Tuesday, May 27, 2014

कसलीही अपेक्षा नाही




   गेले वर्षभर तरी आम्ही नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत होणारा पक्षपात व बिनबुडाच्या टिकेला खोडून काढण्याचा सातत्याने प्रयास केलेला होता. कारण लोकशाहीत कुठल्याही भ्रामक कल्पनेच्या आधारे लोकांनी आपला कौल देऊ नये, इतकीच आमची अपेक्षा होती. याचा अर्थ आमच्या भूमिका मांडण्यामुळे मोदींना चार मते अधिक मिळाली असतील, अशा भ्रमात आम्ही अजिबात नाही. तसे असते तर आमच्यापेक्षा अधिक प्रभावशाली माध्यमे ज्यांच्या हाती आहेत, त्यांनी मोदी विरोधात बारा वर्षे उघडलेल्या आघाडीने मोदींना अपयशीच केले असते. माध्यमे, वृत्तपत्रे वा वाहिन्यांच्या मार्गाने जी माहिती जगासमोर आणली जाते, त्यातून लोकमत तयार होत नसते, तर लोकांना आपले मत बनवायला हातभार लागत असतो. त्यामुळेच तिथे माध्यमांचा कब्जा घेतलेल्या काही दलाल पत्रकारांनी जो पक्षपात चालविला होता, त्याला शह देण्याइतकीच जबाबदारी आम्ही उचलली होती. ती देखील मोदींना मदत व्हावी म्हणून नव्हे; तर मोदी ज्यांना न्युजट्रेडर्स म्हणतात अशा बातम्यांच्या दलालांनी पत्रकारितेला फ़ासलेला काळीमा पुसण्यासाठी आम्ही धडपडत होतो. आता ती जबाबदारी पार पडली आहे आणि नव्या पंतप्रधानांकडून आमची कुठलीही अपेक्षा नाही. देशाची सत्तसुत्रे अत्यंत निष्प्रभ व नाकर्त्या नेतृत्वाकडे होती. तिथे कोणी खमक्या व शक्तीशाली नेता येऊन बसावा आणि त्याने माजलेल्या अनागोंदी व अराजकाला लगाम लावावा, इतकीच अपेक्षा होती. मोदी यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन ती अपेक्षा पुर्ण केली. आता त्यांच्याकडून अधिक अपेक्षा बाळगणे पत्रकारीतेला शोभणारे नाही. म्हणूनच त्यांनी काय करावे, निदान तात्काळ काही करावे, म्हणुन त्यांचेच कालचे निंदक वाडगे घेऊन फ़िरत असताना; आम्ही मात्र त्यापासून अलिप्त आहोत व राहु. मोदीसारख्या नेत्याकडे अपेक्षा बाळगण्याचे काही कारण नाही.

   जनभावना ओळखून जनतेच्या गरजांच्या पुर्तीसाठी अथक परिश्रम करणार्‍या मोदींसारख्या नेत्याला पंतप्रधान म्हणुन काय करायला हवे, ते इतरांनी शिकवण्याची गरज आहे, असे आम्हाला वाटत नाही. सत्तापदाची जबाबदारी घेतल्यावर प्राधान्याने काय करावे आणि दुरगामी काय करायला हवे, याचे पुरेसे भान मोदींना आहे. तसे नसते तर इतक्या प्रतिकुल परिस्थितीत त्यांना हा पल्ला गाठता आलाच नसता. आज पंतप्रधान म्हणून यशस्वी होण्यासाठी मोदींनी काय करावे, त्याचे सल्ले देणार्‍यांनीच त्यांना गेला वर्षभर निवडणूका जिंकण्यासाठी काय करावे लागेल, त्याचेही सल्ले दिलेलेच होते. मोदींनी त्याचे पालन केले असते, तर त्यांना इतके मोठे यश मिळू शकले असते काय? उलट ज्यांनी अशा अनाहूत सल्लागारांचे सल्ले मनोमन पाळले, त्यांना नामोहरम व्हायची पाळी आली ना? मग आता तरी मोदी अशा आगावू सल्ल्याकडे कशाला ढुंकून बघतील? त्यामुळेच आम्ही मोदींना कुठला सल्ला देणार नाही, की त्यांच्याकडून कसली अपेक्षा करणार नाही. पण ज्यांना असले सल्ले ऐकून व पाळून पराभवाच्या गर्तेत जाऊन पडावे लागले आहे, त्यांच्याकडून मात्र आमच्या खुप अपेक्षा आहेत. कारण देशाला स्थिर व भक्कम सरकार हवे होते, ते आता मिळालेले आहे. पण लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाइतकाच विरोधी पक्षही जबाबदार व भक्कम असावा लागतो. मोदींच्या रुपाने भक्कम सरकार आले, त्याला योग्य मार्गावर ठेवायचे असेल, तर तसा मजबूत एकजूट विरोधी पक्षही कार्यरत असायला हवा. आज त्याच विरोधी पक्षाची धुळधाण उडालेली आहे. शिवाय राजकीय भूकंपात विस्कटून गेलेल्या विरोधकांना नव्याने समर्थपणे उभे रहावे लागणार आहे. लोकसभेत मान्यताप्राप्त विरोधी पक्ष म्हणावा, इतकेही संख्याबळ कुठल्या पक्षाकडे राहिलेले नाही. म्हणूनच ही चिंतेची बाब आहे. त्या दिशेने विचार व्हायला हवा आहे.

