Sunday, August 17, 2014

जातीयवादी एकलव्य आणि सेक्युलर द्रोणाचार्य



शीर्षक वाचले तरी अनेकांच्या भुवया कपाळात घुसणार याची खात्री आहे. किंबहूना म्हणूनच असा उपरोधिक मथळा दिलेला आहे. कारण त्यातला संदर्भ खुप नेमका व तितकाच सूचक आहे. ज्या द्रोणाचार्यांनी कुरू वंशातील उच्चवर्णिय राजकुमारांना ज्ञानदान केले, पण कनिष्ठ जातीचा म्हणून एकलव्याला शिकवायचेच नाकारले होते, त्यावर हल्लीच्या जमान्यातही चर्चा होत असते. जातीभेद वा जातीवर्चस्व दाखवण्यासाठी एक संदर्भ म्हणून त्या गोष्टीचा उदारमतवादी वा सेक्युलर मंडळी आग्रहाने वापर करीत असतात. पण त्यापासून जो बोध इतरेजनांना द्यायचा त्यांचा प्रयास असतो, तो बोध त्यापैकी किती पुरोगामी स्वत: घेतात, यावर मात्र प्रश्नचिन्हच लागलेले असते. द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिकवायचे नाकारले, हा तर सामाजिक भेदभाव होताच. पण ज्याला आपण शिकवलेही नाही, त्याच्याकडे पुन्हा गुरूदक्षिणा मागून त्याची घोर फ़सवणूक केली, असाही एक घटक ही पुराणकथा सांगण्यामागे असतो. त्यातला अन्यायच सूचित करायचा असेल आणि तसा अन्याय झुगारण्याची आकांक्षाच असेल, तर मग आपण द्रोणाचार्य होऊ नये, याचीही काळजी अशा पुरोगामी लोकांनी घ्यायला हवी ना? म्हणजे आपणही अशीच कुणाची फ़सवणूक व शोषण करू नये, इतकी अपेक्षा अशा पुरोगामी पंडितांकडून करणे गैर ठरेल काय? कुठली गुरूदक्षिणा द्रोणाचार्यांनी मागितली होती? आपला लाडका शिष्य अर्जुनापेक्षा जगात कोणी उत्तम धनुर्धर शिल्लक राहू नये, म्हणून त्यांनी एकलव्याकडे अंगठा कापून मागितला होता. धनुर्धराने अंगठा कापणे म्हणजे आपल्यातला धनुर्धरच मारून टाकणे होय. थोडक्यात एकलव्याने आपली गुणवत्ता कौशल्यच बळी द्यावे; अशी ती मागणी होती. आणि कशाच्या बदल्यात अशी मागणी केली? जे कार्य गुरू म्हणून केलेच नाही, त्याची किंमत म्हणून केलेली ती मागणी होती.

स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी भाषण केले वा आपल्या धोरणांचे विवेचन केले. त्यासंदर्भात ज्या चर्चा चालू आहेत, त्याकडे बघितले मग मोदींकडून अपेक्षा बाळगणारे त्याच ‘लबाड’ द्रोणाचार्याचे वंशज वाटतात. कारण यात बहुतांश मोदींच्या विरोधात अखंड अपप्रचार केलेले किंवा त्यांच्या अपयशाचीच मनोमन प्रार्थना करणार्‍यांचा समावेश आहे. मात्र त्याउप्परही मोदी यशस्वी झाल्यानंतर ही मंडळी त्याच मोदींकडून ‘अपेक्षा’ व्यक्त करत सुटली आहेत. हा माणूस पंतप्रधान होऊ नये व त्याच्या हाती सत्तासुत्रेच जाऊ नयेत, यासाठी तुम्ही प्रयत्नशील होता, त्याच्यापासून तुम्ही कुठल्या तोंडाने अपेक्षा बाळगू शकता? त्या अपेक्षा बाळगणे म्हणजे द्रोणाचार्याने मानभावीपणे एकलव्याकडून गुरूदक्षिणाच मागण्यासारखे नाही काय? स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात मोदींनी भगवा फ़ेटा कशाला परिधान केला? तो करायला नको होता. त्यांनी धार्मिक दंगे या विषयावर अमूक बोलायला नको होते. त्यांनी नेहरूंचे वा आणखी कोणाचे नाव घ्यायला हवे होते. नियोजन आयोगाला तिलांजली देऊन समाजावादाला गाडायला नको. शेकडो तक्रारी वा अपेक्षा आहेत. पण हे सर्व मोदींनी कशाला करायला करायला हवे? त्यांच्याकडून अपेक्षा बाळगताच कशाला? ज्याच्यामुळे देशाचा विनाश होईल, अशा शापवाणी उच्चारण्यातच ज्यांचे आयुष्य गेले, त्यांनी त्याच विनाशपुरूषाकडे कसलीही अपेक्षा बाळगणेच गैर नाही काय? किंबहूना त्यांना असा अधिकार दिलाच कोणी? ज्या द्रोणाचार्याच्या नावाने अहोरात्र विषमतेचे पांडित्य ही मंडळी सांगतात, त्यांनी स्वत:च त्याचे ‘निषेधार्ह’ अनुकरण करावे काय? ज्यांनी मोदींच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या किंवा सहाय्य केले, त्यांचे अपेक्षा बाळगणे समजू शकते. पण ज्यांनी मोदींना शापच दिले, त्यांनीच मोदींकडून हक्काने अपेक्षा बाळगणे किंवा अपेक्षाभंग झाल्याच्या तक्रारी करणे शुद्ध मानभावीपणा नव्हे काय?

मोदी म्हणजे हिंदूत्ववादी आणि त्यांनी पंतप्रधान झाल्यावर मात्र आपल्या हिंदूत्ववादाला तिलांजली दिली पाहिजे. किती अजब अपेक्षा आहे ना? याचा साधासरळ अर्थ असा, की मोदींनी ज्या बळावर इतके मोठे यश मिळवून अजिंक्य होऊन दाखवले, तो अंगठाच या सेक्युलर द्रोणाचार्यांना कापून हवा आहे. त्यांच्या अपेक्षा मोदी पुर्ण करायला गेलेच तर काय होईल? ज्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या बळावर मोदींनी इतके मोठे यश संपादन केले आहे, तोच तर मोदींचा ‘अंगठा’ आहे. आता मोदीं अपुर्व धनुर्धर झालेच आहेत, तर त्यांना आपला शिष्य म्हणून मान्यता द्यायला हे भंपक द्रोणाचार्य पुढे सरसावले आहेत. मात्र त्याच्या बदल्यात मोदींनी आपले सर्वस्व यांच्या पायावर अर्पण करून आत्मघात करावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र हा नवा एकलव्य असल्या द्रोणाचार्यांना चांगला ओळखून आहे. म्हणूनच तो त्यांना अंगठा कापून देण्यापेक्षा ‘अंगठा’ दाखवतो आहे. सहाजिकच अशा पाखंडी आचार्यांचा तिळपापड झाला आहे. त्यामुळे मग लालकिल्ला येथील भाषणातले दोष दाखवण्याची स्पर्धा चालली आहे. कारण हा एकविसाव्या शतकातला एकलव्य नुसता अंगठा दाखवून थांबलेला नाही, तर सेक्युलर पाखंडाला उखडून टाकत पुढे पुढेच सरसावतो आहे. त्याने सेक्युलर पाखंड व दांभिकतेची पाळेमुळेच खणून काढायची मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे ही सेक्युलर आचार्य मंडळी कमालीची विचलीत होऊन गेली आहे. कालबाह्य व निरूपयोगी ठरलेल्या नियोजन आयोगाला यापुर्वीच बरखास्त करायला हवे होते. पण ते काम हाती घेण्याचा इशारा मोदींनी आपल्या भाषणातून देताच, या सेक्युलर वर्चस्ववाद्यांची तारांबळ उडाली आहे. त्यातून त्यांना नेहरूवादाचा खात्मा होताना दिसू लागला आहे. समाजवाद गाडला जाण्याच्या भितीने पछाडले आहे. त्यामुळेच मग अच्छे दिन कधी येणार, कुठे आहेत, असले शेलके सवाल इतक्या लौकरच विचारले जात आहेत.

