Sunday, April 20, 2014

सेक्युलर मानगुटीवरचे भूत



  मतचाचण्य़ा आणि एकूण राजकीय रंग बघितला, तर कॉग्रेसला पुन्हा सत्तेपर्यंत पोहोचणे अशक्य आहे, याबद्दल आता कुणाही राजकीय अभ्यासकाचे दुमत राहिलेले नाही. वाद आहे तो पुढला सत्ताधारी कुठला पक्ष किंवा कुठल्या नेत्याच्या हाती सत्ता येईल इतकाच आहे. मग भाजपा व मोदी आपल्या मित्रांसह बहूमताचा आकडा गाठणार, की त्यांचे स्वप्न अर्धवट राहिल; याबद्दल मतभेद आहेत. त्याच मतभेदातही वेगळी सहमती एका गोष्टीसाठी स्पष्टपणे दिसते. ती भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून लोकसभेत येणार एवढ्या बाबतीत. पण भाजपा स्वबळावर बहूमत गाठेल, यावर अजून तरी कोणाचा विश्वास नाही. तरीही मित्रपक्षांसह बहुमताचा पल्ला भाजपाला गाठताच येणार नाही, असे ठामपणे कोणी सांगायला धजावत नाही. मग बहूमत हुकले, तर मोदींच्या ऐवजी कोणाला पंतप्रधान भाजपा करू शकेल, असा एकूण चर्चेचा कल दिसतो. मागल्या सहा आठ महिन्यात देशातील राजकीय पंडीतांच्या मतामध्ये किती फ़रक पडला, त्याचे हे निदर्शक आहे. आठ महिन्यापुर्वी भाजपाने गोव्यात मोदींना आगामी लोकसभा निवडणूकीच्या प्रचार प्रमुख पदावर नेमल्यापासूनच भाजपा मोदींमुळे कसा गाळात जाणार; याचा उहापोह करताना तमाम अभ्यासक थकत नव्हते. मित्र पक्ष नितीशप्रमाणे सोडून जातील, भाजपातच दुफ़ळी माजेल, इथपासून भाजपा एकाकी पडण्यापर्यंत सर्व युक्तीवाद चालू होते. भाजपा नेतृत्वाने व मोदींनी त्यावर विसंबून आपले निर्णय घेतले असते; तर आजच्या इतकी परिस्थिती बदलू शकली असती काय? दुसर्‍यांचे ऐकावे, पण निर्णय आपला घ्यावा, हेच तत्व मोदींसह त्यांच्या पक्षातील सहकार्‍यांनी पाळले; म्हणून इतका बदल झाला आहे. आज अनेक पक्ष भाजपासोबत आले असून, तो सत्तेच्या जवळ असल्याचे त्याच टिकाकारांना मान्य करायची पाळी आली आहे.

