Tuesday, April 8, 2014

गोलमाल है भाई.... सब गोलमाल है



   दिल्लीसह चौदा राज्यातल्या ९१ मतदारसंघात गुरूवारी लोकसभेसाठी मतदान व्हायचे आहे. ह्या सर्वच मतदारसंघात मंगळवारी प्रचार संपायचा होता. म्हणूनच सगळे उमेदवार आपापल्या परीने अखेरचे प्रयास करण्यात गर्क होते. आम आदमी पक्षालाही पर्याय नव्हता. त्यामुळेच त्यांचे प्रमुख लोकप्रिय नेता अरविंद केजरीवाल, यांनीही एका भागातून रोडशो चालविला होता. त्यांच्या रोडशोची एक पद्धत आहे. उघड्या जीपमध्ये उभे राहून हसतमुखाने केजरीवाल लोकांना हात दाखवतात आणि मध्येच कधी हात जोडतात. भोवताली त्यांच्या हजारभर अनुयायांचा टोपीधारी गोतावळा असतो. मग तोच गोतावळा कुठल्या नाक्यावरची गर्दी असल्याचे मानून केजरीवाल त्यांच्यासमोर ठरलेले भाषण करतात. त्यांच्या हजारभर गोतावळ्याखेरीज थबकणारे मुठभर लोक आणि आसपासच्या घरातून डोकावणारे श्रोते त्यांना पुरेसे असतात. कारण तेवढी गर्दी कॅमेरासाठी पुरेशी असते. मग टेलिव्हीजनवर भरपूर प्रसिद्धी मिळते. हाच प्रकार मागल्या काही आठवड्यापासून सुरू आहे. पण त्यात स्वत: केजरीवाल सहभागी नसले, तर कॅमेरे येत नाहीत. म्हणूनच जोपर्यंत केजरीवाल दिल्लीबाहेर भरकटत होते, तोपर्यंत दिल्लीतील आम आदमी पक्षाचा प्रचार ठप्प झालेला होता. गेला एक आठवडा केजरीवाल यांनी दिल्लीत अहोरात्र रोडशो करून त्रुटी भरून काढण्याचा प्रयास केला. पण त्यांच्या ठाशीव भाषणे, आरोप व तमाशाला कॅमेरेही कंटाळले असल्याने देशात इतरत्र नाविन्य शोधणे वाहिन्यांना भाग पडले. कोणी जाहिरनामे काढतोय, कोणी दुसर्‍या पक्षाच्या नेत्याची खांडोळी करायच्या धमक्या देतो आहे. कोणी मतदानातून सूड घेण्याचे मतदारांना सल्ले देतो आहे. अशा नाविन्यपुर्ण घटनांचा सपाटा लागल्याने केजरीवाल तमाशातले नाट्य कमी झाले होते. त्यामुळे पुन्हा कॅमेरे आपल्याकडे वळवण्यासाठी धमाल करणे भाग होते. त्याची सोय मंगळवारी झाली. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी केजरीवाल पुन्हा छोट्या पडद्यावर अवतीर्ण झाले.

