Thursday, April 24, 2014

गाशा गुंडाळलेला दिसतो



   मागल्या दोनचार महिन्यापासून शरद पवार युपीए सोडणार आणि एनडीएमध्ये येणार, अशा अफ़वा उठत होत्या. पण साहेबांनी कॉग्रेससोबत असलेल्या आघाडीत आपल्याला हवी तशी वाटणी करून घेण्यासाठी चालविलेले डावपेच; असाच त्याचा अर्थ लावला गेला. तरीही मोदींविषयी वादग्रस्त विधाने करून त्यांनी लोकांना गोंधळात टाकायचा उद्योग चालूच ठेवला होता. अगदी अलिकडे म्हणजे निवडणूकीचा प्रचार सुरू झाला, तेव्हाच त्यांनी मोदींच्या विरोधात तोफ़ा डागायला सुरूवात केली. दोन महिन्यापुर्वी गुजरात दंगलीसाठी मोदींना कोर्टानेच क्लिनचीट दिली असताना; त्याबद्दल टिका करणे गैर असल्याचा हवाला साहेब देत होते. मग आता दोन महिन्यानंतर अकस्मात त्याच दंगलीसाठी मोदींचे हात रक्ताने रंगवायचा खेळ पवार साहेबांनी कशाला करावा? तर असले प्रश्न साहेबांना विचारायचे नसतात. शब्द किंवा त्यांचे अर्थच नव्हे; तर तत्वेही साहेबांच्या गरजेनुसार बदलत असतात. त्यामुळे दोन महिन्यापुर्वीची कोर्टाची क्लिनचीट आता गुन्हेगारीचे आरोपपत्र झाल्यास नवल मानायचे कारण नाही. पण महाराष्ट्रातील मतदान संपत आलेले असताना, पुन्हा साहेबांचे शब्द बदलू लागले आहेत. आता त्यांनी युपीएमध्ये काय चालले आहे, त्यापेक्षा एनडीएमध्ये काय चालले आहे; त्याचा अभ्यास सुरू केलेला दिसतो. म्हणून की काय, निवडणूका संपल्या मग काय होईल, त्याचे नवे भाकित पवार साहेबांनी केलेले आहे. त्यांच्या मते एनडीएला बहूमत मिळाले नाही, तर त्यात सहभागी झालेल्या पक्षांना व्हीटो पॉवर मिळणार आणि ते छोटे पक्ष मोदींना पंतप्रधान होऊ देणार नाहीत, याची साहेबांनी ग्वाही दिलेली आहे. पण असे कशामुळे होऊ शकते? एनडीएला बहूमत मिळाले नाही तरची चिंता साहेबांनी कशाला करावी?

   एनडीएला बहूमत मिळाले नाही तर, याचा अर्थ भाजपासह जे पक्ष आधीच एनडीए आघाडीत सहभागी झालेले आहेत, त्यांच्या जागांची एकूण बेरीज २७२ होऊ शकणार नाही. त्यामुळे सरकार बनवायला लागणारा बहूमताचा २७२ हा आकडा गाठण्यासाठी अन्य काही पक्षांकडे भाजपाला आशाळभूतपणे बघावेच लागणार; असा साहेबांचा अंदाज आहे. मग असे पक्ष सत्तेत येण्यासाठी अटी घालू लागतील व भाजपाची अडवणूक करतील. ती अडवणूक म्हणजे त्यांच्या आवडीचा वा पसंतीचाच पंतप्रधान मागतील. ती पसंती मोदी नसणार. त्याऐवजी राजनाथसिंग यांना नवे मित्रपक्ष पसंती दाखवतील, असा साहेबांचा दावा आहे. मुद्दा इतकाच, की बहूमत हुकले तर याच शक्यतेवर साहेबांचे तर्कशास्त्र अवलंबून आहे. पण ज्याचा पवार साहेब आता विचार करायला लागलेत, त्याचा भाजपाने नसेल; तरी मोदींनी खुपच आधीपासून विचार केलेला आहे. म्हणून तर त्यांनी चार महिन्यांपुर्वीच मिशन २७२ अशी घोषणा केली होती, त्यानुसारच कामाला आरंभ केला होता. त्यानंतर त्यांना मित्रपक्ष मिळत गेले. मोदी पुढे केल्यास भाजपाचे असलेले मित्र जातील आणि नवे मित्रपक्ष त्याच्याकडे फ़िरकणार नाहीत; अशीच मोदी सोडून सर्वांना खात्री होती. पण असल्या बागुलबुव्याला झुगारून मोदी व भाजपाने मागल्या आठ महिन्यात वाटचाल केलेली आहे. किंबहूना त्यांच्या त्याच आत्मविश्वासामुळे लोकमत त्यांच्या बाजूला झुकत गेले आणि त्याची चाहुल लागलेल्या पक्षांनी मोदींचे नेतृत्व मान्य करूनच एनडीएमध्ये प्रवेश केलेला आहे. तेव्हा त्यापैकी कोणी मोदींच्या नावाला आक्षेप घेण्याचा सवालच पैदा होत नाही. मग त्याच मित्रपक्षांना व्हेटो पॉवर द्यायला पवार साहेब कशाला पुढे सरसावले आहेत? त्यांच्यावर हे काम कोणी सोपवले?

