Monday, August 18, 2014

अच्छे दिन येण्याची ही चाहुल नाही काय?आसाराम बापू, मोहन भागवत, सलमान खुर्शिद वा विजय भटकर अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींनी काही बोलले, मग त्यांच्या प्रदिर्घ भाषण वा वक्तव्यातील एखादे वाक्य काढून काहूर माजवले जाण्याचा जमाना वाहिन्यांनी सुरू केला आहे. त्यातून धुरळा खुप उडतो, पण हाती काहीच लागत नाही. कारण ज्यांनी हा धुरळा उडवलेला असतो, त्या मुर्खांना आजकाल अविष्कार स्वातंत्र्याचे पुरोहित मानले जाते. त्यामुळे त्यांनी काहीही बडबडावे आणि लोकांनी त्यालाच मंत्रोच्चारीत पूजाअर्चा मानावे अशी स्थिती आलेली आहे. असल्या गदारोळात मुळात तो माणूस काय बोलला व कशा अर्थाने बोलला, त्याबद्दल संपुर्ण अनभिज्ञता असते. त्यात मग सामान्य माणसे फ़सतात किती माहित नाही, पण स्वत:ला बुद्धीमान व विचारवंत म्हणणारे मात्र अलगद घुसमटतात. म्हणून तर भटकरांना लेख लिहून या मुर्खपणावर प्रकाश टाकायची वेळ येते. त्याचे प्रमुख कारण, माध्यमांचा अफ़ाट विस्तार हेच आहे. एक अभ्यासक्रम पुर्ण केला म्हणजे त्या साच्यातून बाहेर पडणारा, विनाविलंब सर्वज्ञ झाल्यासारखा मोकाट मुर्खपणा करू लागतो. त्याचे हे दुष्परिणाम आहेत. त्यातून मग चुकीच्या माहितीवर ठाम मत मांडणार्‍या अर्धवटरावांचे प्रचंड पिक आलेले आहे. पत्रकारिता वा बातमीदारीतली मूळ बाबच त्यापैकी सगळे विसरून गेलेत. ‘रिडीग बिटविन द लाईन्स’ म्हणजे छापलेल्या वा बोललेल्या ओळींच्या मधल्या मोकळ्या जागेत अव्यक्त राहिलेला आशय वाचता येतो त्याला बातमीदार म्हणतात. याचाच आजकाल सर्वांना विसर पडला आहे. संदर्भ सोडून मग वडाची साल पिंपळाला लावायचा उद्योग अहोरात्र चालू असतो. सहाजिकच खरी बातमी अनुल्लेखाने मारली जाते आणि बातमी नसते, त्यावरून मात्र काहूर खुप माजते. पण पत्रकारांनाच डोळ्यासमोर दिसणारी बातमी बघता येत नाही, की वाचता येत नाही.

गेल्या दोनतीन महिन्यात देशात सत्तांतर झाले आहे आणि अच्छे दिन कुठे आलेत, असा सवाल त्याच मुर्खपणामुळे पत्रकारच विचारत असतात. डोळसपणे निदान पत्रकारांना तरी बदल बघता आले पाहिजेत ना? देशातल्या पहिल्या खाजगी वृत्तवाहिनीचा मान मिळवणार्‍या तेव्हाच्या ‘स्टारन्युज’ व आजच्या ‘एनडीटीव्ही’ वाहिनीची समुह संपादक बरखा दत्त हिचीच गोष्ट घ्या. कालपरवा ट्विटरवर तिने व्यक्त केलेली अपेक्षा एक मोठी सनसनाटी बातमी आहे. पण तिकडे कोणी ढुंकूनही बघितलेले नाही. खर्‍या पत्रकार बातमीदाराला त्यातली बातमी वाचता आली पाहिजे. त्या बातमीचा पाठलाग पाठपुरावा करता आला पाहिजे. तरच मग मागल्या दोनतीन महिन्यात काय व कुठे बदलते आहे, त्याचा सुगावा लागू शकेल. ६ ऑगस्ट २०१४ रोजी बरखा आपल्या ट्विटर खात्यात लिहीते, ‘एअर इंडिया वन या पंतप्रधानांच्या प्रवासी विमानात पत्रकारांना फ़ुकट फ़िरवायचे नाही, या पंतप्रधान कार्यालयाच्या निर्णयाला मी मन:पुर्वक पाठींबा देते. पण त्याच विमानातून पत्रकारांना त्यांच्या स्वखर्चाने परदेशी घेऊन जायला काय हरकत आहे?’ ही काय भानगड आहे? नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून परदेशी दौर्‍यात आपल्या सोबत फ़क्त सरकारी दूरदर्शनच्या प्रतिनिधीला नेलेले आहे. त्याखेरीज कुठल्याही खाजगी माध्यमांच्या प्रतिनिधीला सोबत घेतलेले नाही. आजवर अशा कुठल्याही दौर्‍यात दिडदोनशे पत्रकारांना फ़ुकटातली परदेशवारी उपभोगता येत होती. संपादक वा ज्येष्ठ पत्रकारांची त्यात मक्तेदारी असायची. विमानभर असे पत्रकार भरलेले असायचे. मोदींनी हा प्रघात बंद पाडला. जनतेच्या पैशाने चालू असलेली पत्रकारांची चैन बंद करून टाकली. भूतान, नेपाळ वा ब्रिकच्या निमीत्ताने ब्राझीलच्या दौर्‍यावर गेलेल्या मोदींनी कुठल्याही भारतीय पत्रकारांना सोबत घेतले नाही. सहाजिकच दिल्लीतल्या बड्या प्रस्थापित पत्रकारांचा ‘युनायटेड स्टेटस’ घसरला आहे.

