Wednesday, June 25, 2014

जागे आहात ना, आबा?   दोन दिवसांपुर्वी कोणा पत्रकाराने कॅमेरासकट वाराणशीत जाऊन तिथले शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांची एक मुलाखत घेतली. त्यात त्यांना शिर्डीचे साईबाबा यांच्याबद्दल काही प्रश्न विचारले. तर त्या शंकराचार्यांनी साईबाबा हे देव नाहीत आणि त्यांची भक्ती केवळ हिंदूच करतात. मग त्याला हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून रंगवले जाते. ही निव्वळ दिशाभूल आहे आणि त्यामागे पाश्चात्य परधर्मियांचे कारस्थान आहे, असली मुक्ताफ़ळे शंकराचार्यांनी उधळली. अर्थात कोणी मुलाखत घेतली नसती, तरी शंकराचार्यांचे मत यापेक्षा वेगळे असण्याची शक्यता अजिबात नव्हती. पण ती मते त्यांची त्यांच्यापाशीच सुखरूप राहिली असती. मग मुळात अशी मुलाखत घेण्यामागचा हेतू काय, असा पहिला प्रश्न उभा रहातो. कुठल्याही पत्रकाराची विवेकबुद्धी शाबुत असेल, तर असली मते जनक्षोभ निर्माण करू शकतात, इतके नक्कीच कळू शकते. सहाजिकच त्याने मुलाखत घेताच त्याचे पुढले प्रसारण करण्यायोग्य त्यातली मते नाहीत, हे ओळखयाला हवे. त्याने नाही, तर निदान त्याचे वरीष्ठ जे वाहिनीचे संपादक म्हणून कार्यरत आहेत, त्यांनी त्याचे प्रसारण समाजातील सामंजस्याला धोका निर्माण करू शकणारी ही मुलाखत म्हणून रोखून धरायला हवे होते. पण यापैकी काहीच झाले नाही. फ़ेसबुक वा अन्य जी सोशल माध्यमे मानली जातात, तिथेही असेच कोणालाही काय वाटेल ते सुचले, मग थेट इंटरनेटवर टाकले जात असते. सुदैवाने शंकराचार्य त्यापैकी काहीच वापरत नाहीत. त्यामुळे त्यांची ही स्फ़ोटक मते आजवर जगापुढे आलेली नव्हती, की त्यावरून गदारोळ होऊ शकला नव्हता. पण ते काम मुख्यप्रवाहातील माध्यमांनीच करून टाकले. त्यामुळे मग देशभर काहूर माजले आहे. साईभक्त व इतरांनी नाराजी प्रकट करून निदर्शने होण्यापर्यंत मजल गेली. कोणीतरी शिर्डी येथे गुन्हाही दाखल केला. समाजात दुफ़ळी माजवून वैमनस्य निर्माण करण्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणे योग्यच आहे.

   आता सवाल असा येतो, की हे काम कोणी केले? शेकडो नव्हेतर हजारो लोकांच्या मनात विकृत विचार घोळत असतात वा त्यांची मते समाजाला घातक असतात. पण जोपर्यंत त्याचा उच्चार जाहिरपणे होत नाही, किंवा त्याचा प्रसार प्रचार केला जात नाही, तोपर्यंत त्यावर कुठली कारवाई होऊ शकत नसते. कारण परिणामांचा धोका त्यात नसतो. मध्यंतरी कोणी शिवराय व शिवसेनाप्रमुखांच्या बदनामीचा मजकूर चित्रे इंटरनेटवर टाकली होती. त्याचा पसारा सोशल माध्यमातून वाढवला गेला आणि दंगलीची स्थिती निर्माण झाली. एका निरपराधाचा त्यात हकनाक बळी गेला. त्यामुळे सरकारला अशा प्रकारांची गंभीर दखल घ्यावी लागली. तेव्हा अशा उचापती करणार्‍यांना महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष गृहमंत्री यांनी कर्तव्यबुद्धीने तात्काळ एक इशारा दिला होता. जो कोणी अशा उचापती करतो, त्याला कठोर शिक्षा दिली जाईल आणि त्याच्याच सोबत त्यात गुंतलेल्यांनाही सुटता येणार नाही, असा तो सज्जड दम आबा पाटलांनी भरल्याचे आठवते. अजून त्याला दोन आठवडेही झालेले नसतील. म्हणूनच आबांनाही त्याचे स्मरण असेल अशी अपेक्षा आहे. अगदी आबांच्याच शब्दात नेमके सांगायचे तर बातमी अशी होती. ‘फेसबुक, वॉट्स अॅपसह इतर सोशल नेटवर्क साईटवर यापुढे आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर टाकणारे, त्या मजकूराला लाईक व शेअर करणा-यांवरही यापुढे गुन्हे दाखल केले जातील असे राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी आज म्हटले आहे. मागील आठवड्यात राज्यातील महापुरुषांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता. त्यामुळे राज्यात मागील 8-10 दिवसापासून तणावाची स्थिती आहे. याचदरम्यान पुण्यात मोहसिन शेख नावाच्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरची हत्या करण्यात आली होती. ही हत्या हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी घडवून आणली होती. शेख याने हा मजकूर पोस्ट केल्याचा हिंदु राष्ट्र सेनेला होता. मात्र यात शेख याचा कोणताही सहभाग नसल्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी सांगितले. तसेच बदनामीच्या या पोस्ट परदेशातून टाकल्याचे पुढे आले आहे. मात्र, यातून एका निष्पाप युवकांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने यापुढे आक्षेपार्ह मजकूर टाकणारे, त्याला लाईक व शेअर करणा-यांवर यापुढे गुन्हा दाखल होणार आहे.’

