Monday, July 21, 2014

पक्षश्रेष्ठीच कॉग्रेसची समस्या बनलीय

  लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या फ़ेरीला काही दिवस बाकी असताना, स्नुपगेटच्या चौकशीसाठी युपीए सरकारने निवृत्त न्यायाधीशाच्या नेमणूकीची घोषणा केली होती. तेवढेच नाही, तर ती नेमणूक मतमोजणीपुर्वी होईल, अशीही हमी कायदामंत्री कपील सिब्बल यांनी मोठ्या मिश्कीलपणे दिली होती. त्याच संदर्भात एका वाहिनीच्या चर्चेत अमित शहा यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. स्नुपगेट व अन्य आरोपांबद्दल शहांना विचारले असता त्यांनी दिलेले उत्तर खुप महत्वाचे होते. पण कॉग्रेसच्या नेत्यांपैकी कोणीच त्याकडे अजून गंभीरपणे लक्ष दिलेले दिसत नाही. शहा यांनी आरोपाचा इन्कार केला नव्हता, की कसली सारवासारव केली नव्हती. उलट त्यांनी वेगळेच उत्तर दिले होते. शहा म्हणाले होते, कॉग्रेस निवडणूक कशामुळे हरत आहे, त्याचाच त्या पक्षाला पत्ता लागलेला दिसत नाही. ह्या विधानाचा अर्थ तेव्हा लावला गेला नाही, की अजून त्याची गंभीर दखल घेतली गेलेली नाही. किंबहूना त्या चर्चेत सहभागी झालेल्या शहाण्यांनाही त्याचा अर्थ उलगडला नव्हता. पण आता लोकसभा निवडणूकीचा निकाल लागून दोन महिने झाले, तरी कॉग्रेसला आपल्या पराभवाच्या कारणांचा शोध घ्यावासा वाटलेला नाही. शहा यांच्या विधानाचे गांभिर्यही समजून घेतलेले नाही. ते केले असते, तर एव्हाना तो पक्ष पराभवातून सावरू शकला असता. निदान त्यांनी सावरण्याची सुरूवात तरी केली असती. पण उलट झालेल्या चुका सुधारण्यापेक्षा मागल्या दोन महिन्यात तशाच आणखी चुका करण्याचा सपाटा त्या पक्षाने लावलेला आहे. सहाजिकच जितके राजकीय डाव खेळले जात आहेत, तितका तोच पक्ष अधिक गोत्यात येत आहे. गेल्या पाच दहा वर्षात पक्षाने वा त्याच्या नेतृत्वाने सुधारण्याचा कुठलाही प्रयत्नच केलेला नाही. त्या पक्षाचा इतका दारूण पराभव कशाला झाला?

   कुठल्याही सरकारला लोक निवडतात, तेव्हा त्या पक्षाने जनतेच्या इच्छाआकांक्षा पुर्ण कराव्यात, अशीच लोकांची अपेक्षा असते. कुठलाही पक्ष वा त्याच्या नेत्याला आपले व्यक्तीगत राग वा सुडबुद्धीचा खेळ करण्यासाठी जनता मत वा सत्ता देत नसते. अर्थात तसे डाव खेळायला जनतेचा आक्षेप नसतो. पण जनतेच्या आकांक्षा पुर्ण होत असतील, तर बाकीचे राजकारण सत्ताधारी पक्ष काय खेळतो, त्याबद्दल लोकांना कर्तव्य नसते. उलट जेव्हा जनतेच्या अपेक्षांना हरताळ फ़ासून नुसतेच सूडाचे डावपेच खेळण्यात सत्ताधारी गर्क होतात, तेव्हा लोकांना त्या सरकारविषयी तिरस्कार वाटू लागतो. त्याच्या तावडीतून सुटायची अनिवार इच्छा होते आणि मतदार अशा पक्षाला घरी पाठवून देतो. कॉग्रेसचा पराभव त्याच कारणास्तव झालेला आहे. मागल्या पाचदहा वर्षात कॉग्रेसने सुडबुद्धीचे राजकारण करीत भाजपा व मोदींना सतावण्याचा एक कलमी कारभार चालविला होता. पण दुसरीकडे लोकांच्या आशाआकांक्षांची पुरती हेळसांड केली होती. त्यामुळेच त्यांना लोक विटलेले होते. त्यातून जनमानस कॉग्रेसच्या विरोधात गेलेले होते. त्यावरचा उपाय पुन्हा तसलेच सुडाचे डाव खेळण्याचा असू शकत नव्हता. उलट आपण राजकीय हेतू बाजूला ठेवून लोकहितासाठी राबतो आहोत, असे निदान लोकांना दिसेल, इतके तरी काम कॉग्रेसने करायला हवे होते. एका बाजूला भ्रष्टाचाराने, हिंसाचाराने, अराजकाने, महागाईने लोक गांजलेले होते. पण कॉग्रेसचे युपीए सरकार मात्र नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा रामदेव बाबा यांच्या मागे सरकारी यंत्रणेचा ससेमिरा लावून बसले होते. गुजरातमध्ये एका महिलेचा पोलिसांनी म्हणे पाठलाग केला, पाळत ठेवली म्हणून युपीए सरकार आक्रमक होते. पण दिल्लीत सामुहिक बलात्कार होऊनही तेच सरकार निष्क्रिय होते. स्नुपगेटच्या तपासापेक्षा मतदार लोकांना दिल्लीच्या सुरक्षेची काळजी होती. पण त्याचा थांगपत्ता कॉग्रेसला नसावा.

