Wednesday, July 23, 2014

आवडनिवड की नावडनिवड

   आपल्या नेहमीच्या बोलण्यात किंवा भाषेत आवडनिवड असा शब्द सहजगत्या वापरला जात असतो. पण खरेच एखादी गोष्ट आपण आवडली म्हणून निवडतो काय? हल्ली अनेकदा असे जाणवते, की आपल्या निवडीला आवडीपेक्षा नावडच कारणीभूत असते. आपल्याला काहीतरी, कोणीतरी नावडलेले असते आणि त्याचा प्रभाव आपल्यावर इतका मोठा असतो, की त्यातून आपली निवड प्रेरीत होत असते. म्हणजे आपल्याला एखादी निवड करायची असते, तेव्हा काय नको यातून आपण आपले मन बनवत असतो. अमूक एक होऊ नये, अमूक एकजण नको, म्हणून आपण तमूकाला निवडतो किंवा तिकडे वळतो. याचा अर्थ तो तमूक आपल्याला आवडलेला असतो वा पसंत असतो, असे अजिबात नाही. अमुकापेक्षा तमूक परवडला, अशी त्यामागची भूमिका असते. म्हणजे अमूक नको, हीच त्य निवडीची प्रेरणा असते. ज्याला राजकीय भाषेत धृवीकरण असेही गोलमाल नाव आहे. नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी व भाजपाला स्पष्ट बहूमत मिळाले, त्याचा अर्थ अनेकप्रकारे लावायचे प्रयास सध्या चालू आहेत. कोणी म्हणतो मोदींनी मार्केटींग उत्तम करून लोकांना भुलवले, भारावून टाकले; म्हणून त्यांना इतकी मते व प्रतिसाद मिळाला. पण त्याचवेळी ही मते भाजपाला मिळालेली नसून मोदींना लोकांनी कौल दिला, असेही सांगितले जाते. त्याचीच तिसरी बाजू अशी आहे, की सत्ताधारी युपीए व कॉग्रेसच्या नाकर्तेपणाने मोदींना इतके यश मिळवून दिले. अशा सर्व विधानांच्या युक्तीवादाचा एकमेव अर्थ असा, की मोदी लोकांना आवडले किंवा उत्तम आहेत म्हणून मतदाराने त्यांना कौल दिलेला नाही, तर अन्य काही वा कोणी नको, म्हणून मोठ्या प्रमाणात भारतीयांनी मोदींना बहूमत व सत्ता दिलेली आहे. त्याचाच अर्थ नावडीतून ही निवड झाली याची कबुलीच आहे. पुन्हा युपीए वा कॉग्रेस नको, या नावडीने मोदींना इतके मोठे यश प्राप्त झालेले आहे.

   याचाच आणखी एक अर्थ असा होतो, की जोपर्यंत मोदी व भाजपा नकोत अशी नावड जनमानसात निर्माण होत नाही, तोवर मोदींच्या स्थानाला व सत्तेला धोका नाही. तसा धोका टाळायचा असेल तर मोदींना लोकप्रियता मिळवायला चांगले काम करण्याची गरज नसून. आपल्यापेक्षा चांगला पर्याय लोकांपुढे असू नये, इतकेच मर्यादित काम त्यांनी केले तरी पुरेसे आहे. याला अर्थातच मोदी वा अन्य कोणी जबाबदार नसून लोकांमध्ये अशी नकारात्मक मानसिकता वा नावड निर्माण करणारे संस्कार व विचार कारणीभूत आहेत. आयुष्यात सर्वात चांगले व उत्तम त्याचा स्विकार करावा आणि त्याचीच निवड करावी, शोध घ्यावा, याचे संस्कार जनमानसावर होत नसतील, तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होत असते. मुस्लिमांना भाजपा वा हिंदूत्वाचे भय दाखवून मते व सत्ता मिळवणार्‍यांना जेव्हा त्यात यश मिळाले, तेव्हा त्यांना लोककल्याणाचे काम करण्याची जरूऱच भासेनाशी झाली आणि त्यातून त्यांच्यात नाकर्तेपणा आला. त्याचे दुष्परिणाम जेव्हा जनतेच्या वाट्याला आले, तेव्हा हिंदूत्वाचा धोका असल्या अराजकापेक्षा परवडला; असेच लोकांना वाटू लागले. तिथे मग निवडीचा विचार सुरू होत असतो. हिंदूत्वाचा धोका जितका आहे वा त्यातून जितके नुकसान शक्य आहे, त्यापेक्षा अधिक हानी अराजकाच्या नाकर्तेपणातून वाट्याला येत असेल, तर लोकांना व्यवहारी निवड करणे भाग होऊन जाते. मोदी व गुजरातच्या दंगलीचा बागुलबुवा करून गेल्या दोन लोकसभा निवडणूकीत सत्ता संपादन करणार्‍या पक्षांनी व कॉग्रेसने गुजरातच्या तुलनेत अधिक चांगला कारभार केला असता, तर लोकांना कमी हानी म्हणून मोदींकडे वळावे लागले नसते. कारण ज्या सेक्युलर कारभाराचा अनुभव लोक घेत होते, त्यापेक्षा मोदींच्या गुजरातमध्ये कमी धोका व हानीचा अनुभव लोकांना येत होता. सहाजिकच मोठ्या नावडीपेक्षा छोटी नावड लोकांनी निवडली.

