Wednesday, June 4, 2014

राणे आणि राज ‘मनसे’त एकत्र आले तर?

 

  मोदी सरकारचे नवे ग्रामीण विकासमंत्री गोपिनाथ मुंडे यांच्या आकस्मिक अपघाती निधनाने राज्यातील भाजपाला मोठाच धक्का बसला आहेच, पण त्यापेक्षाही राज्यातल्या राजकीय समिकरणाला या निधनाने पुरते विस्कटून टाकले आहे. अजून लोकसभा निवडणूकांच्या निकालांची पुरेशी मिमांसा झालेली नाही, की पराभूत सत्ताधारी पक्षांनी आत्मपरिक्षण केलेले नाही; अशावेळी भावी मुख्यमंत्री कोण यावरून वादंग माजले होते. एका बाजूला महायुतीचे दोन प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना भाजपा यांच्यात या पदासाठी स्पर्धा होतीच. पण पराभवाचा दणका बसलेल्या मनसेने आपले अस्तित्व सावरण्यासाठी खुद्द राज ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले आणि भावी सत्तासंघर्षला रंगत चढू लागली होती. राजना काटशह देण्यासाठी शिवसेनेने अप्रत्यक्ष मार्गाने उद्धव ठाकरे यांच्या नावा़ची घोषणा करून उडी घेतली. त्याला उत्त्तर देताना भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुंडे ही राज्य भाजपाने दिल्ली सरकारला दिलेली उसनवारी आहे, असे म्हणत मुंडेच भाजपातर्फ़े युतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असल्याचे सुचवले होते. खुद्द मुंडे यांनी त्यावर नेमके भाष्य केले होते. पंचवीस वर्षाच्या युतीच्या वाटचालीचा फ़ॉर्म्युलाच मुंडे यांनी पुढे केला होता. ज्याचे आमदार अधिक त्याच मुख्यमंत्री, असेच मुंडे यांनी सांगितले होते. म्हणूनच त्यांच्याच आकस्मिक निधनाने सगळी समिकरणे विस्कटून टाकली आहेत. त्याचे कारण असे, की पदासाठी नावे खुप असतील. पण ज्याच्यापाशी राज्यातील जनमानसावर छाप पाडण्याची क्षमता आहे असा, निदान युतीपाशी एकच नेता होता आणि तेच गोपिनाथराव मुंडे होत. आज तेच अंतर्धान पावले आहेत. त्याचा येत्या चारपाच महिन्यातील निवडणूकीच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, ते म्हणूनच तपासून बघणे अगत्याचे ठरावे.

   लोकसभा निकालानंतर राज्यातल्या सत्ताधारी कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे इतके मानसिक खच्चीकरण झाले आहे, की हातातून निसटू बघणारी सत्ता टिकवण्यासाठी लढायची इच्छाही सत्ताधारी गमावून बसले आहेत. आपल्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी कॉग्रेसचे राज्यातील नेतृत्व हायकमांडकडे आशाळभूतपणे बघते आहे आणि खुद्द श्रेष्ठीच देशव्यापी पराभवाने हातपाय गाळून बसले आहेत. सहाजिकच राज्यातली गमावलेली मते व जाऊ बघणारी सत्ता टिकवण्याची इच्छाही, आघाडीच्या नेत्यांमध्ये दिसत नाही. आसामप्रमाणेच इथेही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आमदार मंत्र्यात नाराजी आहे. उद्योगमंत्री व आक्रमक नेते नारायण राणे यांनी थेट सोनियांना पत्र लिहून राज्यात मोठे फ़ेरबदल करायची मागणी केली आहे आणि ती झटपट न केल्यास निवडणूकात होऊ घातलेले पानिपत थोपवणे अशक्य आल्याचा जाहिरपणे इशारा दिला आहे. पक्षाचे अन्य आमदार व मंत्री त्यामुळे राणेंच्या नेतृत्वाखाली उठाव करण्याची शक्यता आहे. राणेंचे पुत्र भाजपाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या होत्या. पण त्यात किती तथ्य आहे? अशा उलथापालथीचा राज्यातील निवाडणूकपुर्व राजकारणावर कोणता परिणाम संभव आहे? ज्याप्रकारे दोन्ही सत्ताधारी पक्षांनी आपल्या मंत्रीमंडळातील जागा भरून घेतल्या, त्यात लढण्यापेक्षा उरलेसुरले ओरपण्याची प्रवृत्ती दिसते. नाही म्हणायला राणे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजिनामा देऊन लढायची व किल्ला वाचवण्यासाठी झुंजण्याची इच्छा तरी व्यक्त केली. पराभवाच्या छायेत अशी वृत्ती मोलाची असते. बचावात्मक पवित्र्यात लढता येत नाही, तितकेच जाणारे राज्यही वाचवता येऊ शकत नाही. राणे यांचा आक्रमकपणा आज अनेकांना आक्रस्ताळेपणा वाटेल. पण व्यवहारी विचार केल्यास त्यांची झुंजण्याची वृत्ती त्यात आढळून येते आणि आजतरी अशाच नेत्याची कॉग्रेसला देशभरात गरज आहे.

