Thursday, July 10, 2014

रेल्वेसंकल्पाला अर्थ दिला



   सतत खोटे ऐकायची सवय लागली, मग खरे ऐकायचीही भिती वाटू लागते. त्याचप्रमाणे अंधारातच जगणार्‍यांना प्रकाशाचे भय अपरिहार्यच असते. त्याची हळुहळू प्रचिती येऊ लागली आहे. मोदी यांनी निवडणूक जिंकण्यापर्यंत अशा दिवाभितांना मोदी इतके मोठे यश मिळवूच शकत नाहीत, याची खात्री होती. म्हणूनच मग त्यातले काही दिवाळखोर चक्क भारत सोडुन पळावे लागेल, अशा वल्गना करीत होते. पण त्यापैकी कोणीच देश सोडून पळ काढलेला नाही. मग अशा बुद्धीमान लोकांनी तशी मुक्ताफ़ळे कशाला उधळायला हवी होती? तर आपण शहाणे आहोत आणि जगातला सगळा काय तो शहाणपणा आपल्याच गुदामात बंद आहे; असल्या भ्रमात काही लोक जगत असतात. सेक्युलर शहाणे त्यापैकीच असतात. अशाच एका शहाण्याने आता शेपूट घातले आहे. नित्यनेमाने काही वेगळे बोलून प्रसिद्धीच्या झोतात रहायची सवय अंगी बाणवलेले लेखक अभिनेता गिरीश कर्नाड असे त्यांचे नाव आहे. आता त्यांनी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्याने त्यांचे यश आपण मान्य करायला हवे, असे मतप्रदर्शन केले आहे. जणू त्यांच्या मान्यतेशिवाय मोदींच्या पंतप्रधान असण्याला घटनात्मकता प्राप्त होणार नव्हती. आपल्याला कोणी कवडीची किंमत देत नाही, याचीच जाणिव त्यामागे आहे. लोकांनी कर्नाड वा अनंतमुर्ति, अमर्त्य सेन अशा तथाकथित शहाण्यांना दुर्लक्षुन मोदींच्या हातात सत्ता सोपवली आहे. कारण गेल्या दहा वर्षात देशाला दिवाळखोर बनवणारा कारभार चालू होता. तेव्हा तोंडात गुळणी घेऊन बसलेल्या ह्या शहाण्यांना दिवाळे वाजवणारे सत्ता गमावणार दिसताच, मोदींची भिती वाटू लागली होती. त्यामुळेच लोकांना एक गोष्ट लक्षात आली, की असे शहाणे ज्याला धोका म्हणतात, त्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवावा. त्याचाच परिणाम आता दिसत आहे. कारण मोदींनी निवडणूकीत कॉग्रेसला हरवले असेल, पण जनतेने अशा अर्धवट शहाण्यांना हरवले आहे.

