Saturday, August 23, 2014

मुख्यमंत्र्यांचा पृथ्वीराज-शिष्टाचार


(ताठ मान अभिमान आमुच्या सह्याद्रीचे उंच कडे)

 गेल्या आठवड्याभरात पंतप्रधान विरुद्ध मुख्यमंत्री अशी जुगलबंदी रंगली आहे. अर्थात दोघांचे पक्ष भिन्न आणि एकाच व्यासपीठावर आल्यावर अशी जुगलबंदी रंगणे अपरिहार्य असते. पण त्यातली राजकीय खेळीमेळी हरवली असेल, तर त्याला आखाड्याचे रुप प्राप्त होणेही तितकेच अपरिहार्य असते. लौकरच चारपाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणूका व्हायच्या आहेत. त्या निमीत्ताने मग विविध पक्षांकडून राजकीय मुलूखगिरी सुरू झालेली आहे. त्यात मग केंद्राच्या मदतीने राज्यात उभे रहाणार्‍या प्रकल्पाचे उदघाटन सोहळे होत आहेत. अशावेळी राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्याने पंतप्रधानांचे स्वागत करणे व त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणे हा राजशिष्टाचार असतो. पण अशाच कार्यक्रमात जमलेल्या गर्दीने एका कुणाची हुर्यो उडवणे गालबोट लावणारे असते, यात शंका नाही. असे प्रकार टाळले पाहिजेत. परंतु दुसरीकडे मान्यवरांनीही त्याचे राजकीय भांडवल करू नये, असा सामाजिक शिष्टाचार आहे. भाजपा वा कॉग्रेसला त्याचे पालन करता आलेले आहे काय? हरयाणातील एका समारंभात जमलेल्या गर्दीने तिथले मुख्यमंत्री भूपींदरसिंग हुड्डा यांच्या भाषणात मोदींचा जयजयकार करीत व्यत्यय आणला. आपली हुर्यो उडवली अशी हुड्डा यांची तक्रार आहे. काहीसा तसाच प्रकार महाराष्ट्रातल्या सोलापूर येथील कार्यक्रमात झाला. मग मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूरात असलेल्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. कुठल्याही स्वाभिमानी माणसाने असे वागण्यात गैर मानता येणार नाही. पण कॉग्रेसच्या नेत्यांनी वा मंत्र्यांनी स्वाभिमानाच्या गोष्टीचे इतके अवडंबर माजवणे योग्य वाटत नाही. स्वाभिमानाशी त्या पक्षातल्या कुठल्याही नेत्याचा वा मंत्र्याचा संबंधच काय? स्वाभिमान गिळण्याच्याच अटीवर अधिकारपदे मिळणार्‍या पक्षात, कोणी स्वाभिमानाच्या गोष्टी करणे चमत्कारीकच नाही काय?

आपल्याच जनतेकडून हुर्यो उडवली गेली, म्हणून मुख्यमंत्र्याने नाराज व्हावे काय? पृथ्वीराज बाबा चव्हाणांचा तसा महाराष्ट्राशी संबंध कमीच येतो. ते कायम दिल्लीच्या राजकारणत रमले. योगायोगाने आधीचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या गडबडीमुळे पृथ्वीराज बाबांना इथे राज्यात यावे लागले. गेल्या विधानसभा निवडणूका अशोक चव्हाण यांनी पक्षाला जिंकून दिल्या होत्या. मग राज्याचा ‘आदर्श’ कारभार चालवताना काही सह्या चुकल्या. म्हणून त्यांना सत्ता सोडावी लागली. तेव्हा त्यांच्याजागी बदली मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज बाबा आले. अशा अशोक चव्हाणांचा किती सन्मान त्या विधानसभा निवडणूकीपुर्वी झाला होता ते म्हणूनच बाबांना माहिती नसावे किंवा आठवत नसावे. कॉग्रेस पक्षाचा नेता, मंत्री वा मुख्यमंत्री म्हणजे किती सन्मानाची बाब असते, त्याची स्वाभिमानी गोष्ट आज अनेक राजकीय अभ्यासकही विसरून गेलेत, म्हणून जुन्या आठवणी चाळणे अगत्याचे ठरावे. तेव्हा पक्षाने उपाध्यक्ष पदावर बसवले नसताना निव्वळ सरचिटणिस म्हणून राहुल गांधी मुंबईच्या दौर्‍याला आलेले होते. तिथे त्यांनी अनेक तरूणांशी संवद साधला होता, भेटीगाठी घेतल्या होत्या. मग त्यांनी घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरला भेट देण्याचा बेत केला. अकस्मात त्यांना पार्ला येथून घाटकोपरला न्यायचे तर हेलिकॉप्टरही सज्ज ठेवण्यात आलेले होते. पण राहुलना सामान्य मुंबईकर जसा प्रवास करतो, तसा लोकल प्रवास करायची अनिवार इच्छा झाली. तेव्हा पार्ला ते दादर व तिथून दादर ते घाटकोपर अशी वरात निघाली होती. अशावेळी गर्दीच्या वेळेत मुंबईकरांचे काय हाल झाले ते बाजूला ठेवू या. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांचा किती सन्मान झाला ते बघूया. राहुलच्या स्वागताला अशोकराव कधीचे रमाबाई नगरात येऊन ताटकळत बसले होते. पण त्यांचाच पत्ता नाही म्हणून मुख्यमंत्र्यांना माशा मारत बसावे लागले होते.

तिथे पोहोचलेल्या राहुल गांधींनी अर्थातच गरीब रहिवाश्यांशी बातचित केली. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि बौद्धविहाराला भेट दिली होती. विहाराचे पावित्र्य जपण्यासाठी राहुलनी पायातल्या वहाणा बाहेरच काढून ठेवल्या होत्या. ते तिथून बाहेर पडले, तेव्हा तमाम ‘स्वाभिमानी’ कॉग्रेसजनांची आपापला सन्मान राखून घेण्यासाठी झुंबड उडाली होती. पण अखेरीस तो मान तात्कालीन गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनाच मिळाला. महाराष्ट्राच्या त्या स्वाभिमानी कॉग्रेसमंत्र्याने आपल्या हाताने राहुलच्या पायात पादत्राणे सरकवली आणि राज्याच्या अकरा कोटी जनतेचा ऊर किती अभिमानाने भरून आला, ते शब्दात सांगणे अशक्य आहे. पृथ्वीराज बाबांना त्याची कल्पना नसावी. राज्यातील सरकार, तिथले मुख्यमंत्री वा मंत्री यांचा राजशिष्टाचारातून कसा सन्मान करायचा, त्याचा हा दाखलाच. कॉग्रेसचा मुख्यमंत्री वा मंत्री असतो, त्याला असे पायाशी बसवणे, याला राजशिष्टाचार म्हणतात ना? यातले काही नरेंद्र मोदींना पंतप्रधान होऊन ठाऊक नाही, की मुख्यमंत्री असून पृथ्वीराज बाबांना माहित नाही. त्यामुळेच नवी मुंबई वा सोलापूरचे कार्यक्रम छान पार पडले होते. कुठे काही तक्रार नव्हती. पण अकस्मात दिल्लीहून फ़तवा आला आणि मोदी यांच्यापासून दूर रहाणे चव्हाणांना भाग झाले. त्यासाठी निमीत्त म्हणुन त्यांनी राजशिष्टाचार वा स्वाभिमानाचा मुद्दा बाहेर काढला. सामान्य गर्दीने दोनचार घोषणा दिल्यावर मुख्यमंत्र्याचा अपमान झाला. मग बागवेनी राहुलच्या पायात चपला सरकवणे वा अशोक चव्हाणांनी ताटकळत बसणे, कुठल्या राजशिष्टाचाराची व्याख्या असते? दोन दिवस यावरून खुप उहापोह चालला आहे. पण नेत्यांपासून पत्रकारांपर्यंत कुणालाच रमेश बागवे व अशोक चव्हाण सन्मान समारंभाची आठवण झालेली नाही. किती गमतीशीर गोष्ट आहे ना? यालाच खरा राजशिष्टाचार म्हणतात.

सत्याचा बळी देऊन सनसनाटी माजवण्यासाठी सोयीनुसार तपशीलाची लपवाछपवी, म्हणजे आजकाल राजशिष्टाचार होऊन बसला आहे. त्यात पंतप्रधानाने इकडेतिकडचे दोन शब्द बोलले, तरी मुख्यमंत्र्याचा घोर अपमान होतो. पण मंत्री मुख्यमंत्री घरगड्यासारखे, गुलामासारखे अपमानित कामासाठी राबवले जातात, त्याला राजशिष्टाचार मानायची ही पद्धत झाली आहे. समारंभात मोदी नावाच्या घोषणा झाल्या तरी अपमान होतो आणि त्यामागे भाजपाचा हात असतो. पण जिथे भाजपा वा मोदींचा संबंध नाही, त्या आसाममध्ये मुख्यमंत्र्यावरच लोक दगडफ़ेक करतात, त्याला कोणता राजशिष्टाचार म्हणायचे? हुड्डा वा चव्हाणांना लोकांनी हुर्यो केल्याने संताप आलेला आहे. मग त्यांच्याच वर्गातले तरूण गोगोई म्हणूनच अपमानाची भरपाई करायला गोळ्या झाडत सुटले काय? कॉग्रेसच्या मुख्यमंत्र्याचा लोक अपमान करीत नाहीत, तर लोक त्यांच्या स्वागताला उतावळेच झालेले असतात ना? आसाममध्ये त्याचीच प्रचिती आलेली आहे. तिथे गोगोई यांच्यावर हल्ला करायला कोणी सुपारी दिली होती? तिथे लोक असे कशाला वागले? लोकसभा निवडणूकीतल्या पराभवानंतर त्याचे आत्मपरिक्षणही कॉग्रेस करू शकलेली नाही. ते केले असते तर मुख्यमंत्र्यांची भर कार्यक्रमात हुर्यो कशाला उडवली जाते, त्याचे आकलन झाले असते. मग शिष्टाचाराच्या मागे तोंड लपवावे लागले नसते. तुमच्या कारभाराने व दिवाळखोरीने लोक इतके संतापले आहेत, की कोणी हुर्यो करण्याची सुपारी देण्याची गरज उरलेली नाही. लोक त्यासाठी उतावळे झालेले आहेत. तो राग नुसत्या एका मुख्यमंत्र्याच्या विरोधातलाही नाही. जेव्हा आपल्या लाचार व लाळघोट्या मुख्यमंत्र्याचा अपमान लोक बागवे वा अशोक चव्हाणांच्या अनुभवातून गिळत असतात, तेव्हा त्यांना मोदींसारखा अभिमानाने मोठे अधिकारपद मिळवणारा नेता स्पुहणीय वाटतो आणि लाचारांचा धिककार करायची अनिवार इच्छा आवरता येत नाही. जितक्या लौकर कॉग्रेसला हे समजेल, तितक्या लौकर त्या पक्षाचे पुनरुज्जीवन होऊ शकेल

No comments:

Post a Comment