Sunday, August 24, 2014

अनंतमुर्तिंच्या मृत्यू निमीत्ताने

(अनंतमुर्तिंच्या मृत्यू निमीत्ताने -लेखांक पहिला)


दाभोळकर स्मृतीदिन व पाठोपाठ अनंतमुर्ति यांच्या निधानानंतर एक नव्या प्रकारची जाचक सभ्यता आपल्यावर लादली जाते आहे. असे लक्षात आल्याने अशा बाबतीत अनुत्तरीत रहाणार्‍या विषयाना नव्याने हात घालण्याची मला गरज वाटली. दोन आठवडे सभ्यपणा म्हणून मी त्याबद्दल बोलायचे टाळत होतो. पण आधी यातलाच एक दिवटा मला अर्धी चड्डी शिवायचा सल्ला देऊन गेला. मग दोघांनी मला आणखी आपल्या अर्धवट निर्बुद्धतेचे डोस पाजायचा आगावूपणा केला. असल्या गोष्टी एका मर्यादेपर्यंत काणाडोळा करून झटकता येतात. पण यामुळे आगावूपणा करणार्‍यांना स्फ़ुरण चढत असेल, तर त्यांना त्यांची जागा दाखवून देणे अगत्याचे होऊन जाते. कारण अशी माणसे कितीही सभ्यता व सुसंस्कृतपणाचे मुखवटे लावून मिरवत असली, तरी ती सभ्य नसतातच. पण बुद्धीमानही नसतात. त्यांचा शहाजोगपणा वेळीच उतरवला नाही, तर त्यांना आपण जगातले महान तत्ववेत्ते झाल्याची झिंग चढण्याचा धोका संभवत असतो. तर तोच धोका टाळण्यासाठी असल्या कृत्रिम सभ्यता व कृत्रिम असभ्यतेचे सांगोपांग पोस्टमार्टेम करायचा विचार आहे. कुठून सुरूवात करावी?


‘समाजात जेव्हा एखादा वरिष्ठवर्ग अभिजनवर्ग असतो तेव्हा त्याचे सदस्य एकमेकांशी वागताना अतिरेकी सभ्यतेचे संकेत पाळताना आढळतात. त्याची उलट बाजू अशी की, या वर्तुळाबाहेरच्या व्यक्तीशी, कनिष्ठ व्यक्तीशी वागताना, ते जाणूनबुजून असभ्यरितीने वागतात. सामाजिक समतेच्या दिशेने वाटचाल करताना या कृत्रिम सभ्यतेवर आणि कृत्रिम असभ्यतेवर आघात करावेच लागतात. अधिकाधिक व्यक्तींना सभ्यतेच्या परिघात आणावे लागते आणि कृत्रिम सभ्यपणा अधिक सुटसुटीत करावा लागतो. या प्रक्रियेत एकेकाळी असभ्य मानल्या गेलेल्या वागण्याच्या रिती सभ्य म्हणून स्विकारल्या जातात. पण याचा अर्थ असा नव्हे की, सभ्यतेचा दंडकच झुगारून देण्यात आलेला असतो. समाजातील व्यक्ती एकमेकाची कदर करीत, सामंजस्याने, सुसंवादाने एकत्र राहायचे असले तर समाजात सभ्यतेचे दंडक असावेच लागतील. समाजात असे दंडक आहेत याचा अर्थच असा की, समाजातील बहुसंख्य माणसे बहुसंख्य प्रसंगी ते दंडक पाळतात. शिवाय याचा अर्थ असा की, जबाबदारीने वागणारा माणूस हे सर्व दंडक प्रसंगी पाळायचा सतत प्रयत्न करीत असतो.’
(प्रा. में पुं रेगे.- ‘नवभारत’ जाने-फ़ेब्रु १९९७)