   मोदींच्या यशाने एक बरे झाले. एकाच विचारधारेचा एकजुट पक्ष सत्तेवर आलेला आहे. त्याला रोखण्यासाठी कुठल्याही तत्वहीन आघाड्या करून सत्ता बळकावण्याचा संधीसाधू राजकारणाला पायबंद घातला गेला आहे. पण ज्यांनी सत्ता गमावली, त्यांना अजून शहाणपणा आलेला नाही. भाजपला बहूमत मिळाले तरी ६२ टक्के मते विरोधातच पडली आहेत, असले फ़सवे युक्तीवाद करणार्‍यांनी २००९मध्ये सोनियांच्याही सत्तेला अवघ्या ३१ टक्के मतांचाच पाठींबा होता, हे सांगितले नव्हते. असले युक्तीवाद दिशाभूल करायला बरे असतात. पण ते आपलीही फ़सवणुक करीत असतात. कॉग्रेस तिथेच फ़सत गेली आणि आता गाळात जाऊन बसली आहे. भाजपाला सत्तेपासून रोखण्याच्या फ़सव्या युक्तीवादाने ही दुर्दशा आलेली आहे. त्यातून संधीसाधूपणा म्हणजेच सेक्युलॅरिझम असे चित्र तयार झाले, त्याचा हा परिणाम आहे. आता भाजपाकडे सत्ता गेलेलीच आहे. तेव्हा सर्व पक्षांना आपली धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळाली आहे. आपापले अहंकार, मस्तवालपणा व व्यक्तीगत स्वार्थ गुंडाळून सर्वांनी सेक्युलर या एकाच विषयावर एकत्र येऊन समर्थ विरोधी पक्ष जनतेला द्यावा. तिथे मग नेतृत्वासाठी, सत्तापदासाठी, व्यक्तीगत हेव्यादाव्यासाठी एकमेकांच्या उरावर बसू नये. भाजपाच्या विचारसरणीचे विरोधक म्हणून एकजुटीने एक पक्ष म्हणून काम करावे आणि येत्या पाच वर्षात आपली धर्मनिरपेक्षता संधीसाधू नाही, याचा साक्षात्कार जनतेला घडवावा. तसे झाल्यास मोदींना हरवणे अशक्य नाही. पण तितक्या काळात मोदींनी थोडाफ़ार चांगला कारभार केला, तरी सेक्युलर पक्षांची लढाई अवघड होणार आहे. कारण मोदी अत्यंत सावध असतात आणि चुका होऊ नयेत यासाठी अतिशय नियोजनबद्ध रितीने काम करतात. तेव्हा आव्हान वाटते तितके सोपे नाही. मुळच्या कॉग्रेसमधून फ़ुटून वेगळ्या झालेल्या विविध लहानमोठ्या पक्षांनी एकत्र येऊन यापुढे देशाला वैचारीक राजकारणातले दोन पर्याय उपलब्ध करून द्यायला हवेत. म्हणूनच यापुढे आमची मोदींकडून काहीही अपेक्षा नाही. अपेक्षा आहे, ती त्यांच्या कडव्या राजकीय विरोधकांकडून व विरोधी पक्षांकडून.

1 comment:

  1. वेळोवेळी उत्तमोत्तम लेख लिहून आपण खूप चांगले काम केले आहे. आपले अभिनंदन आणि धन्यवाद!
    आता असेच काम आपण विधानसभेसाठी करावे. या विधानसभेसाठी महायुतीला पोषक वातावरण असले तरी गाफील न राहता खास करून सेना -भाजपच्या नेत्यांनी जोमाने प्रचार करायला हवा. किमान विधानसभेवर भगवा फडकेपर्यंत तरी आपण राजकीय लेख लिहायचे सोडू नये हि विनंती.

    ReplyDelete