामान्य माणसाच्या मनात आली, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मोठ्या नावाजलेल्या शास्त्रज्ञ, विचारवंत, लेखक, साहित्यिकांच्या अशा घोळक्यात आता एका माजी पंतप्रधानाची भर पडली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि अठरा वर्षापुर्वी अकस्मात देशाचा पंतप्रधान व्हायची संधी पदरी पडलेले कानडी नेते देवेगौडा यांनीही मातृभूमी सोडून जावे लागेल अशी भाषा वापरली आहे. अशा मोठ्या लोकांच्या मनात असले विचार कशाला यावेत? यापैकी बहुतेक लोक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार किंवा शिकवणीचा हवाला देणारे आहेत. त्यात नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन, ज्ञानपीठ विजेते अनंतमुर्ती इत्यादिकांचा समावेश होतो. त्या महान व्यक्तीमत्वांना जनतेपेक्षा गांधी कमी कळतो, असे आपण म्हणू शकणार नाही. कारण त्यांचा जिवनविषयक अभ्यास दांडगा आहे आणि असे तमाम लोक चिंतक मानले जातात. तेव्हा त्यांनीच गांधींजींनी पवित्र मानलेली मातृभूमी, भारत सोडून जाण्याची भाषा कशाला वापरावी, असा प्रश्न आपल्या मनात येणे स्वाभाविक आहे. या सर्वांच्या मनात असा विचार येण्याचे कारण एकच व समान आहे. येत्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी यांना भाजपाने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पुढे केलेले आहे. खरेच त्यात भाजपा किंवा मोदी यशस्वी झाले; तर आपल्याला भारत सोडून जावे लागेल, असे मत या लोकांनी व्यक्त केलेले आहे. म्हणजेच त्यांना आपली मातृभूमी केवळ एकाच कारणास्तव सोडायची इच्छा झालेली आहे. मोदीसारखा माणूस देशाचा पंतप्रधान झालेला सहन करणे, त्यांना कल्पनेतही अशक्य झालेले आहे. अर्थात त्यापैकी काही लोकांनी नंतर आपले शब्द फ़िरवले आहेत. देवेगौडाही तसेच शब्द मागे घेतील, यात शंका नाही. पण याप्रकारचे जे मतप्रदर्शन चालते, त्यातून अशा मोठ्या नामवंतांची प्रतिष्ठा वाढते, की त्यांचा वैचारिक खुजेपणा चव्हाट्यावर येतो, हे तपासण्याची वेळ नक्कीच आलेली आहे.

   मोदी यांच्यावर आजतागायत कितीही आरोप झाले, तरी त्यांच्याइतकी कोणाचीही कसून तपासणी झालेली नाही. म्हणजेच मोदीविषयी जितके गंभीर आरोप होत राहिले, त्यापैकी कुठलाही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही. असे असूनही त्यांच्या निर्दोष असण्याविषयी ज्यांना आपले मत बदलता येत नसेल, त्यांचा मग कायद्याच्या राज्यावर किती विश्वास आहे, असा प्रश्न पडतो. ज्या दंगलीसाठी हे आरोप होतात, तितके कुठल्याही दंगलीचे खटले कधी झाले नाहीत किंवा अशा कुठल्याही दंगलीतल्या गुन्हेगारांना आजवर शिक्षा होऊ शकलेली नाही. तरीही जर मोदींना दोषीच मानायचे असेल, तर तो मनस्थितीचा भाग असतो. निराधार कुणालाही गुन्हेगार मानून त्याच्यावर दोषारोप करीत रहाण्याला काय म्हणायचे? गांधी व मोदी एकाच गुजरातच्या भूमीचे पुत्र आहेत. ज्या गांधींचे कौतुक चालते, त्यांनी अशावेळी काय मत व्यक्त केले असते? गांधी असेच वागले, बोलले असते काय? विचार करा जेव्हा देशात परकीयांची सत्ता होती आणि तिचा तिटकारा गांधींजींना वाटत होता, तेव्हाही गांधीजी परदेशातच होते. त्यांनी असा विचार केला असता, की आपण ब्रिटीशांना घालवू शकत नाही, तर त्या आपल्या देशात परतावेच कशाला? भारत सोडून निघालो, तेच बरे झाले असाच विचार महात्माजींनी केला असता, तर आज भारताचा स्वातंत्र्य संग्राम कुठल्या अवस्थेत राहिला असता? भारत स्वतंत्र तरी होऊ शकला असता काय? आणि नसताच स्वतंत्र झाला, तर आज जे लोक स्वातंत्र्याचे गोडवे गातच देश सोडून जाण्याची भाषा वापरत आहेत; त्यांना असली भाषा बोलण्याची बुद्धी तरी होऊ शकली असती काय? गांधीवादाचा आडोसा घेऊन असली भाषा बोलणार्‍यांना, मग गांधी किती कळला अशीच शंका येते.