बरखा दत्त त्यामुळेच व्याकुळ झालेली आहे. सरकारी खर्चाने नाही तर आमच्याच खर्चाने आम्हाला पंतप्रधानाने सोबत घेऊन जावे, असे ही महिला काकुळतीला येऊन जाहिरपणे विनवते आहे. मोदी वा देशाचा पंतप्रधान परदेशी दौर्‍यावर जाणार असेल, तर त्याविषयीच्या बातम्या दिल्या जाऊ नयेत, असा मोदींचा हट्ट आहे काय? त्यांनी अविष्कार स्वातंत्र्य वा पत्रकारीतेचा गळा घोटलेला आहे काय? आपल्याविषयी बरेवाईट प्रसिद्ध होण्याच्या भयाने मोदींनी अशी मुस्कटदाबी केलेली आहे काय? बरखाचे ट्वीट वाचल्यास तसे दिसत नाही. कारण सरकारी विमानातून जनतेच्या पैशाने पत्रकारांच्या चैनबाजीला लगाम लावण्याचे बरखा स्वागतच करते आहे. मग तक्रार कसली आहे? अशा वाहिन्या वा वृत्तपत्रांची स्वखर्चानेही परदेशी जाण्याची तयारी आहे. खर्चाचा भुर्दंडही त्यांना वाटत नाही. मग त्यांना परदेशी जाण्यापासून कोणी रोखले आहे? मोदी वा त्यांच्या सरकारचा कोणी मंत्री परदेशी दौर्‍यावर जात असेल, तर या पत्रकारांना कोणी रोखलेले नाही की पैशाचीही अडचण नाही. मग समस्या काय आहे? त्यांना परदेशी अन्य कुठल्या विमानातून जायचे नाही, तर मंत्री वा पंतप्रधान जातात, त्या ‘एअर इंडिया वन’ याच विमानातून जाता येत नाही, अशी तक्रार आहे. मग सवाल असा, की त्याच विमानातून कशाला? तर त्याचा अर्थ साफ़ आहे, त्यांना सरकारी पाहुणे म्हणून येजा करायची आहे. ज्या लव्याजम्यामध्य सरकारी अधिकारी वा राज्यकर्त्यांचे निकटवर्तिय असतात, त्या गोतावळ्यात घुसखोरी करायची मोकळीक संपली आहे. अशा गोतावळ्यातून फ़िरल्याने पत्रकारितेला कसले वजन येते? कोणती झळाली येते? चौथा खांब कशाला प्रभावी होतो? तर मग तिथून सरकार, राज्यकर्ते आणि माध्यमे यांच्यातले साटेलोटे सुरू होत असते. राज्यकर्ते व अधिकारी यांच्यात नाते अशी एक जवळीक निर्माण होते. त्या जवळीक व मोकळीक यांना मोदींनी आल्या आल्या वेसण घातली आहे.

