Wednesday, August 20, 2014

अमित शहांच्या मनसुब्याच्या निमीत्ताने

 

अमित शहा यांनी भाजपाच्या नेत्यांना मुंबई काबीज करण्यासाठी तिथला शिवसेनेचा वरचष्मा संपवण्याचा सल्ला दिला. अधिक महाराष्ट्रात भाजपाचा प्रभाव वाढवण्याचाही कानमंत्र दिला अशी ‘सुत्रांची’ बातमी प्रसिद्ध झाली आहे. ती खरी असेल तर काय होईल? काय व्हावे? माझे प्रामाणिक मत विचाराल तर भाजपा आणि शिवसेना यांनी स्वतंत्रपणे लढावे असे मला वाटते. कारण त्यामुळे त्या दोघांचे कुठलेही नुकसान होण्याची बिलकुल शक्यता सध्या तरी नाही. अगदी भाजपा व सेनाच नव्हेतर कॉग्रेस व राष्ट्रवादी यांनीही स्वबळाची खातरजमा करून घ्यायला उत्तम संधी यावेळी आहे. म्हणजे तक्रारीला जागा उरणार नाही आणि प्रत्येकाला आपली खरी शक्ती अनुभवायला मिळेल. असे म्हटले, की राष्ट्रवादी व कॉग्रेस यांचे कट्टर विरोधक अस्वस्थ होतील, याचीही मला खात्री आहे. कारण त्यातले सेनावाले वा भाजपावाले यांना कितीही आपापल्या पक्षाची खुमखुमी असली, तरी त्याहीपेक्षा त्यांना पुन्हा कॉग्रेस आघाडी सत्तेवर यायला नको आहे. सहाजिकच कसेही होवो आणि दोन्ही युती पक्षात समझोता होवो, अशीच त्यांची सुप्त इच्छा असणार हे मी जाणतो. तसा मी व्यक्ती म्हणून आघाडीचा विरोधक आहे. म्हणूनच पुन्हा आघाडी वा कॉग्रेस सत्तेवर येऊ नये, असे माझेही व्यक्तीगत मत आहे. पण राजकीय विश्लेषण करताना भावनेपेक्षा वास्तवाला महत्व असते. म्हणूनच माझ्या भावनेला बाजूला ठेवून मी नेहमी विश्लेषण करतो किंवा तिचे आकलन करायचा काटेकोर प्रयत्न करतो. हे खरे असेल तर युती मोडून आघाडी सत्तेवर येण्याचा धोका मला मान्य होईल काय? अजिबात नाही. पण तसा धोकाच नसेल, तर युती पक्षांनी वेगवेगळे लढायला काय हरकत आहे? अगदी युतीपक्ष परस्परांच्या विरोधात लढले आणि दोन्ही कॉग्रेस एकत्रितपणे लढले, तरी कुणालाच बहूमत मिळणार नाही, याविषयी माझी खात्री आहे. शिवाय एकत्रित लढूनही दोन्ही कॉग्रेस शंभरीही गाठू शकत नाहीत, याबद्दलही मी ठाम आहे. कारण पक्षांना, नेत्यांना वा त्यांच्या समर्थकांना काय वाटते; त्यापेक्षा सामान्य जनतेला काय वाटते त्यानुसार निवडणूकीचे निकाल लागत असतात.