उपरोक्त उतारा रेगे सरांच्या सतरा वर्षे जुन्या लेखातील आहे. तसे मोजक्या लोकांच्या हाती जाणारे हे द्वैमासिक होते आणि त्यातला सदरहू लेख निखील वागळे यांनी आपल्या ‘महानगर’ (शनिवार २२ मार्च १९९७) आणि कुमार केतकर यांनी आपल्या ‘महाराष्ट्र टाईम्स’ (रविवार २३ मार्च १९९७) दैनिकांत अगत्याने पुनर्मुद्रित केला होता. त्याचेही खास कारण होते. तेव्हा रमेश किणी प्रकरण खुप गाजत होते आणि त्यातून शिवसेना भाजप युतीच्या सरकारवर शरसंधान करण्याचे अतिशय सभ्यतेचे कार्य जोरात चालू होते. त्याच संदर्भात माध्यमांनी ठाकरे विरोधात जी आघाडी उघडली होती, त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची दैनिक ‘सामना’मध्ये एक प्रदिर्घ मुलाखत प्रसिद्ध झालेली होती. त्यात त्यांनी अत्यंत ‘रितीबाह्य’ शब्दात तात्कालीन लोकसता संपादक डॉ. अरूण टिकेकर यांच्यावर झोड उठवली होती. मग ठाकरे यांच्या त्या भाषेचे पोस्टमार्टेम रेगे सरांनी आपल्या त्या प्रदिर्घ लेखातून केलेले होते. त्यात त्यांनी सभ्यता, तिच्यात होणारा क्रांतिकारक बदल, त्या सभ्यतेचे नियमन करणारा समाजातील स्वयंघोषित सभ्यतारक्षक अभिजन वर्ग आणि असभ्य चालीरिती वा वर्तनशैलीचा मोठा उहापोह केलेला होता. बाळासाहेबांना ज्यांनी कायम शिवराळ ठरवण्यात धन्यता मानली, त्यांनी मग अशा मासिकातील लेखाचे पुनर्मुद्रण केले नसते तरच नवल. म्हणूनच अभिजन नसतानाही आमच्यासारख्या सामान्य वाचकाला हे अभिरुचीपुर्ण लेखन वाचता आले. अर्थात केतकर किंवा वागळे त्या किणी सोबतच रेगे यांच्या त्या सभ्यतेच्या व्याख्येला कधीच विसरून गेलेत. मग त्यांच्या गोतावळ्यातील कुणाला असले काही स्मरण्याचा प्रश्नच कुठे येतो? सहाजिकच आज दाभोळकर हत्या किंवा यु आर अनंतमुर्ति मृत्यू संबंधाने जो सभ्यतेचा गदारोळ उठला आहे, तेव्हाही त्यातल्या कुणाला रेगे वा त्यांचा उहापोह आठवण्याची अपेक्षा करता येईल काय?

अनंतमुर्ती यांच्या साहित्यिक कर्तबगारीचा विषय बाजूला ठेवून त्यांच्या मृत्यूनंतर उठलेल्या वावटळीकडे बघूया. त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर कर्नाटकात कुणा हिंदूत्व संघटनेच्या मंडळींनी फ़टाके वाजवल्याची बातमी आहे आणि मग त्याचे निमीत्त करून संघ परिवार किंवा भाजपा व मोदी यांच्यावर दुगाण्या झाडण्याची एक अभिजात स्पर्धा तात्काळ सुरू झालेली आहे. असे जे कोणी अभिजात लोक समाजात आहेत, त्यांच्याविषयी उपरोक्त परिच्छेदात रेगे सरांनी एक मर्मभेदी विवेचन केलेले आहे. गेले दोन दिवस ह्या संतप्त प्रतिक्रिया वाचल्या आणि बघितल्यावर अशा सभ्यता रक्षकांचेही चरित्र तपासून घेण्याचा मोह मला आवरला नाही. यातली सभ्यता, सुसंस्कृतपणा, अभिजन, अभिजात संस्कृती, तिचा उदभव किंवा अभिजनांच्या चालीरिती, वर्तनशैली इत्यादीचा उहापोह आवश्यक आहे. असे प्रामाणिकपणे वाटल्यानेच ‘उलटी बाजू’ समोर आणायचा मोह आवरला नाही. रेगे सर त्याची उलटी बाजू नेमकी सांगतात. किंबहूना सभ्य आणि असभ्य यांच्या व्याख्या व वर्तन त्या शब्दांच्याली पलिकडे कसे बदलून गेले आहे, त्याची ग्वाही देतात. अलिकडल्या काही घटनांच्या संदर्भात अशा सभ्यतेला तपासून बघण्याची निकड अनेकांना वाटत असेल. पण समाजाल्या अशा प्रतिष्ठीत वरीष्ठ मान्यवर अभिजनांच्या वाट्याला जायचे धाडस कोणी करायचे असा प्रश्न असतो. झाकलेल्या त्या सभ्य सुसंस्कृतपणाचा मुखवटा थोडा बाजूला करून खरा हिडीस चेहरा समोर आणायलाच हवा असे तीव्रतेने मला व्यक्तीश: वाटले, कारण त्यातल्या काहींनी अकारण माझीही कुरापत काढायचा आगावूपणा केला आहे. ज्यांच्यावर असभ्य वागण्याचे आरोप सभ्य लोकांकडून चालू आहेत, त्यांच्या स्वत:च्या सभ्यतेचा पुरावा काय? (अपुर्ण)

3 comments:

  1. bhau mansanni nehmi satyanisht asave ! vicharnisht manase etaranchya matancha nit vichar karuch shakat nahit karan tyanchyavar eka vishista vicharancha pagada fit baslela asto te swatantrapane swata vichar karu shakat nahit

    ReplyDelete