   जिथे सगळेच भूकंप होऊन उध्वस्त झाले आहे, तिथे नारायण राणे काय करणार? अशावेळी उध्वस्त घरातली भांडीकुंडी उचलून पहिली चुल पेटवायची सोय करावी लागते. भिंती व छप्पर नंतर सावरता येते. बाहेरच्या मदतीची प्रतिक्षा करीत बसून चालत नाही, तर विस्कटलेल्या संसारातील उपयुक्त वस्तु व साहित्य घेऊन पुन्हा नव्याने जगायची धडपड सुरू करावी लागते. राणे यांनी तात्काळ सोनियांना पत्र लिहून त्यासाठी पहिले पाऊल टाकले आणि म्हणूनच काही आमदार मंत्री त्यांच्याकडेच आशेने बघू लागल्याचे वृत्त आहे. अर्थात त्याला हायकमांडकडून दाद मिळाल्याचे दिसत नाही. अशावेळी मग राणेपुत्राने भाजपाशी संपर्क केल्याच्या बातमीला महत्व प्राप्त होते. राणे कॉग्रेस सोडायच्या मनस्थितीत असल्याची ती खुण मानता येईल. पण आजच्या घडीला युतीला धक्का बसेल, अशा कुणाला भाजपा पक्षात घेऊ शकेल असे वाटत नाही. मग राणे भाजपात जाण्याची कितीशी शक्यता उरते? राणे-उद्धव नाते बघता भाजपा सेनेला दुखावणारे पाऊल उचलू शकणार नाही. म्हणूनच राणेंना भाजपात जाणेही शक्य नाही. पण शांतपणे पराभव मान्य करून शरण जाणे हा राणेंचा स्वभाव नाही. राणे कितीही मोठ्या पदावर पोहोचलेला नेता असला, तरी शिवसेना सोडूनही त्यांच्यातला शिवसैनिक गुंडाळून ठेवणे; या नेत्याला कधीच साधलेले नाही. त्यामुळेच आजच्या शिवसेनेशी झुंजतानाही राणे शिवसैनिकाच्याच तडफ़ेने मैदानात उतरतात. त्यामुळेच कॉग्रेसने येणार्‍या पराभवाच्या स्वागताची तयारी चालविली असली, तरी राणे निमूटपणे पराभवाला शरण जाण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळेच त्यांना भाजपा नसेल तर अन्य पर्याय शोधणे भाग आहे आणि सत्तेमागे पळायचीच मानसिकता स्वभावत: असलेले अनेक कॉग्रेसजन राणेंच्या नेतृत्वाखाली पक्षाला रामराम ठोकून बाहेर पडू शकतात. पण राणे जाणार कुठे आणि कसली समिकरणे जुळवणार?

   लोकसभा निकालानंतर जितकी कॉग्रेस राष्ट्रवादीची दयनीय अवस्था झालेली, आहे तितकीच ती राज ठाकरे व मनसेची झालेली आहे. इथे राणे व राज ठाकरे यांच्यातले साधर्म्य सहज दिसू शकते. राजनी दोन आठवड्यात भव्य सभा आयोजित करून विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फ़ुंकले आहे. दुसरीकडे मूळचे कॉग्रेसजन हातपाय गाळून बसले असताना, राणे यांनी मात्र पक्षाला पराभवातून बाहेर काढण्यासाठी हालचाली करण्यात पुढाकर घेतला आहे. जे काय व्हायचे, ते नियतीच्या किंवा श्रेष्ठींच्या हाती सोपवून शांत बसणारे नसल्याने त्याच दोघांनी महायुतीला आव्हान देण्यासाठी निदान दंड थोपटण्याचे पहिले पाऊल उचलले आहे. या दोघांनी एकत्र यायचे ठरवले तर? म्हणजे, असे की दोघांचा डूख उद्धव ठाकरे या व्यक्तीवरच आहे आणि दोघांसाठी आज राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. दोघांना एकमेकांचा स्वभाव नेमका ठाऊक आहे, कारण त्यांनी दिर्घकाळ एकत्र कामही केलेले आहे. शिवाय आजची परिस्थिती दोघांसमोर सारखीच आहे. राणे यांना अन्य मोठा पक्ष जवळ करणार नसेल, पण मनसेला तशी अडचण नाही. दुसरीकडे नव्या पक्षाला चालवताना राज ठाकरे यांना एकट्याने सगळा बोजा उचलावा लागतो, त्याचा बराचसा भार राणेंच्या खांद्यावर टाकता येईल. मनसेची व्याप्ती मोजक्या काही जिल्ह्यात आहे. जिथे मनसेला फ़ारसे स्थान नाही, तिथे राणेंच्या सोबत येऊ शकणार्‍या कॉग्रेसजनांमुळे मनसे अधिक प्रभावी पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात मनसेला राणेंच्या सोबत येणार्‍या कॉग्रेसजनांमुळे बळ मिळू शकते आणि राज्यामध्ये एक मोठी तिसरी राजकीय शक्ती उदयास येऊ शकते. राणे व राज अशा दोन धडाडणार्‍या तोफ़ांच्या तुलनेत कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडी फ़िकी पडू शकते आणि महायुतीला खरे राजकीय आव्हान म्हणुन राणे-राज असे मनसेचे मोठे प्रभावी राजकीय आव्हान उभे राहू शकते. गोपिनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने महायुतीचे बळ कमी झाले असताना राणे-राज समिकरण राजकारणाला वेगळीच कलाटणी देऊ शकेल. असे झाल्यास किती कलाटणी मिळू शकेल?

5 comments:

  1. बाळासाहेब असताना हे दोघे दुसऱ्या फळीतले नेते होते. त्यामुळे त्यांचे जमू शकले होते. सेनाप्रमुख म्हणून दोघांना बाळासाहेब मान्य असल्याने त्यावेळी काही प्रश्नच आला नाही. आता मात्र या दोघांना पहिल्या फळीतले नेते व्हायचे आहे. हे कसे जमणार?

    राणेंची अनेक वर्षांची मुख्यमंत्री बनण्याची अभिलाषा आणि " मीच पुढचा मुख्यमंत्री" ही राज ठाकरे यांची घोषणा याची सांगड कशी घालायची हाही एक प्रश्नच आहे.

    "उद्धवशी असलेले मतभेद" हे एकमेव कारण दोघांना किती वेळ एकत्र ठेवू शकेल हा मुद्दा शिल्लक राहातोच.

    ReplyDelete
  2. म न से राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांचा घट-स्फोट होऊ शकतो आणि राणे राष्ट्रवादीत जाऊ शकतात.

    मनसे मध्ये राणे गेले , तर शिवसैनिक आणि सामान्य व्यकी "बाळासाहेबांना दगा देणारे राणे म न से मध्ये गेले " म्हणून कदाचित म न से ला मत देतील याची शक्यता कमी होते.

    ReplyDelete
  3. भाऊ आपण जे समीकरण मांडले आहे ते शक्य आहे. परंतू प्रद्युम्न भागवत आणि वेताळ किंग यांची मतेही लक्षात घेण्याजोगी आहेत. राणेंनी वेगळा पक्ष काढून राजच्या मनसे बरोबर युती केल्यास दोघांचाही फायदा होईल असे वाटते. कारण राणे मनसेत जाऊन स्वत:चे महत्त्व कमी करुण घेणार नाहीत. आणि एकाच पक्षात दोन समान्तर सत्ताकेंद्र असू शकत नाही आणि राहुही शकत नाही. (नातेवाईक सोडून) आपण कधी कधी अजीत-सुप्रिया, गडकरी-मुंडे, शरद यादव-नितीश कुमार यांची आपआपसातील धुसफुस ऐकली आहेच. मला वाटते आपण नवीनच समीकरनास जन्म दिला आहे. जे कोणा राजकीय विश्लेशकाच्या स्वप्नातही आले नसेल. नाहीतरी राणेंचे मन कॉंग्रेसमधे सुरुवातीपासूनच रमत नाही.

    ReplyDelete
  4. एक डेडली राजकीय बेरीज !
    भाऊंनी अत्यंत योग्य शक्यता वर्तवली आहे ...
    राजसाहेब आणि दादा एकत्र आले तर दोघांनाही फायदा होईल हे निश्चित आहे ....
    राणेसाहेबांना कॉंग्रेसच्या 'घुसमट' वातावरणाचा त्याग करून आपल्या शैलीत आगेकूच करता येईल ; तर त्याचवेळी मनसेला सुद्धा एक खंदा सेनानी मिळेल ...
    काय सांगावं ?
    राज-राणे यांची कणकवली भेट ही या 'बेरजे'ची सुरुवात तर नसेल ??

    ReplyDelete
  5. छान लेख भाऊ ,
    एकदा नाशिकच्या विकासा बद्दल वाचायची इच्छा आहे.(जर झालं असेल तर )

    ReplyDelete