   मोदी लाटेवर स्वार व्हायचा भाजपाने निर्णय घेतला, तेव्हा मुळात मोदीलाट असल्याचे कितीजण मान्य करीत होते? खुद्द पवार तरी हे सत्य मान्य करायला तयार होते काय? पण आज तेच पवार साहेब मोदीलाट केवळ शहरी भागातच आहे आणि ग्रामीण भागात तिचा प्रभाव नाही; असे सांगतात. म्हणजे निदान शहरात मोदीलाट असल्याचे कबुल करतात ना? मग ती लाट त्यांना दोनचार महिने आधी कशाला दिसू शकली नव्हती? ह्याचा अर्थ पवार साहेबांना दोन महिने उशीरा, घडत असलेल्या राजकारणाचा सुगावा लागतो. त्यामुळेच एनडीएला बहूमत मिळाल्यानंतर व मोदींचा शपथविधी उरकल्यानंतर साहेबांना ग्रामीण भागातही मोदीलाट असल्याचे लक्षात येऊ शकेल. तसेही नसेल तर साहेबांच्या ताज्या विधानाचा अर्थ कसा लावायचा? त्याचे उत्तर साहेबांच्या आजवरच्या राजकारणात सापडू शकते. पवार यांनी आयुष्यभर तत्वापेक्षा ‘बेरजेचे राजकारण’ केले. त्यामुळेच एनडीए वा भाजपाची वजाबाकी झाली आणि बहूमताच्या बेरजेसाठी दोनपाच खासदार कमी पडत असतील; तर ती बेरीज पुर्ण करण्याची त्यांनी मानसिक तयारी केलेली आहे. देशाच्या कल्याणासाठी व जनतेला राजकीय स्थैर्य बहाल करण्याच्या ‘राष्ट्रवादी’ विचारांनी प्रेरीत होऊन एनडीएला पाठींबा देण्य़ाची त्यांची तयारी झालेली आहे. त्यासाठीच्या अटी आतापासूनच त्यांनी घालायला सुरूवात केली आहे. आपण मोदींना मान्य करणार नाही. राजनाथ पंतप्रधान होणार असतील तर आपण एनडीएला पाठींबा देऊ. इतकेच नाही तर आवश्यक दहापंधरा इतरांना गोळा करू; असे सुचवत आहेत. थोडक्यात मोदीलाटेची गाज त्यांच्या कानावर पोहोचली असून त्यात दोनचार खासदारांच्या बळावर सत्तेत कायम रहाण्यासाठी युपीएच्या तंबुतला गाशा आपण गुंडाळला असल्याचा संकेत साहेब देत आहेत.

4 comments:

  1. True! He is most opportunist & will support NDA with his 3-5 seats!!!

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. एकदम सही लेख, भाऊ! असं म्हणतात की जहाज बुडू लागले की त्यातले उंदीर आधी बाहेर उड्या मारतात. खरेखोटे देवजाणे!
      आपला नम्र,
      -गामा पैलवान

      Delete
  3. 2004 saali suddha ashich laat hoti tyaat vajapyei budale adavani budale aata modi chi pali

    ReplyDelete