Friday, August 15, 2014

नरेंद्र मोदींनी साफ़ निराशाच केली






   काही वर्षापुर्वी टिव्हीवर एक झकास जाहिरात खुप वेळ दाखवली जायची. फ़्रीजची ही जाहिरात त्या कंपनीने बनवलेल्या अप्रतिम तंत्रज्ञानावर भर देणारी होती. ते तंत्रज्ञान सामान्य लोकांना कसे कळावे? त्यासाठी मग त्यांनी सामान्य माणसाच्या फ़्रीजविषयक समजूतीला लक्ष्य केले होते. एक गृहिणी घरचा नवा फ़्रीज बिघडलाय म्हणून कंपनीला फ़ोन करून मेकॅनिक मागवते. घरी आलेला तो दुरुस्तीकर्ता सगळा फ़्रीज तपासतो. यात वस्तू थंड होत असतात, आतले दिवे लागलेले असतात. पाणीही थंडच असते. एक एक गोष्ट तपासून त्या महिलेला दाखवून तो तिची समस्या विचारतो. तर ती म्हणते, बाकी सर्व ठिक आहे. ‘फ़्रीज आवाजही नही करता.’ जुना झालेला वा बेफ़िकीरीने वापरलेला फ़्रीज म्हातारा होऊ लागला, की त्याची मोटर वा यंत्रणा गुरगुरू लागतात. त्याचा आवाज चालू असणे म्हणजेच मग फ़्रीज उत्तम चालणे, असे वाटणे स्वाभाविक आहे. पण नव्या तंत्रज्ञानाने यंत्रणा इतकी चोख केलेली आहे, की फ़्रीजचा आवाजच येत नाही. आणि आवाज येत नाही म्हणजेच तो फ़्रीज उत्तम स्थितीत आहे. बिचारा मेकॅनिक गृहिणीला हे समजावतो. तिच्या चेहर्‍यावरही समाधान पसरते आणि विषय संपतो. आठदहा वर्षापुर्वीची ती जाहिरात आता कुठे दिसत नाही. पण ती मानसिकता मात्र कायम असावी. लोक समजूतीच्या बाहेर पडत नाहीत आणि प्रामुख्याने बुद्धीमान विचारवंत असले, मग तर समजूतीच्या कोषातून बाहेर पडणेच अशक्य असते. समजा त्याच जाहिरात कथानकात गृहिणीऐवजी कुणी विचारवंताशी त्या मेकॅनिकची गाठ पडली असती, तर त्याने फ़्रीजची घरघर म्हणजेच त्याच्या उत्तम चालण्याची हमी, असेच त्यालाही पटवून दिले असते आणि नव्या तंत्रज्ञानाला झुगारून लावले असते. भारताचे नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर विविध वाहिन्यांवरील चर्चा ऐकल्यावर ती जाहिरात आठवली.

