Thursday, July 17, 2014

कॉग्रेसचा घास कॉग्रेसनेत्यांनाच फ़ास   आता वेदप्रकाश वैदिक यांच्या सईद हाफ़ीज प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून कॉग्रेसच्या भडीमारामुळे त्याची सरकारला चौकशी करावीच लागणार आहे. वाराणशी येथे कुणा वकीलाने वैदिक यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, म्हणून कोर्टात धाव घेतलेली आहे. पण मोदी सरकारने मात्र त्याबाबत भलतीच सौम्य भूमिका घेतलेली आहे. ही भेट एका पत्रकाराने घेतली असल्याने त्याबद्दल सरकार त्यात किती हस्तक्षेप करू शकते, असा सरकारी पवित्रा आहे. पण मोदी सरकारचा हा खुलासा कितीसा प्रशासकीय आहे आणि किती डावपेचाचा भाग आहे, अशी शंका घ्यायला जागा आहे. पहिली गोष्ट म्हणजे रामदेव बाबा यांच्याशी वैदिकचे फ़ोटो प्रसिद्ध केल्याने वैदिक यांचा भाजपा वा संघाशी संबंध प्रस्थापित होत नाही, की कुठलेही बालंट त्या दोन्ही संघटनांवर येऊ शकत नाही. उलट वैदिक यांना अगत्याने आमंत्रण देऊन पाकिस्तानात घेऊन जाणारे सर्वच मान्यवर कॉग्रेसशी संबंधीत आहेत किंवा कॉग्रेस समर्थक तरी आहेत. निदान त्यापैकी कोणीच मोदी समर्थक नक्कीच नाही. मग वास्तविक बघता वैदिक यांना कायद्याच्या जाळ्यात ओढून कारवाई सुरू करणे, भाजपाला राजकीय लाभाचेच ठरत नाही काय? कारण त्यात कॉग्रेसचे दोन माजी मंत्री मणिशंकर अय्यर व सलमान खुर्शीद यांची शेपूट अडकणार आहे. मग मोदी सरकारने इतके सौम्य धोरण कशाला घ्यावे? दुसरीकडे आपलेच पाठीराखे अडकण्याची शक्यता असताना कॉग्रेसने त्यात इतकी मोठी झेप घेण्याचे काहीही कारण नव्हते. अर्थात वैदिक प्रकरण आता उलगडू लागल्यावर कॉग्रेसची त्या प्रकरणातली आक्रमकता खुप कमी झाली आहे. पण दोन दिवस संसदेत कॉग्रेसने धुमाकुळ घातल्यावर मोदी सरकारने त्या प्रकरणाची तपासयंत्रणांकडून चौकशी करण्याचे मानलेले दिसते. थोडक्यात ही चौकशी मोदी सरकार केवळ कॉग्रेसच्या आग्रहास्तव करीत असल्याचे चित्र आता तयार झालेले आहे.

   आता पुढे जाण्याआधी चौकशी म्हणजे काय व त्यात कोणकोण फ़सू शकतात, त्यांची नावे तपासा. एकट्या वैदिक यांच्यापुरती ही चौकशी मर्यादित राहू शकणार नाही. म्हणजे सईद हाफ़ीजला भेटण्यापुरती ही चौकशी होऊ शकत नाही. वैदिक यांना अशा सेमिनारला कोणी आमंत्रित केले, त्यासाठी कोणी पुढाकार घेतला? पाकिस्तानात त्या सेमिनारमध्ये कोण कोण भारतीय सहभागी झाले? हे लोक तिथे कोणाकोणाला कशासाठी भेटले? अशा सहभागी होणार्‍यांचे पाकिस्तानात कोणाकोणाशी कितीसे सख्य व मैत्रीसंबंध आहेत? अशा शेकडो प्रश्नांचा उलगडा अशा चौकशीतून होऊ शकतो. मग अशा कार्यक्रम वा भेटीगाठीचे चित्रण असल्यास, कागदपत्रे, छायाचित्रे असल्यास त्याचीही कायदेशीर मागणी होऊ शकते. यजमान संस्था व तिचे भारतीय पाहुण्यांशी असलेले आजवरचे संबंध, त्या संस्थेचे सदस्य व त्यांची पार्श्वभूमी सुद्धा तपासली जाऊ शकणार आहे. अगदी स्पष्ट भाषेत सांगायचे तर कॉग्रेसने या विषयाचे काहुर माजवून, त्याची तपशीलवार चौकशी करायला मोदी सरकारला भाग पाडले आहे. पण प्रत्यक्षात त्यातून कॉग्रेसने आपलेच दोन माजी मंत्री व नेते यांच्यासह अनेक बुद्धीमंत पाठीराख्यांच्या गळ्यात चौकशीचा फ़ास अडकवला आहे. अर्थात अशा गोष्टीचा सुगावा लागला असता, तरी राजकीय डावपेच म्हणून मोदी सरकारला त्या लोकांची चौकशी करण्याच अधिकार होता व आहे. पण तसे परस्पर केलेच असते, तर मोदी सरकार आपल्या विरोधकांना राजकीय सुदबुद्धीने वागवते असा सरसकट आरोप नक्कीच झाला असता. राहुल व सोनिया गांधी यांच्या विरोधात डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी खाजगी खटला दाखल केला आहे, त्याचे समन्स दोघांना कोर्टाने बजावले, तरी मोदी सरकार सूडबुद्धीने वागल्याचा आरोप होतो. मग अशा प्रकरणात तोच आरोप झाला असता आणि विरोधी विचारांच्या बुद्धीमंतांना सतावल्याचा जाब विचारला गेला असता ना?

   आता जी चौकशी होणार आहे, त्यात बहुतेक मोदी विरोधक कॉग्रेसनेते अडकणार असले, तरी त्यासाठी कोणी मोदी सरकारवर त्याचा ठपका ठेवू शकणार नाहीत. कारण ही चौकशी कॉग्रेसने संसदेत व इतरत्र धुडगुस घालून मागणी केल्याने राष्ट्रीय हितासाठी होणार आहे. थोडक्यात कॉग्रेसच्या नेत्यांनी आपल्या सहकार्‍यांना चौकशीच्या गोत्यात ढकलले आहे. वैदिक-सईद भेट प्रकरण जितके उलगडले जाणार आहे, तितके मग त्याच्या संयोजकांपैकी एक असलेले कॉग्रेस नेते मणिशंकर अय्यर गोत्यात येणार आहेत. कारण आता नुसता वैदिक यांच्या सईद भेटीचा तपशील शोधला जाणार नाही. तर अशा प्रकारे पाकिस्तानी हेरसंस्थेचा आशीर्वाद व अर्थसहाय्य असलेल्या तसल्या सेमिनार व परिषदांना आजवर कोणकोण गेले होते, कशासाठी गेले होते आणि त्यांचे पाकिस्तानात कोणाकोणाशी संबंध आहेत, त्याचा साग्रसंगीत उलगडा चौकशीतून होण्याची शक्यता आहे. कारण सईद पाकिस्तानी पत्रकारांनाही इतक्या झटपट भेटू शकत नाही. त्याला तिथल्या गुप्तचर खात्याच्या संरक्षणात ठेवले आहे. अशा जागी जाऊन त्याला भेटण्यासाठी सईदच्या पुर्वपरवानगीची गरज नाही, इतकी आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर खात्याच्या संमतीची गरज असते. अशी संमती मिळवू शकणारे दोन ‘अय्यरमित्र’ सदरहू सेमिनारचे आयोजक होते. जे ‘योगायोगाने’ पाकिस्तानी हेरसंस्थेचे माजी प्रमुख होते. सईद कायम त्याच हेरसंस्थेच्या इशार्‍यावर भारतविरोधी हिंसाचाराच्या कारवाया करीत राहिलेला आहे. त्यामुळेच वैदिक-सईद भेटीसाठी ते दोघे स्वत: जितके जबाबदार नाहीत, तितके हे दोन माजी आयएसआय प्रमुख कारणीभूत असू शकतात. पण त्यांची तर वैदिकशी भेट मैत्री नाही, की ओळख नाही. ती पात्रता केवळ मणिशंकर अय्यर यांच्याकडेच आहे. त्यामुळे अशी भेट का होऊ शकली व कोणत्या कारणास्तव होऊ शकली, याचे उत्तर फ़क्त अय्यर साहेबच देऊ शकतात.

   इथे एक मुद्दा स्पष्ट होईल. भारत व पाक यांच्या हेरसंस्थांचे परस्परांवर काडीमात्र प्रेम नाही. उलट दोघांमध्ये कायमचे वैमनस्यच असू शकते. अशावेळी पाक गुप्तचरांचे मित्र असलेल्या अय्यर यांच्याकडे किती प्रेमाने व आपुलकीने भारतीय तपासयंत्रणा चौकशी करतील, याची केवळ कल्पनाच आपण करू शकतो. जी संस्थाच पाक हेरसंस्थेच्या आशीर्वादाने चालते आणि तिचे म्होरकेच माजी गुप्तहेर प्रमुख असतात, त्यांच्याशी भारतीय बुद्धीजिवींचा इतका सलोखा कशाला असतो? संस्थेच्या एका पाकिस्तानी सदस्याने सांगितले, की भारतीय शिष्टमंडळातून कोणाला आणावे ही संपुर्ण जबाबदारी अय्यर यांच्यावरच सोपवली होती. म्हणजेच वैदिक यांची निवड मोदी सरकारने केलेली नसून अय्यर यांनीच केली असणार हे उघड आहे. त्यांना अशा सेमिनारमध्ये एकही भारतीय माजी गुप्तचर घेऊन जायची इच्छा होत नाही. पण पाक गुप्तचरांच्या सहवासात बौद्धिक चर्चा करण्यात स्वारस्य असते, त्या मणिशंकर अय्यर व अन्य बुद्धीमंतांच्या ‘भारतप्रेमा’विषयी आपण शंका संशय तरी घेऊ शकतो काय? सीमेवर जवान पाक हस्तकांकडून नित्यनेमाने मारले जात असताना, त्याविषयी काडीची सहानुभूती नसलेले हे भारतीय बुद्धीमंत त्याच हिंसक कृत्याचे नियोजन करणार्‍या माजी पाक गुप्तचरांकडे पाहुणचार घ्यायला जातात, ही आता आपल्या राष्ट्रप्रेमाची मोजपट्टी झाली आहे. मग त्यानुसार वैदिक यांनी सईद हाफ़ीज याची भेट घेऊन गुफ़्तगू केल्यास त्याचा परमवीरचक्र देऊनच सत्कार करायला नको काय? किंबहूना त्याला हातभार लावल्याने अय्यर यांना भारतरत्नच द्यायला हवे ना? असो, तर आता अशा तमाम सेक्युलर बुद्धीमंतांच्या देशप्रेमाची कॉग्रेसच्या आग्रहामुळे कसून चौकशी होणार आहे. त्यामुळे गेल्या दहावीस वर्षात त्यांनी किती व कोणते देशप्रेम केले आणि त्यासाठी किती हजार भारतीतांना हकनाक प्राणाला मुकावे लागले, त्याचा बहुतांश तपशील बाहेर येईल ही अपेक्षा.

No comments:

Post a Comment