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी झाली, त्याला स्वातंत्र्यदिनी नेमके तीन महिने पुर्ण झाले. त्याच दिवशी देशातले सत्तांतर झालेले नसले तरी तथाकथित सेक्युलर सत्तेची गुढी उतरण्यावर शिक्कामोर्तब १६ मे रोजी झाले होते. त्यानंतर गेल्या तीन महिन्यात काय काय झाले? मोदी सरकारने काय केले, असे सवाल करणार्‍यांना खरेच किती व कोणता बदल झाला, हे जाणून घ्यायची इच्छा आहे काय? तशी प्रामाणिक इच्छा असती, तर त्यांनाही कोणते व कुठे बदल होत आहेत, ते बघता आले असते व दिसले असते. किंबहूना त्यांनाही नेमके कोणते बदल होत आहेत, त्याची पुर्ण जाणिव आहे. पण हे बदल नेमके त्यांच्याच पाखंडी दांभिकतेवर आघात करणारे असल्याने त्याविषयीची माहिती दडपली वा लपवली जात आहे. देशातली महागाई, भ्रष्टाचार वा गैरकारभार यांना रोखण्यासाठी मूलभूत पावले उचलली गेली आहेत, त्याबद्दल माहिती द्यायची कोणी? माध्यमांनीच ती दिली पाहिजे ना? पण ती माहिती दडपून हेच द्रोणाचार्य नसते सवाल विचारून लोकांनी दिशाभूल करण्यात कशाला गर्क आहेत. आपले कर्तव्य विसरून मोदींना त्यांच्या कर्तव्याचे डोस पाजायचा कांगावा चालू आहे. कारण हेच सेक्युलर पाखंडी लोक भ्रष्टाचारावर पोसलेले आहेत आणि त्यांच्यावरच नव्या सरकारच्या कारवाईचा घाला आलेला आहे. त्याविषयीच्या बातम्या देणार तरी कशा? त्यापेक्षा मग एकलव्य दगाबाज निघाला आणि तो गुरूदक्षिणा देत नसल्याचा गदारोळ केला जात आहे. असले द्रोणाचार्य किती भंपक असतात, त्याचा एक नमूना योंगेंद्र यादव आणि राजदीप सरदेसाई अशा दोन बुद्धीमंतांच्या प्रतिक्रियेतून मिळू शकतो. सरदेसाई म्हणतात, मोदींनी मोठ्या संकल्पना मांडल्या, पण अंमलबजावणी कधी व्हायची? तर त्याच भाषणावर यादव म्हणतात, उस्फ़ुर्त भाषण मस्तच, पण त्यात मोठ्या संकल्पनांचा दुष्काळ होता. ही असल्या भंपक विद्वानांची ‘एकवाक्यता’. एकाच भाषणात एकाला भव्य संकल्पना दिसते आणि दुसर्‍याला संकल्पनांचा दुष्काळ आढळतो. वास्तवात मोदींनी सत्ता हाती येताच यांची भ्रष्ट पाळेमुळे खणायला घेतली आहेत. कशी ते उद्या तपासू या.

3 comments:

  1. भाऊ, शिर्षक वाचून भुवया कपाळात घुसल्या असतीलच परंतू पूर्ण लेख वाचून दुसरेच काहीतरी कपाळात गेले असेल यात अजीबात शंका नाही. भाऊ आता अशा 'सेक्युलर द्रोणाचार्याँना कोणीही विचारत नाही. बाकी एकलव्य हुशार निघाला यातच आनंद आहे.

    ReplyDelete
  2. मोदी सरकार वर दुगाण्या झाडणाऱ्या लंबकर्णांची पोलखोल झाली आहे...

    ReplyDelete
  3. 15% अल्पसंख्यांक (?) लोकांच्या भावना जपण्यासाठी 85% बहुसंख्याकांनी त्यांच्या भावना दुखवून घ्याव्या (?) एवढ्यावरच "एकलव्य" जातियवादी कसा?
    ज्या देशाचे शत्रु आणि विचारवंत (?) मंडळी एकाचवेळी कांगावा करतील त्यावेळी तो देश प्रगती करतोय असंच समजावं... या आचार्य चाणक्यांच्या विचाराचीही आज आठवण होतेय!

    ReplyDelete