   दुसरा मोठा फ़रक लक्षणिय स्वरूपाचा आहे. मुस्लिमांना नको असलेला कुठला पक्ष वा नेता भारतात सत्ताच मिळवू शकत नाही, असा सातत्याने दावा केला जात होता, भाजपाला मुस्लिम मते मिळत नाहीत आणि मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवणे, म्हणजे सत्तेच्या शक्यतेलाच लाथ मारणे, असले युक्तीवाद मागली दोन वर्षे चालू होते. त्यासाठी देशातील मुस्लिमांच्या १८ कोटी लोकसंख्येपासून सव्वाशे मतदारसंघातील निर्णायक मुस्लिम मतदारांचेही हवाले दिले जात होते. त्यामुळे भाजपा बहूमतच काय, दोनशे जागांचाही पल्ला ओलांडू शकणार नाही; अशी छातीठोक ग्वाही देणार्‍यांची संख्या अफ़ाट होती. आज ती मुस्लिम मतपेढीची भाषा कुठल्या कुठे गायब झालेली असून मुस्लिम मते विविध सेक्युलर पक्षात विभागली जाण्याचा लाभ मोदी व भाजपाला कसा मिळू शकतो; त्याचा उहापोह राजकीय पंडीत करीत आहेत. सेक्युलर पक्षातही मुस्लिमांच्या मतांसाठी झोंबाझोंबी सुरू झाली आहे. मुस्लिम मतांमध्ये फ़ुट पडू नये, म्हणून कॉग्रेससारख्या जुन्याजाणत्या पक्षाला उघडपणे इमाम मौलवींना पाठींब्याच्या घोषणा करायला सांगायची वेळ आली आहे. जणू मुस्लिम मते म्हणजेच सेक्युलर मते, असल्या थराला वैचारिक घसरण झालेली आहे. त्यामुळे एक वेगळाच प्रश्न पुढे आलेला आहे आणि त्याची वाच्यता राजकीय चर्चांमध्ये व्हायला हवी, ती टाळली जाते आहे. मुस्लिम मतपेढी म्हणजे व्होटबॅन्क, खरेच अस्तित्वात आहे, की नुसताच एक भ्रम आहे? काही जागी मुस्लिम मतदार डावपेच म्हणून गठ्ठा मतदान करीत असतील. पण म्हणून मुस्लिम व्होटबॅन्क असा शब्द वापरणे किती रास्त आहे? मोदींच्या झंजावाती प्रचाराने जे वादळ निर्माण केले आहे, त्यात सेक्युलर पक्ष व ही व्होटबॅन्क वाहून गेलेली दिसते.

   चित्रपट उद्योगापासून वैचारिक बौद्धिक नेतृत्वापर्यंत सर्वच क्षेत्रात मोदींच्या झंजावाताने खळबळ उडवून दिली आहे. पळापळ सुरू केलेली आहे. जम्मू काश्मिर या मुस्लिमबहूल राज्यातले मुस्लिमांचे दोन्ही प्रमुख राजकीय पक्ष; सेक्युलर नेते व विचारवंतांपेक्षा अधिक वास्तववादी दिसतात. पीडीपीच्या महबुबा मुफ़्ती व नॅशनल कॉन्फ़रन्सचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, यांच्या मोदीविषयक प्रतिक्रिया त्यासाठीच मोलाच्या ठराव्या. तमाम सेक्युलर गोटातून मोदींना गुजरातच्या दंगलीसाठी आजही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याची स्पर्धा चालू असताना महबुबा मुफ़्ती मात्र दंगलीच्या जखमा विसरून पुढे जाण्याची भाषा बोलत आहेत. तर ओमर अब्दुल्ला मोदी लाट वा मोदी प्रभाव नाकारणार्‍यांना मुर्खाच्या नंदनवनातले शहाणे म्हणू लागले आहेत. आठ महिन्यातल्या फ़रकाचा हाच मोठा पुरावा आहे. किंबहूना काश्मिरचा फ़ुटीरवादी गट मानल्या जाणार्‍यांपैकी मिरवैज फ़ारुख यांनी कॉग्रेसपेक्षा वाजपेयी सरकारने काश्मिरसाठी खुप काही केल्याची ग्वाही देत भाजपाचे सरकार येण्याचे स्वागतच केले आहे. म्हणजेच ही निवडणूक अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरू घातली आहे. प्रथमच भाजपा आपल्या कुठल्याही मुद्दे व अजेंडाला वार्‍यावर सोडून निवडणूकीला सामोरा जात नाही, किंवा मित्र पक्षांनी त्यांना कुठल्या अटी घातलेल्या नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे मुस्लिमांतही भाजपाकडे आशेने बघणारा वर्ग वाढत असल्याचे पुरावे समोर येत आहेत. त्यामुळेच बारा वर्षे गुजरातच्या दंगलीचे भांडवल राजकारणात करणार्‍यांना तोंडघशी पडण्याची वेळ आलेली आहे. कारण त्यातूनच मोदी नावाचे भूत सेक्युलर राजकारणाच्या मानगुटीवर असे बसले आहे, की त्यापासून सुटका होत नाही आणि त्याच्याकडे पाठही फ़िरवता येणे आवाक्यातले राहिलेले नाही.

No comments:

Post a Comment