आपल्या या पहिल्या भाषणाच्या आधी तिथे जी सुरक्षेची सज्जता केलेली होती, त्यात मोदींनी ऐनवेळी बदल केला. गेली दोन दशके तरी देशाचा पंतप्रधान तिथून भाषण करताना बुलेटप्रूफ़ काचेमागे उभा राहून देशाला संबोधित करतो. मोदींना तर जिहादींपासून धोका असल्याचे प्रतिदिन आपण रोज ऐकत असतो. त्यामुळेच मोदींनी बंदिस्त सुरक्षा कवचामागून भाषण केल्यास नवल नव्हते. आजवरचे आठदहा पंतप्रधान तेच करत आले. पण मोदींनी जनतेला आपला आत्मविश्वास दिसावा, म्हणून ती प्रथा मोडीत काढली आणि ऐनवेळी ते कवच बाजूला करायला लावले. अर्थात तसे करण्याआधी त्यांच्या सुरक्षा सल्लागारांचा सल्ला त्यांनी घेतला असणार यात शंका नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मोदींनी नेहमीप्रमाणे औपचारिक भाषण देणे टाळून उत्स्फ़ुर्त संवाद साधला. त्यांच्या भाषणात मोठ्या भव्यदिव्य कल्पनांचा भडीमार अजिबात नव्हता. बुद्धीमंतांना चघळायला वैचारिक खाद्य द्यावे, तसे त्यांचे भाषण अजिबात नव्हते. पण अतिशय छोटे वाटणारे विषय व मुद्दे घेऊन त्यांनी जनतेला आवाहन करायचा पवित्रा घेतला. उदाहरणार्थ देशात वाढलेल्या महिला असुरक्षीतता व बलात्कार विषयाला हात घालून, त्यांनी मुलीपेक्षा पालकांनी आपल्या मुलांवर नजर ठेवण्याचा मुद्दा मांडला. शेवटी बलात्कार वा मुलींवर अत्याचार करणाराही कुणाचा तरी मुलगा-भाऊ आहे. त्याला बहकू देणारा पालक देशापुढे समस्या उभ्या करतो, हे भीषण वास्तव आहे. त्याला कायद्याने पायबंद घातलाच पाहिजे. पण घरातच बेताल होऊ लागलेल्या मुलांना वेसण घातली गेली, तर कायदा यंत्रणेवर इतके अवलंबून रहावे लागणार नाही. तिच्यावरील बोजा कमी होतो. त्याहीपेक्षा असे विषय गुन्हे असण्यापेक्षा सामाजिक विकृती असतात आणि त्याच्यावरचे उपाय समाजाकडूनच होणे अगत्याचे असते, त्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बलात्कार, महिला सुरक्षा वा महिलांचे सशक्तीकरण असल्या बाबतीत नुसते कायदे करणे वा सरकारने योजना आखणे, एवढीच मर्यादा मानली गेली आहे. त्यात समाजाची जणू काहीच जबाबदारी नाही, अशा समजूतीमध्ये सरकारवर खापर फ़ोडण्याची स्पर्धा चालते. पण यातले गुन्हेगार वा समाजकंटक आपल्यातच वावरत असतात. त्यांना सर्वात आधी आपणच रोखू शकतो. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी त्याला लगाम लावणे, कायद्यापेक्षा सामान्य जनतेलाच शक्य आहे. त्यात जनतेने पुढाकार घ्यायला हवा, हे साधे आवाहन आजवर कुणा नेत्याला करावेसेही वाटले नव्हते. मोदींनी तिकडे लक्ष वेधले व असेच त्यांनी अनेक बाबतीत केले. योजना, विकास वा जनतेचे हित ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, ते त्याच जनतेचे उत्तरदायित्वही आहे, याचाच आपल्याला विसर पडून गेला आहे. सरकार काय करणार, असा प्रश्न नित्यनेमाने विचारला जातो. पण ज्यांच्यासाठी अशा गोष्टी सरकारने कराव्यात अशी अपेक्षा आहे, त्या जनतेने स्वत:साठी काहीच करायचे नसते काय? आपल्या मुली बहिणीवर अत्याचार होऊ नये ही अपेक्षा चुकीची नाही. पण आपल्याच मुला, भावाकडून असे अत्याचार होऊ नयेत, त्याची जबाबदारी कोणाची? अत्याचार करणारा पुरूष आपल्या घरातला असू नये, हे प्रत्येक कुटुंबाचे सामाजिक दायित्व नाही काय? कितीदा बुद्धीमंतांपासून पुढार्‍यांपर्यंत कोणी त्याची जाणीव जनतेला करून दिली आहे? ही म्हटले तर किरकोळ बाब आहे. त्यामुळे उद्यापासून घराघरातल्या मुलगे वा पुरूषांना सदबुद्धी होण्याची अजिबात शक्यता नाही. पण असे काहीही घडल्यावर लगेच सरकारला गुन्हेगार मानणार्‍या नागरिकांना यापुढे निदान आपला चेहरा आरशात बघायची इच्छा तरी होईल ना? दोनपाच टक्के लोकांनी जरी त्याची जाणिव ठेवून घरात मुलगे वा पुरूषांचा बंदोबस्त करायचे ठरवले, तरी एका चांगल्या दिशेने लहानसे पाऊल टाकले जाईल ना?