अशा जवळीक होण्यातून काय काय होते? या प्रश्नाचे उत्तर खरे तर बरखानेच द्यायला हवे. ती देत नाही म्हणून त्याचे उत्तर अन्यत्र शोधावे लागते. त्याचे उत्तर मग आपल्याला २ जी घोटाळ्यात सापडते. २००९ च्या लोकसभा निवडणूकीनंतर युपीए-२ हे सरकार बनवले जात होते, तेव्हा त्यात कुणाला सह्भागी करून घ्यावे आणि कोणाला कुठले मंत्रालय द्यावे, याची खुली सौदेबाजी चालू असल्याचा बोभाटा नीरा राडीया टेप्समधून जगासमोर आलेला होता. ही नीरा राडीया सरकारमध्ये कुठली मंत्रालये कोणाला द्यावीत, यासाठी उद्योगपती भांडवलदारांच्या वतीने सौदेबाजी करीत होती. त्यासाठी तिने बरखा दत्त हिच्यासारख्या ‘नावाजलेल्या’ पत्रकारांना आपले दलाल म्हणून वापरले होते. प्रभू चावला, वीर संघवी असे करताना सापडले आहेत. अशा पत्रकारांना बातमीदारी करण्यापेक्षा कोणत्या कामात रस असतो, त्याचा खुलासा नीरा राडीया टेप्समधून होतो. बरखाचे तेच दुखणे आहे. पत्रकारिता वा बातमीदारी स्वखर्चाने अन्य विमानातून परदेशी वारी करूनही साधली जाऊ शकते. पण सरकारी अधिकार पदांची सौदेबाजी करण्यासाठी लागणार्‍या दलालीत त्या पत्रकारितेचा उपयोग नसतो. तिथे राज्यकर्ते व अधिकारी यांच्याशी व्यवसायापलिकडली जवळीक असावी लागते. ती जवळीक अशा सरकारी लव्याजम्यात मिसळता आले, तरच शक्य असते. गेल्या तीन महिन्यात सत्तांतरानंतर मोदींनी नेमकी तीच जवळीक तोडली आहे. राज्यकर्ते, अधिकारी व पत्रकारांचे जे भ्रष्ट साटेलोटे गेली कित्येक वर्षे चालू आहे, त्याच्या मूळावरच मोदींनी आल्या आल्या घाव घातला आहे. म्हणून बरखाला बातमीदारीसाठी सरकारी विमानात फ़ुकट यायचे नाही, तर सत्ताधार्‍यांच्या लव्याजम्यात घुसून दलाली करायची मुभा हवी आहे. कुणा पत्रकाराला त्या ट्वीटचा शोध घ्यावा असे का वाटू नये? भ्रष्टाचारमुक्ती अशी सुरू झाली असेल, तर त्यात अच्छे दिन येण्याची शक्यता का दिसू नये? (अपुर्ण)

6 comments:

 1. नेहमी सारखाच अप्रतिम.....
  Reading Between the lines .... precise description.

  ReplyDelete
 2. It is far-fetched logic. If a journalist and an officer want to establish relationship they have many opportunities to do so, and particularly if it is mutually beneficial they find ways to do it. Tour on PM's plane is not the only opportunity. What Barkha said is on the basis of practice in US, where journalists travelled with President on Air Force One and later US govt sends bills to all media organisations. Travelling on that flight gives an opportunity to journalists to have an insight into government;s thinking on issues related to that tour.

  ReplyDelete
  Replies
  1. We can Understand and analyse English, Marathi, Hindi, News.
   In USA officially Lobbying is allowed. While in India for Fair dealing It's not allowed.
   Just stop comparisons , USA is different Country and India Is different.

   Please No - Nonsense support for Even Paid Travel Via AIR INDIA ONE.

   लग्नाला जायचेय तर आमंत्रण आहेच मग नवरदेवाच्या कार मधूनच कशाला ???
   तुमच्या खर्चानेच जायचेय तर तुमची कार तुम्ही आणा , फुकट मिरवून का घेताय !!!

   Delete
 3. MediaPerson, We can Understand and analyse English, Marathi, Hindi, News.
  In USA officially Lobbying is allowed. While in India for Fair dealing It's not allowed.
  Just stop comparisons , USA is different Country and India Is different.

  Please No - Nonsense support for Even Paid Travel Via AIR INDIA ONE.

  लग्नाला जायचेय तर आमंत्रण आहेच मग नवरदेवाच्या कार मधूनच कशाला ???
  तुमच्या खर्चानेच जायचेय तर तुमची कार तुम्ही आणा , फुकट मिरवून का घेताय !!!

  ReplyDelete
 4. नवरदेवाची कार सुद्धा नव्हे तर घोडी वर बसायला उतावीळ पत्रकार खरपूस बातम्या हुंगायला अशा विदेश वारीत वर्णी लावायची सोय शोधू पाहतात असे वाटते...

  ReplyDelete
 5. आता फुकटात मिरवता येणार नाही.

  ReplyDelete