   तेच अमित शहा म्हणत होते. लोकांना दिल्लीत सुरक्षा हवी आहे, पण मनमोहन सरकार मात्र अमित शहाला स्नुपगेटमध्ये अडकवण्यात गर्क होते. त्याचे कारणही स्पष्ट होते. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा निवडणूक जिंकण्याच्या भयाने कॉग्रेसला पछाडले होते. त्यात गैर काहीच नाही. लोकशाहीत राजकीय पक्ष निवडणूका जिंकायला आसुसलेले असतात. कॉग्रेस तशीच वागली असेल तर गैर काहीच नाही. पण निवडणूका जिंकण्यासाठी लोकांना समाधानी ठेवणे आवश्यक असते. लोकांच्या अपेक्षा पुर्ण कराव्या लागतात. पण सातत्याने कॉग्रेस नेतृत्वाने लोकांकडे व त्यांच्या अपेक्षांकडे साफ़ दुर्लक्ष चालविले होते. तिथेच कॉग्रेसच्या पराभवाची निश्चिंती झाली होती. आपल्या विरोधातल्या पक्षाला वा नेत्याला बदनाम करून हरवता येते, अशी समजूत त्याला कारणीभूत झाली. भाजपावर जातीयवादाचे धर्मांधतेचे अनेक आरोप करून राजकारण केल्याने लोक एक दोनदा फ़सले हे कोणी नाकारू शकणार नाही. पण आता लोकांना त्यातली लबाडी अवगत झाली आहे. त्यामुळेच पराभवाची पाळी आली. तसाच समज भाजपाच्या नेत्यांचाही होता. म्हणुनच मागल्या दहा वर्षात भाजपाचे ज्येष्ठ नेते नुसतेच आरोपाचा धुरळा उडवित राहिले होते. मोदी मैदानात उतरले नसते तर त्या पक्षालाही यश मिळणे अशक्य होते. दहा वर्षापुर्वी सत्ता गमावल्यानंतर भाजपा जसा वागत गेला व त्याने ज्या चुका केल्या; त्याचेच अनुकरण आज विरोधात बसलेली कॉग्रेस करते आहे. आपल्या चुका सुधारण्यापेक्षा भाजपावर आरोपांची राळ उडवण्यात हा पक्ष गेले दोन महिने रमून गेला आहे. उलट सत्ता हाती घेतल्यापासून मोदी मात्र लोकांच्या अपेक्षा व आकांक्षा पुर्ण करण्यात गर्क आहेत. आपल्याला लोकांनी सत्ता कशाला दिली व ती सत्ता कशामुळे जाऊ शकेल, त्याचे पुर्ण भान मोदींना दिसते. म्हणूनच विरोधातले आरोप व गदारोळ यांना उत्तर देत बसण्यापेक्षा मोदी कामाला लागले आहेत. कॉग्रेसने तेच काम करावे. गमावलेला विश्वास संपादन केल्यासही कॉग्रेसला सावरणे अशक्य नाही. मोदी हेच त्याचे उत्तम उदाहरण आहे.

   २००४ सालात भाजपाने एनडीएची सत्ता गमावली. त्यानंतर आजच्या कॉग्रेस नेतृत्वाप्रमाणेच दिल्लीतले भाजपाश्रेष्ठी नुसत्या आरोपांची राळ उडवण्यात रममाण झालेले होते. पण त्यांना पक्षाची प्रतिमा व शक्ती पुन्हा उभारता आली नाही. उलट असलेली शक्तीही तो पक्ष गमावून बसला होता. पण त्याच पक्षाच्या राज्यातील नरेंद्र मोदी, शिवराजसिंह चौहान, डॉ. रमणसिंग अशा नेत्यांनी प्रादेशिक पातळीवर उत्तम कारभार व पक्षसंघटना उभी करून भाजपाला नवी उभारी दिली. थोडक्यात दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींनी बुडवलेला पक्ष, राज्यातल्या नेत्यांनी नव्याने उभा केला. त्यापैकीच एकाने कारभाराचे भारतीयांना भारावून टाकणारे मॉडेल समोर आणले आणि त्यातूनच भाजपाने अभूतपुर्व यश संपादन केले. त्याच मार्गाने कॉग्रेसला जाणे अशक्य आहे काय? आजही अनेक राज्यात कॉग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. तिथे पक्षाला चांगले स्थान आहे. मग अशा नेत्यांना व तिथल्या सत्तेला कामाला जुंपून कॉग्रेस पक्षाची नव्याने उभारणी करणे अशक्य नाही. पण कुठल्याही राज्यातल्या स्वयंभू नेत्याला कॉग्रेसने कधी समर्थपणे काम करू दिलेले नाही. उलट असा कोणी नेता पक्षात दिसला, तरी त्याचे पंख छाटायचे उद्योग कॉग्रेसमध्ये चालू असतात. त्यामुळे राज्यपातळीवर पक्ष पुरता खच्ची होऊन गेला आहे. सहाजिकच त्यातून या पक्षाने बाहेर पडण्याची गरज आहे. पण तिकडे ढुंकूनही न बघता कॉग्रेसश्रेष्ठी आजही मोदी वा भाजपावर नुसतेच आरोप करण्यात दंग आहेत. आसाम, महाराष्ट्र, कर्नाटक इत्यादी राज्यात अनेक चांगले खंबीर नेते कॉग्रेस पक्षातही आहेत. त्यांच्याकडून नव्याने पक्षाची उभारणी होऊही शकते. पण कालबाह्य झालेल्या डावपेच व जुगारात फ़सलेल्या पक्षाच्या नेतृत्वाला, गाळातून बाहेर पडायची इच्छा नाही. जे तोंडपुजे भोवती जमा केलेत, त्यातून बाहेर पडायची हिंमतही हे नेतृत्व गमावून बसले आहे. थोडक्यात कॉग्रेसचे नेतृत्व हीच त्या पक्षाची आज समस्या बनली आहे.

No comments:

Post a Comment