   हा अर्थातच केवळ निवडणूकीपुरता विषय नाही. तो आपल्या सर्वसामान्य जीवनाचाही भाग आहे. आपण प्रत्येक बाबतीत अशीच ‘नावडनिवड’ करत असतो. मोदींच्या विरुद्ध मतदानाच्या आधी ज्या बुद्धीमंत वा जाणत्यांनी आघाडी उघडली होती, त्यांच्यावर कॉग्रेसचे समर्थक भाट असल्याचे आरोप झाले. त्यातले बहुतांश कम्युनिस्ट वा मार्क्सवादी डाव्या विचारांचे लोक दिसतील. मागल्या दोन दशकात सोवियत युनियन अस्ताला गेल्यावर आणि जगातून कम्युनिस्ट विचारधारा कालबाह्य झाल्यावर; अशा लोकांनी थेट डावा विचार नसलेल्या, पण उजव्या विचारांचा विरोधक असलेल्या पक्ष व संघटनांचे समर्थन चालू केल्याचे दिसून येईल. याचा अर्थ असे पक्ष व संघटना ही त्यांची उत्तम निवड नाही. तर उजव्या पक्षांना शह देण्यासाठी केलेली तात्पुरती निवड असते. आयुष्यभर कॉग्रेस विरोधाचे राजकारण करणार्‍या डाव्यांनी भाजपाला रोखण्यासाठी २००४ सालात कॉग्रेसला पाठींबा देणे असो किंवा आधी लालू व नंतर भाजपा यांच्या विरोधात बदलती भूमिका घेणारे नितीश असोत, त्याची ती निवडही नावडीतून आलेली दिसेल. आपल्याला आवडते काही होणार नाही याची खात्री पटते वा तशी भिती वाटू लागते; तेव्हा पर्याय म्हणून निदान सर्वाधिक नावडते काही होऊ नये याकडे माणसाचा कल वळत असतो. त्याची निवड त्यातूनच होऊ लागते. तसे करताना डाव्या पक्षांचे अधिक नुकसान झाले आणि नितीशचेही झाले आहे. मुलायम मायावतीही त्याच मार्गाने गेल्या आहेत. त्यांची निवड नावडीतूनही आलेली नाही, तर द्वेषभावनेतून आलेली होती. आपले अपयश ज्यांना अधिक द्वेषाकडे घेऊन जाते, त्यांना त्यातून सावरता येत नाही, ते अधिकच गर्तेत जातात. ते आपल्या नुकसानाचा विचार करण्यापेक्षा ज्याचा द्वेष करतात, त्याच्या नुकसानाचे अहोरात्र चिंतन करतात. तिथे त्यांची निवड चुकत जाते आणि अधिकच खाईत लोटले जातात.

   सामान्य माणसाची गोष्ट वेगळी असते. तो सर्वच नावडते असेल तर त्यातून कमी नावडत्याची निवड करीत असतो आणि आवडीचे कधी आढळेल, त्याचा अखंड शोध घेत असतो. पण जे बुद्धीमान असतात आणि एखाद्या गोष्टीचा कमालीचा द्वेष करीत असतात, त्यांना चांगले आवडते शोधायला वेळ नसतो की इच्छा नसते. त्यांना सतत नावडत्याने पछाडलेले असते. सहाजिकच असे लोक कधीच आवड-निवड करू शकत नाहीत. ते नावडत्याचा द्वेष करताना त्याला पराभूत करता येत नाही म्हणून मग स्वत:चाही द्वेष करू लागतात. सहाजिकच त्यांना स्वहिताचाही विसर पडतो. परिणामी आवडते व लाभदायक काही समोर आले, तरी त्यांची नजर तिकडे वळत नाही, की दिसत असले तरी बघायची इच्छाही त्यांना होत नाही. नावडत्यामध्ये अधिकाधिक काय नावडते आहे, त्याचा शोध घेताना मग आवडत्याचेही त्यांना विस्मरण होऊन जाते. परिणामी ते अधिकाधिक नुकसान ओढवून घेतात. नावडते नष्ट करण्याच्या मोहाने त्यांना इतके व्यापलेले असते, की आपल्याला आवडते निर्माण करायचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. फ़सलेल्या जुगार्‍याने जसे अधिक काही पणाला लावून आत्मघाताला आमंत्रण द्यावे, तसे ते लोक अधिकच वहावत जातात. मग तर्कशास्त्र, विवेक व बुद्धीही त्यांना मदत करू शकत नाही. नावड हीच त्यांची निवड होऊन जाते. अशा प्रतिस्पर्ध्याला हरवणे खुप सोपे होऊन जाते. त्याला द्वेषाची अधिक संधी व निमीत्ते दिल्यास, तो स्वत:चा सर्वनाश आपल्याच कृत्यातून ओढवून घेतो. त्याला तशी निमीत्ते पुरवणे, हा शत्रूचा सर्वात कुटील डाव होऊ शकतो. नरेंद्र मोदींना राजकारणात व निवडणूकीत पराभूत करायला आसूसले आहेत, त्यांनी म्हणूनच आपल्या नावडनिवडीची कास सोडून आवडनिवडीकडे वळण्याची खरी गरज आहे. मोदींचे यश हे नावडत्याकडे पाठ फ़िरवून आपल्याला आवडती परिस्थिती व संधी निर्माण करण्यातून आलेले आहे. तोच त्यांना पराभूत करण्याचा मार्गही असू शकतो.

2 comments: