Wednesday, August 13, 2014

उघडा डोळे आणि बघा नीट



मतचाचण्या वा मतदानपुर्व अंदाज यांचे आता एक शास्त्र झालेले आहे. ज्यांना त्यातून येणार्‍या उत्तरातच रस असतो, त्यांना आकड्यांशी मतलब असतो. पण ज्यांना त्यामागची कारणमिमांसा करायची असते, त्यांना त्यातली कार्यप्रणाली समजून घेणे भाग असते. सहा कोटी मतदार कसे कोणाला व कशासाठी मतदान करतील, याबद्दल आडाखा बांधताना, चाचणीत काही हजार मतदारांची चाचपणी होत असते. सहाजिकच त्यात सर्वप्रकारच्या सामाजिक घटकांचा नमूना घेतला जाईल, याची अत्यंत जपून निवड करावी लागते. तरच समाजाचे प्रातिनिधीक मत मिळवता येते आणि त्यानुसार जय पराजयाचे अंदाज मांडता येतात. ते जसेच्या तसे खरे ठरण्याची अजिबात शकता नसते. पण त्यातून लोकमत कुठल्या बाजूला झुकते आहे वा त्याचे वारे कुठल्या दिशेने वहात आहेत, त्याचा अंदाज मिळत असतो. लोकसभा निवडणूकीच्या वेळी ज्या असंख्य चाचण्या झाल्या व त्याचे निष्कर्ष मांडले गेले, त्यापैकी एकादा अपवाद करता कोणालाच नेमके मोदींचे यश जोखता आलेले नव्हते. याचा अर्थ असे सर्वच चाचण्या घेणारे भामटे वा मुर्ख होते, असा अजिबात होत नाही. त्यापैकी अनेकांना मोदींच्या यशाची पुर्वकल्पना आलेली होती. कारण हाती येणारे चाचणीचे आकडे त्याची ग्वाही देत होते. पण अशी चाचणी घेणारे व त्याचा राजकीय अन्वय लावणारे आपापल्या समजूती व पुर्वग्रहामुळे सत्य स्विकारायला धजावत नव्हते. आघाडीचे युग आहे आणि भारतातला सेक्युलर मतदार मोदींसारख्या हिंदूत्ववाद्याला यश देऊच शकत नाही, अशा समजूतीचा बुद्धीवर इतका दबाव आलेला होता, की समोर येणारे प्रत्यक्ष चाचणीचे आकडे मनाला पटणारे असूनही बुद्धीला पटत नव्हते. म्हणून हातचे राखून आकडे कमी करून दाखवले जात होते. कारण तेच आकडे प्रस्थापित सेक्युलर बुद्धीवादाला पटणारे व पचणारे होते. मतमोजणीच्या आधी आलेला शेवटचा अंदाज एनडीटीव्हीच्या प्रणय रॉय याचा होता. वास्तविक भारतात मतचाचण्याचे युग आणणारा तोच यातला आद्यपुरूष. त्याने अखेरच्या क्षणी एनडीएला बहूमताच्या दारात आणून उभे केले होते. पण भाजपाला स्वत:चे बहूमत मिळेल असे काही मान्य केले नव्हते. तेव्हाच त्याबद्दल लिहीताना मी साफ़ सांगून टाकले होते, की प्रणय रॉय एनडीएला काठावरचे बहूमत देत असेल, तर मोदी भाजपाला थेट बहूमतापर्यंत घेऊन जाणार याची खात्री बाळगा. असे मी कशाच्या आधारावर म्हणत होतो? तर सगळेच चाचणीकर्ते खोटे पडू नये, अशा दबावाखाली सावधपणे आपापले अंदाज व्यक्त करीत होते. त्यातला सर्वात जाणता एनडीएला बहुमत दाखवतो, म्हणजेच त्याच्यापलिकडे मोदींनी मजल मारलेली आहे, असा माझा अंदाज होता आणि तोच खरा ठरलेला आहे.

त्याच काळात एबीपीने काढलेले व मांडलेले अंदाजही फ़सलेच होते. पण निदान उलटेपालटे झाले नव्हते. तेव्हा निलसन व एबीपीने भाजपा अधिक जागा देताना बहूमत दाखवले जाऊ नये, अशी काळजी घेतली होती. पण वास्तवात त्यांच्या हाताशी आलेल्या आकड्यात एनडीए व भाजपा मोठ्या यशाकडे जाताना स्पष्ट दिसत होते. तरीही मानसिक व सेक्युलर बुद्धीवादाच्या दबावाखाली त्यांनीही आपापले आकडे हात आखडून दाखवले होते. ती अशा लोकांची खरी चुक वा गुन्हा असतो. आज त्यांच्यापैकी कोणीही आपण तेव्हा हात आखडला असे मान्य करणार नाही. कारण खोटेपणा मान्य करायला कोण तयार असतो? पण त्यावेळी आपली चाचणी बरोबर आकडे दाखवत होती आणि त्याप्रमाणेच मोदींना इतके मोठे यश मिळू शकले, याची एबीपी व निलसन यांना पक्की खात्री आहे. त्यामुळे सेक्युलर बुद्धीवाद व राजकीय दबाव यांना घाबरून अकारण महायुतीच्या यशाला छोटे दाखवायला ही मंडळी आज तयार नाहीत. विधानसभा निवडणूकीत आघाडी हमखास पराभूत होणार आणि महायुती नक्की जिंकणार, याची अशी मतचाचणी घेणार्‍यांना (लोकसभा) अनुभवातून झालेली खात्रीच आहे. म्हणूनच त्यांना लोकसभा मतदानाच्या वेळी नसलेली सत्यकथनाची हिंमत आलेली आहे. त्यातून मग त्यांनी महायुतीला १८० पासून २१० पर्यंत जागा देऊ केल्या आहेत. मात्र अशा जागा कशाच्या आधारे मिळतात, ते समजून घेऊन मांडायला हव्यात. त्यामागची कार्यप्रणाली, तर्कशास्त्र वा मतदार प्रवृत्ती यांची योग्य मिमांसा त्यांना करता आली पाहिजे. पण दुर्दैवाने राजू खांडेकर, प्रसन्ना जोशी वा प्रताप आसबे यांच्यासह कार्यक्रमात सहभागी झालेल्या कोणालाच त्या विषयाची साधी तोंडओळख सुद्धा नाही. सहाजिकच उत्तर बरोबर असले, तरी त्यांनी मांडलेले गणित चुकताना दिसते आहे. त्यातून त्यांच्या चाचणीविषयी शंका घेतल्या गेल्या व त्यांना खोटे पाडण्यापर्यंत गदारोळ जाऊन पोहोचला आहे.

त्या कार्यक्रमात कॉग्रेसचे जनार्दन चांदूरकर संतप्त होऊन उठून निघाले व त्यांनी एबीपीवर दिशाभूल करीत असल्याचा आरोपही केला. त्यांना समजावण्याचा केविलवाणा प्रयास करताना राजू खांडेकर यांनी दिलेले लंगडे स्पष्टीकरणच एकूण संयोजकांच्या अज्ञानाचे प्रदर्शन होते. लोकसभेत युतीला ५० टक्के मते मिळाली होती आणि आता विधानसभेला त्यातली आठ टक्के मते कमी होत आहेत. मात्र युतीची कमी झालेली मते कॉग्रेस आघाडीकडे येताना दिसत नाहीत. त्यामुळे मोदी लाट ओसरल्याचे ते प्रतिबिंब असल्याचे खांडेकर म्हणाले. ह्यालाच मी अज्ञान म्हणतो. युतीची कमी होणारी मते कॉग्रेस वा राष्ट्रवादीकडे जाण्याचा विषयच येत नाही. कारण ती त्यांची मतेच नव्हती. ही आठ टक्के मते मनसे, शेकाप, भारीप किंवा आप वगैरे किरकोळ पक्षांची असतात, ज्यांचा लोकसभा मतदानावर प्रभाव पडत नाही. मग त्यांचा मतदार पर्याय म्हणून निर्णायक ठरणार्‍या अन्य उमेदवाराकडे तात्पुरता वळलेला असतो. १९८९ पासून १९९९ पर्यंत वसईमध्ये आमदार निवडताना हिंतेंद्र ठाकूर यांनाच मते देणारा बहुतांश मतदार लोकसभेला राम नाईक यांच्या झोळीत आपले वजन टाकत होता. कारण त्याला हितेंद्रने कुठला लोकसभा पर्याय दिलेला नसायचा. परंतू २००४ सालात तिथे कॉग्रेसने गोविंदा या अभिनेत्याला उमेदवारी दिली आणि हितेंद्र वर्गमित्र म्हणून गोविंदाच्या समर्थनाला उतरताच वसईतच नाईक यांना मोठा दणका बसला. २००९ मध्ये मनसेकडे वळलेल्या मतांनी युतीला फ़टका बसला, तो मतदार यावेळी युतीकडे परतला. मात्र लोकसभेला तिकडे गेलेला काही मतदार विधानसभेत पुन्हा मनसेकडे परततो आहे. त्यामुळेच युतीची आठ टक्के कमी होताना दिसणारी मते मनसेसारख्या अन्य किरकोळ पक्षाकडे विधानसभेत झुकणार आहेत. कॉग्रेस वा राष्ट्रवादीकडे त्यांनी जाण्याचा प्रश्नच येत नाही. युतीच्या त्या कमी होणार्‍या मतांचा मोदींच्या लोकप्रियता घसरण्याशी काडीमात्र संबंध नाही. भारतातला मतदार अत्यंत चतूर चाणाक्ष आहे. ग्रामपंचायत वा तालुका पंचायत आणि लोकसभा विधानसभा यासाठी निवड करताना त्याच्यात जे तारतम्य आढळते; त्याचा मागमूस विश्लेषणकर्त्या अभ्यासकात नसल्याने असे गोंधळ उडतात.

बिचारे खांडेकर, प्रसन्ना आपल्या चाचणीविषयी छातीठोकपणे ग्वाही देऊ शकलेले नाहीत. पण मी आज त्यांचे आकडे चोख असल्याची ग्वाही देऊ शकतो. कारण त्यात जनमानसाचे नकारात्मक प्रतिबिंब चोख पडलेले आहे. त्यांनी सेना भाजपया पक्षांना मिळू शकणार्‍या जागांचे दाखवलेले आकडे चुकीचे असतील. पण युती म्हणून त्याच पक्षांना एकत्रित मिळू शकणार्‍या जागांची संख्या शंभर टक्के तशीच येईल अशी मला खात्री आहे. त्या चाचणीने एक सिद्ध होते, की युती पक्षांनी कितीही मुर्खपणाने दिवाळखोर वागून दाखवले, तरी मतदार आघाडीला सत्तेवर येऊ देणार नाही. म्हणूनच सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात स्वबळावर लढले तर त्यांना मिळणार्‍या जागा आणि युती आघाडी करून लढल्यास मिळणार्‍या जागा, हे आकडे बोलके आहेत. एकदिलाने लढल्यास युती २१० आणि एकमेकांच्या विरोधात लढले तरी १८०, याचा अर्थ स्पष्ट आहे. शिवसेना भाजपाला भले एकत्र येऊन लढायचे नसेल, तरी त्यांनाच कान धरून एकत्र सत्ता संभाळायला बसवायचे, असा निर्णय मतदाराने आधीच केलेला आहे. त्यासाठी मग कुठूनही कॉग्रेस वा राष्ट्रवादी यांना इतरांच्याही मदतीने बहूमताचा पल्ला गाठता येऊ नये, असे निकाल मतदार लावतो आहे. सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात लढून आघाडीची बेरीज ८०-८५ आणि युती-आघाडी असे लढले तरी पल्ला ५५ जागांच्या पलिकडे जात नाही, हा एबीपी चाचणीतला महत्वाचा निष्कर्ष आहे. पण मांडायला बसलेत, त्यांना त्याचे आकलन झालेले नाही. किंवा ऐकायला बसलेत त्यांना बोजवारा उडालेल्या कार्यक्रमामुळे कशाचाच उलगडा होऊ शकलेला नाही. त्यातली गोळाबेरीज इतकीच आहे, की युती पक्ष आपल्या कर्तृत्वाने वा लोकप्रियतेमुळे इतके मोठे यश मिळवण्याच्या परिस्थितीत अजिबात नाहीत. त्यापेक्षा सत्ताधारी राष्ट्रवादी व कॉग्रेस यांच्या भ्रष्ट, नाकर्त्या व नालायक सरकारपासून मुक्ती मिळवणे ही जनतेसाठी अगतिकता झाली आहे. आसबे आपल्या लेखातून त्याची ग्वाही देऊन म्हणतात, ‘काय बिशाद लोक आघाडीला मते देतील, असा पण करूनच सरकारने कारभार केला.’ त्यांनी आपले एबीपी सहकारी प्रसन्ना व खांडेकरांना सादरीकरणापुर्वी लेखातला हा मुद्दा समजावला असता, तरी कार्यक्रमाचा इतका विचका झाला नसता. चांदुरकरांनाही इतका आवेश दाखवण्याची वेळ आली नसती. असो. तीन महिन्यानंतर एबीपी निलसन खरे ठरले, तर त्याचे श्रेय मात्र स्वत:कडे न घेता त्यांनी भाऊ तोरसेकरला द्यावे, इतकीच नम्र विनंती. कारण इच्छा नसताना त्यांची बाजू मला मांडावी लागली आहे. अपेक्षा इतकीच, की आपलीच मतचाचणी समजून घ्यायला, उघडा डोळे आणि बघा नीट

4 comments:

  1. एकदम परफेक्ट ! चाचणीचे निष्कर्ष खरे ठरले तर त्याचे श्रेय भाऊ तोरसेकर यांना, नक्कीच !

    ReplyDelete
    Replies
    1. रामदास पवार,

      शिवसेना व भाजप स्वतंत्ररीत्या लढले तर १८० पर्यंत जातील हा अंदाज खरा ठरला आहे. तसेच रावा आणि काँग्रेस स्वतंत्ररीत्या लढले तर ८५ चा आसपास जातील हाही अंदाज खरा ठरला म्हणायचा. नीलसनचे अंदाज खरे ठरले त्याचं श्रेय भाऊ तोरसेकरांना द्यायला हरकत नाही.

      आपला नम्र,
      -गामा पैलवान

      Delete
    2. होय, गामा पैलवान साहेब, भाऊंचे सर्व आकडे बरोबर ठरले आहेत. याचं संपूर्ण श्रेय भाऊ तोरसेलर यांना!

      Delete
  2. भाऊ, तुमचे निष्कर्ष एकदम खरे ठरले. भारतातील एकमेव वंदनीय पत्रकार आहात तुम्ही.

    ReplyDelete