   अशी गर्जना केल्यानंतर पुढे काय झाले आणि त्या प्रकरणात आबांनी किती लोकांवर गुन्हे दाखल केले, त्याचा पत्ता नाही. कारण दुसर्‍या ब्रेकिंग न्युज आल्या आणि आबांसह तमाम सगळेच सोशल लोक माध्यमांमधल्या उचापतखोरीला विसरून गेले आहेत. पण हरकत नाही. इतक्या मोठ्या पदावर, इतकी मोठी जबाबदारी पार पाडणार्‍या इतक्या मोठ्या कर्तव्यदक्ष नेत्याकडून अशा छोट्याछोट्या बाबतीत विसरभोळेपणा होऊ शकतो ना? मग आपण आबांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून चालेल काय? त्यांनाही मोठी मोठी कर्तव्ये असतातच. त्याच्या गडबडीत अशी छोटी छोटी कर्तव्ये विसरली जाणारच ना? तेव्हा विसरलेली कर्तव्ये आपण सोडून देऊ आणि सध्याच्या साईबाबा प्रकरणात आबा काय करत आहेत, त्याची चौकशी करू. आणि समजा आबांचे दुर्लक्ष झालेच असेल, तर तिकडे इतक्या मोठ्या व्यक्तीचे लक्ष वेधणे आपल्यासारख्या छोट्या माणसांचे इवलेसे कर्तव्यच नाही काय? म्हणून हा प्रयास? सध्या साईबाबा विरुद्ध शंकराचार्य असा जो वाद उफ़ालला आहे आणि अनेक जागी भक्तगण रस्त्यावर आलेत, त्याला कोण जबाबदार आहे? शंकराचार्यानी तर कुठे जाहिरसभा घेऊन असे भडकावू भाषण दिलेले नाही. त्यांनी आपली मते कुठल्या सोशल माध्यमातून व्यक्त केलेली नाहीत. पण त्यांची अशी समाजात दुफ़ळी माजवणारी मते रेकॉर्ड करून वाहिन्यांवर आणणारे आहेत, त्यांना निर्दोष मानायचे काय? कारण त्यांनीच ह्याची जाहिर वाच्यता केलेली आहे. म्हणजेच ज्याने मुलाखत घेतली, त्यानेच प्रथम आक्षेपार्ह मजकूर व विधाने माध्यमातून जगासमोर आणली. नंतर ज्या वाहिन्यांनी त्याचे पुन:प्रसारण केले; त्यांनी त्याला ‘लाईक’ केले आणि शेअर व ‘फ़ॉरवर्ड’ केलेले नाही काय? म्हणजे गुन्हेगार समोर आहेत. मग आबा कृती कधी करणार? सोशल माध्यमे आणि मुख्यप्रवाहातील माध्यमे यात फ़रक कोणता?

   इंटरनेटला सोशल माध्यमे म्हणायचे व समजायचे, तर मुख्यप्रवाहातील माध्यमे एन्टी सोशल समजायची काय? कारण हा उद्योग मुळातच वाहिन्यांनी सुरू केला आहे. त्यामुळेच हा आक्षेपार्ह मजकूर व मतप्रदर्शन खेड्यापाड्यापर्यंत जाऊन समाजात वैमनस्य निर्माण झाले आहे. शिर्डीमध्येच नव्हेतर देशाच्या विविध भागात रस्त्यावर येऊन लोकांनी पुतळे जाळण्यापर्यंत मजल गेली आहे. मग यात लाईक व फ़ॉरवर्ड नियमानुसार कारवाई व्हायला नको काय? आबा जागे आहात ना? शंकराचार्य आणि साईबाबा असल्या विषयात त्यांचे आपापले भक्त शांतपणे भक्तीत मग्न असताना त्यांच्यात अकारण वैमनस्य निर्माण करण्याला कोणता कायदा व नियम लावणार? तुमच्याच पोलिसांनी शिर्डीत शंकराचार्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. समाजात दुफ़ळी माजवणारे वक्तव्य केल्याचा तो गुन्हा आहे. सवाल इतकाच आहे, की त्याला ज्या विविध वाहिन्या व त्यावरील बुद्धीमंत वादपटू यांच्याकडून ‘लाईका’ मिळाल्या व ‘शेअर’ करण्याची स्पर्धाच चालली आहे, त्यांच्यावर गुन्हे कधी दाखल व्हायचे? कारण त्यांनीच अनभिज्ञ भक्तांना विचलीत करण्याचे परम कर्तव्य निष्ठेने पार पाडलेले आहे. थोडक्यात सोशल मिडीयापेक्षा मुख्य प्रवाहातील मीडियाच हल्ली अधिक एन्टी सोशल होत चालला आहे. त्याचा बंदोबस्त कसा करणार आहात आबा? हे नियम वा गुन्हे दाखल करण्याच्या असल्या कसोट्या आमच्या नाहीत. आबा तुम्हीच त्या निर्माण केलेल्या आहेत. तेव्हा आता त्यानुसार कधी कामाला लागताय बोला. नाहीतर लोक पुन्हा म्हणतील, आबांनी शेपूट घातली. जरा हिंमत करा आबा, दाखवून द्या की तुम्ही शेपूट घालत नाही, शेपूट पिरगाळणारे आहात. जागे आहात ना आबा?

No comments:

Post a Comment