असे अनेक मुद्दे मोदींनी इतक्या सहजतेने आपल्या भाषणातून मांडले, की सरकार आणि जनता ह्या दोन भिन्न बाजू नसून एकमेकांना पुरक आहेत, याचे भान त्यांनी निर्माण करायचा प्रयास केला. एकाने करावे आणि दुसर्‍याने बघत बसावे, असे काम होत नाही. सरकार व जनता यांनी परस्पर पुरक भूमिकेतून कामाला लागले तर मोठ्या वाटणार्‍या गोष्टी वा आव्हाने सोपी होऊन जातील. विकास हे आंदोलन होऊन जाईल. जेव्हा विकास वा योजनांमध्ये जनतेचाच सहभाग असा वाढत जाईल, तेव्हा त्यातला भ्रष्टाचार आपोआप कमी होत जाईल. सरकार जे जनतेसाठी व जनतेचे असेल, तर त्याच्यापासून जनतेला अलिप्त राहुन चालणार नाही. तिचाही सरकारी कामात सहभाग असायलाच हवा. अशा आशयाचे हे भाषण देशवासियांना भारावून गेले तर नवल नव्हते. मात्र सामान्य जनतेला सहजगत्या उमजू शकणारे तेच भाषण वाहिन्यांवर चर्चेला बसणार्‍यांना मात्र अर्थशून्य वाटले. त्या बुद्धीमंतांची पंतप्रधानांनी निराशा केल्याचे चर्चेतून दिसत होते. पण अशा जाणत्यांची निराशाच अपेक्षीत नव्हती काय? एक वर्षापुर्वी भाजपाने मोदींना आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केल्यापासूनच ही विचारवंत मंडळी निराश झालेली नव्हती काय? मोदी देशाचे पंतप्रधान होऊच शकत नाहीत. लोकशाहीत पंतप्रधान पदाचा उमेदवार आधीच जाहिर करायचा नसतो. मोदींमध्ये पंतप्रधान व्हायची गुणवत्ताच नाही, अशाप्रकारचे पांडित्य आपण गेले वर्षभर ऐकले आहे. मात्र त्याला झुगारून मतदाराने मोदींच्याच हाती देशाची सत्तासुत्रे सोपवली. परिणामी अभ्यासकांची आधीच निराशा झाली आहे. मग असा अपात्र पंतप्रधान त्यांच्या अपेक्षा पुर्ण तरी कसा करणार? बहुतांश सामान्य लोकांना कित्येक वर्षानंतर प्रथमच लालकिल्यावरून कोणी खमक्या पंतप्रधान बोलला असे वाटले, समाधान झाले. पण वर्षभर निराश असलेल्या बुद्धीमंतांची मात्र मोदींनी साफ़ निराशाच केली. त्याला पर्याय तरी कुठे होता? या शहाण्यांनी मोदींकडून नेमकी तीच अपेक्षा बाळगलेली नव्हती काय? सामान्य जनतेला उमजू शकणारे बोलणारा पंतप्रधान बुद्धीमंतानी कसा पचवावा ना?

1 comment:

  1. भाऊ, शशिकांत पित्रे (माजी लश्करी अधिकारी) एबीपी माझा वर म्हणाले की मोदिंचे भाषण स्फूर्ति देणारे होते, असे भाषण त्यांनी आयुष्यात कधी कोणत्या पंतप्रधानाकडून ऐकले नाही. इंडिया टीवी वर सांगितले गेले की आतापर्यंत सर्व पंतप्रधान छापील भाषण वाचायचे, परंतू मोदिंचे भाषण उत्स्फूर्त होते. एबिपी माझा वर मोदींच्या भाषाणाविषयी चर्चा चालू होती तरीही लेखक अरुण साधू असे म्हणाले की मोदी सर्वांच्या टोप्या घालतात परंतू मुस्लिमांची घातली नाही. तसेच ते आणि काँग्रेसचे प्रवक्ते सावंत हे अजुनही गुजरातच्या विकासाविषयी टीका करत होते. परंतू अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले की गुजरातचा विकास झाला आहे हे काँग्रेसच्याच आयोगाने सांगितले आहे. अरुण साधू आणखी म्हणाले की मोदींच्या भाजपला ४०% मतदारांनी मते दिली आहेत याचा अर्थ ६०% मतदार त्यांच्या विरोधात आहेत. यालाही धर्माधिकारी यांनी खुप मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले की आपली निवडणूक प्रक्रियाच अशी आहे की ज्याला अधिक मते तोच निवडून येतो. नेहरू किंवा इंदिरा गांधी यांनाही ४१-४२% पेक्षा अधिक मते कधी पडली नाहीत. अरुण साधू सारखे लोक अजूनही मोदींचा आंधळा विरोध करत आहेत याला काय म्हणावे? खरच हे डोळ्यांना झापड लावलेले विचारवंत आहेत.

    ReplyDelete