Sunday, August 10, 2014

मतचाचण्यांचे गणित चुकवावे कसे?



   शुक्रवार शनिवारी एबीपी या वाहिनीने दोन राज्यांच्या विधानसभा निवडणूकीपुर्वी घेतलेल्या मतचाचण्यांचे निष्कर्ष मांडले आणि त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया आलेल्या आहेत. लोकसभेप्रमाणेच याही मतदानात भाजपाचा वरचष्मा राहिल, असे त्या चाचणीचे भाकित आहे. सहाजिकच असे भाकित पराभूत होऊ घातलेल्या सत्ताधारी पक्षांना आवडणारे नसणार हे उघड आहे. अशावेळी मग माध्यमांवर आक्षेप घेणेही आता नित्याची बाब झाली आहे. पण त्यासाठी निव्वळ कॉग्रेस वा राष्ट्रवादी पक्षाच्या नाराजांना दोष देऊन चालणार नाही. कुठलीही बातमी वा महिती मांडताना समोरच्याला, ती समजावी याची सादरकर्त्यांनी काळजी घेतली पाहिजे. ही माहिती समोरच्याला पटण्याचे कारण नाही. पण निदान त्याला समजावी व त्याने तिचा ठोस प्रतिवाद करावा, इतकी तरी अपेक्षा बाळगणे गैर आहे काय? गेल्या दोन वर्षात विविध निवडणूकांच्या निमित्ताने मतचाचण्या हा वाहिन्यांसाठी अगदी पोरखेळ होऊन बसला आहे. कारण अशा चाचण्या करून घेतल्या जातात आणि त्यावर आधारीत निष्कर्ष सादर केले जातात. मग जणू तेच निकाल आहेत, अशा थाटात विविध पक्षाचे प्रवक्ते वा राजकीय अभ्यासकांची त्यावर चर्चा होत असते. इथे एक मोठी गल्लत अशी होते, की मतचाचण्या म्हणजे निकाल नसतो, म्हणूनच त्यातले यश वा अपयश वास्तव असल्याप्रमाणे चर्चा हमरातुमरीवर जाणार नाही याची संयोजकानेच काळजी घ्यायला हवी. मग त्यासाठी आपण सादर करीत असलेली माहिती सहभागी होणार्‍या व ऐकणार्‍यांना निदान उमजावी, इतकी सज्जता तरी असायला हवी ना? त्यासाठी अर्थातच मतचाचण्यांचे शास्त्र काय व त्याची प्रक्रिया कशी असते, याची सादरकर्त्यांना जाण असायला हवी. दुर्दैव असे, की बहुतेक वाहिन्यांचे सादरकर्ते संयोजक आणि त्यात सहभागी होणारे ‘जाणकार’ त्या शास्त्राविषयीच अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट दिसते.

   शनिवारी एबीपी वाहिनीवर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक निमित्ताने घेतलेल्या मतचाचणीचे आकडे सादर करायचा हा कार्यक्रम होता. त्यामध्ये भाजपा वा महायुती बाजी मारणार हा निष्कर्ष चुकीचा म्हणता येणार नाही. पण तिथे तुम्ही फ़ुटकळ अंदाज व्यक्त करायला बसलेला नाही, तर जी मतदाराची चाचपणी केलेली आहे, तिच्या आधारे काढलेले निष्कर्ष मांडायचा तो कार्यक्रम आहे. त्यात कुठल्या आधारे माहिती जमा केली व निष्कर्ष कसे काढले; त्याचेही स्पष्टीकरण देणे अगत्याचे आहे. जेव्हा तुम्ही भाजपाला एकट्याच्या बळावर लढून ११२ आणि युतीमध्ये राहुन लढल्यास १२२ जागा जिंकण्याचा निष्कर्ष दाखवता, तेव्हा इतक्या जागा जिंकणारा भाजपा निदान तितक्या जागा लढवणार काय, याही प्रश्नाचे उत्तर तयार ठेवायला हवे. अजून सेना भाजपा यांच्यात नेमक्या लढवायच्या जागांचे वाटपच झालेले नाही, तेवढ्यात मतचाचणी त्यांना जिंकलेल्या जागाही वाटून टाकणार असेल, तर त्यावर कोणी कसा विश्वास ठेवायचा? अशावेळी युतीच्या जागा वेगवेगळ्या दाखवायच्या नसतात, तर युती म्हणून मिळणार्‍या एकूण जागा दाखवायला हव्यात. हे पथ्य ज्यांना पाळता येत नाही, त्यांना मतचाचणी म्हणजे काय, ते कळलेले नाही किंवा त्यामागचे शास्त्रही उलगडलेले नाही असा अर्थ होतो. मागल्या पाच विधानसभा निवडणूका युती पक्षांनी एकत्र लढवल्या आहेत आणि त्यात सेनेने अधिक व भाजपाने कमी लढवल्या आहेत. पहिल्या चार वेळा भाजपाने ११७ व गेल्या खेपेस ११९ जागा लढवल्या होत्या. आताही तितक्याच लढवल्या जातील अशी अपेक्षा असेल, तर निदान त्यापेक्षा अधिक जागा भाजपा जिंकू शकणार नाही ना? ११९ जागा लढवून भाजपा १२२ जागा कुठून जिंकणार, असा सवाल विचारला गेला मग चाचणी खोटीच पडणार ना? असे होऊ शकले कारण सादर करणार्‍यांनी चाचणीचा कुठलाही तपशील वा त्यामागचे तर्कशास्त्रही समजून घेतलेले नाही.

