Thursday, June 26, 2014

कोमात गेलेल्या पत्रकारितेने डोळे किलकिले केले



   संध्याकाळचे सात वाजत आलेत आणि तारीख २६ जुनची. एकदम मन भुतकाळात गेले. तेव्हा मी दैनिक ‘मराठा’मध्ये उपसंपादक म्हणून काम करत होतो. त्या आठवड्यात माझी रात्रपाळी होती. माझ्या सोबत (पुढे साप्ताहिक लोकप्रभाचा संपादक झालेला) प्रदीप वर्मा होता. संध्याकाळी साडेआठला रात्रपाळीचे लोक हजर होत आणि अपरात्री दोन नंतरच छपाई सुरू झाल्यावर रात्रपाळी संपायची. मग तिथेच टेबलावर लवंडायचे आणि सकाळी उठून घरी जायचे, असा खाक्या होता. मी कधीच लौकर उठणारा नसल्याने ‘सांज मराठा’चा उपसंपादक येऊन टेबल मोकळे करायचा हट्ट धरण्यापर्यंत लोळत असायचो. प्रदीपची गोष्ट वेगळी. तो पहाटे सहाच्या आसपास उठून निघून जायचा. त्या काळात राजकारण खुप गढूळ झालेले होते. अलाहाबाद हायकोर्टाने इंदिराजींची लोकसभेची निवड रद्द केलेली होती आणि जयप्रकाशांच्या संपुर्ण क्रांती आंदोलनाने धुरळा उडवलेला होता. कोर्टाच्या निकालानंतर इंदिराजींवर राजिनाम्यासाठी दडपण आणले जात होते. त्याच स्वरूपाची कसली बातमी देऊन आम्ही काम संपवले होते. निवांत झोपलो होतो. जुळणी कामगारही तिथेच कंपोज खात्यात झोपून सकाळी निघायचे.

   भल्या पहाटे मला उठवायचे धाडस प्रदीप करीत नसे, कारण मी चिडचिड करून शिव्या घालायचो. पण दुसर्‍या दिवशी त्याने माझी झोप उडवली. सकाळी घरी जाण्यापुर्वी त्याने सवयीनुसार टेलीप्रिंटरच्या लांबलचक कागदावर नजर टाकली होती. फ़्लॅश व स्नॅप अशा त्रोटक स्वरूपात पीटीआय तेव्हा ब्रेकिंग न्युज देत असे. तशाच अनेक त्रोटक बातम्या त्याला उशीरा केव्हातरी टेलीप्रिंटरवर येऊन लटकत पडलेल्या दिसल्या आणि तो ओरडतच माझ्यापाशी आला.

   ‘ए भावड्या ऊठ, सगळा राडा झालाय. दिल्लीत पेपर निघालेले नाहीत, जयप्रकाश, मोरारजी सगळ्यांना अटक झालीय, इंदिरेने आणिबाणी लागू केलीय. बरेच मोठे नेते रात्रीच पकडलेत.’

   मी खडबडून जागा झालो. त्याच्या हातातले बातम्यांचे भेंडोळे घेऊन भरभर नजर टाकली. मग चुळ भरण्यापुर्वीच उठून आत कंपोज विभागात धावलो. बरेच रात्रपाळीचे कामगार तिथे पहुडले होते. झारापकर नावाच्या मुकादमाला उठवला आणि म्हटले कामाला बसा. उद्याचा पेपर निघेल की नाही, याची काही खात्री नाही. केव्हाही पोलिस येतील आणि आपला पेपर बंद करतील. अजून हातात आहे तर ‘सांज मराठा’ छापून घेऊ. त्यानेही सर्वांना भरभर उठवले आणि कामाला बसवले. मग प्रदीप आणि मी भरभरा टेलीप्रिंटरवरून आलेल्या बातम्यांचे भाषांतर सुरू केले. झारापकर सोबत्यांना कामाला जुंपून खाली मशीन खात्यात धावला. त्यांना माझ्या सूचना देऊन परत आला. एक एक कागद आम्ही लिहीत होतो, तसा उचलून कंपोजमध्ये पाठवला जात होता. आठ वाजण्यापुर्वीच आम्ही टॅब्लॉईड आकारातली चार पाने सज्ज केली आणि छपाईला नऊ वाजण्याच्या आत आरंभ होऊ शकला. तोपर्यंत दादर स्टेशन नजीकचा विक्रेता आणि आमचा एजंट सुर्वेला फ़ोन करून, छापल्या जातील तेवढ्या प्रति विनाविलंब बाजारात टाकायच्या सूचना दिल्या.

