Thursday, May 8, 2014

इंदिराजींची हुबेहुब नक्कल


  गुरूवारी वाराणशी येथे बेनियाबाग नावाच्या मैदानात प्रचारसभा घेण्यासाठी तिथले भाजपा उमेदवार नरेंद्र मोदी यांना निवडणूक अधिकार्‍याने नकार दिला. त्यानंतर पक्ष व खुद्द नरेंद्र मोदी यांनी त्याचा पुरेपुर राजकीय फ़ायदा उठवला. आपण सरकारी व आयोगाच्या अन्यायाचे बळी आहोत, असे भासवण्याचा प्रयोग त्यांनी अतिशय नाट्यमय रितीने सादर केला. कायदा हा नेहमीच दुधारी असतो. त्याचा नि:पक्षपाती वापर होत असेल, तरच त्याची धार प्रभावी असते. जेव्हा त्याचा गैरवापर सुरू होतो, तेव्हा त्याची धार बोथट होऊन जाते. स्थानिक जिल्हाधिकारी असलेल्या व्यक्तीने अन्य उमेदवारांना ज्या कार्यक्रमांसाठी बिनशर्त संमती दिली; तशाच कार्यक्रमासाठी मोदींना परवानगी नाकारणे व त्यासाठी फ़डतूस कारणे पुढे करणेच गैर होते. मग त्याला कायद्याने दिलेले अधिकार कितीही घटनात्मक असोत किंवा शब्दानुसार त्याची कृती कितीही योग्य दिसणारी असो. निवडणूक आयोगाचे काम निर्विवाद न्यायाने मतदान घेण्याचे असते. त्याविषयी निर्णय घेणार्‍याने कॉग्रेस वा आम आदमी पक्षाला लावलेले निकष व भाजपाला लावलेले निकष भिन्न असतील; तर त्याचा राजकीय लाभ उठवताना भाजपाकडून नैतिक व प्रामाणिक वर्तनाची अपेक्षा कोणी करू नये. राजकारणात उतरलेले लोक कोणी साधूसंत नसतात आणि मोदी नक्कीच संत महंत नाहीत. मतदानाची लढाई जिंकण्यासाठी परिस्थितीचा फ़ायदा उठवण्याचा त्यांना देखिल तितकाच अधिकार आहे आणि तोच त्यांनी मोठ्या चाणाक्षपणे उठवल्याने बाकीच्या प्रतिस्पर्धी व विरोधकांची गोची होऊन गेली. मोदींनी प्रचार करण्यासाठीचे सर्व कार्यक्रम रद्द करून फ़क्त वाराणशीत काही तास आपल्या निवडणूक कार्यालयात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना कुठल्या परवान्याची गरज नव्हती. मात्र त्यासाठी वाराणशीत मोदी येणार असल्याचा इतका गाजावाजा केला, की त्यांच्या येण्याविषयी कुतूहल निर्माण होऊन लोकांची चौफ़ेर गर्दी लोटली. मग बंदिस्त गाडीतून लोकांचे अभिवादन स्विकारत मोदी साडेतीन तास रस्त्यातच होते.

   कशी गंमत आहे बघा. रोडशो केला असता तर अनेक बंधने मोदींवर लागू झाली असती. पण त्यांनी कुठलाही घोषित कार्यक्रम घेतलाच नाही. केवळ बनारस हिंदू विद्यापिठाच्या आवारापासून पक्ष कार्यालयापर्यत गाडीने प्रवास केला. त्यासाठी बंदोबस्त ठेवणे व पादचारी नागरिकांची सुविधा बिघडणार नाही, याची व्यवस्था राखणे; ही त्याच जिल्हाधिकार्‍याची डोकेदुखी होऊन गेली. माध्यमातून ह्या घडामोडीबद्दल इतके रान उठवण्यात आलेले होते, की संपुर्ण दिवस वाराणशीत मोदी काय करणार व काय होणार, याचीच चर्चा राहिली व लोकांचे घोळके रस्त्यावर घुटमळत राहिले. हे सगळे नाट्य होतेच. पण त्याहीपेक्षा आपल्याला जगासमोर हकनाक अन्यायाचा बळी म्हणून पेश करायची बनवेगिरी होती. मोठ्या शिताफ़ीने मोदींनी ते नाट्य पार पाडले. ज्या कार्यक्रमांना प्रतिबंध घातला गेला; त्यातून जितकी प्रसिद्धी मिळाली नसती किंवा प्रचार झाला नसता, त्याच्या अनेक पटीने हेतू साध्य झाला. मग त्यांच्या विरोधकांनी मोदींवर नाटकबाजीचा आरोप केला तर चुकीचे म्हणता येणार नाही. पण जे राजकीय नाट्यावरच जनतेला आजवर झुलवत आले, त्यांनी अशा तक्रारी करणे ही शुद्ध कांगावखोरीच आहे. राहुल, प्रियंका वा सोनियांनी शहिदांचे वारस म्हणून चालविलेले नाटक आणि मोदींनी वाराणशीतल्या परवान्याचे रंगवलेले नाट्य, यात कितीसा मोठा फ़रक आहे? सत्तेच्या बळावर करोडो रुपयांची माया करणार्‍या नवर्‍याच्या दुष्कर्मांचा बचाव करायला पित्याच्या हौतात्म्याची शाल पांघरणार्‍या प्रियंकाला कोणी नौटंकी म्हणून हिणवले होते काय? आपल्या भावी जावयाने सत्तेचा फ़ायदा घेऊन करोडो रुपयांची माया गोळा करावी; म्हणून राजीव गांधी घातपाताला बळी पडले होते काय? असतील तर मग वारंवार तेच चलनी नाणे प्रियंका कशाला वापरते? पिता वा आजीच्या बलिदानाची भरपाई देशाने त्यांच्या कुटुंबाला भरभरून दिलेली आहे. त्यांचे नाटक भावनात्मक असेल तर मोदींनी नाटक कशाला करू नये?

   प्रियंका वा राहुल यांच्यासह नेहरू घराण्याच्या भगतगणांना मुळात तिथेच मोदी नावाचा बहुरुपी अजून ओळखता आलेला नाही. कारण त्यांना इंदिरा गांधीच मुळात उमगलेल्या नाहीत. उलट ज्या घराणेशाहीवर मोदी सातत्याने शरसंधान करीत असतात, त्यांनी मात्र इंदिराजींकडुन धडे गिरवलेले वाटतात. कारण वाराणशीत मोदींनी जे नाटक गुरूवारी रंगवले, ती इंदिराजींच्या खुप जुन्या नाटकाची अप्रतिम पुनरावृत्ती होती. आपल्या आजीकडून त्या नाट्यकलेचा वारसा प्रियंका राहुलना घेता आला नाही. पण मोदींनी मात्र त्याप्रसंगी इंदिराजींची हुबेहुब नक्कल केली म्हणायची. १९७८ सालात जनता पक्षाच्या हाती सत्ता आलेली असताना गृहमंत्री चरणसिंग यांनी अत्यंत फ़डतुस कारणे दाखवून माजी पंतप्रधान असलेल्या इंदिराजींना अटक करायचा घाट घातला होता. तेव्हा निवासस्थानी पोहोचलेल्या पोलिस पथकाला तसेच बसवून इंदिराजींनी आपल्या अनुयायांना तिथे बोलावून घेतले. बाहेर पुरेशी गर्दी जमल्यानंतर पोलिसांसमवेत बाहेर आलेल्या इंदिराजींनी आपल्याला बेड्या ठोकून घेऊन जाण्याचा हट्ट धरला. ते होईना म्हटल्यावर भर रस्त्यात ठाण मांडले आणि असा तमाशा सुरू केला, की तिथे पत्रकार व छायचित्रकार येऊन पोहोचले. त्याची एक इव्हेंट होऊन गेली. चरणसिंग इंदिराजींना चोविस तास गजाआड ठेवू शकले नाहीत. पण त्या घटनेची नाट्यपुर्ण छायाचित्रे जगभरच्या वृत्तपत्रात झळकली आणि जनता लाट तिथून ओसरायला सुरूवात झाली. आपल्या हजारो विरोधकांना कुठलेही आरोपपत्र, कारणे न देता १९ महिने गजाआड डांबणार्‍या इंदिराजींनी स्वत:च्या साध्या अटकेचा इतका रंगतदार तमाशा सादर केला, की त्यांच्याविषयी नव्याने सहानुभूती जनमानसात निर्माण झाली. मागली बारा वर्षे राजकीय विरोधक, माध्यमे, विचारवंत व कायद्याच्या संस्थांकडून सतत नाडला गेलेला माणूस, अशी मोदींची आधीच प्रतिमा आहे. त्याच लाटेवर स्वार झालेल्या अशा माणसाला साधा लोकसभेचा उमेदवार म्हणून असलेला अबाधित अधिकार नाकारला गेल्याची सहानुभूती मिळवायचे हे नाटक, म्हणजे मोदींनी राहुल प्रियंकाच्या दादीची केलेली निव्वळ नक्कल नाही काय?

2 comments:

  1. माननीय भाऊ, माजी पंतप्रधान श्रीमत इंदिरा गांधी यांना सोमवार दिनांक ३ ऑक्टोबर १९७७ रोजी अटक केली होती. मला आठवते तेंव्हा त्या अटकेचा निषेध म्हणून मुंबईत आंदोलन झाले होते.

    त्या वेळी परळच्या कामगार मैदानावर त्यावेळी काँग्रेस-चड्डी(चव्हाण-रेड्डी) गटाचे महाराष्ट्रातील नेते, मंत्री, जाणता राजा आणि आजचे पंतप्रधानपदाचे उमेदवार(आयुष्यात कधीतरी पंतप्रधान पद मिळेल या आशेवर डोळा ठेवून बसलेले) शरद पवार यांनी दस्तूर खुद्द आंदोलन केले होते. भाषण केले होते.

    पुढे जुलै १९७८ ला शरद पवार दोन्ही काँग्रेसला (इंदिरा काँग्रेस आणि चड्डी काँग्रेसला) गंडवून, टांग देऊन पुलोद स्थापून मुख्यमंत्री झाले. तर इंदिरा गांधी नोव्हेंबर/डिसेंबर १९७८ ला चिकमंगुलर, कर्नाटक येथून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्या.

    जॉर्ज फर्नांडीस यांचे समर्थक वीरेंद्र पाटील हे त्यांच्या विरुद्ध उमेदवार होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे परत ११ वर्षांनी हेच वीरेंद्र पाटील काँग्रेस तर्फे कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले.

    तर समाजवादी लोहीया यांचे शिष्य साथी जॉर्ज फर्नांडीस हे काही काळाने "जनार्दन फडके" असे नामकरण करून(मी मजेत म्हणतोय) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात कार्यक्रमाना हजेरी लावून आले.

    आणि हो, तेंव्हा चिकमंगुलर मध्ये इंदिरा गांधींसाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा देणारे इंदिरा काँग्रेसचे डी. बी. चंद्रेगौडा नंतर काही काळाने भाजपातर्फे खासदार म्हणून निवडून आले.

    खरेच राजकारण आणि काळ फारच विचित्र, चमत्कारिक असतो.............

    ReplyDelete