यावेळी सामान्य मतदाराला कुठल्याही परिस्थितीत कॉग्रेस राष्ट्रवादीला सत्तेवरून खाली खेचायचे असेल, तर लोक काय करतील याचा विचार म्हणूनच मोलाचा आहे. ज्यांनी आघाडीला पराभूत करावे अशी जनतेची इच्छा असेल, त्यांनीच तो समजूतदारपणा दाखवला नाही, तर निर्णय जनतेला स्वत:च घ्यावा लागत असतो. मतदार तसा निर्णय घेतोही. १९९५ सालात युती आजच्या इतकी मजबूत नव्हती. पण शरद पवारांना घरी बसवायचा निर्णय मतदाराने घेतला होता आणि त्याने कुठल्याही समिकरणाने पवार सत्तेपर्यंत पोहोचू नयेत, असेच निकाल दिले होते. त्याचीच पुनरावृत्ती कालच्या लोकसभा निवडणूकीत झाली. आम आदमी पक्ष वा मनसे यांनी वेगळी चुल मांडली, तरी त्यामुळे आघाडीच्या पराभवाला खीळ बसू नये असे मतदान झाले ना? तसेच आताही विधानसभेत युती पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले, तरी त्यांना निकालानंतर एकत्र यावेच लागेल, अशी स्थिती मतदार निर्माण करू शकतो. म्हणजे असे, की कुठल्याच पक्षाला बहूमत नसले तरी आघाडी अन्य कुणाच्याही मदतीने सत्तेपर्यंत पोहोचू नये, असेच निकाल मतदार देणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. सहाजिकच निकालानंतर सत्तेसाठी भाजपा व शिवसेनेला एकत्र यावेच लागेल. त्या दोघांची बेरीज किमान दिडशेच्या पुढे गेल्यास त्यांच्यासमोर कुठला पर्याय शिल्लक उरेल? एकवेळ राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र यायचे ठरवले, तरी त्यांची बेरीज भाजपा व कॉग्रेसच्या बेरजेपेक्षा कमी असेल, तर सेना-राष्ट्रवादी असेही समिकरण जमू शकणार नाही. दुसरीकडे भाजपा कॉग्रेस यांची बेरीज बहूमताचा आकडा पार करणारी असली, तरी त्यांना सत्तेसाठी एकत्र येणेच अशक्य आहे. सहाजिकच कुठूनही सेना-भाजपालाच एकत्र यावे लागेल. म्हणजेच युतीची सत्ता ठरलेली आहे. एकत्रित निवडणूक लढा किंवा एकमेकांच्या विरोधात लढा, तुम्हाला निकालानंतर एकत्र यावेच लागणार आहे. मग त्यांनी महाराष्ट्रात मोठी ताकद कोणाची त्याची परिक्षा यावेळी देण्यात कसला धोका आहे? नेहमी कुरकुरत बसण्यापेक्षा एकदा त्याचा थेट जनतेकडून सोक्षमोक्ष लावून घ्यायला काय हरकत आहे?

समजा असेच झाले, तर मतविभागणीचा तोटा युती पक्षांना व लाभ आघाडीतल्या पक्षांना होणार नाही काय? सर्वसाधारण असेच होते ही समजूत आहे. अनेकदा तसेच झालेले आहे. पण जेव्हा लोकमत एखाद्या सत्ताधार्‍याच्या विरोधात टोकाला गेलेले असेल, तर मतदार अतिशय सावधपणे आपली निवड करीत असतो. आपल्याला हव्या त्या पक्षाला मत देण्यात त्याचा पुढाकार असतोच. पण जिथे त्याला हवा असलेला पक्ष खुपच दुर्बळ असेल आणि नको असलेल्या पक्षाच्या यशाची शक्यता असेल, तेव्हा त्या मतदाराचा कल बदलत असतो. पक्षासाठी सकारात्मक असलेला तोच मतदार नकारात्मक होऊन, नको त्या पक्षाला पाडायला कौल देतो. म्हणजे नकोश्या पक्षाच्या उमेदवाराला लाभ मिळू नये, अशा विरोधातील उमेदवाराला मत देतो. याचा अर्थ असा, की समजा सेना व भाजपा परस्परांच्या विरोधात उभे ठाकले, तर मतदार भले शिवसेना किंवा भाजपाचा समर्थक असेल. पण जिथे भाजपाची फ़ारशी ताकद नाही आणि त्याला मत दिल्याने कॉग्रेस राष्ट्रवादीला लाभ होऊ शकेल, तिथला भाजपावादी मतदार सेना बलवान असल्यास त्या उमेदवाराला मत देतो. तसेच उलटही होऊन सेना बलवान नसलेल्या जागी सेनेचा मतदार भाजपाला मत देतो. कारण त्याचे प्राधान्य पक्षापेक्षा नकोश्या पक्षाला पाडण्यात अधिक असते. महाराष्ट्रात यावेळी लोकांना युतीपक्षांच्या प्रेमापेक्षा आघाडीला पराभूत करण्याची ओढ अधिक आहे. म्हणूनच मग त्या पक्षांनी मुर्खपणा केला, तरी लोक तारतम्याने कुठल्यातरी युतीपक्षाला कल देणार. उदाहरणार्थ मुंबईच्या गिरणगाव, मध्यमुंबईत भाजपा उमेदवाराला त्याच पक्षाचे मतदार मते देण्यापेक्षा सेनेला कौल देतील. उलट बोरीवली, डोंबीवली कल्याणमध्ये सेनेचाही मतदार भाजपालाच कौल देईल. असेच मुस्लिम मतदार सातत्याने करीत आला आहे. त्याला नको असलेल्या भाजपाला पाडणार्‍या मजबूत उमेदवाराला मुस्लिम कौल देतात. यावेळी उत्तरेतील अनेक राज्यात बिगर मुस्लिमांनी त्यांचेच अनुकरण केले आणि कुठल्याच पक्षाचा मुस्लिम उमेदवार निवडून येऊ नये असे तिथे मतदान झाले.