   साडे आठला प्रभाकर राणे हा माझा तरूण सहकारी हजर झाला. ‘सांज मराठा’ ही त्याची तेव्हा जबाबदारी होती. तेव्हा आधीच मी जागा व खुर्चीत बसलेला बघून त्यानेही उपहासाने मस्करी केली. जागा मोकळी करायला नेहमीप्रमाणे फ़र्मावले. त्याला म्हटले जरा कंपोजमध्ये जाऊन मजकूर किती हवाय बघ. तोपर्यंत मी आवरतोच टेबल. प्रभाकर आत गेला तर कंपोझिटर त्याला बघून हसू लागले, पेपर आधीच झालाय म्हटल्यावर राणेला शंका आली. तेव्हा त्याला घटना समजावून सांगितली. तोपर्यंत एजंटचे लोक दाखल झालेच होते आणि मशीन खात्यात हालचालींनी वेग घेतला होता. वर्मा त्याच दिवशी इतक्या उशीरापर्यंत सकाळी ऑफ़ीसमध्ये रेंगाळला. माझ्या मनात धाकधुक होती, तयार केलेला पेपर बाजारात जाईपर्यंत पोलिस आले तर? कारण दिल्लीत अनेक वृत्तपत्रांच्या कार्यालये व छापखान्याची वीज तोडल्याची त्यात बातमी होती, तशीच दोन मोठ्या संपादकांनाही अटक झाल्याची बातमी होती. मुंबई त्याला अपवाद होण्याचे काही कारण नव्हते. झालेही तसेच अकरा वाजेपर्यंत अंदाजे २८ हजार प्रती छापल्या गेल्या आणि तशाच बाजारात गेल्या होत्या. अकराच्या सुमारास पोलिस येऊन ठेपले आणि त्यांनी छपाई मशीन बंद करायला भाग पाडले. साधारण सात आठ हजार प्रती छापून तयार होत्या, त्या जप्त केल्या. पण त्याच्या चौपट प्रती आधीच निसटल्याच्या आनंदात मी होतो. त्या दिवशी संध्याकाळचे दुपारचे कुठलेच पेपर बाजारात येऊ शकले नव्हते. देशात आणिबाणी लागू झाल्याची बातमी घेऊन येणारा ‘सांज मराठा’ बहूधा एकटाच अपवाद होता. आजच्या भाषेत सिर्फ़ ‘इसी चॅनेलपर’ सारखा.

   त्याच सुमारास एक एक वरीष्ठ सहकारी व कर्मचारी ऑफ़िसात येऊ लागले आणि बातमी पसरत चालली होती. मी ज्येष्ठांना कल्पना देऊन घरी निसटलो. पण त्याही आधीच म्हणजे नऊच्या सुमारास टेलीप्रिंटरही बंद पडला होता. देशात आणिबाणीमुळे सेन्सॉरशीप लागू केल्याची शेवटची बातमी टाईप करून पुढले प्रसारण सरकारच्या सूचना येईपर्यंत बंद केल्याचे पीटीआयने कळवले होते. पुढले दहा तास सगळी वृत्तपत्रसृष्टीच देशात ठप्प झाली होती. घरी आंघोळ व अन्य कर्मे उरकून मी विनाविलंब दुपारीच शिवशक्तीत (मराठाचे कार्यालय) दाखल झालो. सगळेच भवितव्याच्या चिंतेने ग्रासलेले बसून होते. करायला काहीच नव्हते,. कारण सरकारच्या गाईडलाईन्स येईपर्यंत वृत्तपत्रांनी छपाई करू नये, असे स्पष्ट सरकारी आदेश होते. दिवस मावळत आला तरी गाईडलाईन्स नव्हत्या आणि कामही नव्हते. भविष्याच्या अनाकलनीय वळणावर ज्येष्ठ व कनिष्ठ दबल्या आवाजात बोलत होते.

   सातच्या आसपास केव्हातरी पुन्हा कोमात गेलेल्या टेलीप्रिंटरच्या जीवात जीव आला. काहीतरी खुडबुडल्यासारखा आवाज आला आणि मी तिकडे धावलो. बाकीचेही उठले. पण तोपर्यंत तिथे पोहोचलेल्या मलाच पहिला संदेश वाचता आला. सरकारने बातम्या व प्रकाशनाविषयी लागू केलेल्या गाईडलाईन्स त्यातून प्रसारीत केल्या जात होत्या. कुठल्या बातम्या देऊ नयेत, कुठल्या कारणास्तव पेपर बंद केला जाऊ शकतो. कशाला गुन्हा समजले जाईल; अशा अटी त्यातून येत होत्या. मग उत्साह बाजूला ठेवून मी थोरल्या सहकार्‍यांना त्यात डोकावायला जागा करून दिली. कोमात गेलेल्या भारतीय पत्रकारितेने पुन्हा एकदा डोळे किलकिले केल्याचा तो क्षण अजून आठवतो. साधारण संध्याकाळचा सात वाजण्याचा सुमार होता आणि तारीख होती २६ जुन १९७५.

4 comments:

  1. Too good, You have a blessing of bright memory !

    ReplyDelete
  2. Romanchak aathavani vachtanahi ek veglach anubhav deun jatat....

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर आणि रोमांचक आठवणी, भाऊ काय दिवस असतील ते....

    ReplyDelete
  4. Khup chhan...rya kalachi amhala mahitich navhati

    ReplyDelete