   समोर बंदूका रोखून उभ्या असलेल्या आणि नुसत्या घोषणा दिल्या तरी लाठ्यांनी झोडपून काढणार्‍या सत्तेपासून पळ काढणार्‍या माणसाचे नाव मोहनदास गांधी नव्हते. तर त्याच सत्तेच्या त्या अतिरेकी व अत्याचारी कृतीला आपल्या नैतिक व अहिंसक आग्रहाने बदलण्य़ाची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणार्‍याचे नाव जनतेने महात्मा गांधी ठेवले. त्याचाच थांगपत्ता ज्यांना नाही, त्यांनी गांधीगिरीचा आव आणून असली भाषा बोलावी काय? गांधींनी आपल्यावर लाठ्या गोळ्या चालवणार्‍यांशीही संवाद साधला आणि त्यांचाही द्वेष करण्याला नकार दिला होता. पण त्याच गांधीजींच्या नावाची जपमाळ ओढणार्‍याना मनासारखे होत नसेल, तर मातृभूमी सोडून पळ काढायचा मोह अनावर झाला आहे. म्हणजेच त्यांच्यापाशी महात्म्याइतके देशप्रेम नाही की सहिष्णूताही दिसत नाही. मुद्दा केवळ त्याच मोजक्या लोकांपुरता नाही. मोदी यांच्यावर बारा वर्षे अनेक आरोप झालेत आणि त्यांनी कधी देश सोडून पळून जाण्याची भाषा केलेली नाही. त्यांनी कधी सत्तेची जबाबदारी किंवा होणार्‍या आरोपाच्या तपासातून पळ काढलेला नाही. कायदा किंवा नैतिकतेच्या आरोपातून पळपुटेपणा केलेला नाही. पण सतत नितीमत्तेचा आव आणणार्‍यांना मात्र त्याच मोदींना सामोरे जाण्याचे धैर्य दाखवता आलेले नाही. गांधींजींपाशी तेवढे धाडस होते, म्हणूनच त्यांनी नि:शस्त्र क्रांतीचा जगावेगळा प्रयोग यशस्वी करून दाखवला. मोदीची कहाणी वेगळी आहे. त्यांनी कायद्याच्या तमाम कसोट्या पुर्ण करून दाखवल्या आहेत. त्याही ज्यांना मान्य नाहीत, त्यांच्यासाठी भारतीय जनतेच्याच न्यायालयात मोदींनी दाद मागितली आहे. त्या जनतेच्या विवेकबुद्धीवर निवाडा करायचे काम सोपवले आहे. लोकशाही मानणार्‍यांचा या देशातील जनतेवरच विश्वास नाही काय? देवेगौडा यांनी असले विधान करून नेमके काय साध्य केले? अशा लोकांनी एकच विचार आपल्या मनाशी करावा. आज गांधीजी असते तर अशीच मातृभूमी सोडून जायची भाषा बोलले असते का?

No comments:

Post a Comment