   एका उमेदवाराच्या प्रचारार्थ रोडशो करीत असताना केजरीवाल यांना हार घालायला आलेल्या एका इसमाने त्यांना नंतर सणसणीत थप्पड हाणली. मग आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा इतक्या शांततेने समाचार घेतला, की त्याला थेट उपचारार्थ इस्पितळातच पोलिस घेऊन गेले. तो कोण व त्याने थप्पड कशाला मारावी याचा खुलासा उशीरापर्यंत होऊ शकला नाही. पण तो एक रिक्षावाला असल्याचे निष्पन्न झाले. मागल्या विधानसभा निवडणूकीत रिक्षाचालक एकदिलाने केजरीवाल यांच्या मागे ठामपणे उभे राहिलेले होते. मग याने आपल्या लाडक्या नेत्याला थप्पड कशाला मारावी? अर्थात त्यात आता नवे काहीच नाही. अलिकडेच हा प्रकार घडला होता. जेव्हा पोलिसांनी जबानी घेतली, तेव्हा मारेकरी आम आदमी पक्षाचाच अनुयायी निघाला. त्याही आधी जंतरमंतर येथे पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांच्या तोंडाला काळे फ़ासणाराही त्याच पक्षाचा अनुयायी होता. यावेळी काही वेगळे असण्याची शक्यता फ़ारशी नाही. केजरीवालना त्याची पुर्ण खात्री आहे. म्हणूनच नुसती थप्पड खाऊन त्यांनी समाधान मानले नाही. आपल्या तमाशामध्ये नाट्य भरण्यासाठी त्यांनी रोडशो तसाच चालू ठेवला. अर्धातास तमाम माध्यमांपर्यंत बातमी पोहोचू दिली. परिणामी तमाम वाहिन्यांचे पत्रकार तिथे धावले. मग मध्येच रोडशो अर्धवट सोडून त्यांनीन थेट राजघाटावर धाव घेतली. तिथल्या गांधी समाधीसमोर येऊन बैठक मारली. आधी सर्वच वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण होणार याची खात्री त्यांनी करून घेतली, मगच राजघाट गाठला होता. मागले तीनचार दिवस वाहिन्यांवरून गायब असलेल्या आम आदमी पक्षाचे मग राजकीय कार्य जोमाने सुरू झाले. जो पक्षच टेलिव्हीजनच्या पडद्यापुरता आहे, त्याला आपले अस्तित्व टिकवायचे तर त्या पडद्यावर कायम असायला नको काय?

   लोक इतके मुर्ख नसतात. सतत एकाच पक्षाच्या एकाच नेत्यावर असे हल्ले कशाला होतात, असा साधा सवाल बुद्धीमंत पत्रकारांना पडणार नसला; तरी तो सामान्य लोकांच्या मनात नक्कीच येतो. इतरही पक्षाचे मोठमोठे नेते अगदी एकटे गर्दीतून रस्त्यावर फ़िरत आहेत, लोकांशी बोलत आहेत, गर्दीत मिसळत आहेत. पण त्यापैकी कोणालाही कोणी थप्पड मारत नाही की त्यांच्या अंगावर शाई-रंग फ़ेकत नाही. या एकाच पक्षाच्या एकाच नेत्याला देशाच्या कुठल्याही शहरात अशा हल्ल्यांना का सामोरे जावे लागते, असा प्रश्न सामान्य बुद्धीच्याच माणसांना पडू शकतो. कारण असा हल्ला होत नाही, तेव्हा केजरीवाल सारखा नेता अन्य पक्षांच्या नेत्याप्रमाणे टिव्हीच्या पडद्यावर कधी बघायलाच मिळत नाही. बाकीच्या पक्षांचे लहानमोठे नेते विविध कारणास्तव वादग्रस्त विधाने वा गर्दी भाषणे, यासाठी झळकतात. केजरीवाल हा एकच नेता आहे, की त्याच्यावर हल्ला वा अन्याय झाल्याशिवाय दाखवला जात नाही. की टिव्हीवर दिसावे यासाठी त्याच्यावर हल्ला झालाच पाहिजे असा नियम आहे? नसेल तर शहाण्यासारखे काही केले म्हणून केजरीवाल यांना वाहिन्यांच्या प्रसारणातून प्रसिद्धी का मिळत नाही? दुसरे काही असे नाहीच, की ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळावी? हर्षवर्धन, कपील सिब्बल, मीनाक्षी लेखी, मनोज तिवारी, अजय माकन असे अनेक मोठे राजकीय नेते दिल्लीत लोकांमध्ये मिसळून फ़िरत आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप होतात व झालेले आहेत. त्यांच्याविषयी देखील लोकांमध्ये राग असू शकतो. पण त्यांच्यावर कोणी हल्ला करीत नाही, तर एकट्या केजरीवालच्याच वाट्याला सगळे हल्ले कशाला यावेत? कुछ तो गोलमाल है भाई.

2 comments:

  1. Bhau tumhi he hindi ani english bhashet suddha translet kara . yachi garatj ahe .

    ReplyDelete
  2. Open it in Google chrome. Translation options are available.

    ReplyDelete