   जेव्हा तुम्हीच एखादा विषय समजून घेतलेला नसतो, तेव्हा त्याचे विश्लेषण वा विवेचन तुम्ही करणार कसे? सहाजिकच तुम्ही उडवाउडवी करू लागता. या कार्यक्रमात नेमके तेच झाले आणि त्याचा पुरता विचका होऊन गेला. एका बाजूला भाजपा शिवसेनेचे प्रवक्ते अकारण खुश होते आणि दुसरीकडे कॉग्रेस राष्ट्रवादीचे नेते संतापलेले दिसत होते. त्यांच्याखेरीज ज्यांना राजकीय अभ्यासक म्हणून सहभागी केले होते, त्यांना कशाचाच थांगपत्ता लागलेला दिसत नव्हता. ज्या चार प्रमुख पक्षात दोन आघाड्या झालेल्या आहेत व त्यांच्यात लढत होते, त्यांनी प्रत्येकाने स्वबळावर लढत द्यायचे ठरवले तर काय होईल, असाही एक प्रश्न या चाचणीत विचारला गेला होता. त्यानुसारचे आलेले निष्कर्ष आघाडी व युती यांच्यात होणार्‍या सरळ लढतीशी तपासून बघितले जात होते. इथे एक महत्वाचा फ़रक पडतो, की प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढला, तर त्याला सर्वच जागा लढवाव्या लागतात. त्यामुळेच त्याला मिळणार्‍या जागा किती असाव्यात याचे बंधन येत नाही. पण युती-आघाडी करून लढायचे झाल्यास कुठल्या पक्षाच्या वाट्याला किती जागा लढायची संधी येते, त्यानुसारच जिंकायच्या जागांचा आकडा मर्यादित होत असतो. लढल्या त्यापेक्षा अधिक जागा जिंकता येत नाहीत. म्हणूनच जेव्हा तशा शक्यतेच्या आधारे चाचण्या घेऊन निष्कर्ष काढले जातात, तेव्हा दोन तीन वा जितके मित्र पक्ष असतात, त्यांच्या जागांची एकत्रित संख्या सांगायची असते. त्या कार्यक्रमात तिथेच गल्लत होऊन गेली. स्वतंत्रपणे सर्व जागा प्रत्येक पक्ष लढवणार, त्याचे निष्कर्ष व आघाडी करून लढायच्या जागा यांच्याविषयी सादरकर्त्यांचाच गोंधळ होता. दुसरी गोष्ट, एकत्र लढून मतविभागणी टाळण्यातले लाभ असतात, तसेच तोटेही असतात. त्याचेही भान जाणकार असलेल्यांना नव्हते. त्यामुळे चाचणी व निष्कर्ष याविषयी सादरकर्तेच गोंधळलेले होते.

   चार प्रमुख पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले मग काय होते? त्याचे उत्तम उदाहरण दोन दशके उत्तरप्रदेश देतो आहे, भाजपा, कॉग्रेस, बसपा व समाजवादी अशा चौरंगी लढतीमध्ये ३० टक्के मतांचा पल्ला ओलांडणारा बहुमताने सत्ता मिळवतो आणि पंधरावीस टक्के मिळवणारा दहा टक्केही जागा जिंकू शकत नाही. चौरंगी तिरंगी लढतीची अशी गंमत असते. त्याचप्रमाणे नुसते मतविभाजन टाळण्याने लाभ होतोच असेही नाही. दुसरीकडेही तसेच मतविभाजन टाळण्याचा यशस्वी प्रयोग झाला, तर दुबळ्याला त्याचा अधिक तोटा होतो. १९९५ सालात २९ टक्के मतांवर युतीने १४० जागा जिंकल्या होत्या आणि १९९९ सालात कॉग्रेस दुभंगली असताना, तीन टक्के मत वाढूनही युतीच्या जागा मात्र पंधरा कमी झल्या होत्या. कॉग्रेस व राष्ट्रवादी अशा मतविभाजनाचा लाभ त्यांनाच मिळाला आणि युतीला मात्र तोटा झाला होता. म्हणूनच चाचण्या व त्यांचे आकडेशास्त्र राजकीय तर्कशास्त्रात बसवून जागांचे निष्कर्ष काढावे लागतात. सोप्या अंकगणित वा बीजगणिताप्रमाणे ही समिकरणे सोडवता येत नाहीत. उपरोक्त कार्यक्रमात, तिथेच सगळी गल्लत झाली होती. लोकसभा निवडणूकीत युतीला मिळालेली मते कमी होत असताना कॉग्रेस आघाडीची मते कमी कशाला झाली किंवा अशी मते कुठे वळली; त्याचे कुठलेही समाधानकारक उत्तर चर्चेतल्या कुणाही जाणकाराकडे नव्हते. कारण हे आकडे निघतात कसे आणि त्यांची समिकरणे बदलतात कशी, त्याचाच चर्चेत बसलेल्यांना थांगपत्ता नव्हता. डिपॉझीट गमावूनही उमेदवार निवडून येतो, असले चमत्कार ज्यांना ठाऊकही नाहीत, त्यांनी असले विवेचन व विश्लेषण करण्याने त्याचा बोजवाराच उडवला जाऊ शकतो. त्यामुळे चाचणी चांगली व योग्य असली, तरी त्याची विश्वासार्हता सादरकर्त्यांच्या बेफ़िकीरीमुळे गमावली जात असते. एबीपीच्या चाचणीचे आकडे नेमके व रास्तच आहेत. पण मांडणीतल्या गोंधळामुळे ते संयोजकांनीच निरर्थक करून टाकले.
(अपुर्ण)

No comments:

Post a Comment