  आता निकाल लागून दोन महिने उलटल्यावर गिरीश कर्नाड यांना देशात सत्ता परिवर्तन झाल्याचा शोध लागला आहे आणि त्यामुळेच इतक्या ‘लौकर’ त्यांनी मोदी पंतप्रधान झाल्याची दखल घेतली आहे. आपण अगोदर मोदींच्या विरोधात गरळ ओकली होती, याचीही अपराधी भावना कर्नाड यांच्या मनात आहे. म्हणूनच त्यांनी मोदींचे स्वागत करताना एक खुलासाही केलेला आहे. मात्र त्यातून त्यांनी आपल्या अडाणीपणाचाच पुरावा सादर केलेला आहे. २००२ सालात गुजरातमध्ये झालेली दंगल व हिंसाचार यातून मोदींना सुटता येणार नाही, याचा पुनरुच्चार करताना पुढे कर्नाड म्हणतात, पण नंतरच्या काळात गुजरातमध्ये मोदींनी कधी हिंसाचार होऊ दिलेला नव्हता. हे निव्वळ सत्यच आहे. पण सवाल असा, की हे सत्य कर्नाड यांना कधी उमगले? कारण २००२ पासून आज २०१४ उजाडले आहे. २००३ पासून २०१४ पर्यंत गुजरातमध्ये हिंसाचार झाला नव्हता, हे कर्नाडना आज कळले काय? असेल तर मग कर्नाड मधली दहा बारा वर्षे कुठल्या धुंदीत जगत होते? की सुप्तावस्थेत गेलेले होते? कारण दोनच महिन्यांपुर्वी त्यांनी मोदींना निवडणूकीत पाडावे, असे आवाहन केलेले होते. मग तेव्हा त्यांना मधल्या दहा वर्षात मोदींनी केलेल्या कारभाराची काही माहितीच नव्हती काय? की कर्नाड व त्यांच्यासारखे विद्वान मान्यवर कायम धुंदीतच असतात? खोटेपणा करून मिरवायची सवय लागली, मग असेच होते. मोदींच्या बहुतांश विरोधकांची अवस्था नेमकी अशीच आहे व होती. त्यामुळेच त्यांना कधीच वास्तवाची दखल घ्यावी असे वाटले नाही. आपण खोटे बोलायचे, वाटेल ते बरळायचे आणि ते छापून आले, म्हणजेच तसे असते, यावर विश्वासून ही मंडळी कल्पनेच्या विश्वात जगत असतात. माध्यमात बसलेले त्यांचेच बगलबच्चे त्यांना प्रसिद्धी देऊन कायम नशेत ठेवत असतात. मग जेव्हा वास्तवाचा दणका बसतो, तेव्हाच त्यांनी झिंग थोडीफ़ार उतरते. कर्नाड यांची अवस्था नेमकी तशीच झालेली आहे.

   अर्थात आपल्या देशात एखादाच कर्नाड वा अनंतमुर्ति आहे, असेही मानायचे कारण नाही. लहानसहान पातळीवर असे शेकडो हजारो कर्नाड आपल्याच मस्तीत व धुंदीत कायम भ्रमिष्टावस्थेत जगतच असतात. त्यांना सत्याची भिती वाटत असते आणि प्रकाशाच्या नावाने सतत गळा काढण्यापलिकडे त्यांना दुसरे काम नसते. म्हणूऩच आता नव्या सरकारचा रेल्वे अर्थसंकल्प समोर आल्यावर, त्याचे परिशीलन करण्यापेक्षा अशा लोकांनी नित्याप्रमाणे गळा काढला आहे. पण रेल्वेमंत्र्याने समोर मांडले आहे ते काय, ते डोळे उघडून बघायचीही इच्छा त्यांना झालेली नाही. गेल्या कित्येक वर्षात नुसत्या घोषणा व गर्जना करून रेल्वेची दुर्दशा करून टाकलेल्या मंत्र्यांचे कौतुक करण्यात मग्न राहिलेल्या, अशा दिवाभितांना नवा रेल्वे अर्थसंकल्प उमगावा तरी कसा? यावेळी प्रथमच रेल्वेमंत्र्याने प्रवासी व जनतेला उदार हस्ते काही फ़ुकट दिल्याचा आव न आणता, समस्या जनतेसमोर मांडल्या आहेत, रेल्वेशी दुर्द्शा स्पष्ट केली आहे. कुठलीही नवी भव्यदिव्य योजना जाहिर करण्यापेक्षा आजवरच्या शेकडो योजना, ही कशी निव्वळ दिशाभूल होती, त्याचाच पाढा त्याने संसदेत वाचून दाखवला आहे. शेकडो योजना तीसचाळीस वर्षापासून रेंगाळत पडल्या आहेत, त्यापैकी ९९ योजना तर मागल्या युपीए सरकारनेच आणल्या होत्या. त्यापैकी अवघी एकच योजना पुर्तता गाठू शकली. उरलेल्या गाळात रुतून बसलेल्या योजना पुर्ण करायच्या, तर किमान पाच लाख कोटी इतक्या निधीची गरज असल्याचे ठामपणे सत्य सांगणारा हा पहिला रेल्वेमंत्री आहे. पण त्याने कुठला भपका दाखवला नाही किंवा फ़सवणूक करणार्‍या घोषणा केल्या नाहीत. म्हणून नाके मुरडण्याची स्पर्धाच चालू आहे. म्हणून आजवरच्या थापाड्या रेल्वेमंत्र्यांचे कौतुक करणारे मोदी सरकारच्या रेल्वेसंकल्पाची टवाळी करण्यात गर्क आहेत. असणारच., ज्यांना सत्याचे वावडे आहे त्यांच्याकडून दुसरी कसली अपेक्षा आपण करू शकतो?

   या रेल्वेमंत्र्यांनी काही वेगवान गाड्या व विस्तारीत गाड्या वगळता कुठल्याही भव्य योजनेची घोषणा केली नाही. अगदी नव्या पंतप्रधानाचे स्वप्न असलेल्या बुलेट ट्रेन या कल्पनेसाठीही लगेच पैसा उपलब्ध नाही, म्हणून चाचपणी करायला लागणार्‍या पैशाची तरतुद केली आहे. इतक्या महत्वाकांक्षी योजनेला लागणारा पैसा उभारायला वेळ लागेल, हे सत्य कितीजण पचवू शकले आहेत? लगेच अच्छे दिन असे कसे येणार, म्हणून सवाल विचारले जात आहेत. अशा कर्नाड प्रजातीच्या लोकांना सत्याच्या समिप जायला दहाबारा वर्षे विलंब लागतो. कर्नाड यांना गुजरात दहा वर्षे शांत असल्याचे कळायला तितकीच वर्षे लागली ना? मग आजचा रेल्वे अर्थसंकल्प चांगला व वास्तववादी आहे, ते अशा मोदीग्रस्तांना उमगायला २०१९ साल उजाडले; तर नवल वाटण्याचे काही कारण नाही. आहे ती व्यवस्था सुधारणे त्यातले दोष काढून टाकणे आणि जनतेसह प्रवाश्यांमध्ये रेल्वेविषयी विश्वास निर्माण करणे; ही ह्या अर्थसंकल्पातील एकमेव योजना आहे असे म्हणता येईल. एकदा तो विश्वास संपादन केला, तर लोकच अधिक भाडे, दरवाढ मान्य करून रेल्वेला आधुनिक बनवण्यासाठी पदरमोड करायला पुढे येतील. आजच्या दुप्पट भाडेवाढ दरवाढ झाली तरी रेल्वेच सर्वात स्वस्त प्रवास साधन असणार आहे. पण आजवर नुसती दरवाढ होत राहिली, तरी सुधारणा व सुविधांची बोंब होती. भ्रष्टाचाराने रेल्वेला गिळंकृत केलेले आहे. त्यातून ती बाहेर पडली, तर रेल्वेच्या विकासाला लागणारा पैसा प्रवाश्यांकडूनच उभा राहू शकतो, रस्त्याच्या विस्तार विकासात करोडो रुपयांचा टोल भरणारा भारतिय नागरिक रेल्वेच्या विकासाला पैसा नाकारील ही शक्यता नाही. त्याचाच पाया यावेळच्या अर्थसंकल्पातून घातला गेला आहे. हा रेल्वेला अत्याधुनिक बनवण्याचा खरा ‘संकल्प’ आहे. त्याचा अर्थ खोट्याच्या पुजार्‍यांना इतक्या लौकर उमगणार नाही.

2 comments:

  1. About Rail Budget. It is no different than UPA budgets. People elected Modi to bring dramatic changes in India at a lightening speed. After all he himself promised that he will bring 60 years progress in 5, so we do not need your "Wakili" to tell us that it will take time to bring changes. Modi never said that so why are you saying it? Modi sycophants promised us that Modi is not a traditional politician. They presented him as a Massiah who was going to save India,and all we see that he is a traditional politician. After gaining gigantic majority tell me one dramatic decision he has taken in last two months. If this is not the case then how is he going to bring in 60 years progress in 5? If you say that no it was for the election then also it bolsters the argument that it is politics as usual!

    ReplyDelete
  2. भाऊराव,

    या करनाड महाशयांना हिंदू ही भारताला लागलेला कर्करोग वाटतो. पण हिंदुत्व मात्र वेगळं काहीतरी आहे असं वाटतं. कृपया हा दुवा पाहावा :

    http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Narendra-Modi/articleshow/18716680.cms

    इतका वैचारिक गोंधळ असलेल्या माणसाकडून दुसरं काय अपेक्षित आहे?

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete