Sunday, June 29, 2014

कॉग्रेस पक्षातील जीवघेणी घुसमट   इंदिरा गांधी यांनी कॉग्रेस पक्षाला आपल्या घराण्याची खाजगी मालमत्ता बनवल्यापासून त्यात संघटनात्मक घटक क्रमाक्रमाने लयास गेला होता. त्यामुळेच विचाराधिष्ठीत संघटना बांधणे, कार्यकर्ते घडवणे अशा गोष्टींना त्या पक्षात स्थान राहिले नव्हते. इंदिराजींची लोकप्रियता व त्यामुळे पक्षाला मिळणारी मते, यावरच कॉग्रेस जगू लागली. सहाजिकच त्या पक्षात स्थान मिळणे वा अधिकारपद मिळण्याला राजघराण्याची मर्जी संपादन करणे अगत्याचे बनत गेले. पक्षातील गुणी कर्तबगार सहकार्‍यांची इंदिराजींना गरज उरली नाही. गुणवान कर्तबगार अधिकार्‍यांच्या मदतीने सत्ता राबवण्यात अडचण नव्हती. म्हणूनच त्यांनी किरकोळ गुणवत्ता व नेतृत्वगुण असलेल्या खुज्या मनोवृत्तीच्या लोकांना गोळा करून कॉग्रेसचा पक्षीय संघटनात्मक ढाचा कायम राखला होता. आणिबाणीच्या कालखंडात त्याची कसोटी लागली. इंदिराजींनी लोकप्रियता गमावली आणि कॉग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. पण त्यानंतर इंदिराजी बाजूला झाल्या तरी पक्षाचे नेतृत्व समर्थपणे करणारा कुणी नेताच पक्षात उरला नव्हता. नाही म्हणायला यशवंतराव चव्हाण, बाबू जगजीवनराम, ब्रह्मानंद रेड्डी वा देवराज अरस असे काही नेते असले, तरी आपली कुवतच ते विसरून गेले होते. शिवाय ज्या पक्ष संघटनेची सुत्रे त्यांच्याकडे आली; तिच्यात इंदिराभक्ती ठासून भरलेली होती. विचारधारेचा लवलेश नव्हता. म्हणूनच इंदिराजी बाजूला होताच अशा नेत्यांची कॉग्रेस टिकू शकली नाही. त्या पराभवातून व नेत्यांच्या बंडातून इंदिराजींनी पुन्हा नव्याने कॉग्रेसला संजीवनी दिली. पण त्यानंतर उरलीसुरली कॉग्रेस नामशेष होऊन गेली. गांधी घराण्याच्या कुणी वारसच चालवू शकतो, असे त्याचे स्वरूप झाले. दुसर्‍या कुणाला त्या पक्षाचे नेतृत्वच शक्य उरले नाही. कारण या सर्व गडबडीत पक्षात तळागाळापासुन नेतृत्व व कार्यकर्ते घडवण्याची प्रक्रियाच संपून गेली होती. जो कोणी आपापल्या परिसरात स्वबळावर कर्तबगारी दाखवील, त्याला निवडणूकीच्या तोंडावर पक्षात आणून नेता करायचे आणि स्थानिक पातळीवर दिर्घकाळ कार्यरत असलेल्या तरूणांना त्याच्या गोठ्यात बांधायचे; ही कार्यपद्धत होऊन गेली. जो कोणी पक्षात येईल वा ज्याला पक्षात रहायचे आहे, त्याने आपल्या निष्ठा गांधी वारसाच्या चरणी लीन करायच्या, म्हणजे तो कॉग्रेसी झाला, ही कसोटी होती.

   अशा पार्श्वभूमीवर इंदिराहत्येमुळे राजीव गांधी तरून गेले. पण पुढल्याच निवडणूकीत त्यांना दारूण पराभवाचे तोंड बघावे लागले. ऐन निवडणूकीत त्यांचीही हत्या झाल्याने कॉग्रेसला सहानूभूतीचा लाभ मिळाला. पण कोणी गांधी घराण्याचा वारसच पक्ष चालवायला नसल्याने त्याची संघटना खिळखिळी होत गेली. त्यासाठी मग नारायण दत्त तिवारी वा अर्जुन सिंग यासारखे नेते सोनियांच्या दारात धरणे धरून बसले होते. तरी त्यांनी दोन मुले वाढवायची असल्याने राजकारणात यायला नकार दिला, मात्र आठ वर्षांनी सोनिया राजकारणात आल्या. तरी नेतृत्वाचे गुण त्यांच्यापाशी नव्हते किंवा इंदिराजींचा करिष्माशी नव्हता. पण दुबळा व भरकटलेला विरोधी पक्ष खेळवत त्यांनी दोनदा कॉग्रेसला सत्तेपर्यंत आणले. यावेळी त्यांना ते शक्य झालेच नाही. कारण मोदींसारखा खमक्या नेत्या विरोधात दंड थोपटून उभा होता, पण म्हणून मोदींच्या करिष्म्याने कॉग्रेस भूईसपाट झाली म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. कॉग्रेसची ही दुर्दशा मागल्या चार दशकापासूनच होत राहिली आहे. कारण तिथे आत्मपरिक्षणाला स्थान उरलेले नाही. गांधी घराण्याचा वारस आपला उद्धार करू शकतो, हीच विचारसरणी मानणार्‍याला कॉग्रेस कार्यकर्ता ठरवला जातो. त्या भ्रमात त्या पक्षातले लोक व त्यांनीच पोसलेले नेहरूवादी विचारवंत राहिले असले, तरी जग एकविसाव्या शतकात येऊन पोहोचले आहे आणि नव्या पिढीतला मतदार खुप बदलला आहे. त्याचे भान नसल्याने शतायुषी मानल्या जाणार्‍या कॉग्रेसची इतकी दुर्दशा झालेली आहे. ह्या भ्रमातच असल्याने सोनिया राहुलसह सर्वच पक्षाला मोदी त्सुनामीत वाहून जाण्याची वेळ आली. पण नाकातोंडात पाणी जाऊन पक्ष बुडाला तरी त्याची कारणे शोधायची कुणाला गरज वाटलेली नाही. अर्थात अनेकांना तशी गरज वाटलीही असेल, पण बोलून कोणी दाखवायचे? सत्य बोलणे हाच जिथे गुन्हा असतो, तिथे स्वयंभू विचार बेशिस्तच असणार ना? ज्यांनी तेवढी हिंमत केली, त्यांना मागल्या महिनाभरात बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहेच. केरळ व राजस्थानच्या दोन नेत्यांची हाकालपट्टी त्यांनी राहुलच्या नाकर्तेपणाची जाहिर वाच्यता केल्यानेच झाली ना? मग बाकीच्यांनी कुठल्या तोंडाने बोलावे? आत्मपरिक्षण करायची मागणी कोण कशी करणार? पण आता हळुहळू अनेक कॉग्रेस नेत्यांना कंठ फ़ुटू लागला आहे.

   या पार्श्वभूमीवर सध्या कॉग्रेसमध्ये मोठ्या उलथापालथी चालू आहेत, अशी आता शंका येऊ लागली आहे. कालपर्यंत जितकी गांधी वारसांची हुकूमत पक्षात चालत होती, तिला आता खिंडार पडू लागल्याची चिन्हे आहेत. जर तुम्हालाच मुजरे करायचे तर त्याचे उत्तरदायित्वही असायला हवे, असे उघडपणे सांगायला आता आजवरचे निष्ठावंतही पुढे यायला लागले आहेत. एका बाजूला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूकीवर डोळा ठेवून मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण दिल्याचे कौतुक चालले असताना, ज्येष्ठ नेते अन्थोनी यांनीच पक्षाच्या सेक्युलर प्रतिमेला आव्हान दिले आहे. आपला पक्ष सेक्युलर असल्याबद्दल आता लोकांना शंका येऊ लागली असून तो मुस्लिम धार्जिणा झाल्याची लोकांना खात्री पटू लागल्याचे अन्थोनी यांनी खुलेआम सांगुन टाकले आहे. या मुस्लिम धार्जिणेपणामुळे केवळ बहुसंख्य हिंदूच नव्हेत, तर अन्य अल्पसंख्यांकही कॉग्रेसकडे संशयाने बघू लागल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्याचवेळी राहुलच्या कुठल्याही मुर्ख कृतीचे गुणगान करण्यात दहा वर्षे खर्ची घातलेले दिग्विजय सिंग, यांनीही खुद्द युवराजांवरच तोफ़ डागली आहे. राहुल अधिकार गाजवण्यासाठी पात्र नाहीत. सत्ता राबवण्यासाठी लागणारी गुणवत्ता त्यांच्यापाशी नसून त्यांना न्यायासाठी आंदोलक म्हणून लढणे आवडते, असे मत सिंग यांनी व्यक्त केले आहे. एकप्रकारे पंतप्रधान व्हायला राहुल नालायक असल्याचेच दिग्विजयनी स्पष्टपणे सांगून टाकले आहे. असे दोन दिग्गज नेते बोलत असतील, तर पक्षांतर्गत किती धुसमट असेल याचा अंदाज येऊ शकतो. कारण स्पष्ट आहे. सोनिया व राहुल यांच्यापाशी इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे करिष्मा नाही किंवा झुंजून पक्षाला नव्याने उभारी देण्याची जिद्दी पात्रता नाही. पण आधीच दुबळ्या असलेल्या पक्षाच्या संघटनात्मक ढाच्याला त्यांनीच निकामी करून टाकले आहे. त्याचेच परिणाम कॉग्रेसला भोगावे लागत आहेत, अशावेळी त्या दोघांसह ज्येष्ठ म्हणून मिरवणार्‍या ऐतखावू नेत्यांनाही बाजूला करून नव्याने पक्षाला संजीवनी देण्याची हिंमत असलेला नेता पुढे येण्य़ाची गरज आहे. अन्थोनी, दिग्विजय वा गुलाम नबी, चिदंबरम यापैकी कोणातही ती क्षमता नाही. आपल्या पक्षाच्या मागल्या दोन दशकातील नाकर्तेपणावर बोट ठेवून नव्याने पुन्हा विचाराधिष्ठीत संघटनात्मक पक्ष उभारण्यास जो पुढे येईल, तोच कॉग्रेसला पुनरूज्जीवित करू शकेल. अन्यथा येत्या काही विधानसभा पराभवानंतर कॉग्रेस अस्तंगत होत जाण्याखेरीज दुसरी कुठली शक्यता नाही. सध्या तरी असा कुणी चेहरा कॉग्रेसमध्ये नजरेस येत नाही.

1 comment:

  1. < आपल्या पक्षाच्या मागल्या दोन दशकातील नाकर्तेपणावर बोट ठेवून नव्याने पुन्हा विचाराधिष्ठीत संघटनात्मक पक्ष उभारण्यास जो पुढे येईल, तोच कॉग्रेसला पुनरूज्जीवित करू शकेल. अन्यथा येत्या काही विधानसभा पराभवानंतर कॉग्रेस अस्तंगत होत जाण्याखेरीज दुसरी कुठली शक्यता नाही. सध्या तरी असा कुणी चेहरा कॉग्रेसमध्ये नजरेस येत नाही.>ज्यांना आपल्या पायावर ़धोंडापाडून घ्यायचाय त्यांना कोण अडवाणी?

    ReplyDelete