सोळाव्या लोकसभा निकालांनी दिलेला हा धडा आहे. मतदार नुसता आपल्या लाडक्या पक्षाला निवडून आणत नाही, तर नको असलेल्या पक्षाला टिपून पराभूत व्हायची बेगमी करतो, असा तो धडा आहे. तो धडा कॉग्रेस राष्ट्रवादी शिकलेले नाहीत वा त्यांची शिकायची तयारी नाही. पण भाजपा-सेना तरी कुठे शिकायला राजी आहेत? पण युती पक्ष तो शिकले नाहीत, तरी त्यांना पाडायची लोकांची इच्छा नसेल व आघाडीच्या तावडीतून सुटायला लोक उत्सुकच असतील, तर युती पक्षांनी आपापल्या बळाची परिक्षा घेऊन टाकायला काय हरकत आहे? एकदा तो सोक्षमोक्ष लागला, मग दरवेळी त्यावरून भांडत बसण्याचे कारण उरणार नाही. कोणी कोणाला एकमेकांची औकात सांगायची वा दाखवायचीही गरज उरणार नाही. मतदारच प्रत्येक पक्षाला त्याची जागा दाखवून देतील. मात्र कसेही गणित वा समिकरण जुळवायला गेलात, तरी कॉग्रेस वा राष्ट्रवादी यांना पुन्हा सत्ता मिळणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणून अजितदादांच्या सूचनेचे मी स्वागत करतो. त्यांनी महिन्याभरापुर्वी असे म्हटले होते, एकदा काय ते प्रत्येक पक्षांनी स्वबळावर लढून घ्यावे. प्रत्येकाची ताकद स्पष्ट होऊन जाईल. खरेच सर्वच पक्षांनी त्याचा गंभीरपणे विचार करावा. निदान युती पक्षांनी त्यात पुढाकार घेऊन आपसातल्या धुसफ़ुशीला कायमचा विराम द्यावा.

1 comment:

  1. भाऊ, आपण अशा बातम्या वारंवार वाचून माझ्या सारखेच निराश झालेले दिसता. ही बातमी नक्कीच काँग्रेसने पेरलेली आहे यात काही शंका नाही. राष्ट्रवादी यात नक्कीच नसेल कारण आपण पाहिले तर मटा नेहमी राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांवरच टीका करतो. मागच्या तीन महिन्यात काँग्रेसवर फक्त एकदाच 'धावते जग' मधे टीका केली आहे. अमित शाह असेजर बोलले असतील तर ते कधीही बाहेर फूटणार नाही याची काळजी त्यांनी अवश्य घेतली असती. जो मनुष्य युपीत एवढे खासदार निवडून आणतो, ज्याची कोणालाही साधी दखलही घ्यावीशी वाटली नाही, तो मणुष्य किती संयमाने वागत असेल याची प्रचीती येते.
    मटा लागोपाठ महायुतीत भांडणे चालू आहेत याच्या बातम्या 'सूत्राकडून', 'वरिष्ठ नेता', 'ज्येष्ठ नेता' यांच्या हवाल्याने देत आहे. त्यात काही तथ्य आहे असे वाटत नाही. अमित शाहंना माहीत नसलेतरी दोनच वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे शिवसेने बरोबर असतानाही काय हाल झाले हे भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना नक्कीच आठवत असेल. त्यामुळे भाजपकडून ही आगळीक होणे शक